परीघापलिकडले नाते - भाग 1 (मराठी कथा : marathi story)

Parighapalikadle, Nate, bhag, marathi, katha, story, family, kautumbik, kutumb, value, prem, love, parigh, pareegh, relations, relation, Swati, Mudholkar, Amol, Arnav, Anay, Nashik, Anshika, Riya, Aryan

निवेदन:
ही एक काल्पनिक कथा असून यातील पात्र आणि घटनासुद्धा पूर्णपणे काल्पनिक आहेत.

*****

"आई , आई, मला नाही जायचं तिकडे. बाबा, मला सोडवा ना त्यांच्याकडून. मला नाही थांबायचं इथे",  अर्णव मागे वळून त्या मोठया लोखंडी गेटच्या बाहेर बघून मोठ्याने ओरडत , रडत होता. धिप्पाड , सावळ्या रंगांच्या वॉर्डनला बघूनच तो घाबरला होता. त्यात वॉर्डन चे मोठे डोळे बघून तर त्याची गाळणच उडाली होती.

"नीट काळजी घ्याल ना त्याची?" अंशिका , अर्णवची आई.
"हो , हो मॅडम. तुम्ही काही काळजी करू नका. पहिल्या दिवशी सगळी मुलं अशीच रडतात. नंतर हळूहळू सवय होते त्यांना.", वॉर्डन.

"मी ऍडमिशन, फी वगैरे सगळ्या फॉर्मलिटी पूर्ण केल्या आहेत. प्रिन्सिपॉल आणि स्पोर्ट टीचर यांनासुद्धा भेटून बोललोय अर्णवबद्दल" अर्णवचे बाबा अनय .

"ठीक आहे. तुम्ही त्याच्याबरोबर कपडे, स्कूल युनिफॉर्म, पुस्तकं वह्या आणि काही खेळणी दिली असतीलच ना? Sport Shoes वगैरे इतर साहित्यही तुम्हाला सांगितलेले दिलेय न सगळं ?" वॉर्डन.

"हो , हो मॅडम, सगळं नीट दिलंय. काही लागलेच तर नंतर भेटायला येऊ तेव्हा घेऊन येऊ." अंशिका.

"चल बाळा, माझा हात धर पाहू. चल आपण आत जाऊया. " वॉर्डन अर्णव चा हात धरून हॉस्टेल च्या इमारतीकडे जायला वळली. गेट पासून हॉस्टेलकडे जाताना मैदानातून जावं लागायचं. थोडंस दोन चार पावलं पुढे गेले असतील नसतील तोच अर्णव तिचा हात सोडून मागे वळून गेट कडे धावला.

" आई,  बाबा, मला घेऊन चला. मला नाही राहायचं इथे..." अर्णव त्यांना हाक  देत म्हणाला.
वॉर्डन ने तिथल्या शिपायाला आवाज दिला आणि त्याने पटकन अर्णवला परत आणून वॉर्डन कडे सोपवले.

अर्णवचा गोरापान चेहरा रडून लाल झाला होता. त्याच्या गालावर अश्रू सुकलेले होते आणि अजूनही तो रडतच होता. त्याचे टपोरे काळेभोर डोळे रडून लालसर झाले होते. पण आई-बाबा गाडीत बसून निघून गेले होते. त्यामुळे तो वॉर्डन च्या मोठ्या डोळ्यांकडे बघूनच शांत राहिला. आई बाबांनी त्याचे न ऐकता इथे एकटे सोडल्यामुळे त्याला खूप वाईटही वाटत होते आणि रागही येत होता. सगळ्या भावना एकवटल्यामुळे अजूनही त्याचे हुंदके देणं आणि मुसमुसणं सुरूच होतं.

वॉर्डन त्याला घेऊन होस्टेलच्या इमारतीजवळ गेल्या. तिथल्या छोट्या लोखंडी गेटजवळ एक छोटीशी पाच सहा वर्षांची मुलगी गेटच्या लोखंडी सळांना धरून , एक पाय गेटच्या आडव्या सळीवर ठेवून उभी होती . गुलाबी रंगाचा फ्रॉक घातलेली, लहान पण नीट कापलेले केस आणि त्यावर लावलेल्या गुलाबी रंगाच्याच फुलांच्या आकाराच्या पिना . गोरा चेहरा, गोबरे गोबरे गाल असलेली, नाजूक अन गोड दिसत होती ती अगदी. अर्णवला गेटपासून रडत येताना ती पाहत होती. वॉर्डनने गेट उघडले आणि दोघेही आत आले.

"ए तू ललू नको न. किती ललत आहे तू. इथे सगलं छान आहे. बघ मी पन लाहते इथेच", छोटीशी रिया अर्णवला समजावत त्यांच्यासोबत चालायला लागली.

"मला नाही राहायचं इथे, मला घरी जायचं" अर्णव.
" माझं नाव लिया, तुझं नाव काय आहे ले? " रिया. तिला 'र' आणि 'ळ' स्पष्टपणे म्हणता येत नसे आणि नेमके तिचे नावही र पासूनच सुरू होणारे !

"अर्णव". अर्णवने सांगितले.
"तुला आई पण आहे?" रिया अर्णवला.
"हो" अर्णव.
"आणि पप्पा पण न?" रिया.
"हो" अर्णव.
"मला तल माझ्या घली आईच नाही आहे आणि आजी पण नाही . फक्त बाबाच आहेत. अन ते पण लोज ऑफिसमध्ये जातात. " रिया. असे बोलता बोलता रियाला तिची मैत्रीण दिसली तर ती तिच्याशी खेळायला पळाली.

एव्हाना ते हॉस्टेल च्या रूममध्ये पोचले होते. ती एक मोठी हॉलवजा खोली होती . तिच्यात थोडया थोडया अंतरावर रांगेने बंकबेड ठेवलेले होते. आणि प्रत्येक बंकबेड समोर एका भिंतीशेजारी कपाटे ठेवलेली होती. दोन मुलांना मिळून एक असे प्रत्येकाला कपाट आणि बंकबेड दिले होते. दुसऱ्या भिंतीशी प्रत्येकाचे टेबल खुर्ची ठेवलेले होते.

रियाशी बोलता बोलता अर्णव थोडंस शांत होऊ लागला होता. त्याने इकडे तिकडे नजर टाकली. खोलीमध्ये त्याच्यासारखी इतर लहानमोठी मुले बंकबेड वर किंवा खुर्चीवर बसलेली त्याला दिसली. रविवारचा सुटीचा दिवस असल्यामुळे मुले निवांतपणे खेळत होती. दोघे तिघे एका बेड वर बसून  लुडो खेळत होते. थोडया मोठ्या मुलांमध्ये दुसरीकडे बुद्धिबळाचा डाव सुरू होता. कोणी पुस्तक वाचत बसलेले होते.

वॉर्डन अर्णवला म्हणाली, " बघ इथे तुला खेळायला किती जण आहेत. हे सगळे तुझे फ्रेंड्स आहेत .आता रडायचं नाही हं ".
तिने सर्व मुलांना बोलावले आणि सांगितले " मुलांनो, हा अर्णव. हासुद्धा आजपासून तुमच्याबरोबर राहणार आहे. त्याला पण तुमच्यात खेळायला घ्या. आपल्या शाळेबद्दल सांगा. इथे तुम्ही काय काय नियम पाळता ते सर्व सांगा हां? " मुलांनी होकारार्थी  मान डोलावली.

तोपर्यंत शिपायाने अर्णवचे सगळे सामान खोलीत पोचवलेले होते.

"हे बघ, हे तुझे कपाट, टेबल-खुर्ची आणि हा बेड. " वॉर्डन. आता तू तुझे कपडे , पुस्तकं या कपाटात ठेव. आणि हं, आता साडेपाच वाजलेत, साडेसात वाजता जेवणाची बेल वाजेल तेव्हा सर्वांसोबत बाजूलाच कॅन्टीन मध्ये जेवायला जायचे आणि जेवून परत इथे यायचे. मग साडेनऊ वाजता तू झोपू शकतोस. उद्या सकाळी साडेआठ वाजता शाळेत जायचंय हं नीट तयार होऊन." मी उद्या सकाळी येईन . वॉर्डन निघून गेली.

आता काही मुले अर्णवजवळ गोळा झाली . अर्णवशी बोलू लागली. "हा जय, हा निकी, मी आर्यन " आर्यनने ओळख करून दिली. "तू कोणत्या वर्गात जाणार? " जय.

"पहिलीत" अर्णव.
"मी दुसरीत आहे , आणि हा आर्यन पहिलीत, निकी तिसरीत.
आमच्याशी खेळशील न? रडू नकोस हं." जय.

"त्या मॅडम खूप रागावतात का? मला भीती वाटते त्यांची " अर्णवने त्यांना विचारले.
"नाही रे, कधीकधी रागावतात फार दंगा केला तर किंवा नियम मोडले तर. पण उगाच नाही रागवत त्या " निकी. वॉर्डन वरकरणी जरी कडक दिसत असली तरी मनाने प्रेमळ होती. मुलांची आस्थेने विचारपूस करायची. दुखलं खुपलं तर औषध लावून द्यायची.  लहान मुलींच्या हॉल मध्ये त्यांच्याबरोबर झोपायची. कधीकधी झोपताना त्यांना गोष्टही सांगायची.

"आता तू तुझं सामान कपाटात लावून घे. चल मी मदत करतो तुला" निकी.

दोघे जण मिळून आपल्या छोट्या छोट्या हातांनी कपाटात कपडे, पुस्तकं लावू लागले. लावता लावता हातातून एक टी शर्ट घसरून खाली पडले. अर्णव ते उचलायला गेला तर हातातल्या गठ्ठ्यातले दुसरे दोन तीन कपडे खाली पडले. ते पडलेले कपडे ठेवले, तर आधी कपाटात नीट न ठेवलेला पुस्तकांचा गठ्ठा खाली कोसळला आणि ते पसरले . अर्णव रडकुंडी ला आला. त्याला आपल्या घरची आठवण येऊ लागली. इथे तर त्याला स्वतः लाच सर्वकाही करावे लागणार होते. 

जमेल तशी घडी करून कसेबसे निकी आणि अर्णवने मिळून कपडे आणि सर्व सामान लावले.  दमलेला अर्णव बेडवर बसून इकडेतिकडे बघायला लागला.

काही वेळाने जय आणि आर्यन त्याला जेवायला न्यायला आले. सगळे मिळून कॅन्टीनमध्ये गेले. रांगेत उभे राहून प्रत्येकाने आपापलं वाढलेलं ताट घेतलं आणि टेबलखुर्चीवर जेवायला येऊन बसले.

सगळे जेवायला लागले पण अर्णव ताटाकडे नुसताच बघत होता.
"जेव ना अर्णव" जय.
"हे काय आहे , मला नाही आवडत ही भाजी. मला फक्त भेंडीचीच भाजी आवडते, माझे दामूकाका बनवतात तशी." अर्णवला पुन्हा घरची आठवण यायला लागली होती.
"अर्णव खाऊन तर बघ , छान आहे. तसंही आता जेवण नीट नाही केलं तर आपल्यालाच भूक लागेल आणि नंतर तर काही मिळणार नाही आता रात्री." ,निकी ने अनुभवाने सांगितले.
हिरमुसल्या चेहऱ्याने "हं" म्हणून अर्णव जेवायला लागला, भूक तर खूप लागलेली होती .

रात्री वॉर्डन पुन्हा राउंडला आली. सर्वजण नीट आहेत याची खात्री करून झाल्यावर अर्णवला तिने विचारले, "अर्णव जेवलास ना नीट? आता दात ब्रश करून झोपायचं हं, आणि शाळेची बॅग भरून ठेव आता . आर्यनकडून टाइम टेबल घे. हा तुझ्याच वर्गात आहे ना."

"हो " म्हणून अर्णव तिथे उभ्या असलेल्या वॉर्डनला बिलगला.
"काय झाले बाळ, आईची आठवण येते आहे काय ?" वॉर्डनने प्रेमाने विचारले. त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि त्याला समजावले, "काळजी करू नकोस. इथे पण सगळे तुझे मित्रच आहेत. बघ सगळे कसे मजा, मस्ती करत राहतात इथे. अभ्यास करायचा, खेळायचं. तुला पण मजा वाटायला लागेल काही दिवसात". थोडया वेळाने वॉर्डन दरवाजा बंद करून निघून गेली.

अर्णव ने त्याचे आवडते छोटा भीमचे चित्र असलेले घरून आईने दिलेले पांघरूण काढले आणि बेडवर बसला. तेवढ्यात लाईट बंद झाले  आणि तो आणि इतर मुलेसुद्धा झोपेच्या अधीन झाली.

क्रमश:

© स्वाती अमोल मुधोळकर

******
कोण होते अनय आणि अंशिका?
कसा होता अर्णवचा परिवार?
अनय आणि अंशिकाने अर्णवला त्याच्या मनाविरुद्ध बोर्डिंग स्कूलला का पाठवले असेल?
अर्णव या नवीन वातावरणाला कसा सामोरा जाईल?
उद्या नवीन शाळा, शिक्षक, मित्र त्याला आवडतील का?
अर्णव इथे राहील की परत घरी जाईल?

या सगळया प्रश्नांची उत्तरं बघू या पुढच्या भागांमध्ये.  हा भाग कसा वाटला ते नक्की कळवा.

कथेचे सर्वाधिकार लेखिकेकडे राखीव.

🎭 Series Post

View all