Sep 25, 2021
स्पर्धा

अनोखी गाठ भाग २२ # मराठी _कादंबरी

Read Later
अनोखी गाठ भाग २२ # मराठी _कादंबरी
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now

अनोखी गाठ भाग २२     # मराठी _ कादंबरी

© आरती पाटील

( मागच्या भागात आपण पाहिलं की, अभिषेक स्त्रियांच्या मासिक धर्माच्या काळात आराम करावा आणि स्वतःला वेळ द्यावा असे म्हणतो. जानकीला आणि समीराला आपण अभिषेकचं म्हणणं चुकीच्या पद्धतीने घेतल्याची जाणीव होते. अभिषेक कावेरी आजीला पुढील गोष्ट सांगायला सांगतो. आजी सांगते तिला सरस्वती ताई त्या दिवसात किती मदत करतात, त्यांना त्या दिवसांची माहिती देतात, त्यांच्या सोबत राहून एक आत्मविश्वास देतात. पाहता पाहता  चार दिवस होतात. रात्री सरस्वती ताई कावेरीला सांगतात, उद्यापासून तुझी एक नवीन सुरुवात असेल.... आता पुढे....)


समीरा, जानकी, स्वाती आणि अभिषेक सर्वजण मन लावून आजीची गोष्ट ऐकत असतात. जानकी आणि समीराला तेव्हाच्या आणि आताच्या परिस्थितीची जाणीव होतं होती. पूर्वी स्त्रियांनी किती सोसलंय याची त्यांना हळूहळू कल्पना येतं होती. अमेरिकेत असताना असं काही वेगळं या जगात असेल याचा विचारही त्यांच्या मनात आला नव्हता. अमेरिकेतल्या स्वछंदी जीवनशैली आणि भारतातील वास्तविकता त्यांना दिसत होती. आजी आपली कथा पुढे नेते.

आजी, " पाचवा दिवस उजाडला. मी उठले तेव्हा सरस्वती ताई माझ्या बाजूला नव्हत्या. त्या आता मला पुढच्या महिन्यात भेटणार हे माझ्या लक्षात आलं होतं. मी न्हनिघरात निघाले तेव्हा साखरबाई समोरून आल्या आणि म्हणाल्या की, "न्हणं आटोपून तुम्हाला सरळ वाड्यात बोलावलं आहे थोरल्या मालकीण बाईंनी." मी फक्त मान हलवली आणि न्हाणीघरात गेले. सरस्वती ताईंनी सांगितलेलं नीट लक्षात ठेवलं होतं मी. सासूबाई सांगतील तसंच वागायचं, बोलण्यापूर्वी किमान दोनदा विचार करायचा. वाड्यात सुखाने राहणं शेवटी सासूबाईंच्या हातात होतं.

मी माझं न्हान उरकलं आणि लगबगीने मागच्याच दाराने वाड्यात प्रवेश केला. वाड्यात चित्र काहीसं वेगळं होतं. वाड्याचा एक भाग छान सजवला होता. त्या भागातल्या झोपळ्यालाही फुलांच्या लडी लावल्या होत्या. फुलांचा सुगंधा बरोबरच स्वयंपाक घरातून गोडाधोडाचा वास पसरला होता. आज वाडयात काय आहे? असा प्रश्न मला पडला होता. मी त्या सजावटीकडे पाहत -पाहत माझ्या खोलीत गेले. माझ्या मनाला पडलेला प्रश्न मी विचारू कोणाला? असं वाटतं असतानाच साखरबाई माझ्या खोलीत आल्या. मी त्या विचारलं, " साखरबाई आज वाड्यात काही विशेष आहे का? एवढी सजावट, स्वयंपाकाचा एवढा मोठा घाट का? " माझ्या प्रश्नावर त्यांनी माझ्याकडे पाहत उत्तर दिलं, " अहो मालकीण बाई हे सर्व तुमच्यासाठीच आहे. " "काय? माझ्यासाठी?" मला खरं वाटतं नव्हतं. साखरबाई माझ्या जवळ आल्या आणि म्हणाल्या, " मालकीणबाई स्त्रीला मोठी होण्याची चाहूल लागली की पहिल्यावेळी काही भागात पूजा करतात. आनंद साजरा करतात. आपल्याकडे सुद्धा करतात. त्यासाठीच पूजा ठेवली आहे. ही वस्त्रे आणि दागिने थोरल्या मालकीण बाईंनी पाठवली आहेत. तयार व्हा. पूजेला बसायचं आहे तुम्हाला. " मी त्यांना प्रतिप्रश्न केला, " पण साखरबाई बाहेर सजावट आहे पूजेची तयार नाही. " त्यावर त्या म्हणाल्या, " अहो मालकीण बाई पूजा देवघरात आहे आणि पूजा झाल्यानंतर एक खेळीमेळीचा कार्यक्रम आहे. ती सजावट त्याची आहे. गावातल्या जवळ पास सर्व बायका येईल. त्यांनी तुम्हाला पाहिलं नाही ना अजून मग सर्व आवर्जून येईल. तूम्ही छान तयार व्हा. आमच्या मालकीणबाईचं रूप पाहून डोळे दिपले पाहिजेत सर्वांचे. " असं बोलून त्या गेल्या.

त्या दिवसात तूच्छ वागणूक आणि त्यानंतर सन्मान? मला ते दुपटी वागणं कळलं नव्हतं पटलं नव्हतं. फक्त सरस्वती ताईंचा शब्द लक्षात ठेवून मी त्यानुसार वागण्याचा प्रयत्न करत होते. मी तयार होऊन खाली आले. घरी बऱ्याच बायका जमल्या होत्या. एवढी लोकं पाहून मला भीती वाटतं होती. फक्त काही चूक आता घडू नये एवढंच मी मनातल्या मनात देवाला सांगत होते. देवघरात पूजा झाली. पतीला पाहायची ही दुसरी वेळ होती. पूजा नीट, व्यवस्थित पार पडली. 'हे ' पूजा झाल्यावर त्यांच्या कामावर गेले. सर्व बायका वाड्यात, जिथे सजावट केली होती तिथे जमल्या. मला त्या सजवलेल्या पाळण्यात बसवलं. सुंदर, छान गाणी सुरु झाली.  सर्व बायका ते क्षण भरभरून जगत होत्या. मंगल वातावरण होतं. नंतर जेवण करायला सर्व बायका बसल्या. जेवणात डाळ - भात, भाकरी, पोळी, पुरण पोळी, कोथिंबीर वडी, चार प्रकारची लोणची, सहा प्रकारच्या कोशिंबीर, नवरत्न भाजी, भजी, पाच प्रकारच्या चटण्या, उसळ, बासुंदी, कढी एक ना अनेक पदार्थांची रेलचेल होती. सर्व बायकांनी जेवणाचा मनमुराद आनंद लुटला. माझ्यासाठीही ते क्षण आनंदाचे होते.

त्या सर्व पदार्थात बासुंदीची चव मला जास्त भावली. खूप आवडली. मी आधीही अनेक वेळा बासुंदी खाल्ली होती पण या वेळी बासुंदीची गोष्टच काही वेगळी होती. सासूबाईंनी मला एक साज भेट म्हणून दिला. कार्यक्रम संपला आणि सर्वजण आपापल्या घरी गेले. मी माझ्या खोलीत गेले. वस्त्रे बदलणार तोच सासूबाई आल्या आणि म्हणाल्या, " वस्त्रे बदलू नकोस. आणि तुझं सामान बांध. " त्यांचं बोलणं ऐकून माझे हातपाय थरथरू लागले. मला वाटलं की माझ्याकडून खाली काही चूक झाली आहे आणि म्हणून त्या मला रागात घराबाहेर काढत आहेत.

मी पटकन वाकून त्यांचे पाय धरले. रडू लागले आणि त्यांना विनवू लागले, " सासूबाई माझ्याकडून काय चूक झाली. चूक झाली ती मला सांगा, त्यांबद्दल मला शिक्षा द्या पण असं करू नका. पुढच्या वेळी चूक होणार नाही. मला माफ करा. " तश्या त्या चिडल्या आणि म्हणाल्या, " तुझ्या घरच्यांनी काहीच कसं शिकवलं नाही तूला? एकदा स्त्रित्व मिळालं की नवऱ्याच्या खोलीत राहायचं असतं स्त्रीने. एवढं सुद्धा माहित नाही का?  तू सामान बांध तुझ्या नवऱ्याच्या खोलीत राहायचं आहे तूला आजपासून. " असं म्हणून त्या निघून गेल्या. मी विचार करत होते, खोली का बदलायची एवढ्यासाठी? शिवाय त्यांना फक्त दोनदा पाहिलं होतं मी. नाही म्हटलं तरी एक भीती होतीच मनात.

माझं सामान ह्याच्या खोलीत हलवण्यात आलं. मोठी ऐसपैस खोली, मोठा पलंग, चार अलमारी, त्यातल्या दोन आलमारीत तर फक्त पुस्तकंचं होती. एक लिखाणाचा मंचक होता. मी हळूहळू खोलीत फिरून सर्व पाहत होते. दोन अलमारी भरून पुस्तकं पाहिल्यावर पहिला मनात विचार आला, एवढा वाचायला किती वेळ जातं असेल. एवढं कधी वाचणार? घराचा, बाहेरचा व्यवहार पाहायचा. त्यात वेळ काढून एवढं वाचायचं आणि लिहायचं पण? माझं डोकं एवढी पुस्तकं पाहूनच गरगर करत होतं.

माझ्यासाठी खोली नवीन होतीच शिवाय ह्यांच्यासोबत राहायचं म्हणजे एक अवघडलेपण होतंच. कधीच कोणत्या पुरुषासोबत नीट बोललेही नव्हते मी. काका, बाबा, आजोबा यांच्याशीही मान खाली खालूनच बोलणं असायचं आणि तेही मोजकंच. त्यामुळे एक धडधड होती. संध्याकाळी सकाळी तयार झाली होती तशीच म्हणजेच सजलेली होती. मी पलंगावर बसले होते. खूप भीती वाटतं होती. पदराच टोक बोटाला गुंडाळात होते, सोडवत होते. असं बराच वेळ सुरु होतं. दार वाजलं आणि माझी धडधड कैक पटीने वाढली.

दार उघडून हे आत आले आणि मी पटकन उठून पलंगाच्या एक कोपऱ्यात उभी राहिली. ते माझ्याकडे पाहत होते. ते येऊन पलंगावर बसले आणि मला म्हणाले," माझ्या समोर येऊन उभी रहा." मी थरथर कापू लागले. ते माझ्याकडे पाहून हसले आणि म्हणाले," मी तूला मारणार नाहीये. तेव्हा येऊन माझ्यासमोर येऊन उभी रहा. " मी घाबरत घाबरत जाऊन त्यांच्यासमोर जाऊन उभी राहीले. त्यांनी मला पहिला प्रश्न केला, " शाळेत गेली होतीस का कधी? " मी फक्त मान हलवून नाही म्हणाले. मग त्यांनी मला दुसरा प्रश्न केला, " घरातून जाऊ दिलं नाही की तुलाच शिकायचं नव्हतं? " मी  त.. त.. प.. प.. करत कसं तरी बोलले, " घ.. घरी बायकांना शिकण्याची परवानगी नाहीये. जेव्हा माझा भाऊ पुस्तकं उघडून बसायचा तेव्हा मी लांबूनच त्यातली चित्र बघायची. त्यांनी पुढे विचारलं, " तुला मी शिकवलं तर शिकशील का? "
त्यांच्या या प्रश्नावर मला खूप टेन्शन आलं आणि मी रडू लागले. त्यांनी मला शांत होण्यास सांगितलं." तूला नाही आवडतं का? " असं त्यांनी विचारलं. त्यावर मी त्यांना सांगितलं मला शिक्षणाची भीती वाटते. "का?" त्यांनी प्रतिप्रश्न केला. मी त्यांना कारण सांगायला सुरुवात केली, " माझ्या माहेरच्या घराशेजारी एक घर होतं. ते माझ्यापेक्षा जास्त श्रीमंत होते. त्यांच्या मुलांना शिकवायला गुरुजी घरी यायचे. शिकवणीची खोली वेगळी होती. तिथे शिकवणी सुरु असताना स्त्रियांना जायला परवानगी नव्हती. त्यामुळे तिथून स्त्रिया त्या वेळेत जाणं टाळायच्या. एके दिवशी एक सहा - सात वर्षांची मुलगी त्या खोलीशेजारून जाताना तिच्या कानावर शिक्षणाचे काही शब्द पडले. ते तिला आवडले म्हणून ती तिथेच उभी राहून ऐकत होती. हे त्या घरातील एका माणसाच्या लक्षात आले. तिने ते ऐकलं म्हणून सळी गरम करून त्या मुलीच्या कानाला लावली. तिची किंचाळी आमच्या घरात ऐकू आली. तिच्या आवाजातली ती वेदना स्पष्ट ऐकू आली. तिची कळवलं ऐकून आमच्या घरातिला स्त्रियांच्या डोळ्यात पाणी आलं होतं. मला तर दोन दिवस जेवणाचं गेलं नाही. सारखी ती किंचाळी कानात गुंजत होती. गरम सळीचा तो व्रण तिच्या कानावर कायमचा झाला. जो पाहून तिला आणि तिच्या आजूबाजूच्या सर्व स्त्रियांना शिक्षण घेतल तर काय होतं याची आठवण झाली पाहिजे. तेव्हा पासून मी त्यापासून लांबच राहीले. " माझं बोलणं ऐकून हे देखील हळहळले.

एवढे ऐकल्यानंतरही ते पुढे म्हणाले, " कावेरी हे बघ. शिक्षण एक जीवना आवश्यक गोष्ट आहे. शिक्षण आपल्याला कोणत्याही परिस्थितीतुन बाहेर पडण्याचा मार्ग शोधायला मदत करतो. या जगात सर्व साथ सोडतील पण ज्ञान आपली साथ कधीच सोडत नाही. तेव्हा माझी इच्छा आहे की तू सुद्धा शिकवसं. " त्यांच बोलणं ऐकून मला कापरं भरलं. एकत्र आता कुठे मला वाड्यात घेतलं होतं. मी शिक्षण घेते किंवा त्यासाठी तयार आहे घे कळल्यावर सासूबाईंनी मला घराबाहेरच काढलं असतं. मी अगदी काकूळतिला येऊन त्यांना सांगितलं, " जे करायची मला परवानगी नाही ते करायला नका सांगू मला. सासूबाईंना कळलं तर माझं काय होईल? " माझं बोलणं ऐकून हे म्हणाले, " ज्ञान मिळवणं म्हणजे देवाच्या छायेत राहणं. आईला काही माहित पडणार नाही याची काळजी आपण दोघ घेऊयात. फक्त रात्री अभ्यास कर. मी शिकवीन तुला. रात्री कोण बघायला येणार आहे? तू थोडंफार वाचायला - लिहायला शिकलीस तर जीवनात खूप बदल घडेल हे नक्की. आता अभ्यास करायचा की नाही ते तू ठरवं. आता झोप उदया दिवसभर विचार कर आणि उद्या रात्री मला उत्तर दे. " एवढं म्हणून ते पलंगावर जावून झोपले. मी खाली अंथरून टाकून झोपले. डोक्यात आता नवीन विचार फिरत होता... शिक्षण..... सासूबाई... गरम सळी.... की नवीन बदल....?......"

क्रमश.....


अनोखी गाठ भाग १    #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-1-marathi--kadambari_5839

अनोखी गाठ २  #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-2---marathi--kadambari_5870

अनोखी गाठ ३  #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-3---marathi--kadambari_5889

अनोखी गाठ ४  #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-4---marathi--kadambari_5986

अनोखी गाठ ५   #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-5---marathi--kadambari_6023

अनोखी गाठ ६   #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-6-marathi-kadambari-_6109

अनोखी गाठ ७  #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-7-marathi-kadambari-_6145

अनोखी गाठ ८   #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-8-marathi-kadambari-_6221


अनोखी गाठ ९     # मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-9--marathi--kadambari_6331

अनोखी गाठ   भाग १०

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-10---marathi--kadambari_6468


अनोखी गाठ भाग ११ # मराठी _कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-11-marathi-kadambari-_6943


अनोखी गाठ भाग १२ # मराठी _कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-12---marathi--kadambari_6979

अनोखी गाठ  १३  # मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-13---marathi--kadambari_7010

अनोखी गाठ भाग १४    #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-14---marathi--kadambari_7049

अनोखी गाठ भाग १५     #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-15---marathi--kadambari_7090

अनोखी गाठ भाग १६      #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-16----marathi--kadambari_7128

अनोखी गाठ भाग १७       #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-17---marathi--kadambari_7183

अनोखी गाठ भाग १८      #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-18---marathi--kadambari_7220

अनोखी गाठ भाग १९     #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-19---marathi--kadambari_7727

अनोखी गाठ भाग २०      #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-20----marathi-kadambari-_7806

अनोखी गाठ भाग २१      #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-20--marathi--kadambari_7882

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now