रणसंग्राम भाग १
(सदर कथा संपुर्णपणे काल्पनिक आहे. कथेतील पात्रांचा व घटनांचा वास्तविकतेशी काहीही संबंध आल्यास तो योगायोग असेल. राजकारणा विषयी संपुर्ण ज्ञान मिळवणे ही अत्यंत कठीण गोष्ट असल्याने त्यातील चुकांसाठी क्षमस्व.)
{ कथा २००४ पासुन सुरु झाली आहे असे ग्राह्य धरण्यात यावे.}
"पटापट हात चालवा सगळे, पुजा देवांची घालायची आहे तुमची नाही…!
लवकर सगळे कामं आटोपुन जेवायला बसले पाहिजे लक्षात ठेवा….!"
"छोटी मालकीण आम्ही समदी मागुन जेवत अस्तुया. सगळ्यायचं झाल्यावरती." गणु (घरातील मुख्य आणि विश्वासु नोकर).
" हे ठरवणारे तुम्ही कोण…! आणि छोटी मालकीण नाही ताई म्हणायचं मला किती वेळ सांगितलंय…!
तुम्ही लोक आमच्या आधी उठुन सगळी काम करता, पुन्हा वाढणार सुध्दा तुम्हीच आणि शेवटी का जेवणार…!!
ताकद कुठुन येईल तुम्हाला…!"
"पण ताई मालक रागिवतील आमासनी" गणु.
"ते मी बघेन, आजपासुन हा नवीन नियम असेल. पुजा, कार्यक्रमाच्या दिवशी नैवेद्य झाल्यावर सर्व काम करणाऱ्यांनी जेवायचं. मग त्यांनी सर्वांना वाढायचं."
"हो न बाबा…! बाबा sss..लक्ष कुठे आहे तुझं..?"
तिच्या बाबांचं भान आपल्या १० वर्षांच्या चिमुरडीकडे अभिमानाने बघण्यात हरवलं होतं. एवढीशी पोर आणि चक्क मोठ्यांना सुचणार नाही असा नियम बनवते."
"बाबा sss... नुसता बघतो काय माझ्याकडे, संग न सगळ्यांना, मी जस म्हटलं तसच होईल."
" अ..! हो हो sss… सर्वांनी ऐका sss.. ताई म्हटल्या तसंच होईल पुढे."
असं बोलुन तिचे बाबा विजयसिंह पोर्चमधील बंगईवर बसले. त्यांना ज्या दिवशी अभिश्री त्यांच्या आयुष्यात आली ती रात्र आठवली.
आजच्याच दिवशी १० वर्षांपुर्वी आपल्या १५ दिवसांच्या मुलीचा थंड देह घेऊन शिक्षणमंत्री विजयसिंह सरपोतदार तिच्या अंत्यसंस्कारासाठी निघाले होते. त्यांच्यासोबत त्यांची खास विश्वासु माणसं होती. कडाक्याची थंडी, अनवाणी पाय आणि डोळ्यात अश्रुंच्या धरांणी ते चालत होते. कोवळ्या जीवाला त्या काळ्या मातीत सोपवुन ते निघाले. तोच बाळाच्या रडण्याचा आवाज आला.
चमत्कार झाला…!
आपली मुलगी पुन्हा जिवंत झाली समजुन आनंदानी त्यांनी तिच्याकडे धाव घेतली. पण एक दुसरीच मुलगी पलीकडे बेवारस पडुन होती. रक्त गोठणाऱ्या थंडीत आपल्या जीवाशी झुंज देत होती. विजयसिंहांना वाटले देवीनी आपलीच पोर आपल्याला परत दिली. ते त्या बाळाला घेऊन घरी गेले. ही आपली मुलगी नाही हे कुणालाच कळु द्यायचं नाही व इथे घडलेला प्रकार कुणाचजवळ कधी बोलायचा नाही अशी सर्वांना ताकीद दिली. आपली मुलगी मेली नसुन हीच ती आहे असं स्वतःशी ठाम केलं.
घरी पत्नी ईश्वरी सुन्न होऊन दारात बसली होती. समोरुन विजयसिंह रडणाऱ्या बाळाला हातात घेऊन येताना दिसताच आपली मुलगी समजुन तिने बाळाला कवटाळुन तिचे मुके घेतले. ईश्वरी थोडी शांत झाल्यावर तिला सर्व वृत्तांत सांगितला व आशाळभुतपणे या मुलीला आपल्या पदरात घ्याल का अशा नजरेने बघितलं. क्षणाचाही विलंब न करता त्या माऊलीने रडणाऱ्या मुलीला आपलं दुध पाजुन, एका आई व बाळाची भुक शांत केली. विजयसिंहांचे डोळे अजुनही वाहत होते पण आनंदाने. ५ वर्ष किती तरी देव, दवाखाने करुन ती आई झाली आणि लगेचच तिची ओंजळ रिकामी झाली होती. आज देवाने पुन्हा त्यांना ही संधी दिली होती, जी दोघांनी मनातुन स्वीकारली. स्वतःच्या आयुष्यासाठी जन्मापासुनच लढणाऱ्या अशा सामर्थ्यवान मुलीचे नाव त्यांनी अभिश्री ठेवले.
----------------------
आज तिचा दहावा वाढदिवस होता.
"अहो sss… आत येता का…! किती वेळ झालाय…! अजुन पुजा बाकी आहे आणि तुम्ही आपले लेकीकडे बघत बसलात…
अजुन भाऊजी आणि गायत्री पण नाही पोहचले. यावेळेस पुजा आदिनाथच्या हातुन करायची ठरलं ना आपलं…!" ईश्वरी.
अमरसिंह आणि गायत्री म्हणजे विजयसिंहांचे धाकटे भाऊ-भावजयी. आदिनाथ त्यांचा एकुलता एक सुपुत्र. वयाने अभिश्री पेक्षा ३ वर्षांनी मोठा. अमरसिंह पुण्याबाहेर शिरुर गावात त्यांच्या फॅक्ट्रीजवळ स्थायी असुन एक उत्तम उद्योगपती होते. आपल्या हुशारी व कर्तृत्वावर त्यांनी स्टील इंडस्ट्रीमध्ये खुप मोठी उंची गाठली होती. विजयसिंहांचे ते राजकारणातील आर्थिक आधारस्तंभ होते.
"अहो sss… फोन तरी केला का भाऊजींना…?" ईश्वरी.
किचन ओट्याजवळ काम करता करता ईश्वरीची खिडकीतुन बघत बडबड सुरू होती. विजयसिंह काधीचेच तिच्या अगदी मागे येऊन उभे होते याकडे तिचं लक्षही नव्हतं.
"तुम्ही काही लेकितुन बाहेर पडणार नाही मलाच तिकडे यावं लागेल…
आह ssss…
मागे वळताच विजयसिंहांवर ती धडकली व त्यांनी तिला मिठीत घट्ट आवळुन घेतले.
"अहो sss ही काय वेळ आहे फाजील पणाची.." ईश्वरी.
"ह्याला फाजील पणा नाही रोमान्स म्हणतात डारलींग." विजयसिंह
"हो पण त्याला काही वेळ काळ, वय बघावं १० वर्षांची मुलगी आहे आपल्याला." ईश्वरी
"प्रेमाला कुठली आली मर्यादा आणि हो कॉलेजचे दिवस विसरलात का तुम्ही…!
पहिल्याच नजरेत घायाळ करुन दिलं होतं मला…!
मी तर अगदी आजही तसाच घायाळ होतो." विजयसिंह.
"(मिठी सोडवत) पुरे पुरे तुम्ही एकदा सुरु झाले की थांबायचे नाहीत." ईश्वरी
" चुक तुमची आहे, असं नऊवारी घालुन त्यावर नथ मोगऱ्याचा गजरा, लाल मोठं कुंकू आणि या गालावरच्या खळ्या दाखवत माझ्यासमोर याल तर कसं सांभाळायचं आम्ही स्वतःला. कॉलेजच्या पहिल्या सांस्कृतिक कार्यक्रमाला अगदी अशाच दिसत होता. ते बघुन तर प्रपोज करायची हिम्मत झाली माझी." विजयसिंह.
"हो काsss मला तर वाटलं तुम्ही त्या गार्गी देसाईला प्रपोज करणार होता आमच्या एक सारख्या नऊवारी मुळे मी गळ्यात पडले. तुमची पहिली चॉईस तसही तीच होती ना…!" ईश्वरी
"अहो sss किती वर्ष होऊन गेले त्या गोष्टीला, अजुनही आठवतं तुम्हाला…!" विजयसिंह
"वाह sss असं कसं विसरणार…!" ईश्वरी.
तेवढ्यात आदिनाथने धावत येऊन इश्र्वरीला मीठी मारली.
"मोठी आई sss…"
"आले का युवराज sss…! किती वाट बघत होतो आम्ही, अभीचा तर सकाळपासुन भाई sss... भाईचा जप सुरु आहे…!" ईश्वरी
"बाबांमुळेच उशीर झाला मोठी आई, त्यांचे काम संपतच नाही. त्यामुळे अभीचं सरप्राइज गिफ्ट घ्यायला पण उशीर झाला." आदिनाथ
"अरे वाह sss काय सरप्राइज आणलाय राणी सरकारसाठी..? विजयसिंह
"आम्ही खुप मोठ्ठं सरप्राइज आणलय अभी साठी.. तिच्या स्वप्नातलं सरप्राइज..!!!
चला न मोठे बाबा दाखवतो" आदिनाथ
लगेच आदिनाथ काकांच्या पाया पडला व हात धरुन त्यांना जवळ जवळ ओढतच नेलं.
"अहो sss.. आपला विषय अर्धवट राहिलाय म्हटलं…" ईश्वरी
"तुमच्याशी बोलण्यात आणि बुद्धिबळात कोणी जिंकु शकतं का…! तसही अमर आलाच आहे तुमचा पार्टनर इन क्राईम. जुन्या गोष्टी उकरणारच तुम्ही दोघं…!" विजयसिंह
ईश्वरी विजयसिंहांकडे एक मिष्खील हास्य करत आपल्या कामाला लागली. आदिनाथ त्याच्या मोठ्या बाबांना अंगणात घेऊन गेला.
---------------------------
"आदी sss.. अरे किती गडबड आधी सामान तर उतरवु दे सगळं." गायत्री
अमरसिंह व गायत्री दोघेही विजयसिंहांच्या पाया पडले.
"काय हे अमर एवढं सगळं कशाला आणलं…!" विजयसिंह
"फार कुठे आहे दादा sss…! आपल्या प्रिन्सेसचा वाढदिवस म्हणजे एवढं लागणारच ना…!" अमरसिंह
"बघा न भाऊजी मी किती वेळ म्हणत होते कमी शॉपिंग करा पण हे बाप लेक ऐकतील तर शपथ…!" गायत्री.
"बरं ssss.. आणि तु केलेली शॉपिंग त्याच कायss…! किती ड्रेस घेतले अभीसाठी…!" अमरसिंह
"अरे sss… तो आहेर असतो… तेवढं घ्यावच लागतं." गायत्री.
"पुरे पुरे तुम्ही दोघं सारखेच आहा कोणी कमी नाही. बरं चला आता घरात. हे लोक सामान घेऊन येतील." विजयसिंह
"मोठे बाबा sss माझं सरप्राइज दाखवायचं राहिलेय न…! " आदिनाथ.
"अरे sss हो की…! त्यासाठीच तर आलो इथे. बरं आपण घरात जाऊन बघु ते. पुजा राहिलीये आजुन. यावेळेस तुझ्या हातुन करायची आहे न." विजयसिंह
"अहो sss पण ते सरप्राइज घरात थोडी नेता येईल इथेच बघावं लागेल. तुम्ही दोनच मिनिट थांबा मी अभीला घेऊन येतो." आदिनाथ
"अरे देवा sss.. हे कसलं सरप्राइज म्हणायचं…!" विजयसिंह.
"बघाच आता…! आमची शॉपिंग तर फिकीच आहे याच्या पुढे." अमरसिंह
विजयसिंह बुचकळ्यात पडुन इकडे तिकडे बघत बसले, नक्की असं कुठलं सरप्राइज म्हणायचं…
तेवढ्यात आदिनाथ अभिश्रीच्या डोळ्यावर पट्टी बांधुन तिला अंगणात घेऊन आला.
"चिटींग नाही करायची हा बिलकुल…!" आदिनाथ.
आदिनाथने मागे उभ्या असलेल्या ट्रक वाल्याला इशारा केला. तो आणि त्याच्या सोबत्यांनी मिळुन ट्रक मधुन एक कळाशार रंगाचा, झुपकेदार शेपटी आणि मोठ्या डोळ्यांचा अरेबियन घोडा उतरवला.
आदिनाथने अभिश्रीच्या डोळ्यावरून पट्टी काढली. घोडा बघतच तिच्यासाठी आकाशच ठेंगणं झालं. ती लगेच आदिनाथला जाऊन बिलगली.
"भाई sss.. तुझ्या लक्षात राहिलं माझं स्वप्न…!" अभिश्री.
"मग..! माझी बहिण एखादं स्वप्न बघेल आणि ते मी पुर्ण करणार नाही असं होईल का..! आहे की नाही तु स्वप्नात बघितला तसाच..!" आदिनाथ.
अभिश्रीने आनंदात घोड्याभोवती नाचणं सुरु केलं.
" हो भाई..! अगदी तस्साच आहे..!"
तिच्या आनंदाला पारावाराच राहिला नव्हता. तिचा भाई खरंच तिच्यासाठी हुबेहूब तिच्या स्वप्नातील घोडा आणेल असं तिला वाटलंही नव्हतं.
तेवढ्यात ईश्वरी पोर्चमध्ये आली.
"अहो sss.. काय हे sss…! त्यांच्या सोबत आत यायचं सोडुन तुम्हीच बसलात इथे…!"
"अगं बघ तर… आदीने घोडा आणलाय अभी साठी." विजयसिंह
"बरं... आणा तो घोडा पण घरात आणि चला आवरा सगळे, गुरुजी येतील तासाभरात." ईश्वरी
"अगं आत आणायला काय त्याने लाकडी घोडा नाही आणलाय…! खराखुरा घोडा आहे तो…!"
ईश्वरीने बाहेर येऊन बघितले.
"अरे देवा नारायणा..! धन्य आहे हे बहीण भाऊ. चला आता." ईश्वरी.
"आई मी घोड्यावर चक्कर मारणार आधी." अभिश्री.
"बरंsss पण लवकर या दोघंही आणि आपल्या बागेतच फिरा. त्याच्यासाठी घर बांधुया आपण आणि गायत्री काकीला छानसं नाव पण सुचवायला सांगु" ईश्वरी.
"यसस् ये sss…" अभिश्री.
आदिनाथ आणि अभिश्री दोघंही घोड्यावर बसले आणि त्यांच्या बरोबर जॉकी व गणु काकाही निघाले.
पुण्यातील खडकवासला धरणाजवळ सरपोतदारांच्या टुमदार वाड्याभोवती २ एक्कराचा विविध प्रकारच्या फळ, फुल, झाडांनी बहरलेला मोठा परिसर होता.
----------------------
गायत्री फ्रेश होऊन ईश्वरीच्या मदतीसाठी स्वैंपाकघरात गेली.
"सॉरी वहिनी यावेळेस नैवेद्य मी करणार होते. नेमकं ह्यांना वेळेवर काम आलं आणि आम्ही काल येऊच नाही शकलो." गायत्री
"अगं काहीतरीच काय…! मला माहिती नाही का, या लोकांची कामं…! नेहमीचच आहे. आणि तू एवढं वाईट वाटुन घेऊ नको. नैवेद्याचा शिरा करायचा ठेवलाय तुझ्यासाठी. गुरुजींना यायला तासभर आहे तोवर होऊन जाईल." ईश्वरी
"वहिनी…! तुम्ही खरंच ग्रेट आहात…! कसं सगळं मॅनेज करता…! मला कमाल वाटते." गायत्रीने ईश्वरीला मिठी मारली.
"अगं एवढं काय त्यात…! साधी सुधी तर काम ही. त्यात हाताखाली एवढी फौज." ईश्वरी
"तरीही…! लोकांकडुन चोखपणे काम करून घेणे यासाठी पण कौशल्य लागतच. ते आहे तुमच्यात. खुद्द शिक्षणमंत्री तुमच्या बोटांवर नाचतात. (डोळा मारून तीने ईश्वरीला चिडवले) गायत्री
"(लाजुन) इशश् sss काहीतरीच…" ईश्वरी
दोघे भाऊ हॉलमध्ये पुजेच्या नियोजनात लागले.
"अच्छा तर या सरप्राइज मुळे तुम्ही काल येऊ नाही शकले…!" विजयसिंह
"नाही दादा…! कंपनी मध्ये सध्या खुप इशुज चालु आहेत. खुप मोठा कट रचण्यात येत आहे. आणि त्याचा संबंध राजकारणाशी जोडलेला आहे. आपण रात्री निवांत बोलुच त्या विषयावर. काहीतरी अघटीत घडण्याची चाहुल जाणवतेय…" अमरसिंह
क्रमशः
(पुढील भाग परवा संध्याकाळी पोस्ट करण्यात येईल)
अमरसिंहांच्या कंपनी मध्ये नक्की काय अडचण असेल…?
त्याचा परीणाम सरपोतदारांच्या घरावर तर नाही नं होणार…?
राजकारणात मुरलेले विजयसिंह आपल्या भावाच्या या अडचणीसठी काही पर्याय शोधु शकतील का…?
जाणुन घेण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा.
कथा शेअर करताना नावासह शेअर करावी. आपल्या प्रामाणिक प्रतिक्रिया कमेंटद्वारे जरुर कळवा.
रणसंग्राम
लेखन : रेवपुर्वा
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा