दृष्टी आणि दृष्टिकोन - भाग 24

Drushti, Drushtikon, ani, Viraj, Rujuta, Vidhi, Rajat, blindness, andh, love, marathi, kathamalika, katha, prem, samajik

मागील भागात ...

"चल, मी येते तुझ्या बरोबर काउंटर ला. आपण सर्वांसाठीच आणू, घेतील ना सगळेच?", ऋजुता म्हणाली आणि विधीसोबत गेली.

"खूप गोड दिसते आहेस विधी, रॉयल ब्लू साडीमध्ये. हेअर स्टाईल सुद्धा खूप आवडली मला तुझी", ऋजुताने जाता जाता विधीचे कौतुक केले.

"थँक यू आणि तुला सांगू का, मी आत्ता तुला अगदी हेच म्हणणार होते, की खूप सुंदर दिसते आहेस तू, हा रंग खूप खुलतोय तुझ्यावर", विधी तिला म्हणाली . विधीची कळी खुलली होती. तिच्या चेहऱ्यावर इतके गोड हसू उमटले ना, की काय विचारता !

*****
आता पुढे ...

काउंटरवरून विधी आणि ऋजुताने ज्यूस वगैरे घेतले आणि परत जागेवर आल्या. तोवर कार्यक्रमाची सुरवात व्हायला आली होती. सर्वांना देऊन त्या आपल्या जागेवर बसल्या. विराजने त्यांना डोळ्यांनीच थँक यू म्हटले.

सुरवातीला एक दोन छोटीशी भाषणे झाली. त्यानंतर एकेका डिपार्टमेंट मधल्या सर्वोत्तम कामगिरी साठी बक्षिसे देण्यात येणार होती. एक एक डिपार्टमेंटचे बक्षीस वितरण झाले की काही सांस्कृतिक कार्यक्रम मग पुन्हा काही बक्षिसे असं चाललं होतं. होता होता विराज ऋजुताच्या डिपार्टमेंटचा नंबर आला. अवॉर्डस देणे सुरू झाले . ऋजुताला 'बेस्ट लीडर ' तर विराजच्या पूर्ण टीमला 'बेस्ट परफॉर्मिंग टीम ऑफ द इयर अवॉर्ड ' म्हणजे वर्षातील सर्वोत्तम कामगिरी करणारी टीम म्हणून बक्षीस मिळाले. संपूर्ण टीमने स्टेजवर जाऊन "हुर्रे " असा जल्लोष करत ट्रॉफीचा स्वीकार केला. निकिता, प्रसाद, प्राची, ऋजुता , विराज, आणि इतर सर्वांचे चेहरे आनंदाने फुलले होते. नव्याने जॉईन झालेल्या नंदन आणि प्राजक्तालाही आपल्या टीम बद्दल आदर आणि अभिमान वाटत होता. राजशेखर म्हणजे ऋजुताचे बाबा आणि विनीत म्हणजे विराजचे बाबा, हे दोघेही आपापल्या मुलांची प्रगती बघून सुखावले होते. रेखाताई आणि वीणाताईं दोघींनीही एकमेकींचे हात हातात घेऊन चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यांत मात्र आनंदाचे आसू अशा अवस्थेत एकमेकींचे अभिनंदन केले. विधी तर खुर्चीवर बसल्या बसल्याच नाचायला लागली . कधी एकदा दादाचे आणि ऋजुताचे अभिनंदन करते असे तिला झाले होते. सर्वजण ट्रॉफी घेऊन खुषीतच परत आपापल्या जागेवर येऊन बसले. विधीने ऋजुताच्या गळ्यात हात टाकत तिचे अभिनंदन केले. पण विराज अजूनही आला नव्हता. कुठे राहिला होता तो?

तेवढ्यात स्टेजवर सांस्कृतिक कार्यक्रमासाठी पडदा पडला. आणि सर्वांना पडद्याआडून बासरीचे मधुर स्वर ऐकू येऊ लागले.
हमको हमी से चुरालो , दिल में कहीं तुम छुपालो ...
या गाण्यावर बासरी वाजत होती. अर्धेअधिक गाणे झाले आणि आतापर्यंत सर्वजण अगदी बघायला उत्सुक झाले होते की कोण एवढी सुंदर बासरी वाजवतंय ? ऋजुता सुद्धा उत्सुकतेने वाट बघत होती. विधीला मात्र का कोणास ठाऊक खात्रीच वाटत होती की हा नक्की तिचा दादाच आहे. स्टेजवर विराजसोबत आलेला त्याचा गृप आपापल्या जागी येऊन सगळे वाद्य नीट मांडून होईपर्यंत रिकामा वेळ जाऊ नये म्हणून विराज तेव्हा स्वतः बासरीवादन करत होता . सर्वजण पडदा उघडण्याची वाट बघत होते. आणि पडदा उघडला. स्टेजवर मध्यभागी उभा असलेला, आकाशी रंगाचा कुर्ता, ऑफव्हाईट रंगाचा पायजमा, गळ्याभोवती गुंडाळलेला दुपट्टा  अशा पेहरावात राजबिंडा दिसत असलेला , मंत्रमुग्ध होऊन बासरी वाजवत असलेला विराज दृष्टीस पडताच टाळ्यांचा गजर झाला. विराजचे हे नवीन रूप ऋजुताच्या मनाला भावले नसते तरच नवल ! तिच्याही नकळत ती अनिमिष नेत्रांनी एकटक  त्याच्याकडे बघत होती. विराजचे वादन संपले तसे भरपूर टाळ्या वाजल्या. सर्वांचे लक्ष विराजच्या मागे स्टेजच्या भिंतीशी बसलेल्या ग्रुपकडे गेले. नारिंगी रंगाचा कुर्ता आणि राजस्थानी रंगीबेरंगी विणकाम केलेले छोटे छोटे आरसे लावलेले काळ्या रंगाचे जॅकेट, ऑफव्हाईट रंगाचा पायजमा आणि डोळ्यांना काळा चष्मा असा एकसारखा पेहराव सर्वांनी केला होता. एका बाजूला काहींच्यापुढे कीबोर्ड, तबला, गिटार अशी वेगवेगळी वाद्ये ठेवली होती आणि दुसऱ्या बाजूला काहीजण  बसले होते . विराजच्या बरोबर मागे चार पाच लहान मुले उभी होती. विराजने प्रेक्षकांना धन्यवाद दिले.


"यापुढे 'दृष्टी कला मंच' हा गृप एकामागोमाग आपली कला सादर करतील. कृपया असाच प्रतिसाद देऊन आपण त्यांचाही उत्साह वाढवावा", असे प्रेक्षकांना सांगून ध्वनिप्रक्षेपकापासून दूर होऊन त्याने तो मुलांसमोर  ठेवला आणि त्यांना सुरवात करायला सांगितली. वादकही सरसावले. विराज स्टेजवरून खाली आला आणि ऑडिटोरिअममधल्या समोरच्या एका खुर्चीवर बसला. मुले हात जोडून गाऊ लागली.

इतनी शक्ती हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर हो ना
हम चलें नेक रस्ते पे हमसे s ,भूलकर भी कोई भूल हो ना

काही महिन्यांपूर्वी ज्या गाण्यापासून विराजचा नवीन प्रवास सुरु झाला होता , त्याच गाण्यापासून आज त्याने त्याच्या ग्रुपच्या कार्यक्रमाची सुरवात केली होती. मुलांनी सुंदर रीतीने गाणे सादर केलेले बघून त्याचे डोळे किंचित ओलावले . मुलांचे गाणे झाल्यावर लगेचच दुसरे गाणे सुरू झाले.

कुठे शोधिसी रामेश्वर? अन् कुठे शोधिसी काशी?
हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी ।।

झाड फुलांनी आले बहरुन, तू न पाहिले डोळे उघडुन
वर्षाकाळी पाऊसधारा, तुला न दिसला त्यात इशारा
काय तुला उपयोग आंधळ्या दीप असून उशाशी?

देव बोलतो बाळ मुखांतुन, देव डोलतो उंच पिकांतुन
कधी होऊनी देव भिकारी, अन्नासाठी आर्त पुकारी
अवती भवती असुन दिसेना, शोधितोस आकाशी

कुठे शोधिसी रामेश्वर? अन् कुठे शोधिसी काशी?
हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी ।।

"अरे, हे तर तेच आजोबा, जे आम्हाला त्यादिवशी रस्त्यात भेटले होते. किती सुंदर गातात हे ! ", ऋजुता आई आणि विधीला म्हणाली. तिला अनपेक्षितपणे हे बघून खूप आनंद झाला होता. आजोबांनी अजून एकदोन जुनी गाणी गायली.

आजोबांचे झाल्यावर प्रकाश नावाचा एक तरुण समोर येऊन पुढील गाणे गाऊ लागला.

शोधिशी मानवा, राऊळी मंदिरी
नांदतो देव हा,आपुल्या अंतरी ।।

मेघ हे दाटती, कोठुनी अंबरी
सूर येती कसे, वाजते बासरी
रोमरोमी फुले, तीर्थ हे भूवरी
दूर इंद्रायणी, दूर ती पंढरी 

भेटतो देव का, पूजनी अर्चनी
पुण्य का लाभते, दानधर्मातुनी
शोध रे दिव्यता आपुल्या जीवनी
आंधळा खेळ हा खेळशी कुठवरी?

शोधिशी मानवा, राऊळी मंदिरी
नांदतो देव हा, आपुल्या अंतरी  ।।

त्यानंतर ज्योती नावाची मुलगी पुढे आली आणि गाऊ लागली.

ज्योत से ज्योत जगाते चलो , प्रेम की गंगा बहाते चलो
राह में आए जो दीन दुखी, सब को गले से लगाते चलो ।।

आशा टूटी, ममता रूठी छूट गया है किनारा
बंद करो मत द्वार दया का, दे दो कुछ तो सहारा
दीप दया का जलाते चलो

छाया है चहुँ ओर अँधेरा भटक गई हैं दिशाएं
मानव बन बैठा है दानव किसको व्यथा सुनाएं
धरती को स्वर्ग बनाते चलो

सुदर्शनने पुढील गाणे गात जीवनात कसे सकारात्मक रहावे ते सांगितले.

या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे ।।

चंचल वारा, या जलधारा, भिजली काळी माती
हिरवे-हिरवे प्राण तशी ही रुजून आली पाती
फुले लाजरी बघून कुणाचे हळवे ओठ स्मरावे?

रंगांचा उघडुनिया पंखा, सांज कुणी ही केली?
काळोखाच्या दारावरती नक्षत्रांच्या वेली
सहा ऋतूंचे सहा सोहळे, येथे भान हरावे

या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे

"अरे, हा तर तो सुदर्शन आहे",  ऋजुता उद्गारली.

"तू या लोकांना भेटली आहेस आधी?" विधीने आश्चर्याने विचारले.

"अग सर्वांना नाही पण हा आम्हाला त्या हॉटेलमध्ये भेटला होता एकदा. ", ऋजुता.

निशा आणि नयनने काही फिल्मी गाणे आणि

शुक्रतारा , मंद वारा, चांदणे पाण्यातुनी ... हे खूप गोड आणि प्रेमभरे गीत सादर केले.

ज्योतीने ' मी मज हरपून बसले ग' हे गीत सादर केले आणि गाण्याची बैठक संपली.

त्यानंतर विराज आणि त्याचा मदतनीस परागने सगळी वाद्ये स्टेजवरून उचलून घेतली आणि सर्वांना स्टेजवर भिंतीशी एका रांगेने बसवले. त्यानंतर निशा 'ये मोह मोह के धागे' या गाण्यावर नृत्य सादर करू लागली.

"अग, ऋजू ही तर निशा न? इतकी छान नृत्य करते ही, अंध असूनसुद्धा? सोपे नसेल ग तिच्यासाठी ! पण किती हुशार आहे ग पोर! ", रेखाताई भारावून गहिवरलेल्या आवाजात म्हणाल्या.

"तुम्ही कसे ओळखता हिला?", वीणाताई.

त्या वीणाताईंना म्हणाल्या , "अहो ही त्यादिवशी पास झाली म्हणून तिच्या आईबरोबर ऋजूला पेढे द्यायला आली होती घरी . तेव्हा ओळख झाली . तेव्हा माहिती नव्हतं यातही इतकी हुशार आहे ते".

"खरच हो, योग्य प्रशिक्षण आणि प्रोत्साहन मिळाले तर किती काय काय करू शकतात ही दृष्टीहीन असूनसुद्धा", वीणाताई.

ऋजुता आणि विधी तर डोळे विस्फारून एकटक ते नृत्य बघत होत्या. नृत्य संपल्यावर टाळ्यांचा कडकडाट झाला. त्याने दोघी भानावर आल्या.

आता सर्वांच्या आश्चर्यात अजून भर म्हणून की काय, खुशी नावाची एक बारा तेरा वर्षांची मुलगी हातात पेटलेले दिवे घेऊन दीपनृत्य करू लागली. आता तर प्रेक्षकांनी त्या तालावर टाळ्या वाजवायला सुरवात केली होती. नृत्य संपले आणि हा कार्यक्रम संपला, तसे सर्वांनी पुन्हा टाळ्यांचा गजर केला. आता विराज स्टेजवर आला आणि ध्वनिप्रक्षेपक समोर घेऊन उभा राहिला . मागून गृप मधील सर्वजण रांगेने एक एक करून खाली उतरू लागले होते. विराजने बोलायला सुरुवात केली.

"तर मित्रांनो कसा वाटला 'दृष्टी कला मंच' या आमच्या गृपने सादर केलेला कार्यक्रम? तुम्ही टाळ्या वाजवून जे कौतुक केले , त्यामुळे नक्कीच या कलाकारांचा उत्साह वाढून त्यांना प्रोत्साहन मिळाले आहे. त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

आता थोडे या संस्थेबद्दल सांगतो. मी काही महिन्यांपूर्वी 'दृष्टी' या नावाने गरीब कुटुंबातील नेत्रहीन समाजबांधवांसाठी एक संस्था स्थापन केली आहे. 'दृष्टी' या नावाचा अर्थ , स्वतः स्वावलंबी बनून जीवनाकडे बघण्याची नवी दृष्टी त्यांना लाभावी तसेच समाजाने आणि कुटुंबानेही त्यांना भेदभाव न करता व्यवस्थित वागणूक देण्याची दृष्टी ठेवावी असा आहे.  या संस्थेमध्ये सध्या लहानमोठे मिळून चौसष्ट जणांना साहाय्य केले जाते. इथे आम्ही नेत्रहीन असलेल्यांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवतो. त्यांना वेगवेगळ्या कलांमध्ये तसेच जीवनावश्यक गोष्टींचे प्रशिक्षण देऊन स्वावलंबी बनवण्यासाठी प्रयत्न करतो . समाजामध्ये वावरण्यासाठी त्यांना आत्मविश्वास मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो. लहान मुलांसाठी, तरुणांसाठी, स्त्रियांसाठी वेगवेगळे उपक्रम , प्रशिक्षण असतात. अंधांना शिकविणारे खास प्रशिक्षक त्यासाठी आम्ही नेमलेले आहेत. उदाहरणार्थ जीवनावश्यक गोष्टींमध्ये मुलामुलींना घरात आणि घराबाहेर काठीच्या साहाय्याने स्वतःहून फिरणे, स्पर्श आणि गंधावरून धान्य , मसाले आणि भाज्या वगैरे ओळखणे, थोडेफार रोजच्यापुरते पाककृती बनवणे, स्वतःची स्वतः नीट काळजी घेणे इत्यादी गोष्टी आमच्याकडे शिकवल्या जातात. तरुणांना आम्ही नोकरीच्या दृष्टिकोनातून व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रशिक्षण देतो. मी स्वतः हे क्लासेस घेतो.  इंग्रजीतून , मराठीतून बोलणे, Resume तयार करणे, ऑफिसमध्ये कसे काम करावे इत्यादींचा सराव करून घेऊन त्यासाठी त्यांना तयार करतो. कॉम्प्युटर हाताळायला शिकवतो , त्यावरचे काही सॉफ्टवेअर ऑडिओच्या माध्यमातून कसे वापरायचे ते शिकवतो. त्यांच्यासाठी काही ऑडिओ कोर्सबुक्सही तयार केले आहेत. त्यावर आणखी काम करायचे आहे. तसेच ब्रेल लिपीतील मोजकी पुस्तके सध्या त्यांना वाचनासाठी ठेवली आहेत.

'दृष्टी'मधल्या महिलांना अगरबत्ती, सुगंधी आयुर्वेदिक साबण बनविणे, वेगवेगळ्या वस्तू जसे पर्सेस , पिशव्या, विणलेल्या बास्केट, चटया, छत्र्या, कागदी पाकिटे इत्यादी , असे अनेक उद्योगाला उपयोगी पडतील अशा गोष्टी शिकवल्या जातात. आयुर्वेदिक गोष्टी बनवण्यासाठी आयुर्वेदिक डॉक्टर मैत्रिणीची मदत घेतली जाते, तसेच तिच्या देखरेखीखाली त्या तयार केल्या जातात. त्यामुळे त्या संपूर्णपणे विश्वासार्ह आहेत. इथे समोरच टेबलावर या वस्तू मांडल्या आहेत. बघा आणि जरूर यथाशक्ती खरेदी करा.

तसेच गाणे, वाद्य शिकवण्यासाठी माझ्याबरोबरच या गोष्टींचे प्रशिक्षण घेतलेले काही मित्रमैत्रिणी स्वतःहून मदत करतात. आज सादर केलेल्या कार्यक्रमासाठी गेले कित्येक दिवस त्यांनी आणि या सर्वांनी परिश्रम घेतले आहेत आणि आज त्याचा उत्तम परिणाम येथे आपल्याला दिसून आला. या सर्वांसाठी शिकण्याचे माध्यम म्हणजे मुख्यतः स्पर्श, गंध, आवाज आणि चव. काही चित्रकार मित्रांच्या मदतीने दृष्टीहीन लोकांसाठी स्पर्शातून कलेची ओळख होईल, अशी काही चित्रे आम्ही तयार केली आहेत. म्हणजे एखाद्या चित्रात जर मोर असेल तर त्याचा मऊ, मखमली पिसारा समजावून देण्यासाठी तिथे खरेखुरे मोरपीस लावले आहेत. वाळवंट असेल तर बारीक रेती चित्रामध्ये वापरली आहे. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या चित्रांचे छोटेसे प्रदर्शन इथे भरवले आहे. विराजने स्टेजला लागूनच असलेल्या, आतापर्यंत बंद असलेल्या पडद्याला बाजूला करत ते दाखवले. आपण इथे येऊन डोळे बंद करून स्पर्शाच्या माध्यमातून हे वेगळे प्रदर्शन नक्की बघा.

लहान मुलांना आमच्याकडे गाणी , गोष्टी, खेळ इत्यादी शिकवले जाते. तोंडी आकडेमोड , गणितातल्या काही युक्त्या हा सुदर्शन त्यांना  शिकवतो . त्यांना गोष्टींच्या माध्यमातून जीवनमूल्यांचे शिक्षणही दिले जाते. श्लोक शिकवले जातात. अनेक जण स्वयंस्फूर्तीने यात साहाय्य करतात.

मित्रांनो, मी एक पाऊल उचलले आहे . मात्र आता हा एवढा पसारा सांभाळण्यासाठी आणि अधिक लोकांना मदत करण्यासाठी मला नक्कीच आपल्या सर्वांच्या सहकार्याची गरज आहे. कॉम्प्युटर आणि इतर सॉफ्टवेअर , ब्रेल लिपीतील आणखी पुस्तके , कच्चा माल इत्यादी सर्व गोष्टी घेण्यासाठी आर्थिक मदत किंवा या वेगवेगळ्या उपक्रमांना हातभार लावण्यासाठी, देखरेख करण्यासाठी , वेळेची, ज्ञानाची किंवा कोणत्याही स्वरूपाची यथाशक्ती मदत  करण्यासाठी मी आपल्याला आवाहन करतो. परागकडे संस्थेचे विझिटिंग कार्ड्स आहेत. नाव नोंदवून आपला नंबर देऊन ठेवल्यास आम्हाला कशाही प्रकारची मदत लागली तर संपर्कही साधता येईल. तसंही मी ऑफिसमध्ये आहेच. माझ्याशीही संपर्क करू शकता. धन्यवाद. "

तेवढ्यात प्रेक्षकांपैकी एकाने प्रश्न विचारला, "विराज , तुमचे काम खरच खूप प्रशंसनीय आहे. याची कल्पना कशी सुचली?"

"खरं म्हणजे आपल्या सभोवताली अशा समाजसेवेच्या ध्येयाने पछाडलेल्या व्यक्ती असतात आणि त्या नेहमी फूल ना फुलाची पाकळी म्हणून इतरांना मदत करत असतात. आपल्या कृतीतून इतरांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवायला त्यांना आवडते. त्यात त्या खूप आनंद मिळवितात. बस, अशीच एक व्यक्ती मलाही भेटली आणि या संस्थेची कल्पना सुचली. जेव्हा मी स्वतः काही वेळासाठी गडद अंधारात राहण्याचा अनुभव घेतला , तेव्हा मला दृष्टीहीन लोकांना होत असलेल्या त्रासाची, अडचणींची कल्पना आली आणि देवाने आपल्याला दिलेल्या दृष्टीचा यथायोग्य उपयोग करून आपण त्यांच्यासाठी काहीतरी व्यापक केले पाहिजे, हा माझा निश्चय पक्का झाला", विराजने उत्तर दिले.

एवढे बोलून विराज खाली उतरू लागला. तेवढ्यात कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांनी  स्टेजवर येऊन विराजचे आणि 'दृष्टी' मधल्या सर्वांचे अभिनंदन करत त्याला त्यांच्या स्वतःकडून पन्नास हजार रुपयांची तसेच कंपनीच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सीबिलिटी फंडातून देणगी म्हणून पाच लाखांची मदत जाहीर केली आणि सर्वांना पुन्हा एकदा यथाशक्ती मदतीचे आवाहन केले. विराजने त्यांचे आभार मानले.  'दृष्टी'च्या कलाकारांजवळ जाऊन त्यांचे अभिनंदन आणि कौतुक केले.

"विराज दादा, कसे झाले आमचे गाणे ?", छोट्या छोट्या मुलांनी त्याला विचारले.

"खूप छान बाळांनो. खूपच छान गायलात", विराज म्हणाला.

"आणि माझें दीपनृत्य? आणि निशाताईचे नृत्य कसे झाले?",  खुशी उत्सुकतेने विचारू लागली.

"अप्रतिम झाले, सगळे अगदी भान हरपून बघत होते", असे म्हणत विराजने त्यांचेही कौतुक केले.

"मला तुम्हा सर्वांचा अभिमान आहे. सर्वांना उद्या बक्षीस मिळेल", सर्वांना त्याने शाबासकी दिली. सर्वांच्या चेहऱ्यावर आता आनंद नुसता ओसंडून वाहत होता. आत्मविश्वासाने त्यांचे चेहरे फुललेले पाहून भरून पावल्यासारखे विराजला वाटले. त्याने सर्व व्यवस्थित सांभाळल्याबद्दल परागचेही अभिनंदन केले. परागला आता सर्वांच्या जेवणाबद्दल तसेच स्टॉलबद्दल पुढील सूचना देऊन विराज ऑडिटोरिअम मधल्या आपल्या आधीच्या जागेवर आला.

क्रमशः

© स्वाती अमोल मुधोळकर

कथेचे सर्वाधिकार लेखिकेकडे राखीव. कथा कोणीही कॉपी पेस्ट करू नये.

आपण देत असलेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल सर्व वाचकांना मनापासून धन्यवाद. हा भाग कसा वाटला ते जरूर कळवा. आपल्या अभिप्रायाच्या प्रतीक्षेत राहीन.

हं, तर कोण कोण मदत करणार विराजला? :-)
कथेत घेतलेली गाणी सुंदर आणि अर्थपूर्ण आहेत. ऐकलेली नसतील तर जरूर ऐका.

आता घरच्या आणि टीममधल्या सर्वांच्या काय प्रतिक्रिया असतील ? बघू या पुढील भागात.

🎭 Series Post

View all