अनोखी गाठ १६    मराठी कादंबरी

------

अनोखी गाठ १६   # मराठी_ कादंबरी


© आरती पाटील 


( मागच्या भागात आपण पाहिलं की, रडणाऱ्या कावेरीच्या दरवाज्यावर टकटक होते. तिने दरवाजा उघडल्यावर समोर एक २४- २५ वर्षांची तरुणी असते. तिचं सावळ रूप कावेरी पाहतच राहते. ती तरुणी दुसरी कोणी नसून कावेरीची थोरली जाऊ असते 'सरस्वती ' . कावेरीला तिच्यात आपली मोठी बहीण दिसते. आणि ती तिला खूप प्रश्न विचारते. सरस्वती आपली कहाणी कावेरीला सांगते. मोठ्या जमीनदाराची मुलगी, त्यानंतर इनामदारांची सून, सोनं - नाणं, नोकर, सुख आणि आनंद, महाराणीसारखा रुबाब. सरस्वती गरोदर असताना सर्प दंशाने तिच्या पतीचा मृत्यू होतो. त्यासाठी सर्वजण तिलाच जबाबदार मानतात. त्या तणावात तिचं बाळ ही दगावतं. केशापन केली गेलेली आणि लाल वस्त्रात गुंडाळलेल्या सरस्वतीची रवानगी वाड्याच्या मागच्या एका खोलीत केली गेली. सर्व अपमान, बोलणी, पती गेल्याचं आणि बाळ गेल्याचं दुःख ती मनात साठवून बसली होती. एके दिवशी तिचे बाबा आल्याचे कळल्यावर तिने बाबांना बोलणं पाठवलं. बाबांनी जेव्हा तिला ' मला शुभ कामासाठी जायचं आहे, मला स्पर्श करू नकोस.' असं म्हणतात, तेव्हा मात्र सरस्वती स्वतःला आता पूर्णपणे एकटी जाणवल्याच म्हणते.... आता पुढे......)

" आजी सखे बाबा असे कसे म्हणू शकतात गं? " जानकीने डोळे पुसत आजीला प्रश्न केला. तिला आपले डॅड आपल्याला किती जीव लावतात याची जाणीव होते आणि क्षणा क्षणाला त्यांच्या बद्दल आदर वाढत असतो. कदाचित आपण गावी आलो नसतो तर आपल्याला कळलंही नसतं की डॅड माझ्यासाठी किती करतात. 


" बाळा, विचार, प्रथा - परंपरांचा, रूढीचा पगडा माणसाला आंधळा बनवतो. काही गोष्टी या चुकीच्या होत्या, आहेत पण काहीजण फक्त आमच्या बापजाद्यानी सांगितलेलं आहे,असं म्हणून पुढे चालवतात. काळानुसार, वेळेनुसार बदल हा झालाच पाहिजे. जसं पाणी वाहत राहिलं तर ती नदी असते. वाहत पाणी स्वच्छ असतं. लोक त्याला आपल्या जीवनात स्थान देतात. तू कधी साठलेलं पाणी म्हणजेच डबक्या मधून कोणाला पाणी नेताना पाहिलं आहेस का? पण  हेच सर्व माणसं आपल्या जीवनात उतरवत नाहीत.  याचं त्यांच्या विचारांना बदलायचं काम मला पुढे करावं लागणार आहे याची मला त्यावेळी किंचितही कल्पना नव्हती. " आजी म्हणाली.


" आजी पुढे काय झालं? " समीराने उत्सुकतेने विचारलं.
आजी पुढे बोलते, " सरस्वती ताईंनी त्यांची गोष्ट सांगता - सांगता मला सर्व जेवण भरवलं. त्यांचे डोळे निर्विकार होते. जसं एखादी जखम झाली की वेदना होतात पण त्यावरचं पुन्हा पुन्हा लागलं की वेदनासुद्धा होईनाश्या होतात. ती जागा बधिर होते. तसंच सरस्वती ताईचं मन बधिर झालं होतं एवढ्या वर्षात. समाजाने लादलेली बंधने तर होतीच पण त्यांनी आता स्वतःला एका कोषात गुंडाळलं होतं. देवाला समर्पित केलं होतं.


माझ्यासोबत जे होत होतं ते त्यांना कळलं असणार शिवाय माझ्या खोलीला लागून त्यांची खोली असल्याने माझ्या रडण्याचा आवाज त्यांनी ऐकला असणार म्हणून त्या माझ्याकडे आल्या होत्या, माझं दुःख वाटण्यासाठी. त्यांचं दुःख ऐकल्यानंतर मला माझं दुःख अगदीच छोटं वाटू लागला. मला त्या प्रचंड पण एकट्या वाड्यात एक सोबत मिळाली होती. मी त्यांना माझ्या जवळच झोपा असं सांगितलं. त्यावर ताई मला बोलल्या, " कावेरी, तू सुवासिन आहेस. मी विधवा. कोणी पाहिलं की तू माझ्या सोबत आहेस तर तुझा जाच वाढायचा बाई. " मी त्यांना म्हणाले, " ताई तसही कोणाला वेळ आणि आपली किंमत आहे? जे इथे येवून बघतील. मला भीती वाटते तुम्ही माझ्यासोबत झोपा. " त्यांना माझं बोलणं पटलं आणि माझ्या बाजूला गोधडी टाकून त्या झोपल्या. माझ्या डोक्यावरून हात फिरवत कृष्णाचं भावगीत गाऊ लागल्या. मला रात्री कोणाच्या गाण्याचा आवाज येत होता याचा देखील मला उलगडा झाला. 


ताई भल्या पहाटे उठून स्नान उरकून, कोणी उठायच्या आत गावातल्या मंदिरात जाऊन यायच्या. कारण उशिर झाला आणि कोणी दिसलं की, म्हणायचं " सकाळी सकाळी विधवाच तोंड पाहिलं, आता दिवस कसा जाणार काय माहित? " आपल्यामुळे कोणाला त्रास नको म्हणून ताई पहाटेच जावून यायच्या. वाड्याच्या मागच्या भागात जिथे आम्ही रहात होतो तिथे बाग बहारली होती. ते सरस्वती ताईंचे कष्ट होते. ताईंनी प्रत्येक झाडाला पाणी मिळेल याची व्यवस्था केली होती. मागच्या विहिरीवर रहाट गाडग होतं. त्याचं खाली जाणार पाणी पाट काढून प्रत्येक झाडापर्यंत काढले होते. सकाळी मंदिरात जावून आल्यावर दुपारपर्यंत ताई त्यांच्या खोलीचा दरवाजा बंदच ठेवत. दुपारी सर्वजण जेवून वामकुक्षी घेत असताना त्या बाहेर येवून झाडांना गोंजारत, त्यांनी निगा राखत, त्यांच्याशी बोलत. त्या बागेतल्या अनंतच्या झाडावर ताईचं विशेष प्रेम होतं. मी त्यांना विचारलं असं का? तर त्या म्हणाल्या, " कावेरी, सकाळी मंदिरात जावून आल्यावर येता येता मी एक - दोन अनंत तोडून खोलीत घेऊन येते. मग दुपारपर्यंत त्याचा सुगंधच मला मी जिवंत असल्याचं सांगत असतो. त्याचा सुगंधच मला समर्पण शिकवतो. तोच सांगतो की, लोकांनी आपल्याला कितीही तोडलं, चुरगळालं तरी आपण सुगंध देण्याचं काम करत राहायचं. "


त्यांचं बोलणं ऐकल्यानंतर एक गोष्ट कळली मला आपण देव आणि गुरु शोधत फिरतो पण खरा गुरु कोणीही होऊ शकतो आपल्याकडे फक्त ती दृष्टी आणि ज्ञान ग्रहण करण्याची पात्रता हवी. नाहीतर श्रीकृष्णाने भगवत गीता सर्व सोडून फक्त अर्जुनालाच का सांगितली? कारण फक्त त्याचीच पात्रता होती. 'चांगदेव' जो योगी चौदाशे वर्षे जगला त्याने  फक्त चौदा वर्षाच्या मुक्ताईला गुरु नसतं मानलं. असो ताईंसोबत मला छान वाटतं होतं. आमच्या असण्या - नसण्याने कोणाला काही फरक पडत नव्हता. मी आता माझा स्वयंपाक माझ्याच खोलीत बनवत होते. सरस्वती ताई मला नवनवीन पदार्थ शिकवित होत्या.


 मला आता इथे ६-७ महिने झाले होते. एका दुपारी मी आणि सरस्वती ताई खोलीच्या बाहेर बसून गोधडी शिवत होतो. तेव्हा छोट्या - छोट्या मुलांचा आवाज आला. मी आणि सरस्वती ताई त्यांच्याकडे पाहत होतो. एक - एक जण हळूहळू चोर पावलांनी सरस्वती ताईंकडे येत होते. त्यामधून एक जण पटकन येवून ताईंच्या मांडीवर बसला, दुसर्याने त्यांच्या मानेभोंवती हात घालून मिठी मारली. ते दोघे चोरून चोरून माझ्याकडे बघत होते. त्यांनी हळूच ताईंच्या कानात काहीतरी विचारलं आणि ताई माझ्याकडे बघत बोलल्या, " हो, हीच तुमची नवी आई आहे. " मला क्षणभर कळलेच नाही. काय झालं. मी ताईंना पुन्हा विचारलं, " ताई आता तुम्ही काय म्हणालात? " ताईंनी पुन्हा उत्तर दिलं, " अगं कावेरी ही तुझीच मुलं आहेत." मला कळतं नव्हतं की त्यावेळी नक्की काय प्रतिक्रिया द्यावी.


मुलांनी सरस्वती ताईंचा पापा घेतला आणि माझ्याकडे बघत, लाजत निघून गेले. मी ताईंना विचारलं, " ताई तुम्ही जे बोलत ते खरं आहे का? " त्यावर ताई म्हणाल्या, " असं का विचारतेस कावेरी? तुला माहित नाही का? भावोजीना ३ मुले आहेत? " मी आश्चर्याने ताईंकडे बघत नकारार्थी मान हलवली. ताई म्हणाल्या, " कावेरी भावोजी तुझ्यापेक्षा जवळ - जवळ २० पावसाळे मोठे आहेत. त्याचं पाहिलं लग्न आपल्यासारखंच लहानपणी  झालं होतं. त्यांच्या पाहिल्या पत्नीचं नाव होतं 'गोदावरी '. " आणि ह्याचं नाव काय आहे? " मी प्रति प्रश्न केला. सरस्वती ताई माझ्याकडे नवलाने बघत म्हणाल्या, " अगं बाई अजून तुला तुझ्या ह्याचं नाव देखील माहित नाही का? तुझ्या ह्याचं नाव आहे,' महादेव इनामदार.' लक्षात राहू दे, फक्त कधी नाव घेवू नकोस. ताईंनी मला समजावत सांगितले. ताई पुढे बोलू लागल्या, " माझं आणि गोदावरीचं लग्न एका पावसाळ्याच्या अंतराने झालं. लग्न झालं तेव्हा मी आणि गोदावरी लहानच होतो. त्यामुळे खूप लवकर आमच्यात मैत्री झाली. आम्ही दोघी एकत्र खूप खेळायचो. लपाछपी, लगोर, काचापाणी, बाहुलीच लग्न खूप काही. माझ्यासोबत हे सर्व झाल्यानंतर काही दिवसांनी गोदावरीला दिवस गेले सासूबाईंनी तिला बजावलं होतं मला भेटायचं नाही, माझं तोंड बघायचं नाही. सासूबाई घरात नसताना ती यायची आणि आता मुलांनी जशी मागून गळ्यात हात टाकून मिठी मारली अगदी तशीच मिठी मारायची. खोडकर होती ती. भावोजी जरा पुढारलेल्या विचारांचे आहेत म्हणून त्यांनी तिला- मला भेटण्यापासून कधीच रोखलं नाही. 

दोन बाळंतपण सुखरूप झाली तिची. दोघेही मुलगेच. सासूबाई आणि मामांजी घरी नसताना यायची त्यांना घेऊन माझ्याकडे. मुलांचा लळा लागला मला. माझ्या आयुष्यात तेच क्षण काय ते सुखाचे असायचे बघ. तिसऱ्यावेळी मात्र तिला बाळंत व्याधी जडली आणि मुलगी ३ महिन्यांची असताना ती मुलांना पोरक करून गेली. त्यानंतर भावोजीना घरातून खूप आग्रह झाला लग्नाचा पण त्यांनी स्पष्ट नकार दिला. जवळ - जवळ दीड वर्षे झाली या गोष्टीला तुझ्या लग्नाच्या वेळी तुझ्या नवऱ्याच्या बाजूने आले होते ते लग्न लावायला. वरात पुढे गेली आणि काही कामासाठी हे मागे होते. जेव्हा भावोजी तिथे पोहचले तेव्हा सर्व संपलं होतं. तुझ्याबाबतीत जे झालं ते वाईट होतं पण त्यानंतर जे तुझ्यासोबत होणार होतं ते महाभयंकर ठरलं असतं. म्हणून भावोजीनी तुझ्या घरच्यांशी बोलून तिथेच तुझ्याशी लग्न केले. "

" माझ्या बरोबर काय महाभयंकर होणार होतं ताई? " मी आश्चर्याने सरस्वती ताईंना विचारलं. ताई म्हणाल्या, " कावेरी, तुझ्यासोबत जे झालं ते वाईटच होतं. त्याबरोबर मुलाकडंच्यांनी घरी येवून जे अपशब्द बोलले होते, त्यामुळे खूप मानहानी झाली होती. हळद लागून, लग्न न झालेली मुलगी म्हणजे ना धड कुमारिका, ना विधवा. तू घरात राहिली असतीस तर तुझ्या मागच्या बहिणींची लग्ने नसती झाली. म्हणून तुझ्या घरच्या मोठ्या माणसांनी तुझं लग्न देवासोबत लावून तुला देवाला सोडायचं असं ठरवलं होतं. " हे ऐकून माझ्या अंगावर सरकन काटा आला. "

हे सर्व ऐकून आजीची गोष्ट ऐकणाऱ्या स्वाती, जानकी, समीरा आणि अभिषेकच्या डोळ्यातही पाणी आलं. आपल्या आजीला किती सहन करावं लागलं याची त्यांना कल्पना येत होती. आजी म्हणते, " मला असं कधीच वाटलं नव्हतं की, ज्या घराणे मला प्रेम दिलं, माया दिली, लाडकोड केले, ज्यांनी मला एवढं जपलं ते माझ्यासाठी असा विचार करू शकतात. एका स्त्रीची या समाजात काही किंमत नाही हे एव्हाना मला कळून चुकलं होतं. सरस्वती ताई पुढे म्हणाल्या, " कावेरी, नशीबवान आहेस, भावोजीनसारखा नवरा मिळाला  तूला. नवस करूनही मिळणार नाही असा नवरा. तू बघ आज नाही तर उद्या ते तूला वाड्यात नक्की नेतील. " मी ताईंना विचारलं, " ताई तुम्हाला हे सर्व कोणी सांगितलं? " तेव्हा त्या म्हणाल्या, " माझ्या देखरेखीसाठी ज्या शेवंता बाई ठेवल्या होत्या ना. त्या वाड्यातच काम करतात. त्या कोणी नसलं की येतात मला भेटायला. तेव्हा सांगतात वाड्यात जे जे घडत ते.  खरं तर आता वाड्यात काय की कुठे काय? कुठे काहीही झालं तरी मला त्याच्याशी घेणं देणं नसतं. पण तूला माझ्या शेजारच्या खोलीत ठेवलं. तेव्हा वाटलं काहीतरी गंभीर आहे. त्यांनी सांगितल्यावर तुझ्याबद्दल सर्व कळलं मला. "

वाड्यात प्रवेश मिळो न मिळो पण माझ्या मनात देवाच्या जागी बसवलं होतं मी त्यांना. तिथे माझ्या घरचे मला देवाला सोडायला निघाले होते तिथे यांनी येवून मला त्या सर्वातून बाहेर काढलं होतं. आगळं - वेगळं नातं होतं, अनोखी लग्नाची गाठ होती. जी नियतीने त्यांच्यासोबत बांधली होती." आजीचं हे बोलणं ऐकून जानकीला आणि समीराला नात्यांची किंमत कळतं होती.

क्रमश ..........

अनोखी गाठ भाग १    #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-1-marathi--kadambari_5839

अनोखी गाठ २  #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-2---marathi--kadambari_5870

अनोखी गाठ ३  #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-3---marathi--kadambari_5889

अनोखी गाठ ४  #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-4---marathi--kadambari_5986

अनोखी गाठ ५   #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-5---marathi--kadambari_6023

अनोखी गाठ ६   #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-6-marathi-kadambari-_6109

अनोखी गाठ ७  #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-7-marathi-kadambari-_6145

अनोखी गाठ ८   #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-8-marathi-kadambari-_6221


अनोखी गाठ ९     # मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-9--marathi--kadambari_6331

अनोखी गाठ   भाग १०

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-10---marathi--kadambari_6468


अनोखी गाठ भाग ११ # मराठी _कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-11-marathi-kadambari-_6943


अनोखी गाठ भाग १२ # मराठी _कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-12---marathi--kadambari_6979

अनोखी गाठ  १३  # मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-13---marathi--kadambari_7010

अनोखी गाठ भाग १४    #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-14---marathi--kadambari_7049

अनोखी गाठ भाग १५     #मराठी _ कादंबरी

https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-15---marathi--kadambari_7090

🎭 Series Post

View all