एक संघर्ष : आईविरुद्धचा (भाग - ५ अंतिम भाग)
भाग -१ https://www.irablogging.com/blog/ek-sangharsh-:-aai-viruddhacha-_5314
भाग -२
https://www.irablogging.com/blog/ek-sangharsh-:-aai-viruddhacha--part---2_5332
भाग - ३
https://www.irablogging.com/blog/ek-sangharsh-:-aai-viruddhacha--part---3_5389
भाग - ४
https://www.irablogging.com/blog/ek-sangharsh-:-aai-viruddhacha--part---4_5429
आता पुढे...
मृदुलाः मला तर, यावर काय बोलू, काहीच सुचत नाही आहे. खरंच खूप संघर्ष केलाय तुम्ही दोघांनी! आणि सविता, सविताचा तर पुनर्जन्मच झाला आहे..
वीरः हो, बरोबर आहे, तिचा पुनर्जन्मच झालाय! तेही तिच्या नशिबाचे उरलेले हाल सहन करण्यासाठी!
मृदुलाः अरे, असं का बोलतोस?
वीरः हो, असंच म्हणाव लागेल! दुसरं अजून काय म्हणणार!
मृदुलाः का? काय झालं होतं? बाळाच्या जन्मानंतर तर सगळं व्यवस्थित झाला असेल.
वीरः नाही ग! कोणत्या जन्माचे पाप आम्ही भोगत होतो, काय माहित? आमचा त्रास कमी व्हायचं नावच घेत नव्हता .. एक संकट संपत नाही की दुसरं दत्त म्हणून हजर!
मृदुलाः नीट सांगशील का, काय झालं होतं ते?
वीरः सांगतो ना! ऐक.. अनय मोठा होत होता. आम्ही त्याची खूप काळजी घेत होतो. सविता तर त्याला नजरेआड पण होऊ देत नव्हती. खूप जपायची त्याला! एवढी काळजी घेऊन पण, जे व्हायचं तेच झालं! अनय तीन साडेतीन वर्षाचा होईपर्यंत तसं सगळं व्यवस्थित सुरु होतं.. ऋतु बदलामुळे होणारे सर्दी, खोकला, ताप आणि अधूनमधून पोटदुखी हे त्रास होतेच... ते नैसर्गिकच होते म्हणा....
पण अनय साडेतीन वर्षाचा असेल, तेव्हा तो सारखा कुरकुर करायचा. मग पोट दुखतंय, पोट दुखतंय करायचा.. आधी वाटलं, काही बाहेरचं खाण्यात आल्याने दुखत असेल. पण नाही.. दोन-तीन वेळा दवाखान्यात पण घेऊन गेलो. तात्पुरता आराम वाटायचा... पण परत पोट दुखणं सुरू व्हायचं...
एका डॉक्टरांना शंका आली.. अनयच्या किडनी (मुत्रपिंड)चा एक्स-रे (क्ष-किरण) काढायला सांगितला.. परत दवाखाने सुरू झाले. एक्स-रे काढला. त्याचा रिपोर्ट (अहवाल) आला... तर त्यात किडनी दोष निघाला.. अजून सखोल तपासणी केली तर किडनी खराब झाल्याचे निष्पन्न झाले... अनयचा त्रास दिवसेन दिवस वाढतच होता.. त्या एवढ्याशा जीवाकडे बघवत नव्हतं.. खूप त्रास व्हायचा ग त्याला! खूप रडायचा तो... त्याचा त्रास पाहून आम्हालाच रडू यायचं..
गोळ्या औषधांचा फरक पडत नसल्यामुळे त्याला डायलिसिस सुरू केलं.. पण ते सुद्धा किती दिवस करणार? त्याने पण त्याला त्रास व्हायचा... सारखं त्याला दवाखान्यात नाव लागायचं.. डॉक्टरांशी चर्चा केली, तेव्हा यावर किडनी ट्रान्सप्लांट (मुत्रपिंड प्रत्यारोपण) हा एकच उपाय होता..
मृदुलाः अरे देवा, एवढ्या छोट्या मुलाची किडनी ट्रान्सप्लांट?
वीरः हो! आम्हाला परत मेल्याहून मेल्यासारखं झालं... आम्ही तो पण धक्का सहन केला... किडनीसाठी नोंदणी केली.. पण वेटिंग लिस्ट (प्रतिक्षा यादी)मोठी होती. काही दिवसांनी एक किडनी मिळाली... मग त्यासाठीची रक्त तपासणी, एक्स-रे आणि बाकीच्या तपासण्या केल्यात. इथपर्यंत ठीक होतं. त्यानंतर महत्त्वाची Antibody Cross Match Test केली. पण ती पॉझिटिव्ह (सकारात्मक)आली. परत आमच्या पदरी निराशाच आली. आता सगळं आमच्या सहनशक्ती पलीकडे जात होतं. आम्ही हळू हळू खचत चाललो होतो...
आणि एक दिवस, सविता सकाळीच उठली... एकदम फ्रेश (ताजीतवानी) दिसत होती. तिच्या चेहर्यावर धीर गंभीर भाव होते. जणू काहीतरी दृढनिश्चय केला असावा... बऱ्याच दिवसानंतर तिला असं बघून मलाही बरं वाटलं. मी सकाळची कामे उरकली. त्यानंतर आम्ही नाश्ता केला, आणि ती बोलली, अहो, आपण आज दवाखान्यात जाऊ या... आपल्या अनयला पण घेऊन जाऊ... मी तिला विचारलंसुद्धा, का ग? काय झालंय? डॉक्टरांनी आज तर नाही बोलावलं... अजून दोन दिवसांनी बोलावलं आहे.. तेव्हा ती बोलली, मला डॉक्टरांकडे काम आहे. मला वाटलं काल अनयला जरा जास्त त्रास झाला, म्हणून असेल..
आम्ही सगळे आवरून दवाखान्यात डॉक्टरांकडे गेलो. आम्हाला पाहून डॉक्टर पण चकित झाले... ते म्हणाले, तुम्हाला तर मी दोन दिवसानंतर बोलवलं होतं. तसं सविता बोलली, हो डॉक्टर! पण मला तुमच्याशी जरा बोलायचं होतं. डॉक्टर म्हणाले, काय झालं? अनयला जास्त त्रास होतोय का? तसं ती म्हणाली, तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्रास होतोच आहे आणि होणारच! पण असं किती दिवस या लेकराने सहन करायचं? डॉक्टर म्हणाले, बरोबर आहे तुमचं! पण जोपर्यंत दाता मिळत नाही आणि ती किडनी जोपर्यंत अनयच्या किडनीशी जुळत नाही, तोपर्यंत तर असा त्रास होणारंच! थोडं धीराने घ्या. आमचा शोध चालूच आहे.
तसं सविता बोलली, डॉक्टर, अनयची मी आई आहे... त्याला होणारा त्रास आता मला सहन होत नाही, हो! आता अनयला जेवढा त्रास होत आहे, त्या त्रासापुढे, त्याला या जगात आणायला मला झालेला त्रास काहीच नाही! खूप त्रास होत आहे हो, माझ्या लेकरला! बोलता बोलता तिच्या डोळ्यांतून अश्रू येत होते आणि... आणि अचानक तिने तिचे डोळे पुसले.. आणि खंबीरपणे बोलु लागली, डॉक्टर माझी किडनी माझ्या बाळाला द्या... माझा निश्चय झालेला आहे... माझ्या अनयसाठी मी माझा जीवही द्यायला तयार आहे. डॉक्टर म्हणाले, अहो पण, तुम्ही आत्ताच कुठे सगळ्या त्रासातून बाहेर येत आहात.. अजून त्रास तुम्हाला नाही झेपणार! तसं ती बोलली, नाही डॉक्टर, मला काहीच होणार नाही. मी खंबीर आहे.. लवकरात लवकर पुढील प्रक्रिया सुरू करा.. आमच्यावर कृपा करा डॉक्टर! मी आणि डॉक्टर तिच्याकडे अवाक होऊन पाहत होतो...
डॉक्टर सुरू करताय न पुढची प्रक्रिया?, तिच्या आवाजाने आम्ही भानावर आलो.. तसे डॉक्टर म्हणाले, ठीक आहे.. आपण आधी सगळ्या तपासण्या करू.. मग बघू, तुमची किडनी अनयच्या किडनीशी जुळतेय का ते! तेव्हा सविताच्या चेहऱ्यावर जे समाधान होते, ते समाधान आजपर्यंत मी कधीच पाहिले नव्हते!
नंतर डॉक्टरांनी तिच्या सगळ्या तपासण्या केल्यात. मग परत Antibody Cross Match Test केली आणि काय आश्चर्य! त्याचा अहवाल नकारात्मक आला... म्हणजे आता सविताची किडनी अनयला देता येणार होती.. आम्ही दोघेही खूप खुश झालो, त्या दिवशी! आम्ही तिघेही समाधानाने झोपलो..
काही दिवसातच सविताची किडनी अनयला बसविण्यात आली आणि तीन-चार महिन्यात दोघेही ठीक झाले.. पण आता सविताला स्वतःची जास्त काळजी घ्यावी लागणार होती... जेव्हा ते दोघं बरं होऊन घरी आले, तेव्हा एवढं समाधान लाभलं मला कि त्याची तुलना कशाशीच होऊ शकत नाही.. परत एकदा संकटावर मात करून आम्ही यशस्वी झालो होतो.. खुप कृतकृत्य झाल्यासारखं वाटंत होतं!
मृदुलाः किती रे एकावर एक संकटे! असं वाटतंय, मी एखादा चित्रपटच बघत आहे ... प्रत्येक संकटावर तुम्ही मात केली, हे विशेष!
वीरः देवाने आयुष्य दिले तर जगावं लागेलच ना! आलेल्या संकटांचा सामना करावाच लागणार! देव संकट पेरत होता आणि आम्ही उचलत होतो...
(बोलता बोलता त्याला हसु आले तसं)
मृदुलाः काय रे, काय झालं हसायला?
वीरः माझ्या नशिबात एवढी संकटं लिहुन ठेवली होती म्हणुन कि काय माझ्या आण्णांनी माझं नाव वीर ठेवलंय... आणि सविता, तिला फक्त देणं माहीत .. नदीसारखी कायम देत, वाहत राहणारी...
ते ऐकून मृदुलाला पण हसु आलं..
वीरः अशातच अनयचा पाचवा वाढदिवस आला... अनयचा पाचवा वाढदिवस मोठा साजरा करायची, सविताची खूप इच्छा होती... बारस्यानंतर आई आपल्याकडे आल्या नाही, या निमित्ताने तरी येतील, हे खास कारण! मग काय परत दोन्ही दादांना आणि तिन्ही बहिणींना फोन केला.. पण सगळ्यांनी काही ना काही कारणे सांगितलीत, न येण्यासाठी... मग आईला केला. आई बोलली, पाहते कसं जमतंय ते.. मी आईला म्हटलं की, वाढदिवसाच्या दोन दिवस आधी, मी येतो तुला घ्यायला.. तर नाही बोलली... मी येईल माझी माझी, म्हणाली..
वाढदिवसाचा दिवस उजाडला, तरी आई आली नव्हती. माझे भाऊ - बहिणी येणे तर शक्यच नव्हते... एक आशा फक्त आईची होती... संध्याकाळ झाली. वाढदिवसासाठी बोलाविलेले सगळे लोक जमा झाले होते. पण मी फाटकाकडे डोळे लावून बसलो होतो. आई अजूनही आली नव्हती. शेवटी सगळे कंटाळले.. अनय पण घाई करायला लागला... केक कापायचा, केक कापायचा, म्हणून बोलू लागला. पण अजूनही आई आलेली नव्हती. मी फोन केला, तर फोनपण उचलत नव्हती.
शेवटी, मी समजून गेलो की, आता ती येणार नाही म्हणून! मग काय? तसाच केक कापला.. अनय खूप खुश होता! त्याच्याकडे पाहून कसं तरी चेहऱ्यावर हसू ठेवत होतो.. सगळा कार्यक्रम छान पार पडला. सगळे आपापल्या घरी गेले. पण मला घरी जावंसंच वाटत नव्हतं. राहून राहून मनात विचार येत होते, आई का असं वागली? का नाही आली? मी अशी काय चूक केली आहे? आई का असं वागते माझ्याशी? माझ्यासाठी नाही, निदान अनयसाठी तरी तिने यायला हवं होतं...
त्या दिवसापासून, तेच ते विचार सारखे डोक्यात फिरत होते. भाऊ-बहीण तर असून नसल्यासारखेच होते. माझ्यासमोर दोन आईंची उदाहरणे होती.. एक माझी आई होती, जिने कधी मला जवळ घेतलं नाही की, मायेने माझ्या पाठीवर हात फिरवला नाही, ना कधी माझी विचारपूस केली. उलट मला माझ्या बायकोसोबत घरातून हाकलून दिलं, आमची बदनामी केली... आणि एकीकडे माझ्या मुलाची आई होती... तिला बाळ होत नव्हतं, असं असतांना बाळ होण्यासाठी तिने काय काय नाही सहन केलं.. एवढं करुनही ती थांबली नाही, वेळ पडली तर तिने स्वतःची किडनीसुद्धा मुलाला दिली..
मी ही आईच्या उदरातून आलो होतो आणि माझा मुलगा पण आईच्या उदरातूनच... पण मग हा जमीन-अस्मानचा फरक का? आई ही आईच असते, तिची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही.. आजपर्यंत आईवर किती तरी लिहिलं गेलं आहे, तिचे गुणगान गायले गेले आहेत.. आईची महती साऱ्या जगाला माहित आहे.. मग माझ्या बाबतीतच असं का? मी असं काय पाप केलं, काय चुका केल्या, की माझी सख्खी आई माझ्याशी असं वागत आहे? हे असे विचार करून करून माझं डोकं फुटायची वेळ आली. सारंख वाईट वाटायचं.. २० वर्षांत एकाही बहिणीने आपल्या लहान भावाला विचारलं नाही.... ३-३ बहिणी होत्या, २ भाऊ होते. पण एकही जण माझ्याशी कधी बोलला नाही.. दिवस-रात्र तेच ते विचार... आणि अशा विचारात असतांनाच मला पक्षपाताचा (प्यारालीसीस) झटका आला..
जसं सविताच्या वडीलांना कळालं तसं सविताच्या वडिलांनी मला त्यांच्याकडे नेलं.. त्यांनी त्यांच्या मुलाप्रमाणे माझी खूप काळजी घेतली.. तिथेच माझ्यावर ५-६ महिने उपचार झालेत. माझ्या सासर्यांच गाव माझ्या बहिणींच्या गावाजवळ होतं. म्हणून माझ्या दोन बहिणी मला भेटायला आल्या होत्या.. पण आई, आई नाही आली.. भाऊ पण नाही आले. आणि तिसरी बहीण पण नाही आली.. मला खूप वाईट वाटायचं.. पण काय करणार? सोडुन देण्याशिवाय पर्याय नव्हता...
आम्ही आईला अधुनमधुन भेटायला जायचो.पण आईने कधी अनयला जवळ घेतलं नाही. त्याचे लाड करणे तर दूरच.. उलट तिला वाटायचं की, मी तिच्या राहत्या घरातला हिस्सा मागायला आलो की काय! मी कधीच काही मागितलं नाही ग! मोठा दादा खूप श्रीमंत झालाय. त्याची गावी दोन घरे आहेत. मुंबईत पण दोन फ्लॅट आहेत. पण तो आईला विचारत सुद्धा नाही.. आईचे खूप हाल होत होते. मी आईला म्हटलं की आमच्यासोबत मुंबईला चल, माझ्याकडे राहा. पण नाही... आई नाहीच आली...
मी सगळ्या जगासोबत भांडू शकतो, पण आपले घरचे? त्यांच्यासोबत कसं भांडणार? तेवढी हिंमत नाही ग माझ्यात! त्यांनीच मला एवढा त्रास दिलाय, मनस्ताप दिलाय आहे की बाहेरच्या लोकांनी दिलेला त्रास मला काहीच वाटत नाही.. अशा बाबतीत, आता मी खूप निष्ठुर झालोय, असं मला वाटतं.
मृदुलाः खरं आहे तुझं! आपल्याच लोकांसोबत आपण कसं भांडणार?
वीरः गेल्या महिन्यातच आईची तब्येत जास्तच बिघडली होती. नीट जेवण नाही, वेळेवर औषध घेणे नाही की स्वतःची काळजी घेणे नाही.. मी तिला जे पैसे पाठवत होतो ते सुद्धा मधला दादा तिच्याकडून घेऊन घेत होता. त्यादिवशी ती अंगण झाडता झाडता चक्कर येऊन अंगणातच पडली. पण तिच्याकडे कोणाचंच लक्ष नव्हतं.. शेवटी बाजुच्यांनी तिला इस्पितळात भरती केले आणि मला फोन केला.. बाजूचे काका मला बोलले, वीर तु पटकन इकडे निघून ये. तुझ्याशिवाय म्हातारीला कोणीच बघणार नाही. म्हातारी शुद्धीवर नाही, पण सारखं तुझं आणि सविताच नाव घेतेय. तुला जेवढं लवकर येता येईल, तेवढं लवकर ये..तो निरोप ऐकून माझ्या मनात कालवाकालव झाली.. मला राहवले गेले नाही आणि जसा निरोप मिळाला तसं आम्ही तिघेजण गावी निघून आलो.
डॉक्टरांनी आम्हाला बोलावून घेतले. डॉक्टर बोलले, तुमची आई शुद्धीवर नाही, परंतु अशा परिस्थितीतीतही ती तुमंच, सविताचं आणि अनयचं नाव घेत आहे. तिला जाऊन भेटा.. त्यांचे काहीच दिवस उरले आहेत.. हे ऐकून तर मला रडूच कोसळले. मी लगेच आईला जिथे ठेवले होते तिथे गेलो.. आईला अतिदक्षता विभागात (आयसीयू) दाखल केले होते. तिला कसल्या कसल्या नळ्या लावल्या होत्या. ऑक्सीजन सुरू होता.
मी तिच्या जवळ गेलो, तिचा हात हातात घेतला आणि तिला आई म्हणून हाक मारली. माझी हाक ऐकून ती शुद्धीवर आली. आम्हाला पाहून तिच्या चेहऱ्यावर हसू आलं होतं. तसं आमच्या डोळ्यांत आनंदाश्रू तराळले.. आम्हाला तिघांना तिने जवळ बोलावलं. तशा अवस्थेत पण तिला भरुन आलं.. इतक्या वर्षांनंतर तिने पहिल्यांदा माझ्या चेहऱ्यावरून प्रेमाने हात फिरवला... सविताला जवळ बोलावलं... तिच्या डोक्यावर हात ठेवला... आणि, आणि दोन्ही हात जोडून ती आमची माफी मागू लागली.
तीचं असं वागणं पाहुन, आम्हाला खूप रडू येत होतं... आमच्या तोंडून शब्दही फुटतं नव्हते.. तिने अनयला पण जवळ घेतलं. त्याच्या कपाळावर ओठ टेकवले.. त्याला पण आशीर्वाद दिला... परत एकदा हात जोडून बोलली, पोरांनो, मला माफ करा, मी चुकले! मी तुम्हाला ओळखू शकले नाही... माझी माणंसं मला समजली नाही...
मी तिला बोललो, नाही आई, असे बोलू नकोस! आम्ही लहान आहोत आणि रागवणं हा तुझा हक्क आहे.. कृपा करुन असं बोलू नको गं... ती म्हणाली, नाही रे... मला बोलू दे... मी खरंच चुकले.. मी जर तुला असं दुर लोटलं नसतं, तर तु पण इथे राहुन तुझ्या भावांसारखाच झाला असतास.. कदाचित वाईट मार्गाने गेला असतास... आणि मला ते आवडलं नसतं... मी वर जाऊन तुझ्या आण्णांना काय तोंड दाखवणार होते?
पण मी जे वागली ते चुकीचंच होतं.. माझीच मला लाज वाटतेय! सविता, मी तुला नेहमी वाईटसाईट बोलली... तुला शिव्याशाप दिलेत... मी एक आई असुनसुद्धा तुला, तु कधीच आई होऊ शकणार नाही, असा शाप देत होते... पण मी जेव्हा बारस्याला आली होती, तेव्हा तु आई होण्यासाठी काय काय त्रास भोगलास, हे मला समजलं.. कदाचित माझ्या अशा बोलण्याने तुम्हाला एवढा त्रास झाला असेल.. तेव्हाच मला माझी लाज वाटतं होती. पण मी हे आजपर्यंत बोलु शकली नाही. आणि म्हणूनच मी अनयच्या वाढदिवसाला आली नव्हती. मला माफ करा रे पोरांनो! यानंतर तुम्हाला असा त्रास होणार नाही... माझे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी असतील... तुमची काळजी घ्या आणि सुखात राहा, असं म्हणून तिने आमचे हात हातात घेतले.. आणि तसेच डोळे मिटले...
आम्हाला खूप रडु येत होतंं.. मी सारखं आई, आई म्हणून हाक मारत होतो. पण आता ती या जगात नव्हती... शेवटी का होईना, तिने आम्हाला जवळ घेतलं होतं... प्रेमाने आमच्या चेहऱ्यावर हात फिरवला होता.. तिच्या प्रेमासाठीच तर आम्ही भुकेले होतो... शेवटी, आईचं प्रेमच जिंकलं होतं... तिचा हात हातात घेऊन कितीतरी वेळ आम्ही रडत होतो.
पुन्हा एकदा त्याला भरुन आलं... तो खुप रडला.. मृदुलाने पण त्याला मनःसोक्त रडु दिलं.. आवेग ओसरल्यावर,
वीरः तिचे सगळे दिवस करून आम्ही मुंबईला परत आलो. पण खूप कमी जाणवत होती. आई आमच्या मुंबईच्या घरी कधी आली नव्हती, पण आमचं हे घर तिच्याशिवाय आम्हाला रिकामं वाटंत होतं.. असाच विचार करता करता सगळा वीस-बावीस वर्षांच्या घटना एखाद्या चित्रपटासारख्या डोळ्यासमोर आल्यात. आजपर्यंत या गोष्टी मी कोणालाच बोललो नव्हतो... पण का कुणास ठाऊक? हे सगळं तुला सांगावसं वाटलं... तुझ्या जवळ मन मोकळं करावसं वाटलं... आजपर्यंत मी पैसा खूप कमवला. पण माझी हक्काची माणसे आज माझ्याजवळ नाहीत. विशेषतः माझी आई... तिची कमी नेहमीच भासणार....मी पैसा तर भरपुर कमवला तसेच माणसंही कमवलीत. पण माझ्या घरचे मला समजून घेऊ शकले नाही, हीच खंत होती.. पण आईच्या बोलण्याने माझं सगळी खंत दुर झाली.. आज वाटतयं, तिचे आशीर्वाद आता कायमच आमच्या पाठीशी राहतील... तसं पाहीलं तर आईविरुद्ध असलेला पण नसलेला हा एक संघर्ष शेवटी संपला होता...
मृदुलाः हो, नक्कीच ! आता तुमच्या आयुष्यात कोणतीच संकटे येणार नाहीत.. शेवटी तुमच्या पाठीशी एका आईचा आशीर्वाद आहे...
वीरः हो, नक्कीच ! चल निघुया, खुप उशीर झालाय.. एकदा घरी ये.. सविताला आणि अनयला खुप छान वाटेल..
मृदुलाः हो नक्की येईल! मला तर सविताला भेटायची खुप इच्छा होतेय.. चल निघुया आता..
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा