दृष्टी आणि दृष्टिकोन - भाग 29

Drushti, ani, Drushtikon, blindness, love, andh, marathi, katha, kathamalika, prem


मागील भागात ...

https://www.irablogging.com/blog/drushti-ani-drushtikon---bhag-28_7443


"विराज, उशीर होईल ना, बाहेर नंतर कधी जाऊ. आज तुझ्या घरी सगळे वाट बघत असतील ना तुझी. असं काय करतोस" , ऋजुता.

"बरं, नंतर कधी घेऊ या. मीही लवकर घरी जातो. आई बाबा विधी वाट बघत असतील, बरोबर आहे. आज माझ्याबरोबर आलीस त्यासाठी थँक्स ऋजुता", विराज.

"अरे, वेडा आहेस का, थँक्स काय त्यात. उलट तुलाच थँक्स म्हणायला हवे मग तर बासरीवादनासाठी ", ऋजुता तिचे घर आले तशी गाडीतून उतरत म्हणाली.

"तुला नाही कळणार ते. निघतो आता. बाय ", विराज हसून म्हणाला.

आता पुढे ...

ऋजू घरी पोचली तर आई बाबाही नुकतेच आले होते. तिने आई बाबांना नमस्कार केला.
"बेटा अशीच मेहनत कर आणि उत्तुंग यश मिळवत रहा. आय ऍम प्राऊड ऑफ यू", बाबा तिच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाले.

"आणि माझी प्यारी मम्मा, तू खुश ना?", तिने आईच्या गळ्यात हात टाकत मिठी मारत आईला विचारलं.

"हो ग माझी परी. खूप खूप खुश आहे मी. अगदी तशीच जशी तुला लहानपणी शाळेत बक्षीस मिळाल्यावर मी खुश व्हायचे", आई.

"ऋजू , चल पटकन, फ्रेश होऊन आपण राहिलेली उद्याची तयारी करून घेऊ.  आणि अगं दादाचा फोन आला होता तुझ्यासाठी. करेल तो थोड्यावेळात", आई.

"ठीक आहे", ऋजुता खूप खुशीत होती. नाचतच आवरायला गेली.

काही वेळाने सगळे आटपून ऋजुता बिछान्यावर पडली. आजचा दिवस झर झर  तिच्या डोळ्यासमोरुन जाऊ लागला. आज मिळालेल अवॉर्ड तिच्यासाठी खूप स्पेशल होतं. गेले कित्येक महिने खूप मेहनत केली होती तिने. त्याचं ते फलित होतं. आई-बाबांच्या डोळ्यात दिसणारा आनंद बघून ती खूप सुखावली होती. मग आठवला तो स्टेजवर बासरी वाजवणारा विराज आणि नकळतच तिच्या चेहऱ्यावर स्माईल आलं.  तिच्यासाठी बासरी वाजवतानाचा मंत्रमुग्ध झालेला विराजही डोळ्यासमोर आला. अन तिचे हसू आणखी रुंदावले. आता तिला मोगऱ्याचीही आठवण झाली तशी ती उठली आणि फुले काढून टेबलवर ठेवली. त्यांचा दरवळ खोलीभर पसरला . स्वतःशीच खूष होत ती पुन्हा बेडवर पडली . "मला फुले आवडतात हेसुद्धा माहिती आणि लक्षात होतं त्याच्या आणि एवढया गडबडीतही आणली त्याने. असं कसं कळलं असेल त्याला की मला त्याचं सर्वात पहिल्यांदा अभिनंदन करायचं होतं ? हा विराज म्हणजे ना एक कोडंच आहे" . विचार करता करता लवकरच तिचा डोळा लागला आणि ती स्वप्नांच्या दुनियेत पोचली.
.........

विराजने जाता जाता विधीसाठी दोन मोठ्या कॅडबरी घेतल्या. घरच्यासाठी आणि संस्थेतल्या सर्वांसाठी मिठाई घेतली आणि मग घरी गेला. घरी पोचतो तर घराला कुलूप!  त्याने स्वतः जवळची चावी काढली आणि दार उघडून आत आला. अंधार होता. बॅग ठेवता ठेवता स्वतःशीच म्हणाला,

"अरे, कुठे गेले हे सगळेजण? आपल्या घरीच तर येणार होते. अजूनही आलेच नाहीत का?"

तेवढ्यात डायनिंग टेबलकडून एकत्र आवाज आला "काँग्रेच्युलेशन्स ! !  सरप्रा ss ईज !!! "
आणि लाईटही लागले.

टेबलावर  बटरस्कॉच फ्लेवर चा एक मस्त केक मांडलेला होता त्यावर Congratulations Viraj असे लिहिलेले होते. आई, बाबा आणि विधी बाजूलाच उभे राहून विराजकडेच बघत गालात हसत होते. विराज तर खरोखरच सरप्राईज झाला होता. आश्चर्यचकित नजरेने तो तिकडे बघत होता आणि विधी भुवया उडवत त्याच्याकडे बघत होती.

"ओहो हे काय? सरप्राईजच एकदम !", विराज म्हणाला.

"मग तुला काय वाटलं , सरप्राइझ तू एकटाच देशील ? हम भी किसीसे कम नही, हो की नाही हो बाबा?"

"रिश्ते में हम तुम्हारे बाप लगते हैं", विनीत हसून कॉलर टाईट करत विराजला म्हणाले तसे सर्वजण हसू लागले.

"विराज ये पटकन हात पाय धुवून, केक कट करायचा आहे", वीणाताई.

"आणि सेल्फी पण घ्यायचे आहेत. हा क्षण असाच फोटोमध्ये कैद करून ठेवायचा आहे.

विराज लगेच फ्रेश होऊन आला . मग काय केक कटिंग, फोटो, आणि विराज विधीची धमाल मस्ती.

"मोठा झालास रे लेका", विनीत त्याच्या पाठीवर थोपटत त्याला जवळ घेत म्हणाले.

"हं, आई , तुझ्या मोठ्या झालेल्या लेकाचं लग्नही करावं लागेल न आता?", विधी मिश्किलपणे हसून म्हणाली.

"हो बाई, कालच माझ्या मावसबहिणीचा फोन आला होता. तिच्या नात्यातली कोणी मुलगी आहे म्हणे . जास्त शिकलेली नाही पण घरकाम अगदी उत्तम येते म्हणे. अहो बोलू या का तिकडे?", वीणाताई.

हे ऐकून विराज आणि विधीचा चेहरा कसनुसा झाला. करायला जावे एक अन व्हावे दुसरेच असे होताना पाहून तिने विराजकडे पाहून आपला कान पकडला. "तू सांभाळ ना ", अशी खूण तिने त्याला केली.

एवढ्यात विनीत म्हणाले, "अग, बघू ना, एवढी काय घाई आहे. तो सध्या जास्त बिझी आहे ना. थोडे स्थिरस्थावर होऊ दे".

"आई आताच काही घाई नाही हं. तू काही बोलू नकोस त्यांच्याशी. प्लीज. मी खूप बिझी आहे सध्या ऑफिसमध्येही आणि इकडेही", विराज.

"अग विधी, पण मला एक सांग , तुम्ही सगळे आत होतात तर कुलूप कोणी लावलं? आणि माझ्याकडे चावी होती म्हणून बरं झालं, नाहीतर काय केलं असतं? " , विषय बदलत विराज म्हणाला.

"हम सब इंतजाम कर चुके थे दादा, डोन्ट वरी. तुझ्या कारचा आवाज आला तसे आम्ही टेबलाजवळ येऊन तयार राहिलो", विधी आपल्या स्टाईलने म्हणाली.

"बरं, झालं ना आता सगळं? आता आवरा आणि जा झोपायला. तो दमलाय विधी आता, झोपू दे त्याला लवकर, त्रास नको देऊ नाहीतर बसशील गप्पा मारत ", वीणाताईंनी सूचना दिली आणि त्या झोपायला निघून गेल्या.

सगळे आवरून विधी आणि विराज माडीवर आपापल्या खोलीत जायला निघाले .

विधीने हळूच त्याला चिडवत विचारले, "कशी झाली तुझी डेट?"

विराजचे डोळे विस्फारले. "ए काहीपण बोलू नकोस. डेट बिट काही नव्हती".

"हो का? मग काय होतं? कुठे गेलात तुम्ही?  सगळं सांगावं लागेल तुला नाहीतर आईला सांगेन मी",  विधीने मिश्किल दम दिला.

"ए माझी आई, तू ना , अजिबात आगाऊपणा करायचा नाहीस", विराज कोपरा पासून हात जोडत म्हणाला. "फक्त मंदिरात गेलो ग आम्ही . ते आपण सगळे मागे एकदा भेटलो होतो ना ? तिथेच",

"अरे मी तर तुझी मदत करण्याचा प्रयत्न करत होती. बरं ते जाऊ दे. काय म्हणाली ती?", विधी.

"खूप आनंद झाला होता तिला , संस्थेचे काम बघून भारावली होती", विराज.

"आणखी?", विधी उत्सुकतेने म्हणाली.

"विधीचं आणि तुझं खूप प्रेम आहे न एकमेकांवर, कधीपासून आहे असं म्हणत होती", विराज.

" हं, ते तर आहेच म्हणा", विधी.

"म्हटलं लहानपणापासूनच आहे. आणि हं , लग्न कधी करतोय असंही विचारत होती ती मला", विराज .

"काय? तुलाही हे विचारले तिने? मग काय म्हणालास तू?"

"हं, हो ना, अग काय म्हणणार मी? वाट बघतोय म्हटलं नवरी तयार होण्याची"

"ही ही ही, हुशार आहेस हं", विधी.

"पण ती सगळं असं का विचारतेय? ही ऋजुता म्हणजे ना एक कोडंच आहे", विराज मनात विचार करत होता.

"बरं झोप आता, गुड नाईट", विधी म्हणाली आणि आपल्या खोलीत गेली.

"काय चाललंय ऋजुताच्या मनात कोणास ठाऊक, उद्या विचारते रजतला", विधी विचार करत होती.

.......

दुसऱ्या दिवशी सकाळी रजत उठला . कॉफी करून घेतोय तोच एका मित्राचा फोन आला आणि दहा वाजता बाहेर फिरायला जाऊ या असे तो म्हणला. रजत हो म्हणून आपलं आवरत होता. ब्रेकफास्ट मध्ये दुसरं काही करण्यापेक्षा आता cereals खाऊन घ्यावेत  म्हणून त्याने ते खाऊन घेतले. आवरून झाल्यावर केस नीट करताना आरशात पाहत होता, तर त्याला विधीची आठवण झाली . तिने दुपारी बोलू या असे सांगितल्याचे त्याला आठवले.

इकडे जेवण वगैरे आटपून दुपारपासूनच विधी वाट बघत होती , कधी एकदा बोलतो असे तिला झाले होते. तिच्या खोलीत बसून अभ्यास करताना दहा वेळा तिने मेसेज चेक केले होते. आज पहिल्यांदाच ते बोलणार होते. एक अनामिक हुरहूर तिला होत होती. कसा असेल तो? बोलेल का माझ्याशी? त्यालाही उत्सुकता असेल का बोलण्याची माझ्यासारखीच? काय बोलेल तो? त्यालाही माझ्याविषयी भावना असतील का?

तेवढ्यात फोन वर मेसेज ब्लिंक झाला.
"हाय विधी, फ्री असशील तर बोलता येईल आता. थोडया वेळाने बाहेर जायचं आहे मला मित्रासोबत", रजत.

"ओके, चालेल मला आता", विधी.

रजतने नेहमी घरी करायचा त्या सवयीप्रमाणे व्हिडिओ कॉल केला . एकमेकांना बघताच दोघेही काही सेकंद ब्लॅंकच झाले. विधीच्या चेहऱ्यावर ती हुरहूर, उत्सुकता, आतुरता दिसत होती . टपोरे पाणीदार डोळे सलज्ज झाले होते. रजत मात्र सगळे विसरून पुन्हा हरवला होता त्यांमध्ये. सकाळी सकाळी फ्रेश चेहरा, ट्रिम केलेली बिअर्ड, नुकतेच सेट केलेले ओले केस असलेला आणि व्हाईट कॅज्युअल टीशर्ट घातलेला रजत खूपच देखणा दिसत होता. विधीचीही नजर हटत नव्हती.

क्रमशः

© स्वाती अमोल मुधोळकर

कथेचे सर्वाधिकार लेखिकेकडे राखीव. कथा कोणीही कॉपी करू नये.
माझी संपूर्ण झालेली दुसरी कथामालिका 'परीघापलिकडले नाते' हीसुद्धा नक्की वाचा. 

https://www.irablogging.com/blog/parighapalikadle-nate---bhag-1-marathi-katha-:-marathi-story_5213

Vaccine घेतल्यावर तब्येत नरमगरम झाल्यामुळे भाग टाकायला थोडा उशीर झाला. प्लीज नाराज होऊ नका हं.

आपण देत असलेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल सर्व वाचकांना मनापासून धन्यवाद. हा भाग कसा वाटला ते जरूर कळवा. आपले अभिप्राय हीच लेखनाची ऊर्जा आणि प्रेरणा. स्वस्थ रहा, आनंदी रहा , मुख्य म्हणजे वाचत रहा आणि कळवत रहा :-)

🎭 Series Post

View all