Login

अनोखी गाठ ३   #मराठी _ कादंबरी

-------------

अनोखी गाठ भाग १    #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-1-marathi--kadambari_5839

अनोखी गाठ २  #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-2---marathi--kadambari_5870



अनोखी गाठ ३   #मराठी _ कादंबरी


" काय  ? कावेरी आजी तुमच्या सावत्र आजी आहेत ? " श्रावणी. 

" हो , आणि ही गोष्ट मला सुद्धा अनेक वर्ष माहित नव्हती. " वसुधा . 

" वाटत नाही अजिबात की आजी तुमच्या सावत्र आजी आहे. " श्रावणी. 

" हो ना, त्यांनी एवढा जीव लावला आम्हाला की कधी मनात सुद्धा आलं नाही. माझ्या लग्नाच्या आधी बाबांची बहीण म्हणजेच माझी आत्या आली होती, तेव्हा तिने सांगितलं." 

" ताई अहो पण असं खरंच वाटत नाहीये की आजी सावत्र असतील. त्या सगळ्यांना किती जीव लावतात. " श्रावणी. 

" हो गं , म्हणून तर एवढ्या वर्षात आम्हांला माहित पडलं नाही. आणि माहित पडलं तरी तिचं आमची बेस्ट आजी होती आणि राहील." वसुधा. 

" हो नक्कीच. " श्रावणी. 

दोन्ही नणंद - भावजयचं बोलणं सुरु असतं तेवढ्यात त्यांना निरोप येतो. ' जेवायला खाली बोलावलं आहे.' दोघीही खाली जातात आणि विषय अर्धवट राहतो. 


                      जेवण झाल्यावर सर्वजण बैठकीच्या खोलीत बसलेले असतात. आणि श्रावणी- भालचंद्रचा देवदर्शनाचा कार्यक्रम ठरवत असतात. बैठकीत बसलेला भालचंद्र पडद्याला धरून उभ्या असलेल्या श्रावणीला अधून मधून चोरून पाहत होता. श्रावणीच्या मनात त्याच्या अश्या पाहण्याने गुदगुल्या होत होत्या. ही गोष्ट शेजारी उभ्या वसुधाच्या लक्षात आली आणि तिने श्रावणीला कोपरखळी मारली. त्याने श्रावणी लाजेने चूर झाली.  

दुसऱ्या दिवशी श्रावणी आणि भालचंद्र काही मोजक्या लोकांसोबत देवदर्शनासाठी निघतात. वसुधा श्रावणीला भालचंद्रच्या बाजूला बसवते. प्रवास सुरु होतो. प्रवासातील हळुवार होणारे स्पर्श दोघांनाही सुखावत होते. दोघेही असा प्रेम स्पर्श पहिल्यांदाच अनुभव होते. मनात फुलपाखरू उडत होते. तलावात काठावरच्या झाडावरून फुलांचा वर्षाव होऊन पाण्यावर तरंग उमटावेत, असं वाटत होते. दोघांच्याही मनात प्रेम अंकुर फुटत होते. त्यांच्या नात्यामध्ये ओलावा निर्माण होतं होता.

..............................

सर्वजण मंदिराजवळ उतरतात. सर्वजण देव दर्शन करतात. श्रावणी लग्नाची गाठ मजबूत व्हावी म्हणून देवाला सांगत असते. भालचंद्र श्रावणीसारखी बायको दिल्यामुळे देवाचे आभार मानत असतो. दर्शन करून सर्व परत निघतात. गाडीत बसताना वसुधा श्रावणीच्या कानात म्हणते, " देवदर्शन झालं आता तूला माझ्या खोली झोपायची गरज नाही. तुझ्या हक्काच्या आणि प्रेमाच्या खोलीत रवानगी होईल तुझी. " वसुधाचं बोलणं ऐकून श्रावणी लाजते. आणि इथून पुढचा परतीचा आणि प्रीतीचा प्रवास आता तिचा हवा हवासा वाटत होता.

सर्वजण घरी येतात. जेवन झाल्यावर वसुधा श्रावणीला भालचंद्राच्या खोलीत नेते आणि पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा देते. श्रावणी भालचंद्राची वाट पाहत बसली होती. भालचंद्र आत येतो आणि श्रावणीच्या हृदयाची धडधड वाढली होती. एकमेकांना समजून घेत, एकमेकांच्या हृदयाची एक एक पान उलगडत त्या रात्री श्रावणी आणि भालचंद्राच्या आयुष्याची गोड सुरुवात होते.

नव्याचे नऊ दिवस संपले आणि भालचंद्रने पुन्हा मुंबईला निघण्याबाबत घरात सर्वांना सांगितला. घरात सर्वांना माहित होतं की भालचंद्र थांबवून थांबणार नाही. म्हणून सर्वांनी आनंदाने याला होकार दिला. श्रावणीला मात्र भरल्या घरातून मुंबईत जाऊन सर्वांपासून दूर व्हायचं नव्हतं. पण भालचंद्राच्या प्रगतीच्या मध्ये तिला यायचं नव्हतं. भरल्या डोळ्यांनी, मनात घर आणि घरातल्या सर्वांची प्रतिमा घेऊन जड मनाने ती भालचंद्र सोबत मुंबईला निघाली.

मुंबईत सुरुवातीला श्रावणीला सर्वच थोडं जड गेलं पण हळूहळू तिने स्वतःला बदललं, वातावरणानुसार स्वतःला ढाळलं. अधून मधून ती भालचंद्र सोबत गावी जातं असे. मुंबईत हरवलेलं जगणं ती गावी येवून पुन्हा भरभरून जगत होती. सर्वांकडून भराभरून प्रेम घेत होती आणि देत ही होती. दिवसेंदिवस भालचंद्र स्वतःच्या व्यवसायात गुंतत होता. श्रावणी खूप समजून घेत होती. पण पुढे पुढे तिला असं वाटू लागलं की भालचंद्र तिच्याकडे दुर्लक्ष करतोय. श्रावणी भालचंद्राशी बोलण्याचा प्रयत्न करत होती पण स्वतःच्या व्यवसायात आणि यश मिळवण्यात एवढा व्यस्त होता की त्याला तिचं बोलणं ऐकूच येत नव्हतं.

श्रावणी हळूहळू खचू लागली. मुंबईत मन मोकळं करायला कोणी नाही. त्याच्यासाठी सर्व सोडून आली त्याच्याकडे वेळ नाही. श्रावणी गुमसुम राहू लागली पण आपल्याच विश्वात गुंग भालचंद्राच्या ही गोष्ट लक्षात सुद्धा आली नाही. एकत्र कुटुंबात जन्मलेल्या आणि वाढलेल्या श्रावणीला बोलायला सुद्धा कोणी नव्हतं. श्रावणी एकटेपणाच्या कोषात गुंडाळात जातं होती. एक दिवस भालचंद्र काही दिवसातच अमेरिकेला व्यवसाय हलवण्याबाबत बोलतो आणि श्रावणीला आता आयुष्य संपलं असं वाटू लागतं.

...............................

दसऱ्याला श्रावणी आणि भालचंद्र गावी येतात. कावेरी आजीच्या नजरेत श्रावणीचा उदास चेहरा येतो. आपण आपल्या नातवासाठी निवडलेली हसरी, खेळकर, पाणीदार डोळ्यांची श्रावणी हरवल्यासारखी वाटली. तिच्या वागण्यातला यांत्रिकपणा आजीच्या लक्षात येतो.

नवमीच्या दिवशी पूजा, हवन झाल्यावर आजी श्रावणीच्या खोलीत येते. श्रावणी शांतपणे डोळे बंद करून पलंगावर बसली होती. आजी श्रावणीच्या खांद्यावर हात ठेवते आणि श्रावणी दचकते. आजी म्हणते, " दचकू नकोस बाळा. मीच आहे. श्रावणी खूप दिवसांपासून विचारायचं होतं, आज विचारते, तूला नक्की काय झालंय? तूला बरं वाटत नाहीये का? काही चिंता आहे का? "
" असं काही नाही आजी. " श्रावणी.
" किमान मला तरी हे सांगू नकोस, मी तुझ्यापेक्षा ४ नाही ४० पावसाळे जास्त पाहिले आहेत. तुझा उदास चेहरा दिसतोय मला. सगळ्यांसमोर उसणं हसू आणून उभी असतेस. मी पाहिलेली आणि पसंत केलेली श्रावणीच्या पाणीदार डोळ्यातलं तेज हरवल्यासारखं वाटतंय. काय झालंय बाळा? "
आजीचे शब्द ऐकून श्रावणीच्या आसवांचा बांध फुटतो. ती आजीच्या कुशीत शिरून हमसून हमसून रडू लागते.

श्रावणी सर्व गोष्ट आजीला सांगते. आजीला श्रावणीची अवस्था पाहून खूप वाईट वाटतं. आजी श्रावणीच्या डोक्यावरून हात फिरवते आणि म्हणते, " श्रावणी बाळा, एक गोष्ट सांगते नीट ऐक, मान्य आहे भालचंद्रचं तुझ्याकडे दुर्लक्ष होतयं. त्याचा तूला खूप त्रास पण होतोय. भालचंद्र चं असं वागणं चुकीचंच आहे, मग कारण काहीही असो. आणि त्याबद्दल मी त्याला फैलावर घेईनच पण तू सुद्धा एक लक्षात ठेव भालचंद्राच तुझ्यावर खूप प्रेम आहे. त्याला ते दाखवता येत नसेल पण आहे. तो तूला इकडे जास्त का आणत नाही माहित आहे का तूला?   मागे एकदा भालचंद्र कामानिमित्त गावी आला होता तेव्हा नात्यातली एक बाई बारश्याच्या आमंत्रणासाठी आली होती. भालचंद्र मागे बसला होता हे त्यांच्या लक्षात आलं नाही आणि त्या बोलून गेल्या, " कावेरी काकू ८ दिवसांनी घरी लेकीच्या मुलाचं बारसं, बारश्याला नक्की या, फक्त आता गावात उत्सव असेल तेव्हा श्रावणी येईल, तेव्हा तिला आणू नका. ३ वर्षे झाली तिच्या लग्नाला पण अजून मुलं नाही. माझ्या लेकीचं पाहिलं बाळंतपण आहे त्यामुळे शक्य तितकी काळजी घेतलेली बरी. "

हे सर्व ऐकून श्रावणीला आश्चर्य वाटतं. आपल्याबद्दल आपल्यामागे लोकं असं बोलतात? तिला अजून रडू येत असतं. आजी पुढे बोलतात, " त्यांचं बोलणं ऐकून भालचंद्राच्या रागाचा पारा चढला होता. तो समोर आला तश्या त्या चपचल्या. भालचंद्र म्हणाला, " स्वतःच्या लेकीची काळजी करताना दुसऱ्यांच्या लेकीला बोल लावणं गरजेचं आहे का? श्रावणीमुळे तुमच्या लेकीचं वाईट होईल असं वाटलंच कसं? आणि एवढं वाटतं होतं तर आमंत्रण करायला का आलात? टोमणा मारता यावा म्हणून का? " भालचंद्र खूप काही बोलला श्रावणी तुझ्यासाठी आणि त्यानंतर त्याने तूला गावी आणन कमी केलं ते यासाठी की तूला कोणी काही बोलावून दुखावू नये. हा पण या सगळ्यात आणि आपल्या उद्योगात तूला दुय्यम ठेवणं हे चुकीचंच आहे. मी बोलेन त्यांच्याशी. फक्त त्याच्याबद्दल मनात अढी ठेवू नकोस. तू आराम कर आता निवांत झोप मी बघते पुढे काय करायचं ते असं म्हणून आजी श्रावणीच्या खोलीतून जातात.

श्रावणी कावेरी आजीकडून जे ऐकलं होतं त्यावर विचार करत होती. भालचंद्र च किती प्रेम आहे आपल्यावर आणि मी? श्रावणीला स्वतःवर राग येत होता. भालचंद्राला प्रगती आणि यश याने पछाडलं आहे हे आधीपासून माहित आहेत आपल्याला तरीसुद्धा? या विचार चक्रामुळे आणि सकाळपासूनच्या थकव्यामुळे तिला झोप लागते. 

इकडे आजी भालचंद्रला ' घरामागच्या बागेत भेटायला ये 'असा निरोप पाठवतात. भालचंद्र तिथे जातो तेव्हा आजी झाडांना पाणी घालत असतात. भालचंद्र तिथे येतो आणि आजी काही विषयांवर त्याच्याशी चर्चा करत असते आणि सोबतच झाडांना पाणी सुद्धा देत असते. पाणी घालून आजी निघणार तोच भालचंद्र म्हणतो, " आजी या फुलझाडाला पाणी घालायचं राहिलं. " त्यावर आजी म्हणते, " असू दे , काय गरज आहे त्याला पाणी द्यायची ? आपल्या बागेत त्या फुलझाडाला जागा दिली ते कमी आहे का ? " 

" असं काय बोलतेयस आजी? अगं झाड आहे ते ,आपल्या बागेत असलं किंवा कोणा दुसऱ्याच्या पाण्याशिवाय कसं जगेल?" भालचंद्र.  

" अरे वाह ! तुला माहित आहे ? झाड पाण्याशिवाय नाही जगू शकत ते ? " आजी. 

" आजी असं का बोलतेस आज ? भालचंद्र. 

" बाळा , तुला जर एवढं कळतं , की झाडाला पाणी नाही दिलं तर ते सुकून जातं , मरून जातं, तर तुझ्या फुलासारख्या बायकोच्या बाबतीत  असा विचार का नाही करत ? " आजी. 

" आजी नक्की काय म्हणायचं आहे तुला?" भालचंद्र. 

" बाळा, श्रावणी एकत्र कुटुंबात जन्मली आणि वाढली आहे. तिला माणसात राहायची सवय आहे. तरीसुद्धा तुझ्या प्रगतीच्या आड न येता ती तुझ्यासोबत मुंबईला आली. तुझ्या अनुरूप स्वतःला ढळलं, तिथे तुझ्याशिवाय तिला आपलं असं कोणीच नाही. दिवसभर तू बाहेर असतोस ठीक आहे, समजू शकतो, पण घरी आल्यावर तरी तू श्रावणीकडे नीट लक्ष देतोस का ? तिला काय हवं -नको ते पाहणं, कधी तिच्या बनवलेल्या जेवणाची स्तुती करणं , कधी सहजच वेळ काढून लांब नाही पण एखाद्या बागेत फिरायला घेऊन जाणं,  कधीतरी का होई ना जवळ बसून मनसोक्त गप्पा मारणं यापैकी काय काय केलंस तू ? "

भालचंद्र आजीकडे पाहत होता. आजी पुढे म्हणते, " अरे बायकांच्या खूप साध्या साध्या अपेक्षा असतात. श्रावणी या घरात लग्न करून आली तेव्हा हसतमुख, मिसळून वागणारी मुलगी होती. तिच्याकडे एकदा नीट बघ किती बदलली आहे ती. एवढ्या मोठ्या कुटुंबात वावरताना सुद्धा खोट हसू चेहऱ्यावर ठेवून वावरतेय ती. तिच्यासोबत राहतो तू , तिच्यातला बद्दल सुद्धा जाणवला नाही तुला ? एवढा स्वतःच्या विश्वात असतोस तू ? एक लक्षात ठेव तुझा व्यवहार जर असाच राहिला तर एक दिवस तिला कायमच गमावून बसशील. एक वेळ मग अशी येईल जेव्हा तुला तिची साथ हवी असेल पण ती फक्त एक औपचारिकता म्हणून तुझ्या सोबत असेल. तिला कशाचाही फरक पडेनासे होईल. कारण एकदा माणूस आतून तुटला की तो पुन्हा कशानेही जोडला जात नाही. आपल्या आयुष्यात भक्कम साथ खूप गरजेची असते. ती साथच आपल्याला जगाशी लढण्याचं बळ देते. मला तुला पुढे आयुष्यात एकटं पाहायचं नाही, म्हणून तुला समजावते, अजूनही वेळ गेलेली नाही. सावर स्वतःलाही आणि श्रावणीलाही. " एवढं बोलून आजी निघून जाते.

भालचंद्र आपल्या वागण्यावर विचार करत होता.  त्याला श्रावणीचा चेहरा आठवला आणि त्याला आपल्या वागण्याची लाज वाटू लागली. 

क्रमश ..............        
  

0

🎭 Series Post

View all