रणसंग्राम - एक झुंजार भाग २ #मराठी_कादंबरी

In this part everyone in evening celebrate abhi's birthday in traditional way with godess puja at night. Amar tells everyone about his problem regarding his parents. Next day in her birthday party chirag gets furious on vijaysinha due to his politica

रणसंग्राम एक झुंझार भाग

भाग १ - रणसंग्राम भाग १

मागील भागात -

१५-२० दिवसांच्या एका मुलीला विजयसिंहांनी आपल्या घरी आणले व तिचे नाव अभिश्री ठेवले. स्वतःची मुलगी म्हणुन तिला खुप लाडात वाढवले. पुणे जिल्ह्यात खडकवासला स्थित शिक्षण मंत्री विजयसिंह व त्यांचं कुटुंब अभिश्रीचा  दहावा वाढदिवस साजरा करण्यासाठी एकत्र जमले होते. विजयसिंहांचे लहान भाऊ अमरसिंह स्टील उद्योगपती परंतु कंपनीमध्ये खुप मोठी अडचण आल्याचं त्यांना सांगितले.

------------------------------

थोड्यावेळात अभिश्री आणि आदिनाथ फिरुन परत आले. गुरुजी आल्यानंतर आदिनाथने खुप सुंदर पुजा केली. आपल्या लाडक्या बहिणीला आयुष्यात सर्वकाही मिळो अशी मनातुन प्रार्थनाही केली. आदिनाथ वयाने १३ वर्षांचा असला तरी एका राजकुमाराप्रमाणे रुबाबदार, नम्र, संयमी आणि प्रतिभाशाली होता. पण स्वतःहुन फार कमी व्यक्त होत. पुस्तकं आणि संगीतामध्ये रमणे तो जास्त पसंत करत. पुजा झाल्यानंतर अभिश्रीच्या नवीन नियमाप्रमाणे सर्व काम करणाऱ्या मंडळींच जेवण आटोपलं आणि नंतर सर्व घरच्या लोकांचं. आजची पुजा फक्त घरच्यांपुर्तीच मर्यादित असल्याने बाहेरचं कोणी जेवायला बोलावण्यात आलं नाही.

दुपारी सर्व आटोपल्यानंतर सगळे पोर्चमध्ये निवांत गप्पा मारत बसले.

"अरे अमर…! हे काय आहे…! मुलं लहान आहेत पण तु तरी समजावायचं त्यांना. एवढी महाग गोष्ट कशी घेऊन दिलीस..? घोडा तोही डर्बी रेस खेळणानार्यांच्या वंशाचा, म्हणजे लाखांच्या जवळ जातो….!" विजयसिंह

"दादा sss मी घेणार नव्हतोच पण आदीने एवढं प्लॅनिंग केलं त्यासाठी की आम्हाला त्याचं मन मोडवलं नाही. आणि अगदी तेवढाही महाग नाहीये…!" अमरसिंह

"हो भाऊजी खरंय… अभीला घोडा घेऊन द्यायचा म्हणुन त्यानी स्वतः हॉर्स रायडिंगचा क्लास लावला. घोड्यांबद्दल सर्व माहिती तर घेतलीच वर घोडस्वारी पण शिकला. कारण अभी लहान आहे ती एकटी घोड्यावर कशी बसणार..! म्हणुन आधी तो तिला शिकवणार आणि मग एकटीला बसु देणार. सांगा आता असं केल्यावर आम्ही नाही तरी कसं बोलणार..!" गायत्री

"खरंच कौतुक करावं तेवढं कमी आहे पोराचं…!" विजयसिंह

"आदी बेटा.. माझ्या रुममध्ये लाकडी कपाटात पानाचा डब्बा आहे तो आण बरं. आज माझ्या हातचं स्पेशल पान खाऊ घालतो सर्वांना." विजयसिंह

"ओके मोठे बाबा.." आदिनाथ

" दादा मी पण येणार तुझ्यासोबत." अभिश्री

दोघांनी मिळुन पानाचा डब्बा विजयसिंहांना दिला. त्यांनी सर्वांना आपल्या हातचं स्पेशल पान खाऊ घातलं.

"आज रात्री देवीचा गोंधळ झाला की मला तुमच्या सगळ्यांशी आपल्या फॅक्टरी विषयी थोडं बोलायचं आहे. बऱ्याच दिवसांपासुन ही गोष्ट माझ्या मनात आहे." अमरसिंह

सर्वांच्या मनात बरेच प्रश्न निर्माण झाले पण कोणीही काही न बोलता रात्री चर्चा करण्यास होकार दिला व वामकुक्षी घेण्यासाठी आपापल्या रुम मध्ये निघुन गेले.  

संध्याकाळी देवीच्या जागरणासाठी सर्वजण जमले. घराच्या मागच्या अंगणात छान लाकडी खाटा टाकुन सर्व देवीच्या गाण्यांचा आनंद घेत होते. हलकीशी थंडी त्यात बोनफायर भोवती अभीने सर्वांना नाचायला लावलं. थोड्या वेळानी अभी थकुन आदिनाथच्या मांडीवर पेंगायला लागली. आदिनाथ तिला थोपटत तिच्याकडे प्रेमाने बघत होता. बाकी सगळे गप्पा मारत त्यांच्याकडे कौतुकाने बघत होते.

आधी ठरल्याप्रमाणे अमरने त्याच्या फॅक्ट्रीच्या अडचणी विषयी बोलणं सुरु केलं. 

"कामात काही अडचण नाही रे दादा…! पण जे माझे पार्टनर्स आहेत ते प्रेशराईज करत आहेत. की मी माझा फायनान्स आपल्या पार्टीला न देता त्याच विभागातील स्थानिक पार्टीला द्यावा." अमरसिंह

"अरे पण तू तर तुझ्या वैयक्तिक वाट्यातील फायनान्स आपल्या पार्टीला देतो न….! 

कंपनीच्या काॅमन शेअर मधुन तर नाही देत…! 

त्यांना हवं तर त्यांचा वैयक्तिक किंवा ग्रुप शेअर त्या विभागातील हवं त्या पार्टीला द्यावा. आपण काय राजकारणी संबंध म्हणुन पैसा घेत नाही." विजयसिंह

"मी पण त्यांना हेच म्हटलं पण त्यांचं म्हणणं आहे की मी आपल्या घरी पैसे देतो म्हणजे अप्रत्यक्ष पणे आमची कंपनी आपल्या पार्टीला सपोर्ट करते. कंपनीला फायदा तेव्हाच होईल जेव्हा कंपनी स्थानिक पार्टीला सपोर्ट करेल. 

पण खरं कारण हे आहे की त्यांना तिथे असणाऱ्या पार्टीच्या सहायाने गैरमार्गाने बिझनेस करता यावा, एका युनिटच्या पैस्यात ४ युनिट, पर्यावरणाला घातक गोष्टी करुनही त्याचं क्लिअरन्स, शेतकऱ्यांच्या वटणीची लाईन स्वतः साठी वापरणे, असे अनेक गैरव्यवहार करायचे आहेत. ज्याच्या मी सक्त विरोधात आहे. 

तसही भविष्यातील उद्योगाची चाल आता खुप बदलणार आहे. अश्या संकुचीत, स्वार्थी वृत्तीच्या लोकांबरोबर आपला पुढचा बिझनेस वाढवणं शक्य नाही. मला लवकरात लवकर चालु गोष्टी वाईंड अप करणं गरजेचं आहे. हे लोक फार काळ माझं चालु देणार नाहीत. भविष्यातील उद्योग हा रस्त्यावर चालणाऱ्या माणसापासुन ते बंगल्यातील माणसाच्या सुध्दा फायद्याचा असेल, लोकांच्या भरभराटीतच उद्योग आणि उद्योगपतींची भरभराट असेल." अमरसिंह

आदिनाथ आपल्या वडिलांची एक एक गोष्ट मन लाऊन ऐकत होता. उत्तम उद्योगपती होण्यासाठीचे धडे तो त्यांच्या कडुन शिकत होता.

"सध्या त्यांच्या सोबतचा बिझनेस बंद करण्याचा प्रयत्न करणे ठीक नाही राहणार. तुला असं सहजा सहजी ते लोक बाहेर पडु देणार नाही. तुमचं तसं कॉन्ट्रॅक्ट आहे. नाहीतर तुझ्या मेहनतीचा शेअर तर ते देणार नाहीच वरुन कॉन्ट्रॅक्ट ब्रीचचा दावा ही करतील." गायत्री

गायत्री एक हुशार मितभाषी वकील होती. सर्व प्रकारच्या कायद्यातील बारकावे ती जाणुन होती. सरपोतदारांना त्यांच्या उद्योग व राजकारण दोन्हीकडे तिच्या कायद्या विषयी ज्ञानाचं मोठं पाठबळ होत. तिचे वडील उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणुन कार्यरत होते.

"बरोबर आहे तुझं.. त्यांच्या वरचढ होऊन आपल्याला हे काम करावं लागेल. पण कसं…? 

अहो sss.. अभिची आई शोधा काही पर्याय…! येऊ द्या तुमच्या बुध्दीबाळाची एखादी चाल.." विजयसिंह

ईश्वरी कॉलेज पासुन बुद्धिबळामध्ये पारंगत होती. राष्ट्रीय स्तरावर अनेक स्पर्धा तिने जिंकल्या होत्या. तिच्या ह्या चाणाक्ष बुध्दीचा विजयसिंहांच्या राजकारणातील चालींमध्ये खुप उपयोग होत. विजयसिंहाच्या राजकारणात कुठल्या प्याद्याना कसं सरकवायचं याचं बरंच श्रेय तिला होतं, ज्याचा त्यांना अभिमान होता. प्रत्यक्ष राजकारणात न उतरता पडद्या आड राहणं तिला पसंत होतं आणि तेवढाच विनम्र तिचा स्वभाव होता.

"अहो sss काहीतरीच काय..! माझं बुद्धिबळ शिकवणीतील लहान मुलांना शिकवण्या एवढंच मर्यादित.  राजकारणात उगाच तुम्ही मोठेपणा देता." ईश्वरी

"बस का वहिनी…! आम्हाला काय माहिती नाही का तुमच्या एका इशाऱ्यावर दादाच्या विधानसभेत कशी खळबळ उडते. पण या वेळेस मात्र चेसमध्ये मी तुम्हाला हरवणार आहे बरं…!" अमरसिंह

"राहु दे तू…! एवढ्या वर्षात तर कधी हरवु शकला‌ नाही आणि आता काय हरवणार…!" गायत्री

"अगं sss बघच तु यावेळेस मी खुप प्रॅक्टीस करुन आलोय." अमरसिंह

"बरं चला आता.. देवीचा जागर कधीच संपला आणि आपला मात्र चालुच आहे." ईश्वरी

सर्वजण आपापल्या रुम मध्ये झोपण्यासाठी निघाले. अभिश्री गाढ झोपली होती. सध्या तरी ती या सर्व गोष्टींपासुन बरीच लांब होती. विजयसिंहांनी तिला कडेवर घेतले. अमर व गायत्री बऱ्याच अंशी चिंतामुक्त झाले होते कारण त्यांना विश्वास होता त्यांचे दादा व वहिनी यातुन नक्कीच मार्ग काढणार.

ईश्वरी आणि विजयसिंहांच्या डोक्यात पुढच्या निर्णयासाठीचे विचार चक्र सुरु झाले होते.

"अहो sss.. मी काय म्हणते जर आपल्याला भाऊजींच्या बिझनेससाठी तिथे कोणी वरचढ व्यक्ती हवी तर ती राजकारणात कार्यरत असणारी लागेल." ईश्वरी

"बरोबर…"  विजयसिंह

"तुम्ही आपल्या विभागात उभे राहताच पण त्यांच्याही विभागात आपल्याच घरातुन आणखी एक व्यक्ती आमदार उमेदवार म्हणुन उभी केली तर नक्कीच त्या लोकांवर दबाव आणु शकेल." ईश्वरी

"म्हणजे कोणाला उभं करायचं…" विजयसिंह

"गायत्री….!" ईश्वरी

" आपली गायत्री…! ( आश्चर्याने )

हम्म… करुयात विचार यावर…" विजयसिंह

अभिश्रीच्या वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी ठेवण्यात आलेल्या पार्टीसाठी नेहमीप्रमाणे शहरातुन, बाहेरुन मोठे मोठे उद्योगपती, राजकारणी, उच्चभ्रु लोकांना आमंत्रण दिलं होतं. त्यावेळेस ग्रँड बी सर्वात मोठं हॉटेल होतं जिथे पार्टी ठेवली होती. अश्या पार्टीजचा फायदा त्यांना राजकारण, उद्योगात नवीन संबंध बनवण्यासाठी व जुने संबंध जोपासण्यासाठी होत. त्याचबरोबर लोकांमध्ये त्यांचा ठसा कायम राहत.

हॉटेल समोर भव्य लॉन ज्याला किड्स थीम नुसार सजवण्यात आले होते. झाडांवर रंगबिरंगी लायटिंग, सर्वत्र विविध रंग आकारांचे फुगे. मिकी माऊस, डोनाल्ड डक कार्टुनचे कपडे घातलेले माणसं मुलांचं मनोरंजन करत होते. मुलांना खेळण्यासाठी झुले, सी साॅ, बोगदे, जंपिंग एअर बलुन. सर्व मुलं मनसोक्तपणे खेळण्यांचा आनंद घेत होते. त्यांना सांभाळण्यासाठी विजसिंहांनी हॉटेलचा स्टाफ आणि स्वतः ची काही माणसं ठेवली ठेवली होती. त्यामुळे इतर मोठी मंडळी निश्चिंतपणे आत हॉटेलच्या भव्य हॉलमध्ये पार्टीचा आनंद घेत होती. हॉल मध्ये भरपुर लाईटची रोषणाई, एका बाजुला विविध खाद्य पदार्थांचे स्टॉल, दुसऱ्या बाजुला सॉफ्ट ड्रिंक, हार्ड ड्रिंक काऊंटर व शेवटच्या टोकाला मध्यभागी मोठा स्टेज जिथे अभिश्रीसाठी मिनी माऊसचा ३ मजली केक ठेवला होता. 

जवळपास सर्व आमंत्रित पाहुणे आल्यानंतर अभिश्रीने केक कापला व जेवणं सुरु झाले. भरपुर लोक असल्याने भेट वस्तु सुध्दा तेवढ्याच होत्या. गणु काका ते गिफ्ट्स व्यवस्थित पणे ठेऊन घेत होते. हळु हळु पाहुण्यांचा भर कमी झाला.

संपतराव आणि त्यांचा मुलगा चिराग यांनाही त्यादिवशी आमंत्रित केलं होतं. संपतराव शेलार म्हणजे SBP चे  (SBP - सर्व बहुमत पार्टी) अध्यक्ष. त्यांची पार्टी आधीपासुन महाराष्ट्रापुरतीच मर्यादित होती. विजयसिंहांच्या राजकारणाच्या सुरुवातीच्या काळात संपतरावांनी खुप मदत केलेली. त्यांचे राजकारणातील गॉडफादर. पण विजसिंहांचे तत्व त्यांच्यापेक्षा वेगळे असल्यामुळे ते SBP पक्षात सामील झाले नाही. 

पुढची वाटचाल त्यांनी गृहमंत्री लक्ष्मीकांत रणदिवे  यांच्या सोबत NKP (नवक्रांती पक्ष) मध्ये केली. पण तरीही संपतराव व त्यांचे मैत्रीपुर्ण संबंध कायम राहिले.

विजयसिंहांनी संपतरावांना अमरच्या अडचणी बद्दल सांगितले. गायत्रीला पुढे येणाऱ्या २००५ च्या इलेक्शनसाठी त्यांच्या विभागातुन म्हणजे शीरुर मधुन आमदार उमेदवार म्हणुन उभं करण्याबद्दल त्यांचा सल्ला विचारला. ते काही उत्तर देण्याआधी त्यांचा मुलगा चिराग अचानक चिडला.

"तुम्ही मुद्दाम आम्हाला डिवचण्यासाठी ही चाल खेळत आहा न…! 

माहित आहे मला…! 

मुद्दाम माझ्याच विभागातुन तुमच्या भाऊजईला उभं करायचा डाव खेळत आहा…! 

स्वतःच्या भावाच्या कंपनीत वाटेल तशे धंदे चालवण्यासाठी तुमची ही कारस्थानं काही नवीन नाहीत.

माझ्या अप्पांकडुन सर्व शिकुन घेऊन तुम्ही त्यांच्या पक्षात कधी सामील झाले नाही. तुमच्यामुळेच ते नेहमी पडद्या मागे राहिले, एक सावली बनुन.

आणि आज तिच अवस्था तुम्हाला माझीही करायची आहे….! मी हे कधीच होऊ देणार नाही.

अप्पा आणि माझ्यात खुप फरक आहे एवढं लक्षात ठेवा.  तुमचं पद वापरुन कितीही दबाव आणला तरी तिला मी जिंकू देणार नाही.

एवढं बोलुन चिराग तिथुन निघुन गेला. जेम तेम वयाची विशी पार केलेल्या मुलाच्या मनात विजयसिंहच्या मनात एवढं विष बघुन त्यांचं डोकं सुन्न झालं. संपतराव स्वभावाने जेवढे शांत, संयमी तेवढांच तो शीघ्रकोपी, संतापी आणि त्यात आमली पदार्थांच्या व्यसनामुळे तो आणखीनच आक्रमक बनला होता. गोरापान रंग, बारीक शरीर, निळे डोळे, विखुरलेले केस, सतत थरथरते हात, क्वचितच शुध्दीत राहत.

"त्याचं बोलणं फारसं मनावर घेऊ नको विजु. तुला तर माहीतच आहे. कसा नाकावर राग घेऊन फिरतो हा मुलगा. अजुन लहान आहे तो. राजकारण समजायला वेळ लागेल त्याला." संपतराव

"बरोबर आहे अप्पा तुमचं. एकदा राजकारणात मुरला की होईल शांत." विजयसिंह

चिरागने खाली रिसेप्शन मध्येच खिशातुन कोकेनची पुडी काढली आणि तिथेच डेस्कवर ते घेणं सुरु केलं. कोकेन डोक्यात जाताचं त्याच्या चेहऱ्यावर एक विकृत हास्य झळकलं. त्याने लगेच रिसेप्शनवरुन फोन लावला.

"हॅलो… चिराग बोलतोय… मी जे सांगत आहे ते आणि तसच झालं पाहिजे. रंग्याला एका रात्री साठी जेल मधुन बाहेर काढा. त्याचं काम झालं की पुन्हा आत पाठवा. पैश्याची फिकीर नाही…  

जोवर त्या सरपोतदार घराण्याला नेस्तनाबुत करत नाही तोवर संपतराव शेलारचं नाव लावणार नाही...

आणि पुन्हा तेच अमानवी हास्य त्याच्या चेहऱ्यावर उमटलं…

क्रमशः

(पुढील भाग परवा शुक्रवारी प्रकाशित करण्यात येईल.)

विजयसिंह गायत्रीला आमदारकीसाठी उभं करु शकतील का…? 

त्यामुळे त्यांच्या अडचणी कमी होतील की आणखी वाढतील…?

चिरागच्या डोक्यात नक्की काय शिजत होतं..? त्यामुळे सरपोतदारांना काही नुकसान होईल का…?

जाणुन घेण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा.

कथा शेअर करताना नावासह शेअर करावी. आपल्या प्रामाणिक प्रतिक्रिया कमेंटद्वारे जरुर कळवा.

(सदर कथा संपुर्णपणे काल्पनिक आहे. कथेतील पात्रांचा व घटनांचा वास्तविकतेशी काहीही संबंध आल्यास तो योगायोग असेल. राजकारणा विषयी संपुर्ण ज्ञान मिळवणे ही अत्यंत कठीण गोष्ट असल्याने त्यातील चुकांसाठी क्षमस्व.)

{ कथा २००४ पासुन सुरु झाली आहे असे ग्राह्य धरण्यात यावे.}

वाचत राहा

रणसंग्राम एक झुंझार

लेखन : रेवपुर्वा





 

🎭 Series Post

View all