दिल्या घेतल्या वचनांची... (लघुकथा)

Utkat premachi ek laghu katha. A story of pure love.तीच संध्याकाळची कातर वेळ. तेच ठिकाण. तो सागरकिनारी बसला होता. सहस्ररश्मीने आपला दिवसभराचा प्रवास संपल्याचे जाहीर करत क्षितिजावर मुक्तहस्ताने केशरी नारिंगी रंगांची उधळण केली होती. निळ्या केशरी रंगांच्या विविध छटांनी आकाशपटल सजले होते. त्याचे प्रतिबिंब सागरात उमटले होते. पक्षी घरट्याच्या ओढीने निघाले होते.

त्याला मात्र या कोणत्याही गोष्टीचं सोयरंसुतक नव्हतं. त्याच्या मन:पटलावर तिच्या आठवणींची दाटी झाली होती, आणि डोळ्यांत अश्रूंची. जसजसे सागराला भरते येत होते तसतसे त्यालाही अश्रूंचे कढ थोपवणे अशक्य होत होते. गेले काही दिवस तिची प्रकर्षाने येणारी आठवण आजही त्याला सतावत होती. शेवटी आज तो या ठिकाणी आला होता. इथेच तिची शेवटची भेट झाली होती, चाळीस वर्षांपूर्वी. आजही ती भेट जशीच्या तशी त्याला आठवत होती.

"अनु, रडू नकोस ना रे", त्याचे डोळे पुसत ती म्हणत होती.

"मला माहिती होतं ग मनू, हेच होणार ते. बाबांनी नकार दिला आपल्या लग्नाला. मी त्यांना आपल्याबद्दल सांगताच जोराचा धक्का बसला त्यांना अन आजारी पडलेत ते. अन त्यांना असं बघून आईनेही शपथ घातली मला, की काहीही झाले तरी तू आपल्या जातीबाहेर लग्न करायचे नाहीस. समाजात मान आहे तुझ्या बाबांचा. त्यांची मान खाली जाईल असे काहीही करू नकोस. मनू, दोघेही पुराणमतवादी आहेत ग . त्यांचे मन वळवणे शक्य नाही. म्हणूनच मी आधीपासूनच तुझ्याकडे स्वतःचं मन व्यक्त करायला धजावत नव्हतो. ", तो डोळ्यातून घळघळ वाहणाऱ्या अश्रूंना थांबवू शकत नव्हता.

तिच्याही डोळ्यांत अश्रूंची गर्दी झाली होती. काहीसं थांबून ती म्हणाली, "अरे बाप रे, इतकं सगळं झालं? पण अनु, तुला सांगू, तू बोलत नव्हतास पण तुझे डोळे मात्र तुझ्याशी फितूर झाले होते. तुझ्या डोळ्यांना नाही थांबवू शकलास तू . त्यांनी एकूणएक भावना पोचती केली होती माझ्यापर्यंत. त्या दिवशी मला कॉलेजमध्ये प्रॅक्टिकल करताना उपवासामुळे आलेल्या अशक्तपणामुळे चक्कर आली. तोल जाऊन खाली पडतच होते की धावत येऊन तू वाचवलेस मला. लगेच तोंडावर पाणी शिंपडून डॉक्टरकडे नेलेस . त्या वेळी तुझ्या डोळ्यात जी प्रेमळ काळजी, आपुलकी, अधीरता, निर्मळता दिसली ना, तिनेच सांगितले मला सर्व काही. आणि डोळे मिटता मिटता त्या अवस्थेतही तुझा तो स्पर्श किती आश्वासक होता हे जाणवले मला. एक विश्वास होता त्यामध्ये. काळजी होती. मला काही होऊ न देण्याची हुरहूर होती. त्या क्षणी तुझ्या मनाचा सच्चेपणा, सौंदर्य जाणवले मला आणि नकळतच माझ्या मनाने ग्वाही दिली. माझ्या मनातला आणि स्वप्नातला राजकुमार तो हाच , हे जाणवले . पण आमच्याही घरी काही फार वेगळे नाही रे . तेसुद्धा तयार नाहीत. "

"त्या दिवशी सकाळपासूनच तुझा चेहरा थोडा उतरलेला दिसत होता. मग काय, एकीकडे प्रॅक्टिकल करता करता लक्ष होतं माझं तुझ्याकडेही . अन बहुधा त्या तिथल्या वासाने तुला आणखी गरगरल्यासारखं झालं असावं. किती घाबरलो होतो मी तेव्हा. असं वाटत होतं, काय करू अन काय नाही. कसे तुला शुद्धीवर आणू? काय झाले असेल तुला? डॉक्टरांनी जेव्हा सांगितलं, अशक्तपणामुळे झालंय. काही ज्यूस वगैरे द्या आणि काही खाल्ले की ठीक होतील त्या , तेव्हा कुठे जीवात जीव आला होता माझ्या. "

"अन लगेच धावत जाऊन ज्यूस आणि खायला घेऊन आला होतास. खरच किती प्रेम करतोस ना माझ्यावर!"

"हो ग, माझा श्वास आहेस तू, तुला थोडेही काही झाले तर सहन करू शकत नाही मी. जेवढा तुझ्यावर जीव, तेवढाच  आईवडिलांवरही आहे ग. त्यांनीही खूप कष्ट घेतलेत ग मला वाढवताना, शिकवताना. त्यांच्या विरोधात जाऊन मी कसं त्यांना दुखवू ? मनू सांग ना ग , काय करायचं आपण ? काय करू मी?", केविलवाणा प्रश्न त्याने विचारला.

"एकच करू शकतो आता, तुझ्या आईने जे म्हटलंय तसंच कर. आपले प्रेम पवित्र आहे ना, त्याला कसलंही गालबोट लागलेलं मला नाही आवडणार. ते तसंच मनाच्या एका कोपऱ्यात सार आणि तयार हो पुढच्या आयुष्याला सामोरे जायला. "

"इतकं सोपं आहे का ग ते?"

"सोपं तर नाहीच आहे. पण जमेल तुला. मी पाठीशी असेन तुझ्या. फक्त भेटणार नाही कधीच तुला, एवढंच. मी तुझ्या आयुष्यात अजिबात ढवळाढवळ करणार नाही. वचन देते मी तुला. आजची भेट ही आपली शेवटची भेट ", स्वतःचं मन घट्ट करून  त्याच्याकडे भरल्या डोळ्यांनी बघत मनू त्याला म्हणत होती.

तो तर हे ऐकूनच कासावीस झाला होता.

"काय बोलतेस तू हे? "

"दुसरा काही उपाय नाही आता. तुझ्या आयुष्यात खूप सुखी रहा, आनंदी रहा, माझं प्रेम ही नेहमी तुझी ताकद असू दे , दुर्बलता नव्हे. आईवडिलांचे स्वप्न पूर्ण कर. जरी तुला बाबांचा व्यवसाय पुढे चालवायचा आहे तरी, त्यातही स्वतःचं विश्व निर्माण कर. स्वतःच्या स्वप्नांना आकार दे, कष्ट कर, मग यश तुझंच आहे.  तुझ्यावर माझं किंवा माझ्या प्रेमाचं कसलंही बंधन नाही. आनंदाने, मुक्तपणे आणि सन्मानाने जीवन जग. कधीही चुकीच्या वाटेला जाऊ नकोस. एखादी चुकीची गोष्ट जर करावीशी वाटली ना तर आधी मला आठवून बघ. तसे केले तर मला आवडेल का, असा विचार कर. तुला उत्तर मिळेल. अशा कुठल्याही गोष्टीमुळे तुझी किंवा पर्यायाने माझ्या  प्रेमाची प्रतिमा डागाळलेली मला चालणार नाही. ते नेहमी आतासारखेच निरतिशय सुंदर, पवित्र, निरागस राहायला हवे",  मनू त्याला समजावून सांगत होती.

"अन तू? तू काय करशील? नीट राहशील ना तू?", अनु.

"मीही जगेन, आनंदाने, सन्मानाने. जे तुला लागू आहे तेच मलाही आहे ना? प्रेमाची एक मोरपिसासारखी नाजूक, सुंदर आठवण हृदयाच्या कप्प्यात ठेवून, आयुष्यभर आनंदाने जगेन. विरह असला तरी तुझं प्रेम तर आहेच माझ्यावर. ", मनू.

"नक्की ? वचन दे मला , की तू स्वतःला सांभाळशील, नीट, आनंदाने राहशील, स्वतःची काळजी घेशील", अनु.

"हो नक्की. अन आणखी फक्त एकच देशील मला?", ती.

त्याच्या प्रश्नार्थक चेहऱ्याकडे बघून ती म्हणाली,
"शक्य झालं तर माझ्या आयुष्याच्या संध्याकाळी फक्त एकदा थोडावेळ भेटशील मला? मी हाक दिली की येशील?".

"असं नको ना ग बोलूस", तो.

"सांग ना , येशील?", तिने अधीरतेने विचारले.

"तुझ्यासाठी काहीही करेन ग मी. मी वचन देतो तुला. तू सांगितलेल्या मार्गानेच जाईन, तसंच मी वागेन आयुष्यभर. तुझ्या आणि माझ्या प्रेमाचे पावित्र्य मी जपेन. मी असलो तर मी नक्की येऊन भेटेन तुला", तो तिचा हात हातात घेऊन तिच्या भरलेल्या डोळ्यात बघत म्हणाला.

"त्याच आशेवर जगेन मी. आयुष्यभर", ती. तिच्या डोळ्यांतल्या अश्रूंना ती थोपवू तर शकत नव्हती पण तिच्या चेहऱ्यावर त्याने दिलेल्या होकारामुळे एक समाधानाची , आणि स्वतःच्या निश्चयाची चमकसुद्धा होती.

आपले थरथरते ओठ तिच्या कपाळावर अलगद टेकवून तो म्हणाला, "प्लीज, मला माफ करशील ना मनू? रागावू नकोस ग माझ्यावर. खरंच माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर."

"मला माहिती आहे रे अनु ते. प्रेम म्हणजे काय? फक्त शारीरिक रित्या सोबत असणं म्हणजे प्रेम नाही. प्रेमाचा अर्थ खूप व्यापक आहे. एकमेकांविषयी ओढ असणं, एकमेकांना आहे त्या परिस्थितीत साथ देणं, एकमेकांचा आधार, ताकद बनून राहणं म्हणजे प्रेम. बरोबर ना? मग या परिस्थितीत साथ द्यायला हवीच ना मी तुला? मग माफ करण्याचा प्रश्न येतोच कुठे? मुळात माझ्या मनात तुझ्याबद्दल कोणतीही अढी राहणारच नाही . कारण दोष तुझा किंवा माझा नाहीच ना. आपल्याला शक्य होते तेवढे प्रयत्न तर आपण केलेच. त्यापुढे या परिस्थितीत न तू काही करू शकतोस न मी. त्यामुळे ते मनातून काढून टाक नि स्वच्छ मनाने भविष्याला सामोरे जा."

"हं."तो. काही वेळ तो तसाच गप्प होता. तिचे शब्द मनात साठवत होता. काही वेळाने तो म्हणाला,

"सुंदर दिसतेस मनू".

"चल, वेडा कुठला. सौंदर्य तर तुझ्या दृष्टीत आहे", तिच्या डोळ्यात पाणी, गालावर गुलाब आणि ओठावर किंचित हसू, असे सगळे एकत्रच त्याला दिसत होते.


भूतकाळातील हे सगळे त्याच्या डोळ्यासमोरून जात होते. डोळ्यातले अश्रू भावनांना वाट मोकळी करून देत होते. तेवढ्यात त्याच्या फोनची रिंग वाजली आणि त्याची तंद्री भंगली. डोळे पुसताना काढलेला चष्मा पुन्हा डोळ्यावर चढवून त्याने बघितले कोणाचा फोन आहे?

"मनस्विनी कॉलिंग"

वाचून एकदम काळजात धस्स झालं त्याच्या. "मनूचा फोन? ती ठीक तर असेल ना?"

धडधडत्या अंतःकरणाने चाचपडतच त्याने फोन घेतला.

"हॅ ... हॅ... हॅलो मनू? तू... तू कशी आहेस ग?"

"अ... अनुराग , अनु, येतोयस ना भे... भेटायला? आठवतं ना? वेळ आलीय , ल... लवकर ये", फिक्कटसं हसून ती अडखळत म्हणाली. कित्ती वर्षांनी आज त्याचा आवाज ती प्रत्यक्ष  ऐकत होती.

"मी ... मी  आलोच , आत्ता लगेच निघतो. क... कुठे आहेस तू? ", तो म्हणाला. त्याला काही सुचत नव्हते. तिच्या आवाजातील अशक्तपणा आणि कंपने जाणवत होती त्याला.

"तू आत्ता जिथे आहेस ना तिथून पंधरा मिनिटांच्या अंतरावर. स्वप्ननगरी सोसायटी, 201", ती.

"तुला कसे ग माहिती, मी कुठे आहे ते?", तो आश्चर्याने बावचळून म्हणाला.

"वेड्या, ती जागा तू विसरला नाहीस , मग मी ... कशी विसरेन? समुद्रकिनारी आपण शेवटचं भेटलो होतो ... तिथेच आहेस ना तू आता? आवाज ओळखते मी तिथला. नेहमीच तर जायचे मी तिथे. "

"मी आलोच, आलोच मी", त्याला शक्य तेवढ्या वेगाने तो उठून त्याच्या गाडीकडे झेपावला.

"ये तू, बाय", ती.

बोलेपर्यंत तो गाडीत बसलाही होता. गाडी वेगाने दामटवत तो निघाला. विचारशृंखला सुरूच होती. "मनू... तिला माहिती असेल का माझ्याबद्दल? कशी असेल ती? तिने म्हटल्याप्रमाणे तशी वेळ ... ? नाही, नाही." , त्याने विचार झटकून टाकला . "मी काही नाही होऊ देणार तिला. मला बोलायचंय तिच्याशी. खूप बोलायचंय. मनू मी आलो ग, जाऊ नकोस कुठेच आता. प्लीज", आताही गाडी चालवताना त्याचे डोळे झरत होते.

पंधरा मिनीटांचं अंतर नऊ दहा मिनिटातच पार करून तो एकदाचा तिच्याकडे पोचला. बेल वाजवली. एका दुसऱ्याच स्त्रीने दरवाजा उघडला.

"मनस्विनी मॅडम?", तो म्हणाला.

"हो , मी इथे काम करते. मॅडम आत आहेत, या इकडे", तिने त्याला एका खोलीत नेले. त्याला बसायला खुर्ची दिली आणि पाणी आणून दिले.

"कमला, शिरा कर आणि चहाही ठेव साहेबांसाठी", मनूने सांगितले.

कमला स्वयंपाकघरात जाऊन त्या तयारीला लागली .

"या या, अनुराग साहेब, गरीबाघरी तुमचे स्वागत आहे. मोठे उद्योगपती झालात तुम्ही आता", बिछान्यावर झोपलेली, कृश झालेली मनू उठून बसण्याचा प्रयत्न करत किंचित हसून म्हणाली. परंतु तेवढ्यानेही तिला धाप लागली. त्याला आलेले बघून तिचा चेहरा उजळला होता.

त्याने तिला पाठीमागे उशी लावून आधार दिला. "अजूनही तुला आठवतं, मला शिरा आवडतो ते? मी कसाही असलो ना तरी अनूच आहे तुझ्यासाठी अजूनही.  झोपून रहा ना , कशाला उठतेय? किती अशक्त झाली आहेस? तब्येत बरी नाही का?", अनु काळजीने विचारत होता.

"हं, सांगितलं न तुला... बहुधा वेळ आली असावी. एकदा ... तुला भेटण्याची इच्छा होती. म्हणून ...", मनू.

"गप्प रहा तू. काहीही होणार नाही तुला, मी आलोय ना आता. काही नाही होऊ देणार तुला. तो बाजूला बसून तिचा हात हातात घेत म्हणाला. काय होतंय तुला ? सांग . मी डॉक्टरकडे घेऊन जाईन . आपण इलाज करू ना", तो केविलवाणा होत होता.

" कालच मी ... डॉक्टरांशी भांडून ... डिस्चार्ज घेऊन घरी आले. तुला भेटण्यासाठी", मनू.

"काय ? असं का केलंस तू मनू?", तो काळजीने म्हणाला.

"असं वाटलं होतं... येशील की नाही. खूप मोठा झालायस... आता. पण तरी कुठेतरी आत... एक विश्वास होता... माझ्या प्रेमावर. माझा इलाज... माझ्या जवळ आलाय. बस ... काही नको... आता मला. खरच", मनू. तिच्या फिकटलेल्या चेहऱ्यावर काहीसे समाधान दिसत होते.

" मनू, तू असं नको ना बोलूस, तू आहेस तर मी आहे ग. कसं तुला सांगू? पण मला सांग, तुला माझा नंबर कुठून मिळाला ग? ", अनु.


"तू सुरू केलेल्या वृद्धाश्रमातून . काही महिन्यांपूर्वी घेतला होता. मी सारखी आजारी पडायला लागले तेव्हा", ती.

"पण तुला... कसं माहिती , माझा... फोन आलाय?", ती.


"एकतर तुझा आवाज , तो मी विसरणं शक्यच नाही. तेव्हाही मी तुझ्या आवाजावरून ओळखायचो की तू कशी आहेस. दुसरं, खूप आठवण यायची गेली काही वर्षे . मग तू ज्या शाळेत शिकवायचीस त्या शाळेतून तुझा नंबर मिळविला. मुख्याध्यापिका म्हणून निवृत्त झालीस ना तिथून. ज्ञानदानाचं महान कार्य केलंस तू. राज्यपुरस्कार मिळून तुझा सत्कार झाला तेव्हाही मी आलो होतो , दुरून बघितले तुला. तुझ्या विद्यार्थ्यांचे मनोगत ऐकले. खूप आदर आणि सन्मान देतात तुला तुझे विद्यार्थी. लाडकी शिक्षिका आहेस त्यांची. सगळं बघून खूप छान वाटलं . ऊर अभिमानाने भरून आला . पण तुझी भेट न होताच कामामुळे परत जावं लागलं मला."

"काय? तू आला होतास त्या कार्यक्रमाला? खरं सांगायचं तर मला खूप आठवण येत होती रे त्या दिवशी तुझी. जवळचं माणूस हवं असतं ना यशाचा आनंद वाटून घ्यायला. असं वाटलं होतं , तू असतास तर किती आनंद झाला असता तुला! आणि तू खरंच होतास! विश्वासच बसत नाही माझा तर ! ", एकाच वेळी समाधान , आनंद, चुटपूट आणि हुरहूर सगळे दाटून आले आणि तिचे डोळे वाहू लागले.

"मनू, तुझ्यासाठी इतका महत्वाचा क्षण होता. मी असा कसा निसटू देणार होतो? तुझ्या नकळत का होईना मी डोळ्यात साठवला तो. मनू, सगळं आयुष्य मी तुझ्या सांगण्यानुसार जगलो. माझ्यासाठी माझी मैत्रीण, तत्वज्ञ, मार्गदर्शक सगळं काही तूच तर होतीस. प्रत्येक वेळी काहीही नवीन करताना विचार करायचो, हे केलं तर मनूला कसं वाटेल? किती आनंद होईल तिला! तिचा अनु तिने दाखवलेल्या मार्गावरून चालतोय हे बघताना किती छान वाटेल तिला! नेहमी असं वाटायचं मला. तुला दिलेलं प्रत्येक वचन पाळतो मी. ", अनु.

"यापुढेही असाच आनंदात रहा. मलाही तुला... एकदा डोळे भरून पाहायचं होतं...  सांगायचं होतं की... मीसुद्धा तुला दिलेले वचन पूर्णपणे पाळलेय. तू आलास, आपले खरे प्रेम... पूर्णत्वास गेले. आता मला ... शांत झोपायचंय ... ", तिला आता बोलता बोलता खूप धाप लागली होती.

त्याने तिचा हात घट्ट धरला, तिच्या डोक्यावरून हात फिरवला. 

"सुंदर दिसतेस मनू", तो.

"चल, वेडा कुठला. अजूनही तसाच आहेस. ", ती. तशातही लाजली होती ती! "म्हातारे झालोय आपण आता."

"हो ग, पण तुझं सात्त्विक सौंदर्य अजून वाढलंय", तो डोळे भरून बघत म्हणाला. "ते तुला नाही कळणार. "

"हो ना, त्यासाठी तुझीच नजर हवी ना?", ती किंचित हसून म्हणाली.

"मनू... तू आता आराम कर, दमली आहेस . हे घे , थोडं पाणी पी. मी आहे इथेच", बाजूला टेबलावर ठेवलेला पेला तिच्या ओठांना लावत तो म्हणाला .

"आहेस ना? आता कुठे जाऊ नकोस अनु", मनू.

"नाही ग, नाही जाणार", अनु अश्रूंना डोळ्यांत रोखत, तिला झोपवत, कसेबसे म्हणाला.

"ओम्", ती.

आणि तिने समाधानाने डोळे मिटले ...ते कायमचेच!समाप्त


© स्वाती अमोल मुधोळकर

कथेचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव. साहित्यचोरी हा गुन्हा आहे.

कथा काल्पनिक आहे. परंतु त्यात खरे प्रेम हे कसे असावे हे दर्शविण्याचा प्रयत्न केला आहे. खरे प्रेम हे मनाला आधार , ताकद देते. कोणीतरी आपल्यासाठी आनंदी होणारे आहे, ही भावनाच आयुष्यभर उत्तम रीतीने जगण्यास साहाय्य करते. खरे प्रेम माणसाला कोणत्याही प्रकारच्या विकृतींपासून दूर ठेवते. जोडीदाराच्या आनंदातच आनंद असतो; त्यामुळे जोडीदाराला बंधनात न ठेवता आनंदाने आणि मुक्तपणे जगण्याची मुभा खरे प्रेम देते. जोडीदारही विश्वासाला पात्र ठरून प्रेम निभावतो.

असे असेल तरच ते प्रेम खरे म्हणता येईल, नाही का?

तर कशी वाटली ही कथा? कंमेंट करून अवश्य कळवा.