Login

एक संघर्ष : आईविरुद्धचा ! (भाग - २)

Sangharsh wachat raha...

एक संघर्ष : आईविरुद्धचा (भाग - २)

भाग -१  https://www.irablogging.com/blog/ek-sangharsh-:-aai-viruddhacha-_5314

आता पुढे....

वीरः हो न! आईला कसं काय कळालं काय माहीत? पण त्या दिवशी, ती आली तेव्हा, सविता घरी एकटीच होती. माझ्या आईला, असं घरी आलेलं पाहून तर तिला खूप भीती वाटली. तेव्हा आतासारखे मोबाईल नव्हते, लगेच फोन करुन सांगायला...  त्या दिवशी आई तिला खूप बोलली... खूप म्हणजे खूप! आणि जाता जाता तिला परत बोलून गेली, की तु कधीच आई होऊ शकणार नाही... आई तिला काय काय बोलत होती आणि त्या बोलण्याने शेवटी सविता चक्कर येऊन बेशुद्ध पडली.

          आजूबाजूच्यांना घरातील भांडणे नवीन नव्हती. त्यांना वाटंल, त्यांच्या घरातल्यासारखी यांच्या घरातली भांडणं असतील. त्यामुळे त्यांनी आमच्या खोलीकडे लक्ष नाही दिलं. मी संध्याकाळी ऑफिस मधून घरी आलो. आणि पाहतो तर काय! मला सविता खाली जमिनीवर पडलेली दिसली. मी तिला आवाज दिला, पण ती उठली नाही. मग मी तिच्या तोंडावर पाणी मारलं. तेव्हा कुठे ती उठली.

          ती उठली खरी, पण आजूबाजूला पाहून खूप घाबरत होती... भीतीने थरथरत होती.... ती घामाने पूर्ण ओली झाली होती.. आणि सारखी रडत होती... मी तिला जवळ घेतलं आणि तीला थोपटु लागलो.. तेव्हा कुठे कितीतरी वेळाने ती शांत झाली. ती तशीच बसुन राहिली... एकटक शुन्यात पहात बसली... काहीच बोलत नव्हती. मग रात्री मीच जेवण बनवलं... जेवायंच पण नाही म्हणत होती... मी बळजबरीने तिला जेवु घातलं... तीने कसेतरी दोन तीन घास पोटात ढकलले... पण अजुनही तिने काहीच सांगितलं नाही... तशी मला कल्पना आलीच होती..

          रात्र झाली, तशी मी चटई टाकली.... तिला जवळ घेऊन झोपलो.. तिला थोपटु लागलो, तसा तिला हुंदका दाटुन आला... आणि ती जोरजोरात रडायला लागली.... मी तिला रडु दिलं. थोड्यावेळाने ती शांत झाली, मग मी तिला विचारलं, की आई किंवा दादा वगैरे कोणी आलं होतं का? तेव्हा कुठे तिने घाबरत घाबरत मला सगळं सांगितलं... पण माझ्या आईचं ते वाक्य "तु कधीच आई होऊ शकणार नाही" तिच्या मनावर कोरलं गेलं. ती काकुळतीला येऊन मला विचारू लागली, अहो, आपल्याला खरंच बाळ होणार नाही का? मी कधीच आई होऊ शकणार नाही का? मला आई व्हायचंय हो! सांगा ना, काहीतरी बोला न!

          तिच्या त्या विनवणीने माझ्या काळजात चर्र झाले.. हृदयावर खूप आघात होत आहेत, असं वाटंत होतं. पण मला स्वतःला आणि तिला सांभाळणे महत्त्वाचे होते... कसाबसा मी सावरलो आणि तिला समजावलं की, असं काही होणार नाही ग! आपल्याला नक्की मूल होईल.. तु आई होशील आणि मी बाबा... मी तिला तेव्हा समजावलं खरं, पण मनातून मीच खूप घाबरलो होतो!

मृदुलाः बापरे, मला तर काय बोलावं काहीच सुचत नाहीये! एक आई हे असं कसं वागू शकते रे?

वीरः हो ग! पण हेच खरं आहे! दुसऱ्या दिवशी आई परत माझ्या ऑफिसमध्ये आली आणि तिने अर्ज दिला की माझ्या ऐवजी तिला कामावर घ्या म्हणून... माझ्या आण्णांचे जे पैसे माझ्या नावावर होते, ते मागू लागली. ऑफिस मध्ये समोर सगळे अधिकारी कर्मचारी होते. या सगळ्यांसमोर तिने तमाशा सुरू केला. जो तिला समजवायला जायचा, त्याला पण ती शिव्या द्यायची.

          शेवटी मी विचार केला की जे पैसे आहेत ते माझ्या अण्णांचे आहेत... म्हणजे तिच्या नवऱ्याचे! ते जरी माझे आण्णा होते तरी ती त्यांची बायको आहे... मी ते पैसे तेव्हाच्या तेव्हा काढून आणायला बँकेत गेलो. मला सगळे समजावतं होते.. त्यांचं म्हणणं होतं की तुझ्याकडे तर काहीच नाही, नको देऊ पैसे... पण माझं मन ऐकत नव्हतं... मी सगळे पैसे आईला देऊन दिले... तेव्हा कुठे ती निघुन गेली...

          तिने जो अर्ज केला होता, तो अर्ज माझ्या मोठ्या साहेबांकडे आला. तेव्हा त्यांनी मला बोलावून घेतले. त्यांनी पण जे काही झालं, ते पाहिलं होतं. त्यांना बोलायची गरजच पडली नाही. त्यांना पण जे समजायचे ते बरोबर समजलं होतंं. त्यामुळे त्यांनी त्या अर्जावर काहीच कार्यवाही केली नाही. (थोडं हसुन) अगं, तुला खोटं वाटेल, पण ऑफिस मधले लोक मला विचारायचे की ही तुझी सावत्र आई आहे की सख्खी आई!

          त्यानंतरही आई एक - दोनदा ऑफिसला आली, आणि परत तसंच केलं. पण आता ऑफिसमध्ये सगळ्यांना माहीत झालं होतं. त्यामुळे कोणी फारसं लक्ष दिलं नाही. आमचं तसं बरं चाललं होतं. मला तेव्हा जाणीव झाली की आपल्याला चांगले आयुष्य जगायचे असेल तर पैसा आवश्यक आहेच, पण त्याबरोबरच माणसं सुद्धासोबत हवीत. तेव्हाच मी ठरवलं, की खुप पैसे कमवायचे आणि आपल्याबद्दल आपुलकी असणारी आपुलकीची आपली माणसंही जोडायची... मग बचत करून एक एक पैसा जमा करत होतो. मला खुप मोठ्ठ व्हायचं होतं...

          पण आईच्या त्या वाक्याचा आम्हा दोघांवर खूपच परिणाम झाला होता. त्यामुळे की काय, आमच्या लग्नाला चार वर्षे होऊनही आम्हाला मूल होत नव्हतं. अशातच सविताला दिवस गेले, पण दीड महिन्यातच तिचा गर्भपात झाला. आम्ही पुन्हा एकदा कोलमडलो.. सगळी स्वप्ने धुळीस मिळाली... माझा विश्वास परत डळमळु लागला... आईचं वाक्य, खरंं होतं की काय, अशी भीती वाटु लागली. पण नाही, असं काही होणार नाही, असं म्हणून मीच स्वतःला समजावु लागलो आणि पुन्हा नेटाने उभा राहिलो.

          मग सरकारी दवाखान्यातील डॉक्टरांकडे जाऊन त्यावर इलाज सुरू केला. कारण खाजगी डॉक्टरांकडे जाऊन उपचार घेणे सध्यातरी आम्हाला शक्य नव्हते. उपचारा दरम्यान सविताच्या छातीवर गाठ आढळुन आली. आम्ही खूप घाबरलो होतो. डॉक्टरांच्या मदतीनेच त्यावर उपचार सुरू केलेत. मुंबईत आमचं कोणीच नव्हतं. त्यात ती गावाकडची! मुंबईसारख्या शहरात नविन! बाहेर निघायला पण ती घाबरायची! माझी पण अवस्था काही निराळी नव्हती..

          पण मी माणुस आणि काहीही झालं तरी ती बाई होती! माणसाला असं घाबरुन कसं चालेल? मग मीच तिला घेऊन एवढ्या मोठ्ठ्या सरकारी दवाखान्यात जायचो. तिथे गेलो की नंबर लावायला रांगेत उभं राहायचं...  मग नंबर लागला की डॉक्टर चेकअप करणार... त्यानंतर मेडीकलमध्ये जाऊन, त्यांनी लिहुन दिलेल्या गोळ्या औषध घ्यायचे... सगळं घेऊन झालं की सविताला परत घरी सोडायचं आणि मग ऑफिसला जायचं...  असं तीन-चार महिने चाललं. पण आमचं नशीब जोरावर होतं म्हणुन की काय ती गाठ साधीच निघाली... सुरुवातीला जेव्हा कळालं तेव्हा आम्हाला भीती वाटत होती कि ती गाठ कॅन्सरची येते की काय! परत आम्हाला जिवंत झाल्यासारखं वाटलं!

          असेच आठ - दहा वर्ष निघून गेले.. पण आम्हाला मूल काही झालं नाही. सविता गावाकडची, जेमतेम शिकलेली! तिला मुंबईचं वातावरण सहन व्हायचं नाही. त्यात मुलं होत नव्हतं... त्यामुळे तिच्या मनात आत्महत्येचे विचार सुरु झाले होते. ती मला खुपदा म्हणायची की, तुम्ही दुसरं लग्न करा.... मला मरू द्या....  निदान तुम्ही तरी बाबा व्हालं. मी तिला खूप समजावलं. पण ऐकेल तर शपथ! ती असं काही करेल, म्हणून मी बरेच दिवस सुट्टी पण घेतली..  मनात भीती होती की मी ऑफिसला गेलो आणि खरंच हीने काही बरं वाईट करून घेतलं तर...  खूप टेन्शनमध्ये असायचो मी! कसंबसं तिला समजावलं... आज पर्यंत आपण एवढा संघर्ष केला तर त्याचे चांगले फळ नक्कीच मिळेल!

          आम्हाला बाळ व्हावं म्हणुन, आमच्यावर उपचार सुरूच होते. उपचारा दरम्यान सविताची सोनोग्राफी केली. त्यामध्ये असे निष्पन्न झाले, की सविताच्या गर्भाशयाला गाठ आहे. त्यामुळे गर्भधारणेला अडचणी येत आहेत. आणि गर्भधारणा झालीच, तर तिच्या बरोबर बाळाच्याही जीवाला धोका आहे. डॉक्टरांनी सांगुन टाकले की अजुन वेळ घ्या आणि पूर्ण विचार करून सांगा. त्यांनी आम्हाला टेस्ट ट्यूब बेबीचा पर्याय सुचविला.

          त्यानंतर, आम्ही खूप विचार केला. मी सविताला म्हटलंही, कि आपण नको रिस्क घ्यायला! मी तिला हाही पर्याय सुचविला की, अनाथ आश्रमातुन आपण एखादं बाळ दत्तक घेऊ. मला तुझी जास्त काळजी आहे. तुझ्या जीवाला काही कमी जास्त झालं तर आम्ही कसं जगु, मी त्याला आई कुठुन आणुन देऊ? त्या इवल्याशा जीवाला एकटा कसं सांभाळु? त्या येणाऱ्या बाळाचा काय दोष! त्याने का म्हणून शिक्षा भोगायची..

          मी सविताला खुप समजावलं. पण सविता काही ऐकायलाच तयार नव्हती. मी जर आई होणार असेल, तर मी त्यासाठी काहीही करायला तयार आहे. मला कितीही त्रास झाला तरी मी सगळं सहन करेल. मला काहीच होणार नाही आणि मी बाळालापण काहीच होऊ देणार नाही. सगळं व्यवस्थित होईल. तिचा हा दृढनिश्चय पाहून मग आम्ही टेस्ट ट्युब बेबी साठी तयार झालो.

क्रमशः....

🎭 Series Post

View all