दृष्टी आणि दृष्टिकोन - भाग 27

Drushti, ani, drushtikon, blindness, Viraj, Rujuta, Vidhi, Rajat, Marathi, katha, kathamalika, love, prem
भाग 24, 25 , 26


https://www.irablogging.com/blog/drushti-ani-drushtikon---bhag-24_7045

https://www.irablogging.com/blog/drushti-ani-drushtikon---bhag-25_7171

https://www.irablogging.com/blog/drushti-ani-drushtikon---bhag-26_7254


'विधीच्या हातची कॉफी आणि बरंच काही' अशी मीटिंग आटपली. कार मध्ये बसल्यावर जाताना रेखाताई आणि राजशेखर असेच बोलत होते.

"अहो, एक विचारू का तुम्हाला?", रेखाताई.

"तुम्ही कधीपासून परवानगी विचारायला लागलात राणीसरकार? बोला ना", राजशेखर ड्राइव्ह करता करता म्हणाले.

"तुम्हाला हा परिवार, हे लोक कसे वाटतात?", रेखाताई. हळूच मनातली गोष्ट बोलण्याचा प्रयत्न करत होत्या.

"छानच , हसता खेळता आहे की. पण असे का विचारतेय एकदम?", राजशेखर.

"आणि विराज कसा वाटतो?", रेखाताई.

"अग विराजच्या स्वभावाबद्दल आता अजून काय प्रूफ हवं? दुसऱ्यांचा विचार करतो , त्यांच्यासाठी जमेल ते काम करतो, ऑफिसमध्ये अवॉर्ड मिळवतो म्हणजे ऑफिसमधले कामही चांगलेच करतो. परिवाराची काळजी घेतो, आणखी काय हवं ना?"

"हो ना? मग आपल्या ऋजुसाठी विचार करायचा का त्याचा? तुम्हाला काय वाटतं?"

"अच्छा, तर हे चालू आहे होय मनात! कधीपासून चालू आहे तेही कळू द्या आता आम्हाला", राजशेखर हसून म्हणाले.

"खरं तर मी पडले होते ना, तेव्हा त्याने ज्याप्रकारे मदत केली, काळजी घेतली, तेव्हाच माझ्या मनाने सांगितले की जावई हवा तर असाच, किंबहुना हाच !", रेखाताई हसून म्हणाल्या.

"मग आता बोलताय तुम्ही? इतक्या दिवसांनी?", राजशेखर.

"अहो, तुम्हाला आवडेल की नाही असं वाटत होतं  आणि त्यानंतर आपल्याला कितीही वाटलं तरी मुलांच्या मनात काय आहे तेही कळायला हवं ना?", रेखाताई.

"हो, बरोबर", राजशेखर.


"खरं म्हणजे दोघेही एकदम अनुरूप आहेत एकमेकांना. एकाच व्यवसायात आहेत, त्यामुळे एकमेकांना , त्यांच्या परिस्थिती, काम, ध्येय या सगळ्यांना व्यवस्थित समजून घेऊ शकतील. आवडीनिवडीही जुळत आहेतच थोडयाफार प्रमाणात", राजशेखर.

"अहो, आज ज्याप्रकारे विराज ऋजूचे कौतुक करत होता, सांगत होता त्यावरून मला काहीशी शंका येतेय की तो ऋजुवर प्रेम करायला लागलाय की काय. पण ऋजुशी सध्या तसं काही बोलला असेल असं वाटत नाहीये ", रेखाताई.

"अच्छा? आणि ऋजूचं काय?", राजशेखर.

"ऋजूही बरेचदा बोलत असते त्याच्याविषयी. सांगत असते काही काही. आजही बघितले ना, किती मनापासून ती त्याचे कौतुक करत होती. नक्की माहिती नाही, पण बहुधा तिलाही तो आवडत असावा."

" तसं असेल तर मग काय, सोन्याहून पिवळेच! समजदार अन जबाबदार आहेत दोघेही. तसं काही असेल तर नक्कीच सांगतील ते आपल्याला."

"म्हणजे पुढे मागे त्या दोघांनी लग्नाचा विचार केला तर तुमची काही हरकत नाही ना. चला बाई, माझे टेन्शन मिटले. एकदा तुमच्या कानावर घालून ठेवले. म्हणजे तुम्ही तिला न विचारता कोणाला शब्द द्यायला नको ना. उद्या गावीही जातोय. ", रेखाताई जरा निर्धास्त झाल्या.

"ओह, तर ही सगळी धडपड यासाठी होती", राजशेखर हसून म्हणाले. "अग, आपल्या छकुलीचे मत विचारल्याशिवाय मी असा कोणता निर्णय घेईन का तिच्यासाठी?"

"अहो , तुम्हाला नाही कळायचं ते. मी बायकोही आहे आणि आईही आहे ना. दोघांचेही मन जपावे लागते", रेखाताई.

"ओहो, जसे काही मी नवरा आणि बाबा नाहीच ", राजशेखर हसून म्हणाले.

आणि दोघेही हसू लागले.


.......

इकडे रजतने फोन ठेवला आणि तो थोडा वेळ तसाच बसून राहिला. एकीकडे ऋजुताने अवॉर्ड पटकावल्याचा आनंदही होता आणि दुसरीकडे विधी पुन्हा समोर आल्यामुळे झालेला गोंधळ.

"का पुन्हा पुन्हा तिला माझ्यासमोर आणतोस देवा? मी जेवढा अलिप्त होण्याचा प्रयत्न करतोय , तेवढेच प्रकर्षाने तू मला जाणवून देतोय की किती कठीण आहे ते माझ्यासाठी! थोडे सावरू तर दे मला", रजत विचार करत होता.

विधीची थोडया वेळापूर्वी दिसलेली छबी त्याच्या मिटलेल्या डोळ्यांपुढे तरळली होती. तिचे मिश्किल , हृदयाचा ठाव घेणारे डोळे आणि लाजरं हसू तर त्याच्या डोळ्यासमोरून हटतच नव्हतं.

"तिने बघितलं असेल का मला तिच्याकडे असं भान हरपून बघताना? ती अचानक अशी एवढी छान तयार होऊन समोर आली आणि काही सुचलंच नाही मला. शी यार, काय वाटलं असेल तिला. काय गोंधळ झाला हा!", रजतचे विचारचक्र सुरू होते.

विधी मात्र खूप आनंदात होती. बदललेली साडी घडी करून कपाटात ठेवता ठेवता ती तशीच साडीवर हात फिरवत थबकली होती. तिला आठवत होते रजतचे तिच्याकडे बघून हरवून जाणे, त्याची ती भारावलेली पण शुद्ध नजर, एकटक बघणारी अन काहीतरी सांगू पाहणारी. "असं काय असतं याच्या नजरेत? खूपच आपलीशी वाटते, जणू असं म्हणते, मला काहीतरी सांगायचंय तुला. किती भान हरपून बघत होता. भानावर आल्यावर मात्र नजर फिरवली अन थोडा उदासही झाल्यासारखा वाटला. काय बरं झालं असेल? विचारावं का त्यालाच? आणि हो त्याने ऋजुला सांगून काय घोळ घालून ठेवलाय तेही बघावच लागेल. काय सांगितलं असेल तिला माझ्याबद्दल, आमच्याबद्दल?", विधी विचार करत होती.

अशा विचारातच तिने रजतला मेसेज केला.
"Hi रजत, उद्या तुम्हाला थोडा वेळ आहे का? बोलू या का उद्या दुपारी? मला तुम्हाला काहीतरी विचारायचंय".

रजत तो मेसेज बघून संभ्रमात पडला. काय बोलायचं असेल हिला? हो म्हणावे की नाही त्याला कळत नव्हते. शेवटी त्याने "ok" असं उत्तर पाठवलं.

"काय झालं, हा एवढा शांत का वाटतोय", विधी विचार करत होती.


........

इकडे कारमध्ये बसल्यावर विराज गाडी चालवताना विचार करत होता , "मगापासून बघतोय, किती शांत झालीय ही. वरवर तर हसते आहे पण मनातून काहीशी उदास का वाटतेय, मला माहिती आहे तिचा मूड कसा ठीक करायचा", .

तो ऋजुताला मिश्किलपणे म्हणाला, " राणीसाहिबा, इस शुभदिन के अवसर पर ये नाचीज आपके साथ एक स्थान पर प्रस्थान करना चाहता है. क्या आप की अनुमति होगी?"

"सारथी, प्रथमतः उस गंतव्य का नाम उद्घोषित किया जाए", ऋजुताही तेवढ्याच मिश्कीलपणे मान ताठ करून , चेहऱ्यावर अभिमान दाखवत त्याला उत्तर देत म्हणाली.

तिने सारथी म्हणताच विराजला हसू आले. "वेडू, किती हजरजबाबी आहे. चालू दे नौटंकी अशीच थोडा वेळ ", विराज स्वतःशीच विचार करत होता.

ऋजुता काहीशी विचारात पडलेली दिसली. तसा विराज म्हणाला, "आप कृपया निश्चिन्त रहें रानीसाहिबा. ये सारथी आप को सुयोग्य और उचित स्थानपर ही लेकर जाएगा, क्योंकि अनुचित स्थान तो सारथी के लिए भी वर्जित हैं. आशा है रानीसाहिबा विश्वास के साथ प्रस्थान की अनुमति देंगी", विराज हसून ऋजुताला म्हणाला.

"सारथी, आप को ये बहुमोल अवसर दिया जाता हैं, परंतु एक घटिका के लियेही अनुमती दी जायेगी", ऋजुता चेहऱ्यावर राणीचा अभिमान ठेवत त्याला म्हणाली.

"इस अनुग्रह के लिये धन्यवाद राणीसाहिबा", विराज मान किंचित झुकवून म्हणाला आणि दोघेही खळखळून हसायला लागले.

"वेडू किती छान दिसते आहे हसताना", विराज मनात विचार करत होता.

"खूप सुंदर दिसते आहेस आणि स्पेशली हे तर खूपच" ,  विराजने स्वतःच्या कानाजवळ एक बोट चक्राकार फिरवत तिच्या कुरळ्या बटेकडे निर्देश केला.

"थँक्स", म्हणत इतकी गोड लाजली ना ऋजुता की विराज समोर बघायचे सोडून दोन क्षण तिच्याकडेच बघत राहिला.

"ए हे काय करतोय, समोर बघ . गाडी चालवतोय ना", असे ऋजुताने म्हणताच तो भानावर येत खजील झाला आणि नीट समोर बघायला लागला.

ऋजुता लाजून किंचित हसत मान वळवून खिडकीतून बाहेर बघायला लागली होती. मनावरून एखादे मोरपीस फिरल्यासारखे तिला वाटत होते.

"काय यार, टायमिंग चुकले माझे ! बघताही येत नाहीये नीट. नो नो , आय कान्ट मिस इट", मनातच म्हणत त्याने क्षणभरात गाडी कडेला घेऊन थांबवली आणि हाताची घडी करून तिच्याकडे बघायला लागला.

गाडी थांबल्याचं लक्षात आलं तसं ऋजुताने मान वळवून विराजकडे पाहिलं आणि म्हणाली , "काय झालं ?"

"काही नाही ग, थांबावंसं वाटलं थोडं, खूप सुंदर दृश्य आहे ना, म्हणून", विराज.

ऋजुताने बाहेर बघितलं तर ज्या रस्त्यावरून गाडी जात होती तो एक मोठा रस्ता, आणि त्याच्याबाजूला एक कच्चा रस्ता, दोन तीन झाडं, तुरळक ट्रॅफिक, बाकी तर सुंदर म्हणण्याजोगे असे तर काहीच दिसत नव्हते.

तिची प्रश्नार्थक नजर बघून तो हसू लागला आणि मग तिला कळले की तो तिच्याबद्दल म्हणत होता . तशी ती पुन्हा लाजली आणि विराजचा फ्यूज उडाला.

"विराज, तू ना. चल आता", ऋजुता हसून म्हणाली. विराजही हसत होता . मग ते निघाले.

काही वेळात विराजने एका ठिकाणी गाडी थांबवली. आणि तिला म्हणाला, "चल जाऊ या".

क्रमशः

© स्वाती अमोल मुधोळकर

कथेचे सर्वाधिकार लेखिकेकडे राखीव. कथा कोणीही कॉपी करू नये.

आपण देत असलेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल सर्व वाचकांना मनापासून धन्यवाद. काही वाचक आवर्जून नियमितपणे कळवतात परंतु कितीतरी वाचक कळवत नाहीत . भाग थोडा जरी आवडला असेल तर प्रत्येकाने लाईक, कंमेंट करून जरूर कळवत जावे. कारण प्रत्येक भाग चांगला आणि वाचनीय असावा असा माझा मनापासून प्रयत्न असतो. आपले अभिप्राय हीच लेखकासाठी लेखनाची ऊर्जा आणि प्रेरणा असते . स्वस्थ रहा, आनंदी रहा आणि वाचत रहा :-)
🎭 Series Post

View all