दृष्टी आणि दृष्टिकोन - भाग 25

Drushti, Drushtikon, ani, Sight, vision, blindness, Viraj, Rujuta, Rajat, Vidhi, love, marathi, katha, prem, kathamalika, andh, drushtihin


मागील भाग 24 वाचायचा राहिला असल्यास आधी तो जरूर वाचावा.

https://www.irablogging.com/blog/drushti-ani-drushtikon---bhag-24_7045

"मला तुम्हा सर्वांचा अभिमान आहे. सर्वांना उद्या बक्षीस मिळेल", सर्वांना विराजने शाबासकी दिली. सर्वांच्या चेहऱ्यावर आता आनंद नुसता ओसंडून वाहत होता. आत्मविश्वासाने त्यांचे चेहरे फुललेले पाहून भरून पावल्यासारखे विराजला वाटले. त्याने सर्व व्यवस्थित सांभाळल्याबद्दल परागचेही अभिनंदन केले. परागला आता सर्वांच्या जेवणाबद्दल तसेच स्टॉलबद्दल पुढील सूचना देऊन तो ऑडिटोरिअम मधल्या आपल्या आधीच्या जागेवर आला.


विराज सर्वांशी बोलून इकडे येईपर्यंत आणखी एका डिपार्टमेंटचे बक्षीस वितरण झाले आणि कार्यक्रम संपला होता. त्यामुळे आता प्रेक्षकांपैकी बरेच जण इकडेतिकडे पांगले होते. कोणी प्रदर्शन बघायला गेले, कोणी जेवायला गेले तर कोणी स्टॉल वर जाऊन तिथल्या वस्तू बघू लागले होते. विराज अन ऋजुताकडली मोठी मंडळी सुद्धा विराज येईपर्यंत प्रदर्शन बघून येऊ म्हणून तिकडे गेली होती. नंतर रेखाताई आणि वीणाताई स्टॉलकडे वळल्या . स्टॉल वर 'दृष्टी'मधल्या दोन तीन बायका वस्तू देण्यासाठी बसलेल्या होत्या. त्या ग्राहकांना नीट माहिती सांगून वस्तू देत होत्या. सुदर्शन हिशेबाचे काम चोख करत होता तर पराग देखरेख करत वस्तूंचा मोबदला स्वीकारण्याचे काम करत होता. टेबलावरच्या वस्तू भराभर विकल्या जात होत्या . त्यामुळे लगेचच बॉक्सेस मधून काढून मांडाव्या लागत होत्या. वीणाताई , रेखाताई हे सगळं बघत होत्या.

"वीणाताई, विराजने नाव काढले हो. किती मोठं काम केलंय त्याने. आज सर्वांच्या तोंडी त्याचेच नाव आहे बघा. खरच किती व्यवस्थितपणे सगळं आखून, सर्वांना एक एक जबाबदारी देऊन सगळं किती छान जमवून आणलंय त्याने . जसजशा वस्तू विकल्या जात आहेत, त्या बायकांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा. स्वतः काहीतरी केल्याचं समाधान ओसंडून वाहतंय चेहऱ्यावरून", रेखाताई.

वीणाताईंच्या डोळ्यात तर कौतुक दाटून आले होते. "मला तर वाटतंय आपणही जावं संस्थेत . काही कामं तर करता येतीलच न आपल्याला. मुलांना श्लोक शिकवणे, देखरेख करणे, यांना वस्तू बनवताना मदत करणे इत्यादी गोष्टी करता येतील मला", वीणाताई.

"अहो, तुम्हाला संस्थेत जाण्यासाठी कोणाची परवानगी थोडीच लागणार आहे? नक्कीच करता येतील. मी सुद्धा येईन गावाहून आल्यानंतर", रेखाताई.

"गावाला जाणार आहात का?", वीणाताई.

"हो, उद्या जातोय ऋजुच्या आत्याकडे. ऋजूचीही सुट्टीच आहे आता आठवडाभर", रेखाताई.

"हं अच्छा", वीणाताई.

"ताईंसाठीही घेऊन जाते काहीतरी स्टॉलवरून", रेखाताई. त्यांनीही काही वस्तू खरेदी केल्या.

तोपर्यंत इकडे विधी आणि ऋजुता विराजची वाट बघत थांबल्या होत्या. कधी एकदा त्याचे अभिनंदन करते असे ऋजुताला होत होते. त्याचे बासरीवादन ऐकून ऋजुता काहीशी बेचैन झाली होती.  बासरीचे सूर तिच्या कानातून थेट मनापर्यंत पोचले होते, हृदयात झिरपले होते.  'हम अकेले हो न जाएं , दूर तुमसे हो न जाएं ' ही ओळ जेव्हा जेव्हा विराज वाजवायचा तेव्हा तिला कसलीतरी अनामिक ओढ जाणवत होती. विराज आपल्याला साद घालतोय असे राहून राहून तिला वाटत होते. ते सूर अजूनही तिच्या कानात घुमत होते. एकतर हे आणि दुसरे म्हणजे विराजचे हे रूप . कुठे तो जमदग्नीच्या अवतार , आणि कुठे हा आताचा विराज! त्याच्यातला इतका सुखकारक बदल बघून ऋजुताला आश्चर्यमिश्रित आनंद झाला होता. खूपच सुखावली होती ती. अधीर झाली होती त्याचे अभिनंदन करायला. आपणच सर्वात पहिल्यांदा हलकीशी गळामिठी मारून त्याचे अभिनंदन करावे असे तिला वाटून गेले. 'दृष्टी' म्हणजे इतकी मोठी गोष्ट होती विराजसाठी ! आणि ऋजुताशिवाय आणखी कोणाला त्याची कल्पना असणार !

पण अरे, हे काय? विराज या दोघी बसलेल्या होत्या तिथे येऊन पोचतोय, तोच विधीने पटकन उठून आनंदाने त्याच्या गळ्यात हात घालत त्याला मिठी मारली आणि त्याचं अभिनंदन केलं आणि ऋजुताचा किंचित समोर गेलेला हात आपोआपच खाली आला. "अरे, खरंच , मी अशी कशी काय विसरले? हा कसला वेडेपणा माझा ! चुकलंच. विधीचा हक्क माझ्यापेक्षाही आधी आहे ना. विधी आणि विराजला हा आनंदाचा क्षण जगू द्यावा". आपल्याच वेडेपणाचा तिला राग आला होता. आतापर्यंत उत्साही आनंदी असलेल्या तिच्या चेहऱ्यावर नकळत एक खिन्नतेची, औदासिन्याची लहर आली. ती मागे वळली. डोळ्यात आलेला एक अश्रू बोटाने हलकेच टिपत चेहऱ्यावर पुन्हा हास्य आणून तिथून जाऊ लागली. तोच तिच्या हाताला कोणाच्यातरी हाताचा स्पर्श जाणवला.

ऋजुताने वळून बघितले तर विराजने एका हाताने विधीला मिठीत घेऊन दुसऱ्या हाताने ऋजुताचा हात पकडला होता. त्याने मानेनेच तिला प्रश्न केला, "काय झालं?" . ऋजुतानेही किंचित हसून मानेनेच उत्तर दिले "काही नाही". हात सोडवून घेत खुणेने त्याला सांगितले, "तुम्ही या, मी आहे तिकडे". विराजही हट्टाने तिला थांबवत मानेनेच "नाही" म्हणाला. तोपर्यंत विधी बाजूला झाली होती. "तर या कामात इतका बिझी होतास तू. आता कळलं. Congratulations ! I am so happy ! Proud of you!" , विधी आनंदाने विराजला म्हणाली.  ऋजुतानेही स्वतःला सावरून आनंदाने "Heartiest Congratulations Viraj . Great job done!" , असे विराजचे अभिनंदन केले.

"आई बाबा कुठे आहेत? अरे तुझी वाट पाहत होते ते. मीच पाठवलं त्यांना. म्हटलं, तुम्ही बघून घ्या सगळं. त्याला किती वेळ लागेल ते माहिती नाही. म्हणून ते गेलेत प्रदर्शन आणि स्टॉल बघायला. बघ , आई ती तिकडे आहे ", विधी.

तेवढ्यात निकिता, प्रसाद, प्राची, नंदन आणि प्राजक्ता सगळेच तिथे आले. सर्वजण अवॉर्ड मिळाल्यामुळे अतिशय आनंदात होते आणि त्यात विराजचे हे सरप्राईज!

"कॉंग्रेच्युलेशन्स विराज सर!  कॉंग्रेच्युलेशन्स ऋजू", निकिता ऋजुला गळामिठी मारत आनंदाने म्हणाली.

"विराज सर, पार्टी तो बनती हैं अब", निकिता, प्रसाद म्हणाले.

"अरे , जमदग्नी, ज्वालामुखी कधी पार्टी देतात का?", विराज हसून म्हणाला.

तशी निकिता, ऋजुता, प्रसाद सर्वांनीच जीभ चावली आणि आपले कान पकडले. "सॉरी सर ते...", प्रसाद, निकिता. "आजपासून ते नाव ?" प्रसाद सर्वांकडे अपेक्षेने बघत म्हणाला. सर्वांनी 'तारक मेहता का उलटा चष्मा'तील 'पोपटलाल'च्या शैलीत एकसुरात ताबडतोब उत्तर दिले, "कॅन्सल!"

विराजच्या चेहऱ्यावर हास्य पसरले. "आता कसं जरा बरंsss
वाटतंय", तो मस्त हसून म्हणाला.

"काय विराज? इतकं मोठं कारण असूनही पार्टीला नाही म्हणतोस तू? हे काही बरं नाही हं", ऋजुता.

"अरे, ही काय ? पार्टीच तर सुरू आहे, एन्जॉय करा", विराज.
विराजने असे म्हणताच सर्वांचा चेहरा पडला आणि ते शांत झाले.

ते बघताच विराज हसून म्हणाला, "ही ही ही, गंमत काय तुम्हालाच करता येते का? तुम्ही कितीही म्हणालात तरी मी खरच जमदग्नी थोडाच आहे? पार्टीचा प्लॅन तुम्ही म्हणण्याच्या आधीच झालाय. सोमवारी लंचला जाऊया आपण सगळे. कारण कामाच्या वेळी काम आणि सेलिब्रेशनच्या वेळी ?"

"सेलिब्रेशन", सगळे आनंदाने एकसुरात.

"ए , मला सोडून पार्टीला जाणार का तुम्ही सगळे? ", ऋजुता नाराजीने म्हणाली.

"अरे हो, ही तर सुट्टीवर आहे आठ दहा दिवस", विराज म्हणाला.

"ए ऋजुता, तू सोमवारी पार्टीला येऊन मग जा न ग", निकिता गळ घालत म्हणाली.

"नाही जमणार ग तसं, लग्नाला जायचं आहे. खरं म्हणजे आज इथे यायचं नसतं तर आधीच गेलो असतो आम्ही", ऋजुता.

"मग नंतर जाऊ या आपण ?", निकिता, प्रसाद.

"नाही नको, एकदा राहिलं की राहून जाईल मग ते . अच्छा चलो, इस बार माफ किया आप लोगों को. जाऊन या सगळे", ऋजुता हसून म्हणाली.

"बरं चला आता जेवण वगैरे आटपून घ्या, मग आपण फोटो काढू आणि नंतर मला स्टॉलचं उरलेलं सामान वगैरे आवरायला मदत कराल ना थोडी?", विराज.

"हो, इथेच काय  'दृष्टी'मध्येही मदत करणार आम्ही तुम्हाला. डोन्ट वरी", निकिता, प्रसाद.


सर्वजण जेवायला गेले. विराज आईबाबांकडे गेला. "आई, बाबा, आशीर्वाद द्या ", तो म्हणाला. "खूप मोठं काम केलंस बाळा. नेहमी सुखी रहा", विनीत , वीणाताई त्याच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाले.

विराजने स्टॉलकडे चक्कर टाकून सगळं नीट चाललंय की नाही ते बघून घेतलं आणि मग तो सर्व मोठ्यांना आणि विधी, ऋजुताला घेऊन जेवायला गेला. सर्वजण आपापलं ताट वाढून घेऊन एका मोठ्या  टेबलवर जेवायला बसले. एका बाजूला सर्व मोठे तर त्यांच्याबाजूला विराज, विधी, मग ऋजुता असे सगळे बसले होते. जेवता जेवता गप्पाही सुरू होत्या. ऋजुता जेवतानाही काहीशी आपल्याच विचारात होती आणि इकडे विधी विराजला काही काही विचारून भंडावून सोडत होती.

"तू सांगत होतास न , एका व्यक्तीमुळे तू प्रेरित झालास हे सगळं उभारण्यासाठी. कोण आहे ती व्यक्ती?", विधीने सर्वांसमोरच विराजला विचारले.

"सीक्रेट आहे ते", विराज हसून म्हणाला.

"खरंच आम्हालाही जाणून घ्यायला आवडेल हं विराज , इतकी मोठी प्रेरणा देणारी व्यक्ती कोण आहे ते. मीही जाऊन भेटेन त्यांना. बरोबर ना, श्रीमतीजी? सांग बरं आता", विनीत न राहवून विराजला म्हणाले.

"अहो बाबा, कुठेही जायची गरज नाही तुम्हाला. इथेच आहे ती. ओळखता तुम्ही तिला", विराज गालात हसत ऋजुताकडे बघत म्हणाला. "तिने काहीही न बोलता फक्त स्वतःच्या कृतीतूनच दाखवून दिलं मला."

"कोण ते सांग ना आता", विधी.

"ही, ऋजुता", विराज तिच्याकडे बघत म्हणाला.

"अगबाई खरं की काय? सर्वगुणसंपन्न आहे हं ऋजुता ", वीणाताई कौतुक करत म्हणाल्या .

विराजने तिचे नाव घेताच ऋजुता आपल्या विचारांच्या तंद्रीतून बाहेर आली. "अं, काही म्हणालास का मला?"

"अग ऋजू, कुठे लक्ष आहे तुझं?", रेखाताई.

"आहे ना, इथेच तर आहे ", ऋजू ओशाळली.

"अग विराज सांगतोय की तुझ्यामुळेच त्याला प्रेरणा मिळाली हे सगळं करण्याची", रेखाताई.

"काय? खरंच?", ऋजुता आश्चर्याने म्हणाली.

मग विराजने सर्वांना अगदी सुरवातीला ऋजुताने निशासाठी परवानगी मागितली होती, आजोबांना गाडी थांबवून मदत केली, रोहितच्या पार्टीसाठी ते हॉटेल सुचवले इत्यादी अथ पासून ते इति पर्यंत सगळे सांगितले. सांगताना विराजच्या नजरेत तिच्याबद्दलचे कौतुक ओसंडून वाहत होते आणि प्रेमही झळकायला लागले होते. त्याची नजर सारखी ऋजुताकडेच वळत होती आणि हे सगळे लक्षात आले ते इकडे रेखाताई आणि तिकडे विनीत यांच्या. किंचित हसू फुलले रेखाताईंच्या गाली, "तरीच मला काहीसे असे वाटत होते" त्या मनात म्हणाल्या.

"ओह तो ये बात है?", विधी हसून म्हणाली.

"ते आजोबा, निशा, सुदर्शन, ती लहान मुलं आणि इतरही दृष्टीहीन लोक, या सर्वांना एका छत्राखाली आणलस तू विराज. त्यामुळे आणखी एक फायदा म्हणजे आपण एकटेच कुठेतरी कमी आहोत ही भावना त्यांच्या मनातून पुसली गेलीय. सर्वजण एकमेकांबरोबर किती छान सहकार्याने वावरत आहेत. आत्मविश्वास आलाय आता त्यांना. आणि स्वतः काहीतरी चांगले करण्याची जिद्द निर्माण झालीय त्यांच्यामध्ये. किती आनंदी दिसत आहेत ते. हॅट्स ऑफ टू यू", ऋजुता विराजचं कौतुक करत म्हणाली. तिच्या डोळ्यांत त्याच्याविषयीचं कौतुक आणि अभिमान भरलेले दिसत होते.

"या दोघांमध्ये कुठेतरी एक प्रेमाची झलक मला तरी जाणवतेय. तसं खरच असेल तर चांगलंच आहे. दोघे उत्तम रित्या सांभाळतील एकमेकांना", विनीतना वाटून गेलं .

"आता लग्न कधी करताय विधी?", ऋजुताने विधीला विचारले.

विधी दचकली, गडबडली अन तिच्या हातातला घास साडीवर सांडला. "रजतने ऋजुताला आमच्याबद्दल सांगितले की काय? हा रजत पण ना", विधीला शंका आली. पण ऋजुता तर गैरसमज झाल्याने विराजबद्दल विचारत होती. विधी पटकन उठली आणि साडीवरचा डाग धुवायला गेली.

"अग तिचं फायनल इयर सुरू आहे. वेळ आहे अजून सहा महिने तरी, लग्नाला. सध्या काही विचार नाही केलाय ", वीणाताई हसून म्हणाल्या.

जेवणं आटपली होती.

"चला , विराज तुझं आवरलं असेल तर निघू या का आता? थंडी वाजतेय मला फार. शाल वगैरे आणायला विसरलेच बाई आज", वीणाताई .

"अग आई , खरं आहे, थंडी वाढतेय आता. मला वाटतं, तुम्ही सगळे पुढे जा. मला सगळं आवरून यायला थोडा वेळ लागेल आणखी. ऋजुताला सर्वांशी भेटवून देतो. टीमबरोबर फोटो वगैरेही काढायचे आहेत. काकू, ऋजुताला मी सोडतो थोड्या वेळाने . चालेल का?".

"ठीक आहे. फार उशीर करू नका. वेळेत या", रेखाताई म्हणाल्या.

"आपण माझ्या गाडीने जाऊ या. मी सोडेन तुम्हाला घरी. ऋजुता येईल थोडया वेळात विराजबरोबर", राजशेखर विनीतना म्हणाले.

"हो चला, तेवढीच विधीच्या हातची कॉफीही प्यायला मिळेल तुम्हाला घरी", विनीत हसून म्हणाले. तसे ते सगळे निघून गेले.

तेवढ्यात विराजची टीम तिथे हजर झाली. मग सगळ्यांनी ट्रॉफीबरोबर आणि पारंपरिक वेशभूषा म्हणून खूप सारे गृप फोटो , ऋजुता, निकिता आणि इतर मुली यांनीही एकमेकींबरोबर फोटो काढले. कशी मस्त टीम आहे ना या सर्वांची?

"मावशी, काय कसा आहे रिस्पॉन्स?", विराज स्टॉलकडे जाऊन तिथे बसलेल्या 'दृष्टी'तल्या एका मावशींना विचारत होता.

"विराज दादा, खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला. एकदोघींनी तर विचारलेही की तुम्हाला जर ऑर्डर दिली तर घ्याल का? मला मुलाच्या लग्नाच्या वेळेला आलेल्या पाहुण्यांना बाकी गिफ्टबरोबर यातल्या काही वस्तूही देता येतील ", मावशी खूप आनंदाने आणि उत्साहाने सांगत होत्या.

"हो , आणि खास करून त्यांना आपल्या पर्सेस, या लाल गुलाबाच्या आकाराच्या गुलाबाच्या आयुर्वेदिक साबण, आणि हे उटणे वगैरे आहेत ना , ते आवडलेत. त्यांनी ऍडव्हान्सही दिला आहे. बऱ्याच जणींनी संक्रांतीच्या वेळेस वाणासाठी मिळतील का असेही विचारले", दुसऱ्या मावशीही खूप आनंदित दिसत होत्या.

"अरे वा, अभिनंदन ! मग त्यांना काय म्हणालात तुम्ही? ", विराज.

"हो म्हणून सांगितलंय आणि त्यांचा नंबर घेऊन ठेवलाय पराग दादांनी आणि त्यांना कार्डही दिले आपले", दुसऱ्या मावशी.

"वा, वा छान, लगेच शिकलात हं तुम्ही सगळं", विराज समाधानाने हसून म्हणाला.

इकडे ऋजुता दृष्टी मधल्या मुलींकडे गेली होती. त्यांचे तिने अभिनंदन केले. निशाला डोक्यावर थोपटून ती म्हणाली, "अग किती सुंदर परफॉर्म केलंस निशा. मला तर माहितीच नव्हतं की तुला हे पण येतं".

"ऋजुता ss ई, कसं वाटलं सरप्राईज? मी तर फक्त तुझ्यासाठीच शिकले आणि केलं आज", निशा उत्साहाने म्हणाली.

"काय? खूपच छान आणि मोठं सरप्राईज होतं ग. पण तुला कसं माहिती मी इथे असेन ते?", ऋजुता.

"अग विराजदादा म्हणाला, चल तुझ्या ऋजूताईला सरप्राईज देऊ या. खूप खुश होईल ती आणि मग एक पंकजाताई येते तिथे , तिने मला नृत्य शिकवले आणि विराजदादाने गाण्याचा सराव करून घेतला", निशा.

"वा मस्तच ग. तरीच विराजने तुझा नंबर मागितला होता मला एकदा", ऋजुता आठवत म्हणाली.

"खूप चांगले आहेत ग विराज दादा, पराग दादा. आम्हाला सर्वांना खूप मदत करतात , काळजी घेतात. तुझ्यासारखेच आहेत ते पण", निशा ऋजुताला म्हणत होती.

"ही ज्योतीसुद्धा किती सुंदर गाते, आणि ही चिमुकली तर! मी तर श्वास रोखून बघत होते तिचा परफॉर्मन्स", ऋजुता तिच्याही डोक्यावरून हात फिरवत म्हणाली.

"मी ज्योतीलाही तुझ्याबद्दल सांगितलं होतं, ताई. तिलाही भेटावस वाटत होतं तुला", निशा.

"हं, आता मीसुद्धा येईन तिकडे मध्ये मध्ये. बरं चला आवरा आता. निघायचंय आपल्याला", ऋजुता त्यांना सांगून तिकडे बसलेल्या आजोबांकडे गेली.

"आजोबा, कसे आहात? किती सुंदर गायलात तुम्ही", ऋजुता.

"पोरी, तू आलीस ? त्या दिवसापासून लई आठवण येत होती बघ तुझी. विराजदादा म्हनला होता, तू येशील म्हनून इकडं. तुमच्यासारखी चांगली माणसं आहेत म्हणून चांगलं चाललंय आमचंही", आजोबा ऋजुताचा आवाज ओळखून म्हणाले.

तेवढ्यात सगळी आवरसावर करून पराग आणि विराज तिथे आले.

"चला सर्वजण , गाडी आलीय. पराग घेऊन जा आता सर्वांना", विराज म्हणाला.

सर्वजण त्याच्याबरोबर गेले. टीमही आपल्या परिवारासह घरी जायला निघाली आणि विराज , ऋजुताही विराजच्या कारने निघाले.

क्रमशः

© स्वाती अमोल मुधोळकर

कथेचे सर्वाधिकार लेखिकेकडे राखीव. कथा कोणीही कॉपी करू नये. तसेच कथेतील घटना, प्रसंग, पात्रे इत्यादी सगळे काल्पनिक असून कोणीही अशा परिस्थितीत योग्य प्रशिक्षणाशिवाय आणि जोखीम घेऊन दीपनृत्य किंवा तत्सम करण्याचा प्रयत्न करू नये ही विनंती. लेखिका त्यास जबाबदार राहणार नाही.

आपण देत असलेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल सर्व वाचकांना मनापासून धन्यवाद. हा भाग कसा वाटला ते जरूर कळवा. आपले अभिप्राय हीच लेखनाची ऊर्जा आणि प्रेरणा. स्वस्थ रहा, आनंदी रहा , मुख्य म्हणजे वाचत रहा आणि कळवत रहा :-) .

🎭 Series Post

View all