दृष्टी आणि दृष्टिकोन - भाग 28

Drushti, ani, drushtikon, Viraj, Rujuta, Vidhi, Rajat, blindness, love, marathi, kathamalika, katha, prem

भाग 27 येथे वाचा

https://www.irablogging.com/blog/drushti-ani-drushtikon---bhag-27_7356

"विराज, तू ना. चल आता", ऋजुता हसून म्हणाली. विराजही हसत होता . ते निघाले.

काही वेळात विराजने एका ठिकाणी गाडी थांबवली. आणि तिला म्हणाला, "चल जाऊ या".

ओहो विराज, आधीच सरळ सांगायचं ना, की त्या टेकडीवरच्या ज्या मंदिरात आपली एकदा अचानक भेट झाली होती तिथेच जाऊ या म्हणून. तू ना भलताच सस्पेन्स क्रिएट करतोस उगाच", ऋजुता हसून म्हणाली.

"हा हा हा, मग काय? केव्हाची सिरीयस होऊन बसली होतीस. आता बघ कशी हसते आहेस, चल जाऊन दर्शन करू ", विराज.

दोघांनीही आपापले देवदर्शन केले. विराजच्या चेहऱ्यावर खूप समाधान दिसत होते. आजचा कार्यक्रम झाल्यावर इथे दर्शनासाठी येईन असे त्याने आधीच ठरवले होते. एवढया दिवसांपासून चाललेली धावपळ आता सध्यापुरती संपली होती , त्यामुळे आणि त्यानंतर देवदर्शन झाल्यामुळे शांत वाटत होते त्याला. डोळे मिटून तो देवासमोर बसला होता. ऋजुतानेही मनोभावे देवदर्शन केले. थोडावेळ डोळे मिटून शांतपणे नामस्मरण केले.

देवदर्शन झाल्यावर ती बाहेर दाराशी येऊन थांबली आणि त्याच्याकडे बघितले. "कॉटन सिल्कचा आकाशी कुर्ता पायजमा घातलेला, हात जोडून, डोळे मिटून बसलेला गौरवर्णी विराज ! किती तेजस्वी चेहरा , सात्त्विक भाव ! स्वतःच स्वतःला घालून दिलेलं कर्तव्याचं बंधन! पण त्या कर्तव्यपूर्तीचे समाधान, संतोष ओसंडत आहेत आता याच्या चेहऱ्यावर.  किती गोड दिसतोय, उफ्फ! नजरच हटत नाहीये, पहातच रहावंसं वाटतय, असं का होतंय", ऋजुताचे पापणीही न लवता आता विराजदर्शन सुरू होते आणि असं का होतंय ते मात्र तिलाच कळत नव्हते.

विराजने डोळे उघडून तिच्याकडे बघितलं आणि म्हणाला, "झालं तुझं? निघूया आता?"

"अं , हो", म्हणत ऋजुता उठली. विराजही उठला अन दोघे परत निघाले. टेकडीवरून उतरताना उतरण्याच्या वाटेत एक ओढा वाहत होता. त्याच्या पाण्याचा खळखळाट कानाला मोहवत होता, छान वातावरण होते आणि दृष्यही छान होते.

"खूप छान पद्धतीने आजच्या प्रोग्रॅमची आखणी केली होतीस हं. अगदी थोडाही वेळ मध्ये वाया न घालवता. सगळ्यांची गाणी , डान्स अप्रतिम झाले", ऋजुता.

विराज म्हणाला , "थँक्स. ए थांबूया का ग इथे थोडावेळ? छान वाटतय न इथे" .

"हं, छान वातावरण आहे. चालेल", ऋजुता.

दोघेही तिथल्या एका बेंचवर बसले. अध्येमध्ये काही जण दर्शन करून परतत होते. टेकडीवरून बघताना खालचे लाईट्स दिसत होते. रस्त्यावरची रहदारी दुरून दिसत होती. ओढ्याचा एका लयीतला खळखळाट सोडला तर बाकी वातावरण शांत होते. आकाशात चंद्राने त्याचं शीतल चांदणं उधळून दिलं होतं. गारवा किंचित वाढल्यासारखा वाटत होता. मध्येच एखादी झुळूक अंगावर शहारे आणत होती आणि वाऱ्याने दोघांचेही केस भुरभुरत होते.

"विराज , किती सुंदर बासरी वाजवतोस तू! नव्यानेच कळलं हे आता. असं वाटतं ऐकतच रहावं. तेच गाणं एकदा वाजवशील का पुन्हा?", ऋजुता.

"जो हुक्म राणीसाहिबा, लेकिन उसके बाद हम भी आप से एक गाना सुनने की ख्वाहिश रखते हैं ", विराज हसून म्हणाला. त्याने सॅक मधून बासरी काढली आणि वाजवू लागला. 

वाऱ्याने विराजचे केस कपाळावर येत होते. ऋजुता पुन्हा पापणी न लवता त्याच्याकडे बघत त्याचे बासरीवादन ऐकत राहिली . सुंदर वातावरणात आपल्या आवडत्या व्यक्तीची सोबत, त्यात हे असे मोहवून टाकणारे सूर. सुख याहून वेगळे ते काय असणार? ती त्या सुरांना कानात आणि मनात साठवत होती आणि तो त्या सुरांमध्ये गुंग झालेल्या तिला डोळ्यात आणि हृदयात साठवत होता. हे हवेहवेसे क्षण विराज आपल्या आठवणींच्या खजिन्यात साठवून ठेवत होता आणि ऋजुताही मोहरून ते गाठीशी बांधून ठेवत होती.

"थँक्स विराज. खरच असं वाटतं ना की या तुझ्या सुरांच्या लहरींवर स्वार व्हावं आणि दूर स्वप्नांच्या देशात फिरून यावं. खूप सुंदर. खूप आवडले मला", ऋजुता आनंदाने त्याचे कौतुक करत म्हणाली. त्या चंद्रप्रकाशात ऋजुताच्या डोळ्यात उमटलेलं आनंदाचं टिपूर चांदणं विराजला सुखावून गेलं.

आता विराज गालावर हात ठेवून सरसावून वाट बघत बसला.
"काय रे?", ऋजुता.

"अग वाट बघतोय ना, तुझं गाणं सुरू होण्याची", तो हसून म्हणाला.

ऋजुताही हसली. "शांत वातावरण आहे ना आता, आशाताईंनी गायलेली एक गजल आवडेल तुला?"

"अग, खूप आवडतात मला गजल, कर ना सुरवात", विराज.

ऋजुता गायला लागली,

सलोना सा सजन है , और मैं हूँ
जिया में इक अगन है , और मैं हूँ
सलोना सा सजन है , और मैं हूँ

तुम्हारे रूप की छाया में साजन -2
बड़ी ठंडी जलन है , और मैं हूँ
सलोना सा सजन है , और मैं हूँ ...

"अप्रतिम ग ऋजुता ! किती सुंदर गातेस तू. शिकली आहेस का संगीत?", विराज.

"हो, लहानपणी शिकले. पण आता बरेच दिवसात गायले नव्हते. आज तू म्हणालास म्हणून गायले", ती गालात हसत म्हणाली.

"थँक्स, अनोखी भेट आहे ती माझ्यासाठी. हे बघ", त्याने फोन समोर करत एक ऑडिओ प्ले करून दाखवला.

"अरे हे काय? रेकॉर्ड केलंस? "

"हो, सॉरी तुला आता विचारतोय यासाठी. पण एक ओळ ऐकली आणि इतकं सुंदर गात होतीस तू की असं वाटलं की हे पुन्हा ऐकता यावं , पण तुला डिस्टर्ब करावंसं वाटलं नाही मध्ये . म्हणून आता विचारतोय. चालेल का मी हे नंतर ऐकायलाही ठेवलं तर?", विराज.

"अरे, मलाही ही आयडिया द्यायची असती ना, मी पण केलं असतं तुझं रेकॉर्ड" , ऋजुता हसून म्हणाली.

"अब आप का वो चान्स तो गया, राणीसाहिबा. लेकिन आप दिल छोटा न करें, आप का जब भी मन करे, ये बंदा खुद सुनाएगा आप को", विराज हसून म्हणाला. त्यावर ऋजुतानेही हसून होकारार्थी मान हलवली. "

"फिलहाल आप ये लीजिए. डोळे बंद कर आणि हाताची ओंजळ कर", विराज.

"अरे, काय आहे?", ऋजुता .

"कर ना प्लीज", विराज.

"ओके बाबा, हं केले", ऋजुता.

विराजने सॅकमधून बांधून आणलेली मोगऱ्याची फुले काढली आणि तिच्या ओंजळीत टाकली. "तुला फुले खूप आवडतात ना?"

"हो पण तुला कसं माहिती? ", ऋजुताने फुलांचा सुगंध श्वासात भरून घेतला.

"चल जाऊ या आता?", असे म्हणत ऋजुता उठली आणि पाठोपाठ विराजही उठला.

काही वेळाने विराज म्हणाला, "ऋजुता, खरं सांगू, आजचा दिवस खूप खास आहे माझ्यासाठी. माझं मोठं ध्येय आज पूर्ण झाल्यासारखं वाटतय . खूप दिवसांपासून या दिवसाची वाट बघत होतो. या खास दिवशी खास व्यक्तीबरोबर काही क्षण घालवावे असं वाटत होतं. म्हणून काकूंकडून परवानगी घेऊन तुला थांबवलं मी".

"खरं सांगू विराज, मी खूप खुश आहे तुझ्यासाठी. एकदम सरप्राईजच दिलंस तू आज. इतकं काही तुझ्या मनात सुरू होतं, तू करायलाही घेतलंस, होता होता इतकं मोठं स्वप्न पूर्ण केलंस. खूप परिश्रम केलेस रे. आम्हाला कळूसुद्धा दिलं नाहीस. डायरेक्ट एवढं सगळं झाल्यावर सांगितलंस, तेही इतक्या सुंदर पद्धतीने समोर आलंय न. खरंच मला खूप आनंद झालाय", ऋजुता आनंदाने सांगत होती.

"हो ना? मग मगाशी डोळ्यात पाणी का आलं होतं तुझ्या?", विराज.

"नाही रे . कुठे ? कधी? काही नव्हतं", ऋजू गडबडली.

"ऋजू, मी बघितलं होतं. सांग ना आता", विराज.

"काही नाही रे, वेडेपणा होता तो माझा", ऋजुता.

"कसला वेडेपणा? वेडेपणा नव्हता तो. मी सांगतो तुझ्या डोळ्यात पाणी का आलं ते", विराज.

"विराज, जाऊ दे ना", ऋजुता.

"इतक्या आनंदाच्या क्षणी तुझ्या डोळ्यात पाणी आलं तर कसं चालेल मला? माझी प्रेरणा आहेस तू. हे सगळं करण्यातल्या आनंदाचे धडे देणारी. मग हे सगळं असं अचानक कळल्यावर तुला झालेला आनंद मला बघायचा होता ग, म्हणून तर असं सरप्राईजसारखं समोर आणण्याचा विचार केला मी".

"अरे खरच खूप खूष आहे मी , हे बघितल्यापासूनच" , ऋजुता.

"खरं आहे. या सर्वांच्या मागचा माझा प्रवास तुलाच माहिती आहे. मी आधी कसा होतो, त्यानंतर आता हे सगळं बघून सर्वात पहिले तू स्वतः माझं अभिनंदन करावं असं वाटत होतं ना तुला? ", विराज.

ऋजुताने चमकून त्याच्याकडे पाहिलं. "हो, तुझं बोलणं झाल्यापासूनच तुझी खूप वाट बघत होते मी. कधी एकदा तुला भेटते आणि तुझं अभिनंदन करते, असं वाटत होतं. पण तुला कसं कळलं हे?", ऋजुता.

"तुझ्या भावना मला नाही कळणार तर कोणाला कळतील?", विराज.

"पण तुला का कळतात माझ्या भावना? " , ऋजुता गोंधळात पडली होती.

"अं..., ते तर तुला शोधावं लागेल", विराज गालातल्या गालात हसत तिच्याकडे बघत होता.

"खरं म्हणजे, ती त्या क्षणातली वेडी इच्छा होती. पण लगेच जाणवलं मला की मी चुकले होते. विधीचा हक्क आधी आहे आणि ते बरोबरही आहेच. विधीला वाईट वाटलं असतं ना. खूप प्रेम आहे तिचे तुझ्यावर ", ऋजुता.

"तिला का वाईट वाटेल ? हे बघ ऋजुता, नात्यांमध्ये प्रत्येक जण आपापल्या ठिकाणी असतो ग आणि सगळेच महत्त्वाचे असतात. हक्काचं म्हणशील तर , मी देतोय ना तुला हक्क. तुला जे वाटेल ते तू कधीही मनमोकळेपणे बोलू शकतेस माझ्याशी. कधी कोणती गोष्ट सांगावीशी, विचारावीशी, शेअर करावीशी वाटली, सल्ला घ्यावासा वाटला तर मी नेहमीच असेन", विराज.

"हं, थँक यू सो मच . पण काही वेळेला परिस्थिती तशी नसते ना", ऋजुता.

"म्हणजे?", न समजून विराज म्हणाला.

"जाऊ दे ते. एक विचारू ? विराज , तुला लग्न करण्याची घाई नाही होत?", ऋजुता.

"हा हा हा, होते ना. खूप होते. पण नवरी तयार होण्याची वाट बघतोय ना", विराजला हसू आले. " काय ग, आज तू लग्नाच्या मागे लागली आहेस? मगाशी विधीलाही विचारत होतीस. अग अजून तर आई बाबांनीही विचार केला नाही त्याचा", विराज हसून म्हणाला.

"म्हणजे काका काकूंना काहीच प्रॉब्लेम नाही?", ऋजुता विधी आणि विराजबद्दल म्हणत होती.

"अग त्यांना काय प्रॉब्लेम असणार आहे?", विराजला कळत नव्हते की ही अशी का म्हणते आहे.

"खूप प्रेम आहे ना तुझे विधीवर? ", ऋजुता.

"हो", विराज.

"हं , कधीपासून रे?"

"अग हा काय प्रश्न आहे ? लहानपणापासूनच. खूप गोड आहे ती. एकदम चुलबुली, खोडकर, पण निरागस. मलाही सांभाळून घेते ती आणि आईलाही", विराज हसून सांगत होता.

"हं, हो ना, गोड आहे खूपच ती आणि मिश्किलही", ऋजुता.

"जाता जाता कॉफी घेऊ या एखाद्या ठिकाणी?", विराज.

"विराज, उशीर होईल ना, बाहेर नंतर कधी जाऊ. आज तुझ्या घरी सगळे वाट बघत असतील ना तुझी. असं काय करतोस" , ऋजुता.

"बरं, नंतर कधी घेऊ या. मीही लवकर घरी जातो. आई बाबा विधी वाट बघत असतील, बरोबर आहे. आज माझ्याबरोबर आलीस त्यासाठी थँक्स ऋजुता", विराज.

"अरे, वेडा आहेस का, थँक्स काय त्यात. उलट तुलाच थँक्स म्हणायला हवे मग तर बासरीवादनासाठी ", ऋजुता तिचे घर आले तशी गाडीतून उतरत म्हणाली.

"तुला नाही कळणार ते. निघतो आता. बाय ", विराज हसून म्हणाला.

क्रमश:

© स्वाती अमोल मुधोळकर

कथेचे सर्वाधिकार लेखिकेकडे राखीव. कथा कोणीही कॉपी करू नये.

इथे विधीच्या खोडकरपणा मुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. पण विधीने तर तेवढ्यापुरताच खोडकरपणा केला होता आणि ती विसरूनही गेली. ऋजुताचा जो गैरसमज झालाय त्यामुळे तिचा दृष्टिकोन वेगळा आहे आणि तिला विराजचे तिच्यावर असलेले प्रेम कळत नाहीये . आणि नेहमी इतरांचा विचार करणारी ऋजुता विधी आणि विराजच्या मध्ये येण्याचा विचारही करत नाही. पण मनात नकळत फुलत असलेल्या भावनांमुळे काही गोष्टी नकळत होत आहेत . ऋजुताही आपल्या ठिकाणी बरोबर आहे आणि विराजही.

तर बघितलंत ना, एखाद्या व्यक्तीबाबत आपला एखादा गैरसमज झालेला असेल , तर आपण त्या व्यक्तीकडे त्या दृष्टिकोनातूनच बघत असतो. मग ती समोरची व्यक्ती कितीही चांगली वागली तरी आपण आपल्या सोयीने त्याचा अर्थ काढतो. ती अशीच आहे , किंवा तो असाच वागतो, असा काहीसा. पण हे समजून घेत नाही की तो असा का वागतोय, असं का म्हणतोय, त्याचेही काही कारण असेल, परिस्थिती असेल . तो त्याच्याजागी बरोबरही असेल. किंवा  कदाचित समोरच्या व्यक्तीचा तसा उद्देशही नसेल.  पण आपल्या पूर्वग्रहदूषित दृष्टिकोनामुळे आपण त्या व्यक्तीचा खरा उद्देश, वागणं , परिस्थिती समजूनच घेत नाही. म्हणून रोजच्या जगण्यामध्ये कोणालाही दोष देण्या आधी आपण त्यांच्या दृष्टिकोनातूनही विचार करून बघू या.


आपण देत असलेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल सर्व वाचकांना मनापासून धन्यवाद. हा भाग कसा वाटला ते जरूर कळवा. आपले अभिप्राय हीच लेखनाची ऊर्जा आणि प्रेरणा. स्वस्थ रहा, आनंदी रहा , मुख्य म्हणजे वाचत रहा आणि कळवत रहा :-)

🎭 Series Post

View all