अनोखी गाठ २  मराठी कादंबरी

--------

अनोखी गाठ भाग १    #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-1-marathi--kadambari_5839

अनोखी गाठ २  #मराठी _ कादंबरी


        भालचंद्र आणि श्रावणीच्या डोक्यावर अक्षता पडल्या आणि श्रावणीच्या सूखी आयुष्याची सुरुवात झाली. श्रावणीच्या घरच्यांनी लग्नात त्यांच्याकडून काही कमी पडणार नाही याची पुरेपूर दक्षता घेतली होती. नवरा - नवरीचा जलेबीचा घास आणि पंगतीच्या स्वाद सर्वांनी लुटला. हर प्रकारे सुयोग्य घरात मुलगी जातेय म्हणून श्रावणीच्या घरच्यांनी आपल्या परीने, आपल्या कुवतीपेक्षा जास्तच केलं. मुलगी सूखी राहणं जास्त महत्वाचं.

पाठवणीची वेळ आली आणि घरातल्या स्त्रिया तर स्त्रिया पुरुषांच्या डोळ्यात देखील पाणी उभे राहीले.  पाठवणीच्या वेळी मोठी आई, आई, काकी सर्व समजावत होते, " ते घर आता तुझं आहे. सर्वांना आपलं मान, सर्वांमध्ये आपल्या घराले नातेच सापडेल फक्त नीट बघायला हवं. कोणी रागवेल किंवा दुःखावेल असं वागू नकोस. कोणी तुझ्यावर रागवलं तर आपल्याच भल्यासाठी हे लक्षात घेऊन त्यात सुधारणा कर, रागवलं म्हणून मन दुखावून घेवू नकोस. घरातल्या प्रत्येकाचा स्वभाव समजून घे. मुलीने सासरी दुधात साखरेसारखं विरघळायचं असतं. या गोष्टीचा विसर कधी पडू देऊ नकोस बाळा. " या शिकवणीसह श्रावणीची सासरी पाठवणी झाली.

...........…...............

वरात रात्री इनामदारांच्या वाड्यासमोर थांबली आणि इनामदरांचा प्रचंड वाडा पाहून श्रावणी क्षणभर बावरली. वाड्याचा मुख्य दरवाजा चार माणसं उंच आणि दोन माणसं रुंद आणि मजबूत असा होता. मुख्य दरवाज्यावर मोठी धान्यांची पायली मापट म्हणून ठेवली होती. श्रावणी माप ओलांडून आत आली. श्रावणीने विचार केला होता त्यापेक्षा वाडा बराच मोठा होता. एखाद्या राजाचा राजवाडाच जणू.

श्रावणीला आराम करायला मोठ्या नणंद सोबत तिच्या खोलीत पाठवलं. श्रावणी जरा नणंदेसमोर मोजकं आणि सांभाळूनच बोलत होती. शेवटी नणंद आहे, कोणत्या गोष्टीवरून रागवेल, रुसेल माहित नाही. श्रावणीने मैत्रिणींकडून असंच ऐकलं होतं आजपर्यंत.  पण मोठी नणंद वसुधा खूप बोलकी होती. श्रावणीला सारखं विचारात होती, " काही हवं आहे का? काही लागलं तर सांग संकोच करू नकोस. आता हे घर तुझं आहे. मला माहित आहे, नवीन घरात सून, वहिनी, जाऊ, काकी, पत्नी म्हणून पाय ठेवताना असे अनेक नाते अचानक आणि फारशी ओळख नसलेल्या लोकांमध्ये वावरताना बावरायला होतं. मला सुद्धा असं झालं होतं. पण हळूहळू ते घर आपल्याला आणि आपण त्या घराला एकमेकांत सामावून घेतो. त्यामुळे आता तरी तुला काहीही हवं असेल तर हक्काने सांग. आणि हो आता तू थोडा इथेच आराम कर, इथे तुला कोणी त्रास द्यायला येणार नाही कारण ही खोली माझी आहे. वसुधाने हसत सांगितलं. श्रावणीला जरा हायस वाटलं.

दुसऱ्या दिवशी श्रावणी पहाटे उठली, पाहते तर वसुधा  उठून न्हान आटोपून तयार झाली होती. श्रावणीला घाबरायला झालं. तिला वाटलं आपल्याला उठायला उशिर झाला आहे. श्रावणी वसुधाला म्हणाली, " ताई मला उठवायचं ना ओ. मला एवढी झोप कशी लागली कळलंच नाही. असं नाही होतं सहसा.. माफ करा ताई. "
वसुधा श्रावणी जवळ येवून बसते आणि म्हणते, " श्रावणी तुला उठायला उशिर झालेला नाही. मला सवय आहे भल्या पहाटे उठायची आणि तयार व्हायची. आणि अगं मी चेटकीण आहे का? तू मला सारखं घाबरत का आहेस? तुझं घर आहे म्हणाले ना मी मग? मी खाली जातेय जरा मदत करते कामात. तोपर्यंत तू तयार हो मी तुझ्यासाठी काहीतरी न्याहारी घेऊन येते. मी न्याहारी घेऊन आल्याशिवाय आणि तू ती खाल्याशिवाय या खोलीबाहेर यायचं नाही. कोणी काही बोललं तर सांग मी सांगितलं आहे. एकदा का तू या खोलीबाहेर आलीस तर गावातल्या सर्व बायका तुला घेरून बसतील. खेळ होतील, काही रितीरिवाज केले जातील यात किती वेळ होईल माहित नाही. तेव्हा तेवढा वेळ उपाशी राहशील त्यामुळे मी आल्याशिवाय बाहेर यायचं नाही. वसुधा श्रावणीला प्रेमळ ताकीद देऊन जाते.

श्रावणी विचार करते की आपण खरंच किती भाग्यवान आहोत. खरंच घर, सासर खूप छान मिळालं आहे मला शिवाय त्या आजी आहेत. त्यांना मला खूप काही विचारायचं आहे. माझ्या छान मैत्रीण झाल्या आणि थेट लग्नासाठी मला पहायला आल्या, सर्व उलगडा झालाच पाहिजे. आणि ताई म्हणाल्या ही खोली त्यांची आहे. त्यांचं लग्न तर खूप आधी झालं असणार दोन मुलं आहेत त्यांना. मग माहेरी वेगळी त्यांची खोली कशी..? असो हळूहळू उलगडा होईलच त्याआधी आपली तयारी केलेली बरी नाहीतर ताई लगेच येतील.

श्रावणी न्हान उरकून तयारी करते आणि वसुधा न्याहारीचं ताट घेवून आत येते. श्रावणीला पाहून वसुधा, " सुंदर दितेयस. " असं म्हणते. आणि आपल्या पेटीतून एक सुंदर असा हार काढून श्रावणीला देते. ते पाहून श्रावणी संकोचते., " ताई, अहो हे कशाला देताय? आधीच खूप दागिने घातले आहेत घरच्यांनी." त्यावर वसुधा म्हणते, " ते तुझ्या सासरच्यांनी घातले, हे माझ्याकडून म्हणजेच तुझ्या नव्या मैत्रिणीकडून लग्नाची भेट समज. तुला भेट देण्यासाठीच मुद्दामहून बनवून घेतला आहे. त्यामुळे तुला तो घ्यावाच लागेल नाहीतर तर मला नणंदेसारखं वागावं लागेल यापुढे. "  हे ऐकून श्रावणीचा नणंद नात्याविषयीं असलेला पूर्वाग्रह गळून पडला आणि तिने जावून वसुधाला प्रेमाने मिठी मारली.

.....................

श्रावणीचे लग्नानंतरचे सर्व रितिरिवाज पूर्ण झाले. सत्यनारायण पूजा झाली. श्रावणीच्या पाचपरतावानसाठी माहेरी जायची वेळ जवळ आली. तिला न्यायला तिचे मोठे बाबा, बाबा आणि छोटा भाऊ आले होते. श्रावणी सर्वांना निरोप देऊन त्यांच्यासोबत निघाली. थोडं पुढे आल्यावर लहान भावाने पटकन कमरेभोंवती मिठी मारली आणि रडू लागला.," ताई, तू गेली आणि घर रिकामं झालं गं. तुझी खूप आठवण येते. आपण ओसरीवर खेळलेले खेळ, मागच्या अंगणातल्या झाडावरून काढलेले फूल, स्वयंपाक घरातून आणून हळूच कोणाच्याही नकळत तू माझ्या हातावर लाडू ठेवायचीस. आई रागावल्यावर मला पाठीशी घालून तिच्या मारापासून वाचवायचीस. तू वरातीसोबत गेलीस आणि मागे सर्व सुनंसुनं झालं गं. सकाळी मोठ्या आईने पण नकळत स्वयंपाक घरातून तुला हाक मारली. मोठे बाबा, बाबा आणि मी तुला आणायला येण्यासाठी सकाळी ६ वाजल्यापासून तयार होवून बसलो होतो. मोठी आई बोलली, " एवढ्या लवकर मुलीच्या सासरी जावून बसू नका, त्यांच्या रितिरिवाज व्हायच्या असतील अजून. " म्हणून आम्ही उशिरा आलो पण कधी तुला बघतोय असं झालं होतं ताई. "

हे सर्व ऐकून श्रावणीचे, मोठे बाबा, बाबा सर्वांचे डोळे पाणावले. मोठ्या बाबांनी काहीही न बोलता फक्त डोक्यावरून हात फिरवला. श्रावणीने त्यांच्या स्पर्शतले शब्द वाचले. तिला आता घरी जाऊन सर्वांना कडकडून मिठी मारायची होती.

श्रावणी घरी आली तर सर्वजण दारातच तिची वाट पाहत होते. तिला पाहून सर्वांचे चेहरे खुलले. तिला आत आणलं.  सर्वांच्या प्रश्नाचे भडीमार सुरु झाला. घर कसं आहे गं? वाडा प्रशस्त आहे सांगत होते, तुझे बाबा मागे घर पहायला गेले होते तेव्हा, खरंच तेवढा मोठा आहे का? घरी सगळे कसे आहेत? स्वभाव कसा आहे सर्वांचा? लग्नात काही उन राहील म्हणून कोणी टोमणा वगैरे नाही ना मारला? सकाळपासून काही खाल्लं आहेस की रितिरिवाज आणि पूजेमध्ये जेवण राहिलं? वगैरे वगैरे..... तेवढ्यात मोठी आई ओरडली पोरीने घरात पाय नाही ठेवला तर प्रश्न सुरु झाले तुमचे. तिला श्वास तर घेवू द्या. बहिणीने पाणी आणले आणि परत विचारू लागली. मोठी आई, आई, आणि काकी स्वयंपाक घरात गेल्या आणि नाना प्रकारचे पदार्थ समोर आणून ठेवले. श्रावणीने मोठ्या आईच्या मांडीवर डोके ठेवले आणि म्हणाली, " आई, तुम्हाला बघूनच पोट भरलं गं माझं. आपल्या माणसांपासून लांब गेल्यावरच त्यांची किंमत कळते हेच खरं. " आई बराच वेळ तिच्या डोक्यावरून हात फिरवत होती.

रात्री जेवणानंतर गप्पा सुरु होत्या. श्रावणी सासरच्या गोष्टी सांगत होती. नणंदबाईने दिलेली भेट दाखवली. घडलेला सारा प्रसंग तिने सांगितला आणि ते ऐकून घराच्या लोकांना आता एक प्रकारे निश्चिन्तपणा आला होता. आपली मुलगी सूखी राहिलं यांची त्यांना खात्री पटली होती. त्यारात्री सर्वजण अंगणातच गप्पा करत झोपी गेले.

सकाळी न्याहारीपासून सर्व पदार्थ श्रावणीच्या आवडीचे होते. शक्य तितकं प्रेम, स्नेह ते आपल्यापारीने तिला देत होते. सासरची मंडळी श्रावणीला नेण्यासाठी आले. त्यांचा मोठा पाहुणचार श्रावणीच्या माहेरच्यांनी केला. श्रावणीला घेऊन मंडळी निघाली आणि श्रावणीच्या घरच्यांनी तिच्यासोबत बरीच शिदोरी दिली. भरल्या डोळ्यांनी आणि समाधानी मनाने घरच्यांनी तिला निरोप दिला.

श्रावणी सासरी परत आली आणि तिची रवानगी नणंदबाईंच्या खोलीत झाली. रात्री श्रावणीने वसुधाला आपल्या मनातला प्रश्न विचारलाच, " ताई तुम्ही म्हणता ही खोली तुमची आहे पण तुमच्या लग्नाला बराच वेळ झाला आहे आणि २ मुलं सुद्धा आहेत, मग तरी माहेरी अशी हक्काची खोली? माफ करा म्हणजे मी असं ऐकलं नाही कधी.लग्न झालेली मुलगी म्हणजे चार दिवसांची पाहुणी असंच ऐकलं आहे आणि पाहुण्यांसाठी हक्काची खोली ते ही लग्नाच्या एवढ्या कालावधीनंतर कसं काय?
श्रावणीचा प्रश्न ऐकून वसुधाला हसू आलं. ती म्हणाली, " बरोबर श्रावणी अगं आपल्याकडेच का भारतात सगळीकडेच असं आहे, असतं. पण आपल्याकडे थोडंसं वेगळं आहे. माझं लग्न ठरण्याआधीपासून ही माझी खोली होती. मला ही खोली खूप आवडते म्हणून भांडून घेतली होती मी. माझं लग्न ठरलं आणि काहीतरी मागे सुटतंय असं वाटू लागलं.  एक एक लग्नाच्या विधी होतं होत्या आणि माझं मन उचल खात होतं. मी पण हेच ऐकलं होतं, " लग्नानंतर मुलगी माहेरी फक्त पाहुणी असते. " त्यामुळे आपण आपल्याच घरी पाहुणे होणार विचारच सहन होतं नव्हता. आजीने माझ्या मनाची घालमेल ओळखली आणि रात्री माझ्याजवळ झोपायला आली, आणि सर्व आजी, आई लग्नाआधी मुलीला शिकवतात की सासरी कसं वागावं ते सांगत होती. थोड्या वेळाने आजी म्हणाली, " वसू, बाळा जगात लग्नानंतर मुली परक्या होतं असतील पण तू कधीच परकी होणार नाहीस. हे नेहमीच तुझं घर राहिलं, तुझं हक्काचं. मला त्यावेळी खूप बरं वाटलं.

लग्न करून सासरी गेले . सासर श्रीमंत , घरंदाज. कशाचीही कमी नाही. सासरचे खूप चांगले आहे. नवरा गुणी आहे. सर्व आहे. पण शेवटी माहेर माहेर गं. तिकडे कितीही चांगलं असलं तरी इकडे यायची ओढ असते. लग्नानंतर जेव्हा आले तेव्हा घाईत असायचे. काही प्रथा असायच्या त्यामुळे लवकर जायचे. पण जेव्हा एक वर्षभराने माहेरी निवांत राहायला आले, तेव्हा आईने भालचंद्रला आवाज देऊन सांगितले," ताईच सामान तिच्या खोलीत नेऊन ठेव." मी आश्चर्याने आईकडे पाहिलं. मला वाटलं होतं, आता मी सासरी गेले म्हणजे माझी खोली दुसरं कोणी वापरत असेल किंवा इतर काही कामासाठी वापरली जात असेल. मी आईकडे पाहिलं आणि डोळ्यांनीच विचारलं. तेव्हा तिनेही डोळ्यांनीच आजीकडे खून केली. मी  जाऊन आजीला मिठी मारली आणि विचारलं तर ती म्हणाली, " वसू तुला आधीच सांगितलं होतं ना मी , की या घरासाठी  तू कधीच परकी नसणार. भालचंद्र जेव्हा मुंबईत असतो, तेव्हा त्याची खोली दुसऱ्या कोणाला देतो का ? किंवा दुसऱ्या कुठल्या कामासाठी वापरतो का ? नाही ना ? का तर ती त्याची खोली आहे. तो येईल तेव्हा वापरेल. तसंच ती सुद्धा तुझीच खोली आहे मग तू इथे असो किंवा नसो. तिची संपूर्ण घराप्रमाणे रोज सफाई होते. तू जेव्हा येशील तेव्हा तुझं या घरातलं अस्तित्व कायम असल्याची जाणीव तुला राहील. " यावर श्रावणीला आजीचं कौतुक वाटत. त्यावर वसुधा म्हणते," आजी आहे भारी पण एक गोष्ट सांगू ? तुला खरं वाटणार नाही. पण कावेरी आजी माझी सावत्र आजी आहे. " 

क्रमश ............. 

🎭 Series Post

View all