अनोखी गाठ  भाग २५     # मराठी _ कादंबरी 

---------

अनोखी गाठ  भाग २५     # मराठी _ कादंबरी 

© आरती पाटील

( मागच्या भागात आपण पाहिलं की, कावेरीने हिशोब वहीत घोळ असल्याचे सांगितल्यावर , महादेवराव (कावेरीचे पती ) पुन्हा हिशोब वही तपासतात. त्यांना त्यात घोळ सापडतो. ते चिडून बाहेर जाणार तोच कावेरी अडवते आणि संयमाने निर्णय घ्यायला सांगते. दुसऱ्या दिवशी सासूबाईंना आपला मुलगा अजून घरी आहे हे पाहून नवल वाटत आणि त्या याबद्दल कावेरीला विचारतात. कावेरी म्हणते रात्री ते उशिरापर्यंत काम करत होते म्हणून कदाचित त्यांना आज उशीर झाला. महादेवरावांनी भाऊराव आणि त्यांचे वडील महादेव काका यांना निरोप पाठवून बोलावून घेतले आणि आई - वडील व बाकी उपस्थित सर्वांसमोर झालेला प्रकार ठेवला. भाऊराव आता प्रकार उघडकीस आल्यामुळे घाबरले होते आणि क्षमा मागत होते. कावेरीची सासरे खूप चिडले होते. फसवणुकीचा खटला करू इतपत म्हणाले ते. कावेरीने इशाऱ्याने नवऱ्याला थांबायला सांगितले. महादेवरावांनी त्या दोघांना उद्या यायला सांगितलं. आता पुढे ......... )

आजी आपली गोष्ट पुढे सरकवत होती," रात्री 'हे' आले आणि मला विचारलं," मला तू थांबवत का होतीस ?" त्यांना मी म्हणाले," तुमच्या किंवा आपल्या घरच्यांच्या हातून पाप घडू नये म्हणून." हे ऐकून त्यांनी चमकून माझ्याकडे पाहिलं. त्यांनी माझ्याकडे पाहिले आणि म्हणाले ," पाप ?" मी म्हणाले ," हो , पाप . "  

" एक मिनिट पणजी आजी , एकच मिनिट ." जानकी कावेरी आजीला मध्येच थांबवत म्हणाली. सर्वजण तिज्याकडे पाहतात," आजी हिशोब वहीत घोळ त्यांनी केला. त्यांना शिक्षा झालीच पाहिजे मग तू आजोबांना असं का म्हणालीस की ' तुमच्या हातून पाप होऊ नये म्हणून अडवलं ? ' गुन्हा केलेल्या माणसाला शिक्षा दिल्याने पाप लागतं का ?" जानकीने एका दमात सर्व विचारलं. आजी हसून जानकीने कडे पाहत होती आणि बाकी सर्व आजीकडे. आजी तिचं डोकं मांडीवर घेते आणि केसांवरून हात फिरवत म्हणते," बाळा, शिक्षा गुन्हा करणाऱ्याला दिली पाहिजे , ज्याने गुन्हा केला नाही त्यांना शिक्षा मिळाली तर ? अन्याय होईल ना तो ? " जानकी न कळलेले भाव चेहऱ्यावर ठेवून आजीकडे पाहते आणि म्हणते," म्हणजे गं आजी ?"  आजी म्हणते," मी माझी गोष्ट पुढे नेते , त्यात तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळेल.

" आजी पुढे बोलायला सुरुवात करते," त्यांनी माझ्याकडे पाहत विचारलं ," पाप? कावेरी तू काय बोलतेयस ? आपण त्यांनी आपली फसवणूक केली म्हणूनच शिक्षा करायचं म्हणतोय ना ? मग ते पाप कसं ?" त्यांना पलंगावर बसवलं आणि बोलायला सुरुवात केली," अहो , आता बघा , भाऊरावांच्या अनेक पिढ्यांनी आपल्याकडे इमाने - इतबारे चाकरी केली. तुम्ही, सासूबाई- आबा सगळेच हि गोष्ट मान्य करतील. हा आता भाऊरावांनी आपली फसवणूक केली ही गोष्ट खरी. पण त्यासाठी शिक्षा अशी हवी जेणे करून भाऊरावांना शिक्षा होईल इतर कोणाला नाही." ते म्हणाले," कावेरी तू काय बोलतेयस मला काही कळलं नाही."  मध्येच जानकी, स्वाती आणि समीरा एकत्र म्हणतात," आम्हाला पण नाही कळलं नाही." त्यांचं एकसुरात म्हणणं ऐकून आजीला आणि अभिषेकला हसू आलं. आजी पुढे बोलते," मी त्यांना सांगितलं. अहो, आपण त्यांना शिक्षा करणार म्हणजे सरकार दरबारी खटला चालणार किंवा पंचायतीमध्ये हा खटला जाणार. हा गुन्हा सिद्ध होणारच कारण आपल्याकडे पुरावे आहेत. भाऊरावांना शिक्षा होणार, शिवाय पंचायतीमध्ये किंवा सरकार दरबारी गुन्हेगार सिद्ध झालेल्या माणसाला किंवा त्याच्या कुटुंबाला समाजात कशी वागणूक मिळते तुम्हाला मी हे वेगळं सांगायचं का ? शिवाय आपल्यासारख्या मोठया जमीनदाराकडून खटला झाला म्हणून भाऊरावांना कोणी नोकरी देणार नाहीच पण त्यांच्या घरच्यांना सुद्धा कोणी नोकरी देणार नाही. त्यांच्या कुटुंबावर उपाशी मरण्याची वेळ येईल.  त्यांच्या घरी म्हातारे आई- वडील , लग्नाच्या मुली आहेत. त्यांच्याशी कोणी सोयरीक करणार नाही. घरादाराला आड जवळ करावा लागेल. " 

माझं बोलणं ऐकून ह्यांना आश्चर्य वाटलं. ते म्हणाले, " कावेरी रागाच्या भरात मी हा विचार केलाच नाही. शिक्षा फक्त गुन्हेगाराला झाली पाहिजे , बाकीच्यांना त्याची शिक्षा भोगावी लागली तर खरंच तू म्हणालीस तसं ' पाप' लागेल आपल्याला." मी त्यांना म्हणाले," तेच मी सांगण्याचा प्रयत्न करतेय. शांत डोक्याने निर्णय घ्या. " त्यावर हे म्हणाले, " कावेरी आता एवढं सगळं सांगितलंस तसं , भाऊरावांना काय शिक्षा द्यायची हे सुद्धा तूच सांग." हे ऐकून मात्र मी बावरले. मी त्यांना म्हणाले," मी....मी काय सांगणार ? कोणाला कधी शिक्षा केली नाहीये मी. मलाच अनेकदा शिक्षा झालीये. मी काय सांगणार? ते तुम्हीच बघा. " मला असं बावरले पाहून ह्यांनी मला बाजूला बसवलं आणि म्हणाले," कावेरी असं वागून चालणार नाही. तू आज असं म्हणतेस ठीक आहे पण आज ना उद्या वाड्याचा कारभार सांभाळावा लागणार आहे तूला. तेव्हा काय करशील ? तुला काय वाटतं माझी आई कडक राहते त्याला काय कारण असेल ? अगं एवढा मोठा वाडा , त्यात अनेक नोकर माणसं , सालगडी, आय- बाया , व्यवहार, पै- पाहुणा हे सर्व सांभाळणं सोप्प आहे ? कडक राहावं लागतं. हा आता कोण कोणती पद्धत वापरत ही वेगळी गोष्ट आहे पण परिस्थितीनुसार निर्णय तुला उद्या घ्यावे लागले तर काय करशील ? " मी त्यांच्याकडे पाहत होते. ते पुढे म्हणाले," ही तुझी रंगीत तालीम समज. तूला ठरवायचं आहे , भाऊरावांना काय शिक्षा द्यायची आहे. तू काय शिक्षा द्यायची विचार कर आणि मला सांग. तोपर्यंत तुला आज काय शिकवायचं ते मी पाहतो. आणि हो , तू भाऊरावांना काय शिक्षा द्यायची हे सांगितल्यावरच आज तुझा अभ्यास सुरु होईल." असं म्हणून ते कपाट उघडून पुस्तके पाहत होते. 

मी त्यांच्याकडे पाहत होते. मनोमन मी देवाचे आभार मानत होते. देवाने लाखात एक नवरा दिला आहे मला. जो फक्त माझ्या मनाचा विचार करत नाही, जो फक्त माझ्या सुखाचा विचार करत नाही तर मी एक कणखर व्यक्ती बनून पुढे कशी येईल ? याचा ही विचार करतो. तो काळ असा होता , जिथे नवरा बोलत असताना मध्ये बोललं तर कानाखाली बसायची, माहेरी पाठवलं जायचं. जिथे कधी नवरा आपल्या बायकोला 'तू जेवलास का ? ' हे सुद्धा कधी विचारत नव्हता, जिथे त्यावेळी पुरुषाचं म्हणणं ' बायकांनी फक्त चूल आणि मूळ सांभाळावं .' असं होतं. त्यावेळी 'हे' मला पूर्ण रूपाने सक्षम करण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होते. आमच्या वयात जवळपास २० वर्षाचं अंतर होतं. त्यांनी ते मला आमच्या मैत्रीच्या नात्यात कधीच जाणवू दिल नाही. सरस्वती ताई बरोबर बोलतात ,' कावेरी तू भाग्यवान आहेस म्हणून तुला भाऊजींसारखा नवरा मिळाला.' लग्न आगळं - वेगळं , नवरा सुद्धा आगळा - वेगळाच भेटला मला. देवाने ही अनोखी गाठ स्वर्गात बांधताना माझा पुरेपूर विचार केला होता हे नक्की. 

त्यांनी माझ्यावर एवढा विश्वास दाखवला म्हणून मी शुद्ध भाऊरावांना नक्की काय शिक्षा द्यावी याचा विचार करत होते. काही वेळाने मला त्यांना काय शिक्षा द्यायची हे सुचलं आणि ते मी ह्यांना सांगितलं. त्यांना मी सांगितलेली शिक्षा योग्य वाटली. ते माझ्या निर्णय क्षमतेवर खुश होते आणि त्यानंतर त्यांनी माझ्या अभ्यासाला सुरुवात केली. 

सकाळी भाऊराव आणि महादेव काका यायच्या आधी ह्यांनी माझ्यामार्फत घेतलेला निर्णय त्यांचा म्हणून सासूबाई आणि आबांबरोबर मांडला. सर्वबाजू पटवून देत ही शिक्षा योग्य आहे हे पटवून दिल आणि एवढ्या वर्षाचे काम लक्षात घेता सासूबाई आणि आबांनी ते मान्य केलं. थोडया वेळाने भाऊराव आणि महादेव काका मान खाली घालून आत आले. कठोर शिक्षा होणार हे गृहीत धरलं होतं त्यांनी. कालपासून बहुतेक जेवणही केलं नव्हतं त्यांनी. त्यांचे चेहरे उतरले होते. महादेव काका आबा आणि ह्यांच्या समोर आले आणि म्हणाले, " अन्नदाता माय - बाप , तुमच्यामुळे आमच्या अनेक पिढ्यांची पोट भरली. सुख - समाधान तुमच्याचमुळे घरात राहिलं. भाऊने जे केलं ते चुकीचं आहे , नव्हे तर गुन्हाच आहे. त्यासाठी तुम्ही हवी ती शिक्षा द्या. मला तर शिक्षा तेव्हाच मिळाली जेव्हा कळलं की भाऊने असं फसवणुकीचं काम केलं आहे. आमच्या अनेक पिढ्यांनी कमावलेली इज्जत याने घालवली. मी तुम्हांला कोणतही कारण देऊन भाऊला माफ करा असं म्हणणार नाही. त्याला शिक्षा झालीच पाहिजे नाहीतर पुढच्या पिढीवर तेच संस्कार होतील."   असं म्हणून महादेव काका  बाजूला झाले. 

महादेव काकांचं कळकळीच बोलणं ऐकून सगळ्यांनाच वाईट वाटलं. आयुष्यभर कमावलेलं सर्व म्हातारपणात मुलामुळे गमावल्याची खंत त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. भाऊराव तर मान खाली खालूनच उभे होते, काहीही बोलले नाहीत. मग ह्यांनी बोलायला सुरुवात केली," महादेव काका , तुमच्या अनेक पिढ्यानी इमानदारीने हिशोब खाती सांभाळली म्हणून तर आम्ही कधी त्यात लक्ष घातलं नाही. आज जर भाऊरावांवर खटला टाकला किंवा पंचायतीमध्ये बसवलं तर तुमच्या पूर्ण कुटुंबावर वाईट वेळ येईल. समाज नातं तोडेल, कोणी नोकरी देणार नाही , मुली -बाळींची लग्ने होणार नाहीत म्हणून तुमच्या अनेक वर्षांची सेवा लक्षात घेता, आम्ही फक्त भाऊरावांची लेखापालाची / मुनीमची नोकरी काढून घेत आहोत. कारण एकदा विश्वास उडालेल्या व्यक्तीवर काहीही झालं तरी पुन्हा विश्वास ठेवता येत नाही. भाऊरावांना शेतावर एका सामान्य मजुरासारखं काम करावं लागेल. घोळ झालेली रक्कम नक्कीच मोठी आहे तरीही काहीही जप्त करत नाही आहोत आम्ही. तसं केलं तरी समाजात बदनामी होईल तुमची. शेतावर काम करणं न करणं भाऊरावांवर आहे. त्याचीही आम्ही जबरदस्ती करणार नाही. " 

ह्यांचं बोलणं ऐकून महादेव काकांच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं. ते जोर - जोरात रडू लागले. म्हणू लागले," मालक तुम्ही थोर आहात. एवढं सगळं झालं तरी तुम्ही माझ्या घरच्यांचाच विचार केलात. तुमचे उपकार मी कधीच विसरणार नाही.  आज सगळं कुटुंब उध्वस्त होणार असं वाटलं होतं. गुन्हाच तसा केलं या माझ्या मुलाने. नातींची लग्ने बाकी आहेत. हीच मोठी चिंता होती मालक. पण देवाला जशी लेकराची चिंता असते तशीच मालकाला पण असते. नाहीतर एवढं झाल्यावरसुद्धा माझ्या कुटुंबाचा विचार का केला असता तुम्ही ? भाऊरावांचं माहित नाही पण मी उदयापासून शेतावर मजुरीसाठी येईन मालक."  महादेव काकाचं बोलणं ऐकून सासूबाई- आबांना ह्यांनी घेतलेला निर्णय योग्य वाटला. भाऊराव ह्यांच्या पायावर डोकं ठेवून म्हणाले," मालक एवढी छोटी शिक्षा नका देऊ. तुम्ही जे करताय त्यामुळे माझी आत्मग्लानी अजून वाढतेय. मला चाबकाने फोडा , घोडयाला बांधून सोडून द्या. पण मला शिक्षा द्या." असं त म्हणू लागले. त्यावर हे म्हणाले," हे बघा भाऊराव जी शिक्षा योग्य वाटली ती आम्ही दिली. आता पुढे काय करायचं ते तुम्ही ठरवा." भाऊराव उद्यापासून शेतावर मजुरी करण्यासाठी येणार हे कबूल करून गेले. स्वयंपाक घराच्या खिडकी मधून मी सर्व पाहत आहे , हे ह्यांना माहित होतं. सर्व गेल्यावर ह्यांनी माझ्याकडे पाहून एक हास्य केलं. त्यात रागात एक चुकीचा निर्णय घेण्यापासून वाचलो हा भाव जास्त दिसत होता. 

क्रमश.........

अनोखी गाठ भाग १    #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-1-marathi--kadambari_5839

अनोखी गाठ २  #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-2---marathi--kadambari_5870

अनोखी गाठ ३  #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-3---marathi--kadambari_5889

अनोखी गाठ ४  #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-4---marathi--kadambari_5986

अनोखी गाठ ५   #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-5---marathi--kadambari_6023

अनोखी गाठ ६   #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-6-marathi-kadambari-_6109

अनोखी गाठ ७  #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-7-marathi-kadambari-_6145

अनोखी गाठ ८   #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-8-marathi-kadambari-_6221


अनोखी गाठ ९     # मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-9--marathi--kadambari_6331

अनोखी गाठ   भाग १०

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-10---marathi--kadambari_6468


अनोखी गाठ भाग ११ # मराठी _कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-11-marathi-kadambari-_6943


अनोखी गाठ भाग १२ # मराठी _कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-12---marathi--kadambari_6979

अनोखी गाठ  १३  # मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-13---marathi--kadambari_7010

अनोखी गाठ भाग १४    #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-14---marathi--kadambari_7049

अनोखी गाठ भाग १५     #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-15---marathi--kadambari_7090

अनोखी गाठ भाग १६      #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-16----marathi--kadambari_7128

अनोखी गाठ भाग १७       #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-17---marathi--kadambari_7183

अनोखी गाठ भाग १८      #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-18---marathi--kadambari_7220

अनोखी गाठ भाग १९     #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-19---marathi--kadambari_7727

अनोखी गाठ भाग २०      #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-20----marathi-kadambari-_7806

अनोखी गाठ भाग २१    # मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-20--marathi--kadambari_7882

अनोखी गाठ भाग २२     # मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-bhag-22-----marathi-kadambari-_7930

अनोखी गाठ भाग २३       # मराठी _ कादंबरी 

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-23----marathi-kadambari-_7945

     

अनोखी गाठ भाग २४     # मराठी _ कादंबरी 

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-24---marathi--kadambari_7973

🎭 Series Post

View all