दृष्टी आणि दृष्टिकोन - भाग 47

Rajat gets a new partner. Who is he? A different story of Viraj, Rujuta and their vision and perspective.

मागील भागात ...

रजत आणि विधी फोनवर बोलत होते.

"अरे, इतकं काही ना काही चालू आहे ना की काही विचारू नकोस. दोन तीन टेस्ट्स होत्या, एकीकडे  सबमिशन्सपण चालू आहेत . दुसरीकडे प्लेसमेंटसाठी वेगवेगळ्या प्रॅक्टिस टेस्ट्स देताहेत ते चालू आहे आता. अन तर दादाची तयारीही सुरू होती. त्याचंही शॉपिंग, बॅग भरणं वगैरे काही न काही करायचं असायचं. त्यालाही अर्जंटली जावं लागलं ना त्यामुळे. त्यात तेव्हा आईलाही बरं वाटत नव्हतं. तिचीही नुसती धावपळ. अन मी मदतीला. फारच बिझी चालले आहेत रे गेले काही दिवस", विधी.

"ओह, मग तर तुम्ही आमच्यापेक्षाही बिझी झालात मॅडम", रजत हसून म्हणाला.

तेवढ्यात स्वयंपाकघरातून रजतला एका जणाने आवाज देऊन विचारले, "रजत, तेल कुठे आहे? अन मिरची आहे का?"

"वरच्या डावीकडच्या कपाटात बघ, तेलाची बाटली आहे तिथे. मिरच्या ओट्यावरच ताटलीत धुवून ठेवल्या आहेत. त्यातली घे", रजतने खोलीतूनच सांगितले.

"हो, सापडले", तिकडून आवाज आला.

"कोणी आलेलं असेल तर आपण नंतर कधी बोलू या. काय रे? कोणी आलंय का घरी? ", विधीने विचारले.

"अग बोल तू, पार्टनर आहे माझा. पोहे करतोय तो", रजतने सांगितले.


आता पुढे ...


"अरे वा, छानच मग. पण आधी तर कोणी नव्हतं ना?", विधी.

"अग हो न, दुसरी खोली रिकामीच होती ना गेले दोन-तीन महिने. आता तिथे तो राहील. बरं झालं तो आला आता. हा एवढा मोठा फ्लॅट आहे, मला एकट्याला कंटाळा यायचा ग कधी कधी. खूप दिवसांनी मला दुसऱ्या कोणीतरी बनवलेले खायला मिळणार आहे. ", रजत हसून म्हणाला.

"हो ना, चांगली सोबत होईल तुला आता. एकटं वाटणार नाही", विधी.

"अग म्हणून तर जसा आमच्या गृप मध्ये त्याचा मेसेज आला न तसं मी लगेच आमचे घरमालक
आहेत ना डिसूझा अंकल-आंटी त्यांना पाठवला", रजत सांगू लागला.

"तू कसं काय? कोणता गृप आहे तुमचा?"

"अग, इथे लंडनमध्ये राहणाऱ्या काही भारतीय लोकांचा एक गृप आहे. बरेच जण आहेत त्यात. काही मराठी-हिंदी भाषिकसुद्धा आहेत. तर तिथे एका जणाने एक मेसेज टाकला होता, की तीन महिन्यांसाठी अपार्टमेंट हवं आहे, शेअर्ड असेल तरी चालेल. मग काय, मी लगेच डिसूझा आंटीना तो मेसेज पाठवला . मग पुढचं त्यांनीच बघितलं आणि पाठवलं त्याला इथे."

"तीन महिन्यासाठी?", विधी काहीसा विचार करत म्हणाली.

"हो , तो तीन महिनेच राहणार आहे इथे. "

"कसा आहे तो? "

"चांगला आहे ग , आणि बोलतोही मराठीच . तू कशाला एवढी काळजी करते आहेस? "

"नाव काय आहे त्याचं? दादा..."

"अग दीक्षित म्हणून आहे. काल रात्री आला तो रहायला इथे.  त्याच्याकडे डिसूझा आंटीचा मेल बघितला आणि मग बाकी काही बघण्याची गरज नव्हती. लगेच घरात घेतलं त्याला. तोही थकलेला दिसत होता आणि मी अगदी झोपेतून उठून आलो होतो. अजून आमचं फारसं बोलणंही झालं नाही. आता तो म्हणाला, मी नाश्त्याला पोहे करतो, तू दुपारी लंचचं बघ. मला लंचमध्ये विशेष काही बनवता येत नाही म्हणाला. मग म्हटलं पोहे होईपर्यंत तुझ्याशी बोलणे तरी होईल माझे, म्हणून विचारलं तुला . आता पोहे खाताना बोलतो त्याच्याशी", आपल्याच नादात बोलत असलेल्या रजतने तिला सांगितले.

इकडे रजतच्या वाक्यागणिक विधीच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलत चालले होते. आधी दिसणाऱ्या आनंदाची जागा आता आश्चर्य, गोंधळ अन भीतीने घेतली होती.


इकडे रजतचा पार्टनर मोठ्या उत्साहात पोह्यांची तयारी करत होता. एकीकडे त्याने जरा मोठ्या आवाजात गाणे लावलेले होते. त्याच्याबरोबर गुणगुणत तो हाताने काम करत होता. " किती दिवस झाले त्या हॉटेलमध्ये ब्रेड अन पिझ्झा खाऊन कंटाळा आलाय. कधी एकदा आपलं भारतीय काहीतरी बनवून खातो असं झालंय. मस्त पोहे बनवतो आज."

एक पातेल्यात त्याने जवळपास पाऊण पातेलं भरून पाणी घेतलं. दोघांसाठी एकेक वाटी पोहे त्यात टाकले आणि पातेलं बाजूला ठेवून त्याने कढईत तेल तापायला ठेवले. लिंबू वगैरे चिरून घेतले.

फ्रीजमध्ये कोथिंबीर शोधली, पण सापडली नाही त्याला.
"हं, कोथिंबीर नसेल बहुतेक घरी. जाऊ दे", त्याने कोथिंबिरीचा नाद सोडला. "शेंगदाणे आहेत का? ", इकडे तिकडे बघितले तर समोरच एका काचेच्या बरणीत शेंगदाणे दिसले. त्याने त्यातले थोडे काढून घेतले.

"व्वा, मिरच्या किती सुंदर दिसताहेत, बारीक हिरव्यागार ! मस्त बारीक चिरून घेतो यांना . पिवळ्या पोह्यांमध्ये हिरव्यागार बारीक बारीक मस्त दिसतील. कोथिंबीर नही तो यही सही !", मिरची चिरून घेऊन त्याने कढईत फोडणी केली आणि पातेल्यातले पोहे उरल्यासुरल्या घोटभर पाण्यासहित त्यात ओतले. सगळं टाकून झालं.
रंगबिंग तर मस्त आला होता पोह्यांना.

"चलाs , झा s ले पोहे ! प्लेट्स कुठे आहेत? ", स्वतःशीच पुटपुटत त्याने दोन प्लेट्स काढल्या. त्यात पोहे वाढून घेतले.

"एक क्लिक तो बनता है , पहली बार पोहे बनाये हैं मैने. कलर तो देखो इनका! वाह!", स्वतःशीच खूष होत त्याने पोह्यांचा आणि पोह्यांसोबत स्वतःचा असे फोटो घेतले आणि दिले की हो लगोलग पाठवून.


इकडे रजत विधीला म्हणत होता, "बरं, ते जाऊ दे ना , पार्टनरचं काय घेऊन बसली आहेस गडे तू? इतक्या दिवसांनी आपण बोलतोय ना ? तुझ्याबद्दल बोल ना. काय म्हणत होतीस? दादाची शॉपिंग, बॅग भरणं वगैरे ? कुठे गेला तुझा दादा?".

"अरे आधी फोन ठेव तू, वाट लावशील नाही तर. मग सांगते तुला."  विधी पुरती गोंधळली होती. काय बोलत होती तिचं तिलाच कळत नव्हतं.

"अग काहीतरीच काय? फोन ठेवल्यावर कशी बोलणार तू?"

"अरे दादा...", विधी बोलतच होती की रजत लगेच म्हणाला,

"अग काय दादा दादा ? तुला बघतोय का तो? कुठेतरी गावाला गेलाय ना तो? तूच तर सांगत होतीस", रजतला काही कळेना.

तेवढ्यात तिकडून त्याला पार्टनरने आवाज दिला,
"रजत, चल लवकर गरमागरम ब्रेकफास्ट तयार आहे".

"ए , बरं, चल आपण नंतर बोलू या थोडया वेळाने तुला जमत असेल तर , तो बोलावतोय आता ब्रेकफास्टला. सॉरी हं, बाय ", रजत. त्याने फोन ठेवला.

इकडे फोन ठेवल्या ठेवल्या विधी मेसेज मध्ये आलेले फोटो बघतच होती की तिच्या फोनवर विराजचा फोन आला.

"विधी आईला पण बोलव ना फोनवर", विराज.

"हो , मीच जातेय तिच्याकडे. ", विधी.
"हं , बोल. आई पण आहे आता ", तिने व्हिडिओ ऑन केला.

"हं , बोल विराज, काय करतोय? उपमा केला आहेस का खायला? तू पाठवलेले फोटोच पाहत होती मी आता", वीणाताई.

"उपमा? , काय ग आई तू! उपमा म्हणून माझ्या नाश्त्याची वाट लावतेस का तू?", विराज नाराज होत म्हणाला.

"अरे उपमाच तर दिसतोय फोटोमध्ये. मग उपम्याला उपम्याची उपमा नाही देणार तर कशाची?", वीणाताई हसून म्हणाल्या.

"हे काय आई , मी पहिल्यांदाच पोहे केलेत ना आणि तू हसते मला. जा मी नाही बोलणार", विराज लटक्या रागाने म्हणाला.

"अरे रुसलंय का माझं बाळ? हे पोहे आहेत का ? बरं कसे झालेत चवीला, खाल्लेस का?", वीणाताई हसू दाबत म्हणाल्या.

"नाही . खातोच आता, आधी तुला दाखवायला कॉल केला", विराज.

"तुझ्या पार्टनर ने खाल्ले का पोहे? ", विधीने गालात हसत विचारले.

"हे काय, खातोय तो पण", म्हणत विराजने दुरूनच फोन त्याच्याकडे वळवून दाखवले.

तो दिसताच विधीचे डोळे एकदम विस्फारले. विधीला आलेली शंका एकदम खरी होती. आता ती श्वास रोखून विराजच्या पार्टनरकडे म्हणजेच रजतकडे पाहत होती.

तेवढ्यात रजतने प्लेटमधून चमचाभर पोह्यांचा पहिलाच घास खाल्ला अन खाल्ल्याबरोबर त्याचा चेहरा कसनुसा झाला . तो इकडे तिकडे बघू लागला. त्याचा चेहरा बघूनच विधीला कळले की काहीतरी गडबड आहे पोह्यांमध्ये. अन इकडे विधीची हसता हसता पुरेवाट झाली. कुठे रजत इतका खूष होता की छान आयते पोहे खायला मिळतील आणि आता त्याचा असा कसनुसा चेहरा !


विराजने फोन स्वतःकडे वळवला .
"तू कशाला एवढी हसतेय ग नकटू? ", म्हणत त्याने एक चमचा पोहे खाल्ले आणि लगेच त्याला कळले की पोह्यांमध्ये मीठ इतके कमी झालेय की टाकलंय की नाही असे वाटावे, अन खरंच हे तर पोहे वाटतच नाही आहेत. खूपच नरम म्हणजे उपम्यासारखेच लागताहेत. आणि याउपर ते एवढे तिखट झाले होते की खाता खाता त्याचं नाक लाल झालं , डोळ्यातून पाणी येऊ लागलं.

वीणाताई त्याला बघत होत्या. "अरे , काय झालं? तिखट झालेत का पोहे ? किती मिरच्या टाकल्यास दोघांच्या पोह्यांमध्ये?"

पाणी पीत पीत विराज म्हणाला, " दहा-बारा टाकल्या होत्या. छान गर्द हिरव्या बारीक बारीक मिरच्या होत्या. कोथिंबीर नव्हती , मग याच मध्येमध्ये आल्या तर हिरव्या बारीक बारीक मस्त दिसतील म्हणून अगदी कोथिंबिरीसारख्या बारीक चिरून घातल्या ...".

"काय? अरे या मिरच्या जास्त तिखट असतात. एवढया मिरच्या इतक्याशा पोह्यांना? अन तेही मस्त दिसतील म्हणून? ", विणाताईंनी डोक्याला हात लावला.

विराजचा चेहरा एवढासा झाला होता.

"तू एखादा व्हिडिओ बघून नाही केले का पोहे?", विधीने विचारलं.

"नाही ना, पद्धत माहीत होती न मला, आधी पोहे भिजवायचे, मग फोडणी करायची अन त्यात टाकायचे , म्हणून उत्साहात स्वतःच बनवले", विराज.

"हं, फुल कॉन्फिडन्स ! नाही का?", विधी हसत म्हणाली. "पाणी किती टाकलंस पोहे भिजवताना?"

"अग, एका मोठ्या पातेल्यात पाऊण पातेलं भरेल एवढं पाणी घेतलं अन त्यात टाकले पोहे. मग बाकीची तयारी केल्यावर बघितलं तर सगळं पाणी गायब झालं होतं. फक्त घोटभरच शिल्लक होतं , तेवढंच टाकलं पोह्यांसोबत मग. जास्त नाही टाकलं", विराज सांगत होता.

"हो का, जास्त नाही टाकलं का तू? म्हणूनच उपमा झाला का तो? ", विधी पोट धरून हसत होती.

"आई सांग ना ग हिला, बघ न किती त्रास देते मला इकडे आलो तरी. तू थांब बेटा, तुला ना, आल्यावर बघतोच मी" , विराज .

विधीने त्याला वाकुल्या दाखवल्या.

"आई, सॉरी ग, मी एकदा तुला नुसतं मीठ थोडंसं कमी झालं होतं तर किती ओरडलो होतो. हे पोहे करतानासुद्धा किती गोष्टी , प्रमाण बघावं लागतं ना. आज कळलं मला. अन मीठ जास्त झालं तर वाया जाण्यापेक्षा कमी झालं तर त्यात मिसळता येतं. थोडंफार काही कमी-जास्त झालं तर करणाऱ्याला तेवढ्यावरून ओरडण्याची , त्याचा एवढा इश्यू करायची गरज नसते , हे पण कळलं. खरंच सॉरी".

त्याने कान पकडलेला दिसताच वीणाताई म्हणाल्या, "हो बेटा, 'जावे त्याच्या वंशा, तेव्हा कळे' असं असतंच. बरं, आता ठीक आहे. मी काही एवढं लक्षात ठेवत बसत नाही ते. जाऊ दे. आता तिखट होतंय न, तर तू असं कर, लाडू घे गोड बरोबर आणि थोडेफार जमतील तेवढे खा पोहे".

"हो, असंच करतो ".

"हं, ठेव तू फोन आता अन शांतपणे खाऊन घे. मग बोलू", वीणाताई.


तिकडे रजतनेही पाणी पीत पीत थोडेसे पोहे खाल्ले . नंतर त्यालाही खाल्ल्या जाईना. तो प्लेट हातात घेऊन तसाच बसला होता. विराजच्या फोनवर विधीसारखाच हसण्याचा, बोलण्याचा आवाज थोडाफार ऐकू येऊन तो गोंधळात पडला होता.

"थांब, थांब पार्टनर सॉरी हं, एक मिनिट", विराज.

विराज आत जाऊन बॅगमधून लाडूंचा डबा घेऊन आला.

त्यातला लाडू रजतला दिला आणि स्वतःही घेतला.

रजतने लाडूचा एक घास घेतला. मात्र लगेच ...


क्रमशः

© स्वाती अमोल मुधोळकर

कथेच्या प्रकाशन, वितरणाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव. साहित्यचोरी हा गुन्हा आहे.

हा भाग कसा वाटला? वाचताना थोडेफार हसायला आले का, मजा वाटली का? अभिप्राय नक्की कळवा.

'दिल्या घेतल्या वचनांची' ही माझी उत्कट प्रेमाची एक लघुकथाही नक्की वाचा.
https://www.irablogging.com/blog/dilya-ghetalya-vachananchi_10126

🎭 Series Post

View all