अनोखी गाठ भाग २३ # मराठी _ कादंबरी
© आरती पाटील
( मागच्या भागात आपण पाहिलं की, पाचव्या दिवशी साखरबाई थोरल्या मालकीणबाईंचा म्हणजेच कावेरीच्या सासूबाईंचा निरोप घेऊन येतात. त्यांना न्हाणं आटोपून लगेच वाडयात बोलावलं होतं. कावेरी न्हाणं आटोपून लगबगीने , मागच्या दाराने वाडयात प्रवेश करतात. वाडयात काहीतरी कार्यक्रम असल्याचं त्यांच्या लक्षात येतं. साखरबाईंना त्या विचारतात. त्यावर घरात पूजा आहे आणि एक कार्यक्रम ठेवला आहे तुमच्यासाठी, तुम्ही मोठ्या झाल्या म्हणून. त्यावेळी कावेरीला अश्या दुपटी वागण्यावर नवल वाटत होतं. पूजा आणि कार्यक्रम झाल्यावर सासूबाईंनी कावेरीला एक ' साज ' भेट म्हणून दिला. सर्व संपल्यावर कावेरी आपल्या खोलीत आली. ती आपले वस्त्रे बदलणार तोच सासूबाई येतात आणि वस्त्रे बदलू नकोस आणि तुझं सामान बांधायला घे . असं म्हणतात. त्यांचं बोलणं ऐकून कावेरी घाबरते. आपली काही चूक झालीये म्हणून सासूबाई घराबाहेर काढत आहेत असा तिचा समज झाला. कावेरी पटकन बसून सासूबाईंचे पाय पकडून क्षमा याचना करते. सासूबाई बाई तिच्या या वागण्यावर चिडतात. तिला म्हणतात ," तुझ्या घरच्यांनी तुला काहीच शिकवलं नाही का ? मुलीला स्त्रीत्व मिळाल्यावर तिने पतीच्या खोलीत राहायचं असतं ." असं म्हणून त्या जातात. कावेरी सर्व सामान घेऊन नवऱ्याच्या खोलीत जाते. रात्री दरवाजाचा आवाज झाल्यावर ती बावरते आणि उठून एका कोपऱ्यात उभी राहते. आत आल्यावर नवऱ्याने तिला समोर उभं राहायला सांगितलं. घाबरत - घाबरत ती समोर जाते. काही प्रश्न विचारल्यावर 'तू शिकणार का?' असा प्रश्न हे विचारतात. माहेरी पूर्वी घराशेजारी पाहिलेली घटना तिच्या मनावर कोरली होती. नवऱ्याने तिला विचार करण्यासाठी वेळ दिला आणि झोपी गेला. इथे कावेरीच्या मनात मात्र शिक्षण, सासूबाई, गरम सळी , .....असे विचार असे विचार फिरत असतात..... आता पुढे. )
जानकीला हे सर्व ऐकून खूप राग येत होता. ती पटकन म्हणाली ," असे कसे क्रूर लोक होती ग ती ? सहा - सात वर्षाच्या कोवळ्या मुलीवर दया आली नाही त्यांना ? एवढे खालच्या पातळीपर्यंत जातातच कसे ?" जानकीबरोबर समीराला सुद्धा राग येत होता. ती पण म्हणाली, " हो आजी, कोणत्याच मनात दया नव्हती का ? कोणीतरी मध्ये यायला हवं ना ? " त्यावर आजी म्हणाली, " तुम्हांला आता राग येतोय पण त्यावेळी काही प्रथा , अनिष्ट रूढी यांचा एवढा पगडा होता लोकांवर की त्यांना या गोष्टी मुळात चुकीच्या वाटायच्याच नाहीत. त्यामुळे कोणी मध्ये येऊन थांबवण्याचा प्रश्नच नव्हता. या अश्या वागण्याने, म्हणजेच एका शिक्षा दिली की , पुढे असं कोणी वागण्याची हिम्मत करणार नाही असं त्यांचं मत होतं. स्त्रियांना त्यावेळी लग्नानंतर फक्त गृहप्रवेश वेळी पुढच्या दाराने प्रवेश होता. बाकी वयाच्या एका ठराविक काळापर्यंत मागच्या दारानेच जा - ये करायची. म्हातारपणात सूट होती. अश्या परिस्थितीत या गोष्टींविरुद्ध आवाज उठवणे वैगेरे तर खूप लांबची बाब होती. काही स्त्रियांना तर हा अन्याय आहे हे सुद्धा कळत नव्हतं. ज्यांना कळत होतं त्यासुद्धा काही करू शकत नव्हत्या. असो विषय वेगळ्या दिशेने गेला. मी माझी गोष्ट पुढे सांगते.
" रात्री मला झोप जरा उशिराच लागली. यांनी जे विचारलं होतं त्यावर विचार करण्यातच बराच वेळ गेला. सकाळी लवकर उठून आवरून मी खाली आले आणि स्वयंपाक घरात आले. स्वयंपाक घरातील बायका माझ्याकडे बघून गालातल्या गालात हसत होत्या. मला त्या असं का करतायत कळत नव्हतं. मी त्यांना विचारलं तर अजूनच हसत होत्या. मी पुन्हा विचारलं तर मला म्हणाल्या',' झोप नीट झाली ना ? ' मी हो म्हणाले. त्या अजून हसत होत्या. मग मी दुर्लक्ष केलं आणि सासूबाईंनी आज काय बनवायला सांगितलंय विचारून त्यांना कामात मदत करू लागले. काम करताना देखील माझ्या डोक्यात ' शिक्षण ' हाच विषय सुरु होता. मात्र माझं कामात लक्ष नाही पाहून बायकांना माझ्यावर हसण्याचं कारण मिळालं.
मला त्यावेळी सरस्वती ताईंच्या सल्ल्याची खूप गरज होती. त्यांना जाऊन भेटता आलं तर कोणी बार होईल ? असा विचार मनात चमकून गेला. सासूबाईंनी मला सांगितल्याशिवाय मागे जायचं नाही असं बजावलं होत. मी रात्री त्यांना काय सांगू ? हाच विचार फिरत होता. दुपारची जेवणे झाली आणि सर्वांची पांगापांग झाली. तशी मी कानोसा घेत वाड्याच्या मागे गेले. ताई नेहमीप्रमाणे कोणी नाही म्हणून खोलीबाहेर मोकळा श्वास घेत काहीतरी काम करत होत्या. मला पाहून त्यांना आश्चर्य वाटलं. त्यांनी मला विचार," कावेरी तू इथे का आलीस ? कोणी पाहिलं तर अनर्थ होईल. " मी ताईंना उठवलं आणि त्यांच्या खोलीत घेऊन गेले. ताईंना मी रात्री घडलेला सर्व प्रकार सांगितला आणि विचारलं ," ताई मी काय करू." त्यावर ताई म्हणाल्या, " मी तुला असं नाही म्हणणार की नवरा जे सांगेल ते प्रमाण मानून ते करत रहा पण जर नवरा चांगली गोष्ट सांगतोय तर कर. त्यानुसार वाग. शिक्षण एक क्रांती आहे. त्यामुळे आपल्याला त्यापासून दूर ठेवलं जातं. भाऊजी तुझी साथ देत आहेत तर नक्की शिक. तसही फक्त रात्री ते शिकवणार आहेत. तेव्हा कोणाला कळणार नाही. " ताईचं बोलणं ऐकून मला बरं वाटलं. कोणी यायच्या आत मी ताईंचा निरोप घेऊन निघाले.
रात्री हे खोलीत आले. माझ्याकडे पाहिलं. मी कालच्यासारखीच एका कोपऱ्यात उभी होते. त्यांनी मला विचारलं ," काय ठरवलंत ?" मला पटकन बोलता आलं नाही. त्यांना वाटलं मला नाही शिकायचं. ते म्हणाले, " नाही शिकायचं तर ठीक आहे, जशी तुझी इच्छा. " असं बोलून ते झोपायला जाणार तोच मी मागे लपवलेली पाटी त्यांच्या समोर धरली. त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा होता. मी शिकणार याचा आनंद माझ्यापेक्षा जास्त त्यांना झाला होता. त्यांनी ती पाटी माझ्या हातातून घेतली आणि आम्ही दोघेही खाली बसलो. त्यांनी मला विचारलं, " कावेरी पहिलं काय शिकणार ?" मी जरा विचारातच होते . ते मला म्हणाले," तस पाहिलं तर नवीन विद्यार्थ्याला पाहिलं अक्षर " श्री " शिकवलं जातं. तू सांग तुला पाहिलं काय शिकायचं आहे ?" मी त्यांच्याकडे पाहत हळूच म्हणाले," सरस्वती " , मला पहिल्यांदा सरस्वती लिहायला शिकायचं आहे. ज्ञान देवी 'सरस्वती ' आणि मला योग्य मार्ग दाखवणारी, सांभाळणारी, मला शिक्षणाकडे पाऊल टाकायला मदत करणारी सरस्वती ताई. " माझं उत्तर ऐकून त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव होते. त्यांनी पाटीवर मला 'सरस्वती ' लिहून दिलं आणि मी बऱ्याच वेळ ते गिरवत होते. त्यानंतर त्यांनी मला ' श्री ' काढून दिलं आणि गिरवायला सांगितलं. माझी अक्षर ओळख ही ' सरस्वती ' शब्दाने झाली आणि त्यानंतर सरस्वती माझ्यावर नेहमी प्रसन्न राहिली.
माझ्या मनातली 'ह्यांच्या ' विषयीची भीती, एक अवघडलेपण होत ते हळूहळू निघून गेलं. रात्री ते मला शिकवत , दिवसा मी दुपारी जेवण झाल्यावर खोलीत येऊन रात्रीच्या अभ्यासाची उजळणी करायचे. मला हळू- हळू अभ्यासाची गोडी लागली. माझा फक्त आणि फक्त खोलीतच व्हायचा. मी काहीही झालं तरी खोलीच्या बाहेर ही गोष्ट येऊ द्यायची नाही असं पक्क केलं होतं. सरस्वती ताई माझ्या या निर्णयाने खुश होत्या. मी त्यांना त्यांचं नाव तांदूळ निवडताना त्यात लिहून दाखवलं होतं. ताईंच्या चेहऱ्यावरचा तो आनंद अजून आठवतोय मला. एकंदरीत शिक्षण मला एक वेगळं जग दाखवत होतं. त्यात मी रमत होते. शिक्षणाचे सुंदर रंग माझ्या आयुष्यात हळू हळू भरत होते.
एके दिवशी मुनीम/ लेखापाल ( भाऊराव ) जमिनीचे सर्व हिशोब घेऊन ' ह्यांच्याकडे ' आले. मी आत होते प मला सर्व ऐकू येत होतं. त्यांनी ह्यांना सांगितले, " मालक , हे सर्व मागच्या तीन महिन्याचे हिशोब. तुम्ही एकदा बघून घ्या. " हे त्यांच्याकडे पाहून म्हणाले की ," भाऊराव , तुम्ही पाहताय तर ते बरोबरचं असणार. " त्यावर ते म्हणाले, " तरीही मालक, तुम्ही एकदा पाहिलंत तर बरं होईल. " त्यांच्या या बोलण्यावर ह्यांना भाऊरावांना हिशोब वही तिथेच ठेवा मी नंतर बघून पाठवतो. असं सांगितलं. भाऊराव हिशोब वह्या तिथेच ठेवून गेले. त्यानंतर मी बाहेर आले आणि त्यांना म्हणाले, " काय हो , तुम्ही भाऊरावांना असं का म्हणालात की, तुम्ही पाहत असाल तर बरोबरच असणार ? नाही म्हणजे असेलही तरीही अधूनमधून लक्ष दिलं की एक वचक राहतो आणि कामे चोख होतात. " ते हसले आणि म्हणाले," अगं त्यांच्या अनेक पिढया आपल्या जमिनीच्या हिशोब ठेवण्यातच गेल्या. त्यामुळे पुरेपूर विश्वास आहे मला आणि आपल्या घरच्यांचा त्यांच्यावर." त्यावर मला जास्त काही बोलता आलं नाही. अनेक वर्ष कोणी हिशोब पाहिलाच नव्हता. भाऊराव वही तपासणीसाठी द्यायचे पण त्यांनाही माहित होतं की कोणीही हिशोब वही तपासत नाही. मग मी त्यांना म्हणाले," बरं असेल. पण मी काय म्हणते, आता ह्या हिशोब वह्या इथे आहेत तर मी तपासू का ? म्हणजे माझा अभ्यासाची उजळणी सुद्धा होईल." माझ्याकडे पाहून ते हसत म्हणाले," अभ्यासाची गोडी वाढलीये बहुदा." त्यांनी मला हिशोब वह्या तपासण्याची परवानगी दिली आणि सूचनाही दिली," दुपारी सर्वजण झोपले असताना हा सर कर." अशी गोड समज देऊन ते गेले. त्यांचा स्वभाव मला आवडू लागला होता. बळजबरीचा अधिकार ते गाजवत नव्हते. समजावत होते. समजून घेत होते. वाडयात दुसरं काही नाही तरी 'हे ' , सरस्वती ताई आणि मुलं यांच्यात जीव रमला होता.
दुपारी सर्वजण जेवणानंतर मी खोलीत आले आणि आतून दार बंद करून हिशोब करायला बसले. दोन - तीन पाने हिशोब लागला पण त्यापुढे हिशोब लागत नव्हता. मी तीन महिन्यांचा हिशोब पुन्हा पुन्हा केला. साडे चार रुपये चा हिशोब नाहीच मिळाला. मग मी ठरवलं , रात्री ह्यांच्या कानावर हा प्रकार घालायचा. रात्री जेवण झाल्यावर मी खोलीत गेले आणि सर्व प्रकार त्यांना सांगितला. त्यांना थोडावेळ खरंच वाटत नव्हतं. त्यांना वाटलं की , मी आज अभ्यास करतेय माझ्याकडून चूक होऊ शकते म्हणून त्यांनी स्वतः हिशोब करायला घेतला. पण ते समोर आलं जे सत्य होतं. या गोष्टीचा ह्यांना खूप राग आला. एवढे वर्ष डोळे झाकून भाऊरावांवर विश्वास ठेवला. त्याबदल्यात त्यांनी दगा केला. ते रागात बाहेर निघाले तस मी त्यांना अडवलं. त्यांना मी समजावलं," अहो आता लगेच काही बोलू नका आणि रागात मी शिकते ही गोष्ट बाहेर येऊ शकते. त्यामुळे डोकं शांत ठेवून निर्णय घ्या. " त्यांनी माझ्याकडं पाहिलं अन म्हणाले," मी तुला म्हणालो होतो ना , शिक्षण बदल घडवतो. स्वतःकडे बघ तुझ्यात किती बदल झाला आहे." त्यावेळी मात्र मला माझ्या प्रगल्भ बोलण्याचं कारण कळलं होत.
त्यावेळी ह्याचा राग कमी झाला नव्हता फक्त नियंत्रित केला होता त्यांनी.
क्रमश........
अनोखी गाठ भाग १ #मराठी _ कादंबरी
https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-1-marathi--kadambari_5839
अनोखी गाठ २ #मराठी _ कादंबरी
https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-2---marathi--kadambari_5870
अनोखी गाठ ३ #मराठी _ कादंबरी
https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-3---marathi--kadambari_5889
अनोखी गाठ ४ #मराठी _ कादंबरी
https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-4---marathi--kadambari_5986
अनोखी गाठ ५ #मराठी _ कादंबरी
https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-5---marathi--kadambari_6023
अनोखी गाठ ६ #मराठी _ कादंबरी
https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-6-marathi-kadambari-_6109
अनोखी गाठ ७ #मराठी _ कादंबरी
https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-7-marathi-kadambari-_6145
अनोखी गाठ ८ #मराठी _ कादंबरी
https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-8-marathi-kadambari-_6221
अनोखी गाठ ९ # मराठी _ कादंबरी
https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-9--marathi--kadambari_6331
अनोखी गाठ भाग १०
https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-10---marathi--kadambari_6468
अनोखी गाठ भाग ११ # मराठी _कादंबरी
https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-11-marathi-kadambari-_6943
अनोखी गाठ भाग १२ # मराठी _कादंबरी
https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-12---marathi--kadambari_6979
अनोखी गाठ १३ # मराठी _ कादंबरी
https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-13---marathi--kadambari_7010
अनोखी गाठ भाग १४ #मराठी _ कादंबरी
https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-14---marathi--kadambari_7049
अनोखी गाठ भाग १५ #मराठी _ कादंबरी
https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-15---marathi--kadambari_7090
अनोखी गाठ भाग १६ #मराठी _ कादंबरी
https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-16----marathi--kadambari_7128
अनोखी गाठ भाग १७ #मराठी _ कादंबरी
https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-17---marathi--kadambari_7183
अनोखी गाठ भाग १८ #मराठी _ कादंबरी
https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-18---marathi--kadambari_7220
अनोखी गाठ भाग १९ #मराठी _ कादंबरी
https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-19---marathi--kadambari_7727
अनोखी गाठ भाग २० #मराठी _ कादंबरी
https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-20----marathi-kadambari-_7806
अनोखी गाठ भाग २१ # मराठी _ कादंबरी
https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-20--marathi--kadambari_7882
अनोखी गाठ भाग २२ # मराठी _ कादंबरी
https://www.irablogging.com/blog/anokhi-gath-bhag-22-----marathi-kadambari-_7930
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा