अनोखी गाठ  १३  मराठी कादंबरी

--------------

अनोखी गाठ  १३  # मराठी _ कादंबरी.


© आरती पाटील

( मागच्या भागात आपण पाहिलं की, अभिषेक, स्वाती, समीरा आणि जानकी आजीसोबत गच्चीवर झोपायला जातात. तिथे समीरा आजीच्या लग्नाविषयी विचारते. आजी तिच्या लग्नाची अनोखी कहाणी त्यांना सांगत असते. १२ व्या वर्षी लग्न ठरतं पण लग्नाच्या दिवशी नवरदेव वरात आणताना दरोडेखोरांच्या हल्ल्यात मारला जातो आणि सर्व नवरदेवाकडची मंडळी आजीला दोष देत असतात. आता कावेरीचं कसं होणार असा प्रश्न सर्वांना पडला होता. घरातील मंडळीसुद्धा कोणी तिच्यावर चिडचिड करत होतं तर कोणी डोक्यावर पाणावल्या डोळ्यांनी हात ठेवत होतं. आता कावेरीचं आयुष्य माती मोल होणार असं वाटतं असतानाच तिचे मोठे काका आत येवून कावेरीला ( आजीला ) लग्नासाठी तयार करायला सांगतात. आता पुढे.........)


" आजी हे सर्व किती हॉरेबल आहे. असं कसं करायचे आधीचे लोक ? आधी तर बाल विवाह, त्यात नवरा कोण माहित नसायचं, त्यात आता अचानक असं तुझे काका येवून बोलून कसे गेले? तू तर विरोध केला असशील ना? तुझा सल्ला मागायला गावातले मोठे लोक पण येतात. तुझं किती चालत गावात मी बघितलं आहे ना. " जानकी.

आजी म्हणते, " नाही बाळा, मी विरोध करायचा प्रश्नच नव्हता. घराचे जे बोलतील ते करायचं असंच होतं त्या काळी.  आणि त्यात मी लहान होते. त्यामुळे जे मोठे सांगतात ते करत होते. आधीच झालेल्या गोंधळामुळे आणि अपशब्दांमुळे मी आतून खचले होते त्यात आता पुन्हा नव्या आनंदात लग्नाला उभी कशी रहाणार होते? सुकलेला चेहरा, खाली मान घालून मी, मला बोलावणं आल्यावर मांडवात गेले. चेहरा पूर्ण झाकला जाईल एवढा पदर घेतला होता. त्यात झालेल्या गोंधळामुळे आणि एकाची हळद लागलेली असताना दुसऱ्याशी विवाह होणारी मी पहिलीच. त्यामुळे संपूर्ण गाव लोटलं होतं हा अनोखा विवाह बघायला. एवढी माणसं होती की मी भीतीने वर सुद्धा बघितलं नव्हतं. लग्न लागलं आणि गावात चर्चेला उधाण आलं. " ' हे लग्न टिकेल का?' ' असं कधी लग्न असतं व्हय?' ' लग्न लागायच्या आधी एकाला खाल्लं, आता त्यांच्याशी लग्न झालं त्याचं काय होईल काय माहित? ' " अशी एक ना अनेक बोलणी माझ्या कानावर पडत होत्या. आधीच झालेल्या प्रकाराने भेदरलेली मी अजूनच घाबरून गेले. माझ्या पाठवणीची तयारी सुरु झाली पण मला कळतं नव्हतं की, घरचे माझं लग्न झालं म्हणून आनंदीत होते की मी त्या घरातून लग्न होवून जातेय त्यामुळे कमी बदनामी होईल म्हणून आनंदीत होते. मी त्यांना सोडून जातेय म्हणून दुःखी होते की झालेल्या गोंधळामुळे दुःखी होते? मला त्यांच्या भावना कळतंच नव्हत्या.

रडून रडून पाठवणीच्या बैलगाडीत बसले मी. कोणासोबत जातेय? माहित नाही. कुठे जातेय? माहित नाही. ज्याच्यासोबत लग्न झालं, तो नक्की कोण? माहित नाही.  अश्या संभ्रमात एक १२ वर्षाची मुलगी निघाली. तसं सोबतीला २-३ करवल्या असायच्या. आणि शक्यतो वयाने मोठ्याच असायच्या. वयाने मोठ्या करवल्या यासाठी पाठवल्या जायच्या जेणेकरून मुलीच्या सासरची ऐकून परिस्थिती ती येवून सांगू शकेल. त्यावरून पोरगी कशी नांदवली जाईल सासरी याचा एक अंदाज बांधता येत असे. अश्या परिस्थितीत कोणी मोठ्याने जावं असं कोणाला वाटतं नव्हतं. त्यामुळे माझी आत्या जी माझ्यापेक्षा २ वर्षांनी लहान होती. तिलाच माझ्यासोबत पाठवायचं असं ठरलं. आम्ही बैलगाडीत बसलो . गाडी कुठे जातेय? माहित नव्हतं पण जायचं होतं.  मनात भीती होती.

आमच्या पोहचण्याचा आधी जे झालं त्याची बातमी माझ्या सासरी पोहचली होती. वाड्याच्या बाहेर आम्ही पोहचलो तर तिथे गर्दी झाली होती. माझ्या सासरची लोकं बाहेरच उभे होते , तेही रागातच. मी आणि आत्या अजून बैलगाडीतच बसून होतो. जोरजोरात भांडणाचा आवाज येऊ लागला. " असं कसं तू त्या मुलीला लग्न करून घरी आणलंस ? ज्या मुलीने लग्नाआधीच ज्याच्यासी लग्न होणार होतं त्याला खाल्लं तर आता आपल्या घराण्याचं कसं होईल ?" दुसरा आवाज आला ," घरातल्या मोठ्यांना एकदा विचारावंस नाही वाटलं ? " तिसरा आवाज , " जिने घरात पाय ठेवण्यापूर्वी घरात भांडणाला सुरुवात झाली , तर पुढे घरात महाभारत घडेल. " एक ना अनेक आरोप माझ्यावर लागत होते. मला माझा दोष नक्की काय ? हे मात्र कळत नव्हतं. 

भांडणाचा आवाज वाढत होता. सर्वांनी मला घरात घ्यायला नकार दिला. मी फक्त रडत होते. मी घाबरले होते. माझ्यासोबत माझी आत्यासुद्धा रडायला लागली. आम्हाला संभाळून घेणारं कोणी नव्हतं. शेवटी वादाचा अंत होत नाहीये हे पाहून गावातील काही जुनी - जाणती माणसं माझ्या सासरच्या लोकांसोबत चर्चा करण्यासाठी बसले. हळूहळू आवाज कमी झाला. त्यानंतर वाड्यात काम करणारी एक वयस्कर बाई आमच्या बैलगाडीजवळ आली आणि म्हणाली, "  माझ्या मागे या." आम्ही बैलगाडीतून उतरून त्यांच्या मागे जाऊ लागलो. असं वाटत होतं की सर्वांच्या नजर फक्त मलाच बघत आहेत. त्या आम्हाला वाड्याच्या मागच्या बाजूला घेऊन गेल्या. एका खोलीकडे बोट दाखवलं आणि म्हणाल्या," तुम्हाला इथे या खोलीतच राहायचं आहे. थोड्यावेळाने मी तुम्हाला जेवायला आणून देते. " असं म्हणून त्या बाई निघून गेल्या. त्या खोलीत प्रवेश केला तर माझ्या डोळ्यात पाणी दाटून आलं. खोलीत मोठी होती पण खूप भीतीदायक दिसत होती. त्या खोलीच्या भिंती काळसर झाल्या होत्या. खोली स्वच्छ होती पण ती लहान मुलीला राहण्यासाठी नक्कीच योग्य नव्हती. माझ्या आईने, काकीने मला लग्नाच्या आधी सांगितलं होतं की सासरी जाशील तेव्हा दरवाज्यात पायली किंवा माप धान्यांनी भरलेलं असेल ते उजव्या पायानेच आत हलकेच ढकलायचे वगैरे..... पण तसं काही झालंच नाही. लग्न लागेपर्यंत नवऱ्यामुलीने उपवास करायचा असतो म्हणून मी उपवास धरला होता. तो सुद्धा अजून सोडला नव्हता. मला सपाटून भूक लागली होती. पण मागायचं कोणाकडे ? माझी अवस्था खूपच बिकट झाली होती. आता तरी आत्याची साथ आहे. उद्या आत्या गेल्यावर माझं या खोलीत कसं होणार ? या विचारानेच मला कापरे भरत होते.  मी आणि माझी आत्या तिथे तश्याच बसून होतो. बऱ्याच वेळाने त्याच बाई आत आल्या. त्यांनी काही अंथरून , झाडू, पाण्याचं मडकं असं काही काही सामान आणलं आणि मला दिलं. मी आणलेले माझे कपडे माझ्याकडे होतेच. सर्व खोली मी आणि आत्याने मिळून एकदा स्वच्छ केली. बाहेरच्या विहिरीवरून पाणी आणलं आणि दोघीही घळाघळा पाणी प्यायलो. खूप वेळेपासून उपाशी आणि तहानलेली होतो आम्ही. " 

हे ऐकताना स्वाती, समीरा, जानकी आणि अभेशेकच्या डोळ्यात पाणी आलं. जानकी डोळ्यातलं पाणी पुसत म्हणाली, " असं कसं वागू शकतात लोकं. किमान लहान वयाचा तरी विचार करायचा." 

आजी जानकीकडे हसून बघते. आणि पुढे म्हणते," बाळा , जे माझ्या नशिबात लिहिलं होतं , ते घडत होतं. असो..... थोड्यावेळाने त्या बाई आमच्यासाठी जेवणाची दोन ताट घेऊन आल्या. ताटात फक्त भाजी आणि भाकरी होती. नवी नवरी आणि तिच्या ताटात फक्त भाजी आणि भाकरी. त्यावेळी एवढी भूक लागली होती की जे समोर आहे ते महत्वाचं.  आम्ही पूर्ण ताट संपवलं आणि बाहेर विहिरीवर जाऊन भांडी स्वच्छ करून ठेवली. जमेल तशी खोली लावण्याचा प्रयत्न आम्ही केला.  संध्याकाळ टळून गेली होती. त्यामुळे खोलीत आता अंधार जाणवत होता. मला आणि आत्याला दोघीनांही आता भीती वाटू लागली. एकतर भयावह खोली, त्यात अंधार. दोघीजणी कसातरी एकमेकांचा हात धरून बसलो. काही वेळाने त्याच बाई दोन दिवे घेऊन आल्या आणि आमचा जीव भांडयात पडला. खोलीत थोडा का होईना प्रकाश तर झाला. आम्हाला घरी आई- काकू , आजी सोबत झोपायची सवय होती. इथं आम्ही आल्यापासून त्या वाड्यात काम करणाऱ्या बाई सोडल्या तर कोणाला पाहिलं सुद्धा नव्हतं. आम्ही दार बंद केलं आणि गोधडी टाकून एकमेकींचा हात धरून झोपायचा प्रयत्न करू लागलो. झोप आमच्यापासून खूप लांब होती. एक तर नवीन जागा, त्यात मोठं कोणी सोबत नाही. मोजका प्रकाश असलेली खोली. डोळ्यात झोप नव्हती, पण डोळ्यात पाणी मात्र नक्कीच होतं. थोडया वेळाने बाजूच्या खोलीमधून जपाचा मधुर आवाज येऊ लागला. त्यानंतर कृष्णवरचं सुरेख भावगीत. आमच्या मनातली भीती थोडी कमी होऊन त्याजागी प्रसन्नता जाणवू लागली आणि नंतर कधीतरी आम्हाला झोप लागली. 

पहाटे गार वाऱ्याने लवकरच जाग आली. मी उठून बाहेर आले. बाहेर लगबग सुरु होती. अंघोळीसाठी पाण्याचा बंब सुरु होता. सालगडी पाणी भरणे, झाडावरचे ताजे फळ आणि फुल काढणे, तर कामासाठी ज्या बायका होत्या त्या सडा सारवन करणे, दळण दळणे इत्यादी कामे करत होत्या. मी दरवाज्यामध्ये उभी राहून त्यांच्याकडे बघत होते अणि ते सर्व चोरून - चोरून माझ्याकडे बघत होते.  ती लगबग, तो कामाचा वावर पाहून मोठ्या घरात आहोत आपण याची खात्री झाली. कालपासून मला जेवण आणून देणाऱ्या, दिवा आणणाऱ्या त्या बाई मला पुन्हा दिसल्या मी त्यांना ' काकी ' असा आवाज दिला. त्या कावऱ्या - बावऱ्या झाल्या आणि लगबगीने इकडे- तिकडे बघत माझ्याकडे आल्या.  त्या थोडया घाबरून म्हणाल्या, " मालकीण बाई, असं 'काकी ' म्हणून पुन्हा कधी आवाज देऊ नका. रखमा नाव आहे माझं. नावानेच आवाज द्या मला." मला कळत नव्हतं त्या असं का म्हणाल्या. मी विचारलं त्यांना, " पण तुम्ही माझ्यापेक्षा वयाने मोठ्या आहात ना ? मग मी तुम्हाला नावाने का आवाज देऊ ?" त्यावर त्या म्हणाल्या, " काहीही झालं तरी तुम्ही धाकटया मालकीण बाई आहात. थोरल्या मालकीण बाईंनी ऐकलं तर माझी खरडपट्टी निघेल. तेव्हा कृपा करा पण मला नावानेच हाक मारा." त्या माझ्या समोर हात जोडून म्हणाल्या.    त्यांनी माझ्यासमोर हात जोडल्याने मला कसंतरीच वाटलं. तरी मी 'बरं ' असं आणि एवढंच म्हणाले. त्या मला म्हणाल्या , " काय काम होतं बाईसाहेब ?" हे ऐकून मला खुप अवघडल्यासारखं झालं. मी फक्त ,"मला न्हाणीघर कुठे आहे तेवढं सांगा." एवढंच म्हणाले. त्यांनी मला न्हाणीघर दाखवलं आणि गरम पाणी आणून दिलं. मी माझं न्हान आटोपून आले. देवघर माहीत नव्हतं. शिवाय मला अजून त्या घरात घेतलं आहे की नाही माहित नव्हतं , त्यामुळे मी सूर्यनारायणाला हात जोडले. त्यावेळी कोणीतरी माझ्याकडे पाहून हसत असल्यासारखं वाटलं. मी मागे फिरून पाहिलं तर दोन २ -३ छोटी मुलं मला पाहून हसत होती आणि मी त्यांच्याकडे पाहिलं की तिथून पळत होते. ते पाहून मला गंमत वाटली. कारण माझ्या घरी हे नेहमी सुरु असायचं. या वाडयात आल्यापासून मनाला जाणवलेला हा दुसरा गारवा होता. पहिला रात्री ऐकलेलं ते जप अन भावगीत. मी त्या मुलांकडे जाणार तोच 'रखमा बाईंनी ' मला आवाज दिला.  त्या माझ्या जवळ येऊन म्हणाल्या," मालकीण बाई कुठे जाऊ नका. थोरल्या मालकीण बाई तुम्हांला भेटायला येणार आहेत. " थोरल्या मालकीण बाई म्हणजे नक्की कोण ? आणि पुढे काय घडणार ? या विचारानेच मला धडधडायला लागलं.......

क्रमश ....................

अनोखी गाठ भाग १    #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-1-marathi--kadambari_5839

अनोखी गाठ २  #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-2---marathi--kadambari_5870

अनोखी गाठ ३  #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-3---marathi--kadambari_5889

अनोखी गाठ ४  #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-4---marathi--kadambari_5986

अनोखी गाठ ५   #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-5---marathi--kadambari_6023

अनोखी गाठ ६   #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-6-marathi-kadambari-_6109

अनोखी गाठ ७  #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-7-marathi-kadambari-_6145

अनोखी गाठ ८   #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-8-marathi-kadambari-_6221


अनोखी गाठ ९     # मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-9--marathi--kadambari_6331

अनोखी गाठ   भाग १०

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-10---marathi--kadambari_6468


अनोखी गाठ भाग ११ # मराठी _कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-11-marathi-kadambari-_6943


अनोखी गाठ भाग १२ # मराठी _कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-12---marathi--kadambari_6979

🎭 Series Post

View all