दृष्टी आणि दृष्टिकोन - भाग 26

Drushti, ani, Drushtikon, Viraj, Rujuta, Rajat, Vidhi, blindness, love, andh, marathi, katha, kathamalika


मागील भाग 24  आणि 25 ची लिंक .

https://www.irablogging.com/blog/drushti-ani-drushtikon---bhag-24_7045

https://www.irablogging.com/blog/drushti-ani-drushtikon---bhag-25_7171


सर्वजण प्रोग्रॅम, स्टॉल वगैरे आटपून परागबरोबर परत गेले. विराजची टीमही आपापल्या परिवारासह घरी जायला निघाली आणि विराज , ऋजुताही विराजच्या कारने निघाले.

इकडे विधी आणि सर्व मोठी मंडळी राजशेखरबरोबर वीणाताईंच्या घरी पोचले. विधीने आल्या आल्या हात वगैरे धुवून सर्वांना पाणी दिले आणि स्वयंपाकघरात जाऊन तिने कॉफी करायला घेतली. हॉलमध्ये वीणाताई, रेखाताई एका सोफ्यावर बसलेल्या होत्या . किचनकडे त्यांची पाठ असल्याने विधीला त्या पाठमोऱ्या दिसत होत्या. तर त्यांच्या समोरच्या सोफा खुर्चीवर विनीत आणि राजशेखर बसलेले होते. विधीही ओपन किचनमधून गप्पांमध्ये अधेमध्ये सामील होत होती. कॉफीचा सुवास दरवळत होता.

"एवढे मोठी संस्था उभारली पण घरात थोडंसंही काही कळू दिलं नाही बाई विराजने ! एका शब्दानेही बोलला नाही. एकटाच सगळी धावपळ करत होता. घरी यायचा तर थकलेला दिसायचा. पण कसलंसं समाधानही दिसायचं चेहऱ्यावर. आज कळलं", वीणाताईंना गेले काही दिवस चाललेली त्याची धावपळ आठवत होती.

"अहो श्रीमतीजी, त्याने आधी सांगितलं असतं, तर आज एवढं सगळं असं अचानक बघून आपल्याला जे सरप्राइज मिळालं, सर्वांच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसतोय तो कसा बघायला मिळाला असता त्याला? आणि तुम्हीच बघा, एवढं असूनही किती छान पद्धतीने मॅनेज केले त्याने सगळे. अगदी प्रोग्रॅमची आखणीसुद्धा किती व्यवस्थित आणि अजिबात कुठेही वेळ वाया जाऊ न देता ! ", विनीत म्हणाले.

"आज तर आई दृष्टच काढणार आहे दादाची, हो की नाही हो बाबा?", विधी हसून म्हणाली.

"तुम्ही दोघे बापलेक काय मला चिडवायचे सोडणार आहात का? जाऊ दे बाई", वीणाताई नाक मुरडून म्हणाल्या.

"प्रश्नच नाही", विधी आणि विनीत एका सुरात म्हणाले आणि त्यांनी हसून एकमेकांना टाळी दिली. राजशेखर आणि रेखाताई हसून यांच्याकडे बघत होते.

"तूही अशा चांगल्या गोष्टी शिक दादाकडून जरा", वीणाताई विधीला म्हणाल्या.

तेवढ्यात रेखाताईंचा फोन वाजला.

"हं , बोल . काय म्हणतोस?", रेखाताई रजतचा व्हिडिओ कॉल घेत म्हणाल्या.

"झाला का ग ऋजुच्या ऑफिस मधला प्रोग्रॅम? कसा झाला?" , रजत.

"हो , झाला. अरे खूप मस्त झाला प्रोग्रॅम", रेखाताई.

"अग विधी, झाली का कॉफी? ती पापडीही आण थोडीशी बरोबर", वीणाताईंनी आवाज दिला.

"हो", विधी.

रेखाताईंच्या रजतशी बोलण्याकडेच लक्ष असलेली विधी उकळत्या कॉफीकडे नुसते बघत राहिली होती. वीणाताईंच्या आवाजाने ती भानावर आली. पटकन कपात कॉफी ओतायला लागली. तरीही ओतता ओतता कान मात्र इकडेच लागले होते. खरं म्हणजे तिलाही रजतशी बोलावसं वाटत होतं. पण कशी बोलणार ?

"आणि आनंदाची बातमी सांगू का रजत, आपल्या ऋजुलाही अवॉर्ड मिळालं  बरं का! आणि तिच्या पूर्ण टीमलाही मिळालं", रेखाताई.

"अरे वा, खरंच का? फँटस्टिक ! कुठे आहे ऋजू? दे ना तिला जरा. पोचलात ना तुम्ही घरी?", रजतलाही आनंद झाला होता. तेवढ्यात त्याला जाणवलं हे घर आपलं दिसत नाही.  इकडे चेहऱ्यावर गोडसं हसू असलेली विधी कॉफीचे कप ट्रे मध्ये ठेवून घेऊन येत होती ते दिसलेच त्याला आणि तो हरवल्यासारखा दोन तीन क्षण एकटक बघत राहिला तिकडे . प्रोग्रॅम साठी नेसलेली रॉयल ब्लू सिल्क साडी , त्याला साजेशी सुंदर केशरचना, गळ्यात, कानात नाजूक आभूषणे, साजेसा हलकासा मेकअप, टपोऱ्या काळ्याभोर डोळ्यात काजळ अशा पेहरावात असलेली विधी, आणि  हा संयोग जुळून आल्याने तिच्या चेहऱ्यावर फुललेलं नाजूकसं लाजरं हसू ... ती एक एक पाऊल टाकत समोर समोर येत होती आणि हा त्याच्याही नकळत श्वास रोखून आणखीनच एकटक तिकडे पाहत होता. बसल्या बसल्या पुरता घायाळ झाला होता.

"अरे नाही, आम्ही जरा वीणाताईंकडे आलोय प्रोग्रॅम संपल्यावर. ऋजू ऑफिसमध्येच आहे. ती घरी आल्यानंतर बोल तिच्याशी.", रेखाताई.

"बरं", रजत.

"अरे, हे काय , किती दाढी वाढलीय? चेहराही कसा दिसतोय ? अजिबात लक्ष दिसत नाही आहे तुझं स्वतः कडे. काय झालं ? काम जास्त आहे का एवढ्यात?", रेखाताई. विधीही दुरूनच त्याला बघत होती. तिच्या मनात आलं, "काय झालं असेल एवढं याला?".

रेखाताई असे विचारू लागताच रजत भानावर आला. ऋजुताने विधीबद्दल सांगितलेले त्याला आठवले. विधीही राजशेखर आणि विनीत यांना कॉफी द्यायला गेली त्यामुळे त्याला आता दिसत नव्हती.

"ए आई, आता रागावू नको ना प्लीज, ठीक आहे मी. काम जास्त आहे इतक्यात. मी नंतर करेन ऋजुला फोन, बाय", रजतने फोन ठेवला. ऋजुताने सांगितल्यापासून रजतने स्वतःला आणखीनच कामात बुडवून घेतले होते. जेणेकरून विधीचा विचार येऊ नये. बिचारा झगडत होता स्वतःशीच.

विधी रेखाताई विणाताईंना कॉफी देऊन तीही बाजूच्या खुर्चीवर बसली. रजतने लगेच कॉल बंद केल्यामुळे खट्टू झाली होती थोडी मनातून. "पण काही का असेना किती छान वेळ जुळून आली, निदान दुरून बघता तर आलं. अशीही खूप आठवण येत होती ", विधी मनात विचार करत होती. तिने स्वतःचा मूड पुन्हा सावरून आनंदी केला.

रजतचा फोन आल्याने आपसूकच विनीत त्याच्याबद्दल राजशेखरना विचारू लागले. कुठे असतो , काय काम करतो वगैरे वगैरे. त्यांनीही सगळे सांगितले.

"नवीन प्रोजेक्ट मिळाला होता तिकडला. अजून सहाएक महिने तरी चालेल म्हणाला त्याचं तिथलं काम . तोपर्यंत लंडनला राहील तो", राजशेखर.

"छानच आहे न. नवे नवे अनुभव गाठीशी बांधत जावे माणसाने. संधी आली की स्वीकारायला हवीच" , विनीत दुजोरा देत म्हणाले.

"हो ना, बरोबर", राजशेखर.

"विधी बेटा, कॉफी एकदम जबरदस्त हं. थंडी कुठल्या कुठे पळून गेलीय" , राजशेखर विधीकडे वळून तिला म्हणाले.

"थँक यू काका", विधी.

"तू काय करायचं ठरवलं आहे पुढे?", राजशेखर.

"जॉबसाठी कॅम्पस सिलेक्शनसाठी प्रयत्न करते आहे सध्या. पुढील तीन चार महिन्यात येतील कंपन्या", विधी.

"छान, ऑल द बेस्ट", राजशेखर.

"मागच्या वर्षी थर्ड इयर इंजिनिअरिंगला प्राविण्य श्रेणी मिळवलीय तिने", विनीत सांगू लागले.

"अरे वा, मस्त. हुशार आहे विराजसारखीच! ".

"विराजचा धाक असतो ना, करावाच लागतो मग तिलाही अभ्यास, हा हा हा " , विनीत हसून म्हणाले.

"अंs , बा s बा, मी स्वतःहून पण अभ्यास करते हं, तो दादा आहे म्हणून दादागिरी करत असतो माझ्यावर, अभ्यास कर , अभ्यास कर म्हणून", विधी हसून म्हणाली.

सगळे हसू लागले.

"तुमचंही ना , आमच्या ऋजू आणि रजतसारखंच आहे वाटतं, तुझं माझं जमेना अन तुझ्यावाचून करमेना", रेखाताई हसून म्हणाल्या.

"हो ना , दोघांचीही चिडवाचिडवी , मस्ती सुरूच असते, दोघेही घरी असले की घर दणाणलं असतं त्याने", वीणाताई.

"हो ना , त्यानेच तर घराला घरपण असतं ना", रेखाताई.

"चला हाय कमांड , गप्पा झाल्या असतील तर निघूया का घरी? ", राजशेखर रेखाताईंना मिश्किलपणे म्हणाले.

"इश्श , काहीतरीच काय हो तुमचं, सर्वांसमोर असं", रेखाताई जरा लाजल्यासारख्या झाल्या होत्या.

"वहिनी, राजशेखर स्पष्टपणे म्हणालेत , पण ते तसं बोललं काय किंवा नाही बोललं काय, कमांड मात्र तुम्हा लोकांचीच असते, हो की नाही श्रीमतीजी?", विनीतही मिश्किलपणे हसून म्हणाले. आता लाजायची पाळी वीणाताईंची होती. सगळे हसू लागले.

"विधी बघा कशी खुदूखुदू हसतेय", रेखाताई तिच्याकडे बघत उठत म्हणाल्या आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवला. "खूपच गोड दिसते आहेस आज", रेखाताई निघता निघता म्हणाल्या.

कारमध्ये बसल्यावर जाताना रेखाताई आणि राजशेखर असेच बोलत होते.

"अहो, एक विचारू का तुम्हाला?", रेखाताई.

"तुम्ही कधीपासून परवानगी विचारायला लागलात राणीसरकार? बोला ना", राजशेखर ड्राइव्ह करता करता म्हणाले.

"तुम्हाला हा परिवार, हे लोक कसे वाटतात?", रेखाताई.

क्रमशः

© स्वाती अमोल मुधोळकर

कथेचे सर्वाधिकार लेखिकेकडे राखीव. कथा कोणीही कॉपी करू नये.

आपण देत असलेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल सर्व वाचकांना मनापासून धन्यवाद. हा भाग कसा वाटला ते जरूर कळवा. आपले अभिप्राय हीच लेखनाची ऊर्जा आणि प्रेरणा. स्वस्थ रहा, आनंदी रहा , मुख्य म्हणजे वाचत रहा आणि कळवत रहा :-)

🎭 Series Post

View all