दृष्टी आणि दृष्टिकोन - भाग 64

विराज - ऋजुता."सर, मला जायला हवं, काहीतरी इश्यू येतोय वाटतं निकिताला. निघू या?" ऋजुता.

"ओके." म्हणून रोहितही उठला. तसंही त्याला जे तिच्याशी महत्वाचं बोलायचं होतं ते झालंच होतं.

रोहित आपल्या केबिनमध्ये गेला तो आनंदातच.  ऋजुता निकिता होती त्या ठिकाणी गेली. निकिता प्रसादची फोनवरून मदत घेत त्याचे डिप्लोयमेन्ट करत होती.

"निकी, किती राहिलंय अजून डिप्लोयमेन्ट? " ऋजुताने विचारले.

"डिप्लोयमेन्ट जवळपास होत आलय. टेस्टिंग बाकी आहे आणि नंतर प्रीती यूजर टेस्टिंग करेल ते बाकी आहे. काय झालं ग? " निकिताने सांगितले.

"ओके कर लवकर लवकर. " ऋजुता.

"हो, पाऊण-एक तास तरी लागेल ग सगळं होईपर्यंत. " निकिता म्हणाली. ऋजुताचा अस्वस्थ झालेला चेहरा तिला कळला होता. पण प्रीती तिथेच असल्याने निकिताने काही विचारले नाही आणि ऋजुतानेही काही सांगितले नाही.


"ओके, मी काम करतेय इथेच, काही अडलं तर सांग मला." ऋजुता.

त्या आपापल्या कामाला लागल्या. ऋजुता कसंबसं स्वतःला कामात गुंतवत होती.  काही वेळाने तिनेही एकदा निकितासोबत टेस्टिंग केले आणि सगळं ठीक असल्याची खात्री करून मग प्रीतीला यूजर टेस्टिंग साठी दिले. प्रीती  ते करायला लागली. निकिताही तिच्यासोबत बसून ते बघत होती. मग ऋजुता पुन्हा आपल्या कामात मन गुंतवण्याचा प्रयत्न करू लागली.

काही वेळाने टेस्टिंग व्यवस्थित आटपले.

"ऋजुता मॅम, माझं टेस्टिंग करून झालंय. काही इश्यूज नाहीत, परफेक्टली चालतंय सगळं." प्रीती.

"चला, छान झालं. " ऋजुता.

" रोहित सरांनाही सांगते मी तसं. " प्रीती.

"हो कळव त्यांना, मीही मेल करते की सगळं नीट डिप्लोयमेन्ट आणि टेस्टिंग झालंय. तेवढं करा आणि तुम्ही दोघीही जेवायला जा, बराच उशीर झालाय. निकी जेवून ये तू लवकर, मग निघू या परत." ऋजुता म्हणाली.

"हो आलेच थोड्या वेळात." म्हणून निकिता आणि प्रीती कॅन्टीनमध्ये गेल्या.

आता मात्र रोहितला डिप्लोयमेन्टचा मेल टाईप करतानाही ऋजुताचा हात थरथरत होता.

मग तिने कसबसे स्वतःला समजावले, 'ऋजुता, काय करते आहेस? पर्सनल आणि प्रोफेशनल गोष्टी वेगळ्या ठेव. उगाच त्यांचा कामावर परिणाम होऊ देऊ नकोस.'

स्वतः ला समजावत तिने मेल टाकला आणि आपले इतर काम करू लागली. थोड्या वेळाने रोहितने रिलीज पूर्ण झाल्याचा मेल बघितला आणि त्याने अंदाज लावला की निकिता आणि प्रीती आता जेवायला गेल्या असतील.

'ऋजुताही गेली असेल का त्यांच्याबरोबर? जाऊनच बघतो. नसेल गेली तर तेवढंच थोडं आणखी बोलता येईल.' रोहित मनात म्हणाला आणि तो ऋजुता बसलेली होती तिकडे डोकावला.

ती तिथेच बसलेली आहे असे पाहून तो आत येऊन बाजूची एक खुर्ची ओढून घेऊन त्यावर बसला.

'ओह नो, हे पुन्हा आले. आता कशाला आले असतील? हं... रिलीज झाला त्याबद्दल बोलायला आले असतील.' ऋजुता असा विचार करते न करते तोच रोहित म्हणाला,

"सो, एव्हरिथिंग डन नाईसली, परफेक्टली अँड ऑन टाईम ! काँग्रॅच्युलशन्स ऋजुता, यू हॅव डन अ ग्रेट जॉब! "

"थँक यू सर." ऋजुता.

"प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून हा तुझा पहिलाच प्रोजेक्ट रिलीज असेल ना?" रोहित.

"हो. पहिलाच." ऋजुता.

"आय रिअली एप्रिशिएट इट!" रोहित.

"थँक्स." ऋजुता.

"ऋजुता, मघाशी एक सांगायला विसरलो." रोहित.

'आता अजून काय?' ऋजुता मनात विचार करत होती आणि चेहऱ्यावर प्रश्नाचिन्ह उमटले होते.

ते बघून रोहित म्हणाला,
"मघाशी मी जे म्हणालो त्याबद्दल, तुला काही निर्णय घेण्याआधी माझे घर बघायचे असेल, किंवा आईला भेटायचं असेल तर तसंही सांग. मी घेऊन जाईन तुला घरी. कळव मला तसं."

"अं... सर मला घरी बोलावं..." ऋजुता.

"डोन्ट वरी, मला माहिती आहे. हे बघ, मी आत्ताच तुझा निर्णय नाही मागत आहे, पण तू माझा पॉझिटिव्हली विचार करावास एवढंच म्हणतोय. त्यासाठी तुला जे लागेल ते सहकार्य मी करेन. " रोहित मधेच म्हणाला .


तेवढ्यात निकिता आणि प्रीती परत आल्या. रोहितने त्यांनाही त्यांच्या कामाची पावती दिली. त्यानंतर तो निघून गेला.

रोहित गेला आणि ऋजुताने सुटकेचा निःश्वास टाकला.

ती निकिताला म्हणाली,

"चला, निकी, झालंय ना आता सगळं? निघायचं ना?"

"थोडा वेळ मॉनिटर केलं असतं ना?" निकिता.

"हं ते करूच तिकडून. चल आता. बाय प्रीती. " म्हणत ऋजुताने निकिताला जरा घाईनेच बाहेर काढले.

"अग, एवढी घाई का आहे? जरा शांततेत जाऊ ना." निकिता गाडीत सीटबेल्ट लावत म्हणाली.

"निकी, माझं डोकं भणभणतंय ग, काही सुचत नाही आहे. घरी जावंसं वाटतंय." ऋजुता ड्राईव्ह करता करता म्हणाली.

"ओके मग मला सोडून तू घरी जा, मी बघते मॉनिटरिंग. फार काही इश्यू येणार नाही मोस्टली." निकिता.

"हं" ऋजुता.

आणि ऋजुता गाडी चालवू लागली. काही अंतर गेल्यावर,

'नेहमी तर एवढी खूष असते, बोलत असते ही. आज किती चुपचाप बसून  गाडी चालवतेय. रिलीज एवढा नीटपणे पार पडला तरी कसल्या विचारात आहे कोणास ठाऊक.' निकिता विचार करत होती.

तेवढ्यात बाजूच्या एका गाडीच्या खूपच जवळून कट मारत ऋजुताने गाडी पुढे घेतली.

"अग ऋजू, काय करते आहेस? किती जवळून गेलो आपण त्या गाडीच्या. धक्का लागला असता म्हणजे? कसली एवढी घाई झालीय तुला?" निकिता रागावली.

"हो, तुझ्याच मुळे झालंय सगळं. म्हटलं होतं ना, मी नाही येत, तू जा म्हणून. पण नाही ऐकलंस तू." ऋजुता.

"अग पण त्याने काय झालं?" निकिता.

एव्हाना त्या इंडस्ट्रियल एरिया च्या बाहेर येऊन शेताजवळच्या रस्त्यावरून जात होत्या. ऋजुताला  त्या आजीबाईंची शेताच्या बाजूलाच असलेली झोपडी आणि त्यासमोर मांडलेली छोटीशी टपरी दिसली होती.

"काही सुचत नाहीये मला. विचार करून डोकं भणभणतंय नुसतं. चल, जरा चहा घेऊ त्या आजीबाईंकडे. त्यांच्याकडची फळं पण खूप छान असतात, एकदम ताजी." ऋजुता.

मागच्या वेळी रोहितच्या ऑफिसमधून घरी जाताना इथेच थांबून ऋजुता आणि विराजने चहा घेतला होता, कणीस आणि काही ताजी फळेही घेतली होती. ते ऋजुताला आठवले होते.

दोघीही गाडीतून उतरून आजीबाईंकडे गेल्या.

"आजी, कशा आहात? दोन कप मस्त चहा मिळेल का?" ऋजुता.

"म्या ब्येस हाय की ताई. तुम्हीबी चांगल्या हाय नव्हं?" आजी  चहा करायला घेत म्हणाल्या.

"अरे तुम्ही ओळखता एकमेकींना?" निकिता आश्चर्याने म्हणाली.

"मंग काय तर? अशा जोड्याला कोण इसरंल? महिना दीड महिना झाला असंल,  या ताई अन त्यांचे धनी आलते ना मागच्या खेपेला. चा घेतला. त्या बारीला कणीस बी व्हते माझ्याकडं. घरला बी नेलते त्यांनी." आजीबाईंनी निकिताला सांगितले.

"ताई, आज धनी न्हाई का आले तुमचे?" आजीबाई ऋजुताला विचारत होत्या .

"धनी?" निकिताने आश्चर्याने विचारले.

ऋजुताला वाटलं धनी म्हणजे मालक, मालक म्हणजे बॉस म्हणजेच धनी म्हणजे बॉस!

"अग विराजबद्दल म्हणत असतील त्या. आम्ही मागच्या वेळी इथे थांबलो होतो चहा घ्यायला." ऋजुता म्हणाली.

"अच्छा." निकिता.

"तुमाला सांगते ताई, यांच्या धन्याचं लय पिरेम यांच्यावर , लई जीव लावत्यात बगा या ताईसनी. म्या तर आशीर्वाद बी दिलता सायेबास्नी." आजीबाईनी काचेच्या ग्लासात चहा ओतून दोघींना दिला.

"खरं की काय?" निकिता आश्चर्याने म्हणाली आणि आनंदाने हसूही आलं तिच्या गालावर.

आता मात्र हसावं, की रडावं की लाजावं ऋजुताला कळत नव्हतं. गोरीमोरी झाली होती ती.

"तसं काही नाही हो आजी." ती खाली मान घालून म्हणाली तर खरी पण  तिच्या मनातल्या गोंधळात अजून भर टाकणाऱ्या विचारांचे थैमान मात्र सुरूच होते.

"न्हाई कसं, त्याशिवाय का येवढं टुकूरटुकूर बघतंय कोणी? म्या पाहिलंय नव्हं. हे केस असंच पांढरे झालेत काय? अनुभवी नजर असतीया आमची. अवो काही माणसं बोलत नसत्याती, पण त्याईच्या डोळ्यातून कळत असतंया. डोळं मनातलं सांगत असत्याती. ते आपण ओळखायचं असतंया." आजीबाई.

"होय हो आजी. बरोबर आहे तुमचं." निकिता ऋजुताकडे आणि आजीकडे बघत हसून तिला चिडवत म्हणाली आणि ऋजुताला अजूनच लाजल्यासारखे झाले.

"लाजत्यात बगा कशा या ताई " आजीबाई हसून निकिताला म्हणाल्या.

"बरं आज काय देऊ तुमास्नी? फळं बी हाईत चांगली. "

दोघींनी काही फळं घेतली पैसे देऊन आणि आजीबाईंचा निरोप घेऊन त्या पुढे निघाल्या.

गाडीत बसल्या बसल्या निकिता हसायला लागली.


क्रमश:

© स्वाती अमोल मुधोळकर.

कथेचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव. कसल्याही प्रकारची कॉपी खपवून घेतली जाणार नाही. साहित्यचोरी हा गुन्हा आहे. 

विराज आणि ऋजुता आजीबाईंकडे चहा प्यायला थांबले होते तेव्हा काय झाले होते? आजीबाईंनी असे का म्हटले? भाग 14 मध्ये याचा संदर्भ आहे. कोणी वाचलेला नसेल तर त्यांच्यासाठी लिंक देत आहे.

भाग 14 येथे वाचा.

कथेला देत असलेल्या प्रतिसादाबद्दल सर्व वाचकांना धन्यवाद. भाग आवडल्यास लाईक कमेंट करून नक्की कळवा.

🎭 Series Post

View all