दृष्टी आणि दृष्टिकोन - भाग 14

Drushti, Drishti, Drushtikon, sight, vision, perspective, Viraj, Rujuta, love, marathi, katha, kathamalika, blindness

मागील भागात ....

"म्हणजे , तुमच्यासारखे दिग्गज कधीपासून स्वतःला 'आम्हा पामरांच्या' पंक्तीत बसवायला लागले?", ऋजुता हसून विराजला म्हणाली.

आता विराजही हसण्यात सामील झाला.

"पण जोक्स अपार्ट विराज, आय एम सो हॅपी ! काहीतरी नवीन करायला मिळालं आज!  विराज, या वेळी मला सगळं हँडल करायला कसं काय सांगितलंस रे? म्हणजे नेहमी असे काम तू करतोस ना?", ऋजुता आनंदात होती.

"हं हो ना. दोन गोष्टी आहेत . एकतर आता तुला ते बघून , कशाप्रकारे करायचं ते माहिती झालं आहे . नवीन गोष्टी शिकून करण्याची तुझी क्षमता खूप छान आहे , त्यामुळे तुला एक चान्स द्यावा असं वाटलं. गरज पडलीच तर सावरायला आज मी होतोच ", विराज.

"आणि दुसरी ?", ऋजुताने उत्सुकतेने विचारलं.

"सध्या नाही सांगता येणार . काही दिवसांनी नक्की काय ते कळेल , तेव्हा सांगेन " , विराज.

"ओके, म्हणजे मला माहीत नसलेल्या आणखी काही गोष्टी आहेत तर....", ऋजुता हसून पण विचार करत म्हणाली.

"हं, तेच तर म्हणतो न तुला. बऱ्याच गोष्टी सुरू असतात ग ऑफिसमध्ये", विराज.

"हं", ऋजुता.

दोघांनीही खाऊन संपवले आणि बिल देऊन ते निघाले. जाताना वेटरसाठी एक नोट ठेवायला विराज विसरला नाही.

****

आता पुढे ...

दोघेही कारमध्ये बसून पुन्हा पुढच्या रस्त्याला लागले . हसत खेळत , बोलत बोलत मार्गक्रमण सुरू होते . इंडस्ट्रियल एरियाच्या बाहेर आल्यानंतर आता रस्त्याच्या दोन्ही बाजूंना झाडे, शेती वगैरे दिसत होते. नुकताच पाऊस पडून गेलेला दिसत होता. भुरभुर बारीक थेंबांचा पाऊस अजूनही सुरू होता. सूर्य अस्ताचलाला जाण्याच्या तयारीत होता.

तेवढ्यात ऋजुताला एका ठिकाणी झोपडीवजा खोपटासमोर टपरीसारख्या ठिकाणी एक म्हातारी बाई मक्याचे कणीस आणि काही फळे विकायला घेऊन बसलेली दिसली . ताजे ताजे मक्याचे कणीस बघून ऋजुताला वाटले की दोन चार कणीस घरी घेऊन जावेत सर्वांसाठी.

"विराज, थोडं थांबशील का इथे? मी त्या आजीबाईकडून कणीस घेऊन येते", ऋजुता.

"ओके", म्हणत विराज ने गाडी थांबवली.

ऋजुता उतरून आजीबाईंकडे गेली.

"आजी, त्यातले चार कणीस द्या ना एका पिशवीत", ऋजुता म्हणाली.

"व्हय, देते कि पोरी. लय कोवळी अन गोड आहेत बघ", आजी .

"देऊ का दोन कणीस भाजून ? हितंच गरमागरम खाऊन जावा. साहेबांस्नी बी बोलव. चहा बी देते करून छान गरमागरम. सारा शीण दूर होईल बघ", आजी.

ऋजुता विराजला विचारायला गाडीच्या दरवाजापाशी गेली.

"विराज येतोस का बाहेर ? ", ऋजुता.

"आज तर तुझा दिवस ना? मग ऐकावंच लागणार मला", विराज हसून म्हणाला.

"अरे, मक्याचे कणीस भाजून देत  आहेत आजी. म्हणून बोलवते आहे. ये ना, खाऊ आपण . गरमागरम चहा पण घेऊया". ऋजुता खिडकीतून म्हणाली.

"हो सांग त्यांना. आलोच मी", विराज.

"आजी, द्या भाजून दोन कणीस. अन चहा पण ठेवा दोन कप", ऋजुता आजीला म्हणाली.

आजी कणीस भाजेपर्यंत दोघे गप्पागोष्टी करत होते.

"विराज तूही घेऊन जा ना कणीस घरी . आवडत असतील ना तुझ्याकडेही?", ऋजुता.

"अं, हो", विराज. त्याने असं काही घरी नेलं नव्हतं आतापर्यंत. बाबा मात्र आणायचे अध्येमध्ये. आज नेऊ या , त्याने विचार केला.

"आजी , आणखी 4 कणीस द्या बांधून"

"व्हय देते हं ",आजी.

वातावरण खूप सुखद झाले होते. गार वारा सुटला होता. ऋजुता तर खूप आनंदात दिसत होती. वाऱ्यामुळे तिच्या केसांच्या बटा अध्येमध्ये चेहऱ्यावर, गालावर रुंजी घालत होत्या . केसांवर पडलेल्या बारीक-बारीक थेंबांना मावळत्या सूर्याची सोनेरी किरणे प्रकाशमान करीत होती. ते थेंब अगदी रत्ना प्रमाणे विलसत होते. त्यात गोऱ्यापान चेहऱ्यावरचे तिचे  मोहक हास्य ! जणू काही गुलाबाच्या पाकळ्या मधून मोती ओघळत असावे असे !

©
"तुझं अवतीभवती असणं
निष्पाप निरागस हसणं....
विसरावे भान, अन जगावं
तुला एकटक बघत राहणं....

तुझं अवतीभवती असणं....
ते स्वच्छंद निर्मळ हसणं....
मोत्यांच्या दाण्यांनी जणू
गुलाबी गुलाबातून ओघळणं ...

तुझ्या गालावरची लाली...
गुलाबाने उधार मागावी...
मोत्यांसम हसण्यात या...
सगळी चिंता मी विसरावी ...

विराज भान हरपून एकटक तिच्याकडे बघत होता.

"काय रे, काय बघतो आहेस इतका?", ऋजुताने त्याची निर्मळ पण एकटक बघणारी नजर हेरून विचारले. विराज गडबडला.

"अरेच्चा!  कविता केली की काय मी !? वा, वा !",  तिच्या मनमुराद हसण्याकडे बघत असलेला विराज स्वतःचेच आश्चर्य वाटून मनात म्हणाला.

तेवढ्यात आजींनी आवाज देऊन भाजलेले कणीस तिखट, मीठ, लिंबू लावून त्यांना दिले आणि आपसूकच विषय बदलून उत्तर देण्याचे टळल्यामुळे विराजला हायसे वाटले.

"हुश्श, वाचलो बुवा, नाहीतर पकडले गेलोच असतो आज तर", विराज मनात म्हणाला.

कणीस आणि चहा घेऊन झाल्यावर आजींना पैसे देऊन ऋजुता गाडीत जाऊन बसली. विराज  आणखी काही फळे घेत आजीशी असाच बोलत उभा होता.  आजी त्याला म्हणाल्या, "लई छान दिसतो बघा तुमचा जोडा. अक्षी लक्षुमीनारायणासारखा. लई जीव हाय ना तुझा तिच्यावर? खुश ऱ्हावा दोघेबी" .

विराज चमकला, पण मनातून सुखावलाही. काही न बोलता तो थोडंस गालात हसून मागे वळून गाडीकडे जायला निघाला.

"खरंच प्रेम करायला लागलोय का मी तिच्यावर? कविताही सुचली मला आज. वेड्यासारखा भान हरपून बघतच राहिलो मगाशी तिच्याकडे. कितीदा तरी मी हरवतो तिच्याच विचारांमध्ये.  रोज तिच्या येण्याची वाट बघतो ... ती नसली की करमत नाही मला... हं, मिस्टर विराज, आवरा स्वतःला जरा . नाहीतर काही खरं नाही तुमचं", विचार करतच विराज गाडीमध्ये बसला.

ऋजुता आधीच बसलेली होती . कणसाच्या पिशव्या तिने मागच्या सीटवर ठेवल्या होत्या. दोघेही निघाले. दहा पंधरा मिनिटात ऋजुताचे घर आले. तिला सोडून विराज निघणार तोच आईचा फोन आला.

"विराज , झाली का मीटिंग? कधी येतो आहेस?"
"हो, आई झाली . आता ऋजुताला सोडले. इकडेच एका ठिकाणी जायचे आहे , आठ साडेआठच्या सुमारास येईन घरी", विराज.

"ठीक आहे", आई.

इकडे ऋजुता घरी गेल्यावर तिचा मूड बघूनच आईला कळले की ऋजुताची मीटिंग चांगली झालीय.

" हं , छान झाली ना मीटिंग तुझी?", आई.

"हो ग, पण तुला कसं कळलं? मी तर काही सांगितलंच नाही अजून", ऋजुता.

"चेहराच सांगतोय की काम फत्ते करून आली आहे आमची राजकुमारी", सोफ्यावर बसलेले बाबा उठून समोर येत हसून म्हणाले.

"हो . सगळं नीट झालं तिथे, काही अडचण न येता. अरे, तुम्ही कधी आलात बाबा?", ऋजुता.

"अग मघाशी तुझ्याशी बोलले ना त्यानंतर  तासाभराने आलेत", आई.

"आई हे बघ मी काय आणलंय. खाऊन घ्या तुम्ही दोघे. मी आणते गरम करून", ऋजुता.

ऋजुताने दोघांना वडा सांबर दिलं आणि ते खाऊन होईपर्यंत कणीस भाजून घेऊन आली.

"अग हे कणीस कुठून आणलेस? कोवळे आणि गोड आहेत छान", आई.

"हो, ते येताना हे विकायला घेऊन बसलेल्या एक आजीबाई दिसल्या. मग घेतले त्यांच्याकडून".

"हं , अच्छा. बरं हे बघ मी काय म्हणते, आता हे खाऊन झाल्यामुळे फार भूक तर नाही आहे.  तू ही दमलेली आहेस ना? तर आता मसाला खिचडी लाव थोडीशी, की झालं ".

"बरं", ऋजुता.काही वेळाने विराजकडे, तो आल्यावर ...

"आई हे घे. काही फळं आणि मक्याचे कणीस आणले आहेत", विराज.

"अगबाई, छान आहेत. बरं तू ये फ्रेश होऊन पटकन जेवायला ", आई.

"दादा, ये दिमाग तुम्हारा नही है... बताओ , साथ में कौन था?", विधी त्याला चिडवत हसून म्हणाली.

"काय ग विधी, आल्या आल्या चिडवतेस त्याला? दमून आलाय ना तो? तू जा बरं विराज" , आई.

"हं , जा हं तू दादा. बाद मे तुम्हारी पूरी खबर लूंगी", विधी. शेवटचे वाक्य तिने आईला ऐकू जाणार नाही अशा आवाजात म्हटले. मात्र विराजला ऐकू गेलेच. तसे त्याने हसून तिच्याकडे बघितले आणि खोलीत गेला.


ऋजुताकडे रात्री...

सगळं आवरून झाल्यावर बिछान्यावर पडल्या पडल्या ऋजुताच्या डोळ्यासमोरून दिवसातल्या घडामोडी सरकल्या.

"खरंच छान होता ना आजचा दिवस... सकाळी घाईने आवरून गेले, घाईत बनवलेली भाजी सर्वांनी मिळून आवडीने फस्त केली. विराजनेसुद्धा घेतली आज तर.... त्यानंतर विराजने नवीन आव्हान समोर ठेवले.... प्रेझेंटेशन आणि डील दोन्ही छान झाले... समाधान वाटतंय ... किती आनंदात होता आज विराजसुद्धा ... 'आजचा दिवस तुझा' म्हणाला ... तो का माझ्यासाठी एवढा खूष झाला? ... मी पण इतकी आनंदित नक्की कशामुळे ? .... नवीन काम नीटपणे केल्यामुळे?.... की डील नीट झाल्यामुळे? .... की विराज खूष असल्यामुळे?", दमल्यामुळे विचार करता करता तिचा डोळा लागला आणि ती निद्राधीन झाली.


क्रमशः

© स्वाती अमोल मुधोळकर

कथेचे सर्वाधिकार लेखिकेकडे राखीव.

हा पार्ट कसा वाटला नक्की कळवा. कथेला देत असलेल्या प्रतिसादाबद्दल सर्वांना मनापासून धन्यवाद. स्वस्थ रहा , आनंदी रहा, वाचत रहा आणि असेच कळवत रहा. 

🎭 Series Post

View all