Login

अनोखी गाठ भाग १४    मराठी कादंबरी

---------

अनोखी गाठ भाग १४    #मराठी _ कादंबरी

© आरती पाटील

( मागच्या भागात आपण पाहिलं की, कावेरी आजी तिच्या लग्नाची गोष्ट आपल्या पतवांडाना सांगतेय. आपल्या आजीचा त्या काळी झालेला अपमान आजसुद्धा स्वाती, जानकी व सर्वांना त्रास देतोय. लग्न करून आलेली पण नवऱ्याचं अजून तोंडही न पाहिलेली, सून असून गृहप्रवेश न झालेली, लाडा कोडात वाढलेली आज एका अंधाऱ्या खोलीत झोपत होती. त्यात रखमा बाईंनी त्यांना थोरल्या मालकीण बाई भेटायला येत असल्याचं सांगितलं आणि १२ वर्षाच्या कावेरीचं धडधडणं वाढलं.... आता पुढे.....)

आजी पुढे बोलतात, " रखमा बाई मला थोरल्या मालकीण बाई येणार आहेत भेटायला. एवढं सांगून आपल्या कामाला निघून गेल्या. त्या अनोळखी घरात, रखमा सकट सर्व ज्या नावाला घाबरत होते त्या थोरल्या मालकीण बाई मला भेटायला येणार ऐकून माझी धडधड वाढली आणि मी स्तब्ध तिथेच उभी होते. तेवढ्यात माझ्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला आणि मी भीतीने अक्षरशः ओरडून मागे पाहिलं. " आजी हसत म्हणाली, " ती माझी आत्या होती. आता मला हसू येतंय पण त्यावेळी मी खरंच खूप घाबरले होते. आत्याने मला विचारलं काय झालं? मी सर्व सांगितलं. आत्या पण पटापट तयार होऊन बसली.

आम्ही दोघींही वादळापूर्वीची शांतता अनुभवत होतो. मनात अनेक प्रश्न होते जे कोणाला विचारू शकत नव्हतो. समोर अजून काय वाढून ठेवलंय माहित नव्हतं. त्या क्षणी असं वाटतं होतं की, महासागरात मला एकटीला एका छोट्याश्या नावेत बसून सोडून दिलंय.आत्या सोडल्यास सोबत कोणी नाही, लांब लांब पर्यंत किनारा दिसत नाही. असंच काहीसं सुरु होतं आयुष्यात. तेवढ्यात रखमा लगबगीने आत आली आणि म्हणाली, " मालकीण बाई, तुम्हाला भेटायला थोरल्या मालकीण बाई आल्या आहेत. " असं म्हणून ती मागे सरकली आणि दरवाजातून एक रुबाबदार व्यक्तिमतवाने प्रवेश केला. अंगावर सोन्याच्या जरीची नववारी, गळाभर दागिने, कपाळावर ठसठसित कुंकू, गोरा वर्ण, नारळा एवढा अंबाडा आणि त्यात सोन्याची फुले. मी त्यांना पाहिलं आणि पाहतच राहीले. थोडं वय वाटतं होतं पण खानदानी देखणं सौंदर्य खुलून दिसत होतं ते. मी आणि आत्या पटकन पुढे जावून पाया पडत होतो पण त्यांनी थांबवलं आणि खमक्या आवाजात बोलायला सुरुवात केली, " तुम्ही कोण, कुठल्या आम्हाला माहित नाही. आमच्या मुलाने तुमच्याशी का लग्न केलं ते देखील आम्हाला माहित नाही. पण आम्ही तुम्हाला स्वीकारू शकत नाही आणि आमच्या लेकाने तुम्हाला लग्न करून आणल्यामुळे परत जा असेही सांगू शकत नाही. तेव्हा तुम्ही या खोलीतच राहायचं. तुम्हाला जे हवं ते दिलं जाईल पण वाड्यात पाय ठेवायचा नाही. तुमचं लग्न ज्याच्याशी होणार होतं तो गेला. मला माझ्या घराची अवस्था तशी करायची नाहीये. त्यामुळे तुमचा पाय वाड्याला लागणार नाही याची काळजी घ्या. ही गोष्ट समजवायला आम्हाला पुन्हा यावं लागलं नाही पाहिजे. " एवढं बोलून त्या आल्या तश्याच परत निघूनही गेल्या. मी आणि आत्या बघतच बसलो आणि थरथरत पण होतो. त्याचा रुबाब आणि वागणं असं होतं की घाबरलो होतो आम्ही. "

" आजी एवढं असं ऐकून घेतलंस तू ? तू काय मुद्दाम केलं होतंस का? आणि तुला तुझं लग्न कोणाशी झालंय हे सुद्धा माहित नव्हतं तरी सुद्धा तुलाच बोल लावत होते सर्वजण? असं का? " समीराने सर्व प्रश्न एका दमातच विचारून टाकले.

आजी म्हणते, " हो बाळा, तुझं बरोबर आहे पण त्यावेळी असं विचारू शकतं नव्हतो आम्ही. विचारलं असतं तर संस्कार काढले असते माझे आणि माहेरच्या शिकवणीवर बोटं ठेवलं असतं. तसही मी त्यांच्या समोर बोलू शकलेच नसते. त्या गेल्या पण मला मात्र आता माझं आयुष्य अंधारात दिसत होतं. त्या खोलीत माझा जीव गुदमरतोय, तिथेचं राहावं लागणार या विचारानेच रडू येत होतं मला. मी आणि आत्या बराच वेळ तश्याच बसून होतो. थोड्या वेळाने रखमा बाई आल्या आणि म्हणाल्या, " मालकीण बाई तुम्हाला पाच परतावणीसाठी नेण्याला तुमचे चुलते आले आहेत. तुम्ही तयार व्हा. "

रखमा बाई गेल्यावर मी आत्याला बाजूला घेतलं आणि तिला सांगितलं, " आत्या इथे काय झालंय ते आपल्या घरी कोणालाही काहीही सांगायचं नाही. सर्व व्यवस्थित आहे असंच सांगायचं. " मी आत्याला नीट समजावलं होतं आणि हेच घरी सांगायचं हे निक्षुन सांगितलं. "

" आजी व्हेरी बॅड. अन्याय सहन करणं चुकीचं असतं ना ? आणि तू तुझ्या आतु ला पण तुझ्या घरी खोटं बोलायला सांगितलंस ? त्यांनी काहीतरी केलं असता ना. तुझा त्रास कमी झाला असता. " जानकी आजीकडे बघत म्हणाली.

आजी, " त्यावेळी ना बाळा, प्रत्येक आई लग्नाच्या वेळी आपल्या मुलीला एक शिकवण नक्की द्यायची की, सासरच्या गोष्टी माहेरी सांगायच्या नाहीत. आनंद वाटावा पण दुसरं काही नाही. सासरच तुझं घर आणि काहीही झालं तरी तुला तिथेच राहायचं आहे. असही मी जे आहे ते सांगितलं असतं तरी काय झालं असतं ? मला नीट वाग, त्यांना जिंकण्याचा प्रयत्न कर वैगेरे वगैरे सांगून पाठवलं असतं. त्यांना बोलायला नसते आले ते. हा मी गेल्यावर माझं टेन्शन नक्की घेतलं असतं. शेवटी मुलगी आहे त्या घरची. आठवण काढून, टेन्शन घेऊन घरच्यांनी स्वतःच्या जीवाला घोर लावून घेतला असता. त्यापलीकडे काहीही झालं नसतं.

वाड्या बाहेर बैलगाडी उभी होती. मी आणि आत्या मागच्या दाराने बैलगाडीमध्ये जावून बसलो. चुलते थोड्या वेळाने आले. आम्ही निघालो. ज्या परिस्थिती माझं लग्न झालं होतं त्यामुळे माझी चौकशी नक्की काय करावी हे चुलत्यांना कळतं नव्हतं. त्यांनी मला फक्त " बाळा कशी आहेस? " एवढंच डोक्यावर हात ठेवून विचारलं. त्यांचा मायेचा हात डोक्यावर पडल्यावर मला खूप भरून आलं होतं पण मोठ्या मुश्किलने मी माझे अश्रू परतवले होते. पूर्ण प्रवास शांततेतचं झाला.

घरी पोहचल्यावर सर्वजण लगबगीने पुढे आले. सर्वांच्या चेहऱ्यावरची चिंता स्पष्ट दिसत होती. आईने आणि आजीने माझ्या चेहऱ्यावरून हात फिरवला. घरी पाय ठेवल्यावर मला खुप बरं वाटत होतं. आईने पटकन पाणी आणलं आणि काकीने फराळ. मला खरंच खूप बरं वाटलं मायेच्या माणसात येऊन. सर्वांनी प्रश्नांचा भडीमार केला. चुलत्यांना सर्व विचारू लागले, घर कसं आहे ? माणसं कशी आहेत ? तिथे काही गोंधळ नाही झाला ना ? वगैरे वगैरे ....... चुलते म्हणाले, " मी गेलो तेव्हा त्यांचे लहान काका आणि जावईबापूचं सामोरी आले. लेकीच्या घरी काही खायचं - प्यायचं नाही म्हणून थोडा वेळ त्यांच्यासोबत बोलून लगेच निघालो. मला हायसं वाटलं, चुलत्यांना खरी परिस्थिती कळली नाही म्हणून. सर्वांनी मग मोर्चा आमच्याकडे ( माझ्याकडे आणि आत्याकडे ) वळवला. " घरचे कसे आहेत ? नीट वागतात ना? " मी सर्वांना सांगितलं, " सर्व चांगले आहेत. वागवतात पण चांगला. अजून सर्वांशी ओळख झाली नाहीये होईल हळूहळू. आत्या माझ्याकडे बघत होती. मी तिला डोळ्यांनीच शांत राहण्याचा इशारा केला. 

सर्वजण माझी काळजी घेत होते. मी सुद्धा पुढच्या एकटया आणि अंधाऱ्या प्रवासासाठी शक्य तितकं प्रेम स्वतःमध्ये साठवण्याचा प्रयत्न करत होते. दुसऱ्या दिवशी मला न्यायला माझा नवरा आला. ज्याला मी अजूनही पाहिलं नव्हतं. ते आले घरच्यांनी त्यांचा यथायोग्य पाहुणचार केला. मला जाण्यासाठी तयारी करायला सांगितली. मला परत नव्हतं जायचं. मला माझ्या आईच्या कुशीतच राहायचं होतं पण मी ते बोलू शकत नव्हते. तयारी करत होते आणि आसवेही गाळात होते. आई आत आली आणि मला मिठी मारली , तशी मी रडू लागले. हा प्रसंग प्रत्येक मुलीच्या आयुष्यात येतो. जो एकमेकांची किंमत सांगून जातो. 

यावेळी तरी मला माझ्या नवऱ्याचा चेहरा पाहता येईल असं वाटलं होतं पण तसं काहीही झालं नाही. मी मागच्या बैलगाडीत आणि हे पुढच्या. त्यामुळे तेव्हा ही मला त्यांना पाहता आलं नाही. पण एक गोष्ट लक्षात आली होती की माझा नवरा चांगला माणूस आहे. त्यांनी माझ्या माहेरच्याचा योग्य तो मान राखला होता. घरी पोहचल्यावर , वाड्यासमोर उभी असताना सासूबाईंचे शब्द मला आठवले. ' वाड्याला पाय लागू द्यायचा नाही.'  मी मागच्या दाराने माझ्या खोलीत प्रवेश केला. आधी आत्या तरी होती पण यावेळी माझी सोबत करायला कोणी नव्हतं. आता आयुष्य या खोलीतच जाणार असं वाटू लागलं होतं. मी खोलीत येऊन खोली आवरली, विहिरीवर जाऊन पाणी भरून ठेवलं. माझी जवळजवळ सर्व कामे झाली आणि मी हाताला काम नसल्यामुळे रिकामी झाले. ती रिकामी खोली आणि ती भयाण शांतता मला नकोशी वाटत होती. मी हतबल होते. संध्याकाळी रखमा बाई जेवणाची थाळ घेऊन आल्या. त्यांनी ती थाळ एका मालकिणीला दयावी त्याच अदबीने मला दिली. मला माझ्याच नशिबावर हसू येत होतं. माझ्याकडे रखमा बाईशी बोलण्यासारखं काहीच नव्हतं. रखमाबाईचं बोलू लागल्या," मालकीण बाई उद्या वाड्यात पूजा आहे. " मी विचारलं," कसली ?" त्यावर त्या म्हणाल्या," नवीन लग्न झालंय ना या वाड्यात , मग सत्यनारायण होणारच ना मालकीण बाई. असं काय विचारता ?" माझ्या लक्षातूनच गेलं होतं हे की लग्न झालं म्हणजे पूजा होणारच. मला खूप बरं वाटत होतं. रखमा बाई थाळ ठेवून गेल्या , पण जाता जाता एक छान बातमी सांगून गेल्या. उद्या पूजेसाठी तरी मला वाडयात घेतील असं वाटत होतं मला.

त्या भयाण खोलीत एकटं वाटत होतं पण उद्याच्या दिवसाची उत्सुकता देखील होती. रात्री त्या खोलीत पुन्हा भीती वाटू लागली. दिवे होते पण ते फक्त नावाला. त्या भीतीमुळे झोप लागले असे काही वाटत नव्हतं. बऱ्याच वेळाने पुन्हा तोच स्वर कानी पडला. जो या खोलीत असताना पहिल्या रात्री ऐकला होता. गीता शोल्क, भावगीत , कृष्ण आराधना त्या गोड आवाजात ऐकताना कधी झोप लागली कळलंच नाही. 

पहाटे लवकर उठून मी खोली स्वच्छ करून आणि माझं सर्व आवरून बसले होते. पूजेसाठी मला बोलवायला कोणीतरी येईल या आशेवर मी बसले होते. बऱ्याच वेळ झाला कोणी नाही आलं. माझी तगमग सुरु झाली. मी तिथल्या तिथे येरझाऱ्या घालत होते. वाट बघता बघता दुपारही टळून गेली. मी संकल्पसून काही न खाल्ल्यामुळे सुकून गेले होते. त्यात मला कोणी पूजेला कसं बोलवायला आलं नाही याचा विचार करून करून डोकं दुखत होतं. संध्याकाळची थाळ द्यायला रखमा बाई खोलीत आल्या. मी त्यांना प्रश्न विचारू लागले," रखमा बाई आज वाड्यात सत्यनारायण होतं ना ? मला कोणीच बोलवायला कसं आलं नाही ? " रखमा बाई म्हणाल्या, " मालकीण बाई माफ करा पण मला पण वाटलं होतं की पूजेला तुम्हांला बोलावतील पण थोरल्या मालकीण बाईंनी तुम्हाला वाडयात पाय ठेवू द्यायचा नाही असा चंगच बांधला आहे. धाकले मालक म्हणजे  तुमचे यजमान पण म्हणाले होते, तुम्हांला बोलवण्याबद्दल पण थोरल्या मालकीण बाईंनी काहीही ऐकलं नाही आणि धाकल्या मालकांना सुपारी बाजूला ठेवून सत्यनारायण करायला लावला. पूजा होऊन नैवेद्य दाखवेपर्यंत घरात बाकी कोणी जेवू शकत नाही त्यामुळे दुपारी तुम्हांला थाळ आणला नाही. " रखमाच बोलणं ऐकून माझी उरली- सुरली आशा देखील संपली होती. रखमा बाईनीकडून थाळ घेतली त्या गेल्या. मी दरवाजा लावून रडू लागले. हुंदके आवरता येत नव्हते मला. मी रडत असतानाच माझ्या खोलीच्या दरवाज्यावर टकटक वाजलं.......

क्रमश............   









अनोखी गाठ भाग १    #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-1-marathi--kadambari_5839

अनोखी गाठ २  #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-2---marathi--kadambari_5870

अनोखी गाठ ३  #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-3---marathi--kadambari_5889

अनोखी गाठ ४  #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-4---marathi--kadambari_5986

अनोखी गाठ ५   #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-5---marathi--kadambari_6023

अनोखी गाठ ६   #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-6-marathi-kadambari-_6109

अनोखी गाठ ७  #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-7-marathi-kadambari-_6145

अनोखी गाठ ८   #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-8-marathi-kadambari-_6221


अनोखी गाठ ९     # मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-9--marathi--kadambari_6331

अनोखी गाठ   भाग १०

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-10---marathi--kadambari_6468


अनोखी गाठ भाग ११ # मराठी _कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-11-marathi-kadambari-_6943


अनोखी गाठ भाग १२ # मराठी _कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-12---marathi--kadambari_6979

अनोखी गाठ  १३  # मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-13---marathi--kadambari_7010

0

🎭 Series Post

View all