दृष्टी आणि दृष्टिकोन - भाग 46

An interesting story of Viraj and Rujuta, their vision and perspective.

मागील भागात ...
https://www.irablogging.com/blog/drushti-ani-drushtikon---bhag-45_9853

विराजने सेशन सुरू केले. माहिती देणे, प्रश्न, उत्तरे, अडचणी सोडवणे इत्यादी सगळे झाले . सेशन संपले. विराज शांत झाला. ऋजुता कडे बघत काहीसं विचारात हरवला. "आता यानंतर कधी बोलणे होईल कुणास ठाऊक", तो विचार करत होता.

"ए , काय झालं? कुठे हरवलास?", ऋजुता.

"काही नाही ग. काही सांगायचं राहिले का, हा विचार करत होतो", विराज.

"हं, आठवलं तर सांग नंतर. तुला उशीर होईल ना आता", ऋजुता म्हणाली. पण का कोणास ठाऊक, आज त्यालाही निघावेसे वाटत नव्हते आणि ऋजुताचीही कॉल संपवण्याची इच्छा होत नव्हती . असे वाटत होते, हे सेशन अजून काही वेळ चालावे. शेवटचे सेशन आणि उद्यापासून विराज असा बोलणार नाही की दिसणारही नाही याची तिला हुरहुर वाटत होती. त्या दिवशी विराज पुण्याहून लंडनला जाताना जसं तिचं स्वतःचं काहीतरी हातातून निसटून जातंय असं वाटत होतं ना, तसंच आज पुन्हा एकदा वाटत होतं. एखाद्या अथांग डोहासारखे त्याचे डोळे आज आणखी काहीतरी बोलताहेत असं तिला वाटत होतं. काहीतरी आहे त्याच्या डोळ्यांमध्ये, खोलवर.  आज मध्ये मध्ये तो स्वतःच्या विचारातच हरवतोय हेही तिला जाणवलं होतं. या काही दिवसात त्यांच्यामधले बंध आणखी घट्ट झाले होते का?


आता पुढे ...


"काय रे, निघायचंय ना तुला?", विराजला तसेच बसून एकटक तिच्याकडेच बघत असलेले पाहून ऋजुता म्हणाली.

"अं , नाही थोडं उशिरा निघतो. ब्रेकफास्ट नाही केला तर थोड्या वेळाने निघता येईल मला. ऑफिसमध्ये गेल्यावर मीटिंग वगैरे आटपल्यावर खाईन तिथेच काहीतरी. तू बोल ना. कुठे काही अडचण वगैरे असेल तर सांग."

"अरे हे काय, आधीच दोन तास झाले असतील तुला उठून. ऑफिसमध्ये जाऊन मीटिंग वगैरे आटपेपर्यंत आणखी दोन तास जातील ना. नाही. इतका वेळ कशाला उपाशी राहायचं? जा तू. पटकन नाश्ता करून घे . नको उगाच असं उपाशी राहायला.", ऋजुता.

"अग पण, चालतं ग", विराज.

"तुला चालत असेल, पण मला नाही चालणार", ऋजुता.

"का ?"

"का म्हणजे काय? नीट वेळेवर खात - जेवत जा. काळजी आहे तुझी", म्हणताना ऋजुताच्या नजरेत खरच काळजी दिसत होती विराजला.

"खरंच? माझी काळजी का आहे तुला? तुला काय फरक पडतो मी खाल्ले काय आणि नाही खाल्ले काय ? सांग बरं", विराज.

"ओह ! मी हे काय बोलले", मनात म्हणत ऋजुताने जीभ चावली.

"माहीत नाही " , ती म्हणाली. तिची नजर खाली झुकली होती. चेहऱ्यावर किंचित स्मितहास्य खुलले होते.

"तू s जाs ना आताs", ऋजुता जरा लाडिकपणे म्हणाली.

"कोणत्या हक्काने पिटाळते आहेस ग मला ?", विराज हसून म्हणाला.

" तू ना, खूप प्रश्न विचारतोस. जा आता." , ऋजुता गालात हसत असे म्हणाली तर खरं पण सोडवत मात्र तिलाही नव्हते.

ती किंचित लाजत होती आणि इकडे विराजचा जीव कासावीस होत होता. तिला असे किंचित लाजलेले बघून त्याचा पाय आणखीच निघत नव्हता. गालावरच्या नाजूक खळीत, अन त्या खळीच्या बाजूलाच खेळणाऱ्या केसांच्या  बटेत त्याचा जीव क्षणोक्षणी अडकत चालला होता . असेच एकटक बघत रहावे , हा क्षण कधी संपूच नये असे त्याला वाटत होते. काहीवेळ दोघेही एकमेकांच्या नजरेत बघत राहिले, काहीतरी शोधण्याच्या ओढीने, निःशब्दपणे.

तेवढ्यात ऋजुताच्या हातातला पेन निसटून टेबलावर पडला आणि त्याच्या आवाजाने इकडे विराज भानावर आला.

"ठीक आहे , मी जातोय खाली , पण तू माझ्या प्रश्नाचं उत्तर नक्की सांग हं मला", विराज हसत म्हणाला आणि ब्लेझर चढवून बाकीची तयारी करून तो निघाला.

कॉल बंद झाल्यावर ऋजुता खुर्चीला मागे टेकून, डोळे मिटून बसली होती. डोळ्यासमोर थोड्यावेळापूर्वीचा विराज तरळला अन तिच्या ओठांच्या कडा आपोआपच रुंदावल्या. "असा कसा आहे हा? म्हणे नाश्ता वगैरे राहू दे, आता असेच बोलू. पण खरंच मी कोणत्या हक्काने त्याला एवढं नाश्ता करायला जा म्हणत होते? तो उपाशी राहू नये, त्याला त्रास होऊ नये असं का वाटत होतं मला? मैत्रीच्या हक्काने असेल. दुसरं काय असणार? पण असे तर सगळेच मित्रमैत्रिणी आहेत इथे. मग एवढं काळजीने आग्रह करते का मी कधी कोणाला? ओह गॉड , गोंधळ आहे नुसता माझा. अन एक हा, एवढं सगळं नीट सांगितलं त्याने हॅन्डओव्हर देताना. मला पुढे कोणताही त्रास होऊ नये म्हणूनच ना. त्याच्याजागी कोणी दुसरं असतं तर कसातरी देऊन आपले काम संपवले असते. स्वतःलाच तर माझी किती काळजी आहे , आणि म्हणतो की तुला माझी काळजी का आहे?", स्वतःशी विचार करताना हसूच आले ऋजुताला.

"नेहमी ना , खूप काहीतरी असतं याच्या डोळ्यामध्ये. म्हणजे जेव्हा जेव्हा तो बघतो ना, तेव्हा तेव्हा जशी त्या नजरेतली निर्मळता, आपुलकी जाणवते तसंच काहीतरी खोलवर दडलेलं असल्यासारखंही जाणवतं. त्याचे डोळे बघण्यापेक्षाही काहीतरी बोलू पाहताहेत असं सारखं वाटत असतं. काय बरं असेल? कोडेच आहे एक. किती मिश्किल आणि अथांग आहे ह्याचा स्वभाव! अजून किती कंगोरे आहेत रे तुझ्या स्वभावाचे? जाणून घ्यायला चांगलंच खोलवर समजून घ्यावं लागेल ह्याला. अरेच्चा ! पण  मला का ह्याला इतकं जाणून, समजून घ्यावसं वाटतंय?", विचार करता करता ऋजुताच्या चेहऱ्यावर गोड हसू उमलले होते.

"झालं का तुझं सेशन? जायचं का आता जेवायला ? जाम भूक लागलीय", निकिता ऋजुताच्या केबिनमध्ये येत म्हणाली.

ऋजुता दचकलीच जरा, जणूकाही तिची चोरी पकडली गेलीय.

"काय गं, काय झालं असं दचकायला? किसके खयालों में खोये हुए हो ? हां? एsक मिनिट, कळतंय मला, तुझं सेशन होतं ना आत्ता? आणि त्यानंतर ही स्माईल . म्हणजे --- ", निकिता तिच्याकडे बघत, डोळे मिचकावत , चिडवत  म्हणाली. आज खूप हँडसम दिसत होते का ते?

"मॅडम, हे सर्वज्ञात आहे की आपण खूप हुशार आहात. पण आपले तोफगोळे जरा बाजूला ठेवा अन आपले डोके भलत्या ठिकाणी चालवू नका. किसीने सुन लिया तो शामत आ जायेगी. चला जाऊ जेवायला", हसून ऋजुता उठली अन स्वतःचा डबा घेत म्हणाली .

"अच्छा म्हणजे प्रॉब्लेम फक्त कोणी ऐकलं तsरच आहे.
तुला s  काही s  प्रॉब्लेम नाs ही", निकिता अजूनच खुलून चिडवत होती.

"गप्प ग तू, कशात काय अन फाटक्यात पाय", ऋजुता हसून म्हणाली.

"नाही ग, अजिबात फाटक्यात वगैरे नाही तुझा पाय. अगदी बरोबर जागी आहे", निकिता हसून म्हणाली.

"मॅडम , आता जेवायला चलण्याचे आपण काय घ्याल? आत्ता कोणाला तरी खूप भूक लागली होती ना?", ऋजुता.

"हो ना , भूक तर मलाच लागलीय, तुझे तर पोट भरलेच असेल बघून. ही ही ही", निकिता हसून म्हणाली.

आता मात्र ऋजुताने हलकेच एक चापट मारली तिच्या हातावर.

"येस्स, चिडली चिडली, ऋजुता चिडली. इसका मतलब दाल में कुछ काला है. हं देखना पडेगा, नही तो पता चला, यहां तो पूरी दाल ही काली है" , निकिता हात चोळत हसून म्हणाली.

"हो दाल ही काली है, पण ती डब्यामध्ये आहे. चल तुला देते खायला. आईने पोळीसोबत 'काली दाल'च दिली आहे आज. पोटभर खाऊन घे तू", ऋजुता हसत हसत म्हणाली आणि दोघी  हसतच कॅन्टीनमध्ये निघाल्या.


काही दिवसानंतर, रविवारी सकाळी रजतकडे,

रजत आपल्या खोलीत बसलेला होता आणि तो आणि विधी फोनवर बोलत होते.

"बऱ्याच दिवसांनी वेळ मिळाला मॅडमना. आजकाल काही आठवण येत नाही वाटतं आमची" , रजत हाताची घडी घालून फुरंगटून नाटकीपणे म्हणाला.

"नाही ना", विधी हसत म्हणाली. "कोणीतरी रुसलंय वाटतं आज".

"हो , रुसलोय मी. मी काही म्हणत नाही तर तू फायदा घेतेस न त्याचा. किती वाट बघायची मी? किती दिवस झाले फोन नाही, मेसेज नाही, एवढंच काय तर आठवणही येत नाही म्हणतेय. मग काय बोलायचं आता? ठेवतो मग फोन . बाय", रजत जरा राग आल्यासारखे दाखवत होता.

" ॲ हॅ, म्हणे बाय", विधी हसून त्याला वेडावत म्हणाली आणि तिने त्याच्याकडे डोळ्यांच्या कोपऱ्यातून एक मिश्किल कटाक्ष टाकला.  अन रजत झाला की हो तिथल्यातिथे खलास ! आपल्या डोळ्यांमध्ये असे काही गुंतवले रजतला की तो विसरूनच गेला की तो फोन ठेवायचा आहे असं म्हणालाय. दोन मिनिटे तर अशीच गेली असतील.

"सॉरी ना , झालंच नाही माझं", आता तिने क्यूटसा पपी फेस केला होता. "पण ऐकून तर घे ना आधी. मी काय म्हणतेय ते न ऐकताच रागावणं सुरू?"

"तू अशा आपल्या वेगवेगळ्या भावमुद्रा दाखवत राहशील तर मी कसा नाराज राहीन तुझ्यावर? तसं ही मी नाराज नव्हतोच मुळी. ते तर असेच तुला चिडवायला", रजत मनात म्हणत गालात हसत होता.

"मग आता 'म्हण ' ना, काय म्हणायचंय ते. मी तर वाटच बघतोय", रजत मिश्किलपणे म्हणाला.

"ए s, तसं नाही रे. जा बाबा, तू पण ना.", विधी लाजली होती.

"बरं, मग कसं, तूच सांग", रजतचे सगळे लक्ष तिच्या चेहऱ्यावरच्या भावमुद्रा टिपण्यात होते.

"अहा ! कित्ती सुंदर लाजते ही!", तो मनात विचार करत होता.

"म्हणजे ... ते..., आठवण येत नाही , कारण ..., ", विधी एकेका शब्दावर जोर देत थांबत थांबत बोलत होती.

"हं, कारण?", रजत गालावर एक बोट ठेवून उत्तराची वाट बघत होता. त्याच्या डोळ्यात उत्सुकता दिसत होती.

"कारण, जो नित्य मनातच असतो, त्याला आठवायचे कसे? आठवण्यासाठी आधी विसरावे तर लागेल ना?"

तिच्या उत्तरातले मर्म कळताच रजत खूष झाला. हसतच तो म्हणाला, "चतुर आहेस. म्हणूनच... ".

"म्हणूनच काय?"

"आवडतेस मला", रजत प्रेमाने म्हणाला आणि विधी गुलाबी गालात लाजली.


"पण खरं सांगू का, मी रुसलो नव्हतोच. फक्त बघत होतो की मी रुसलो तर तू कशी माझा रुसवा घालवशील ते", रजत.

"वा , हे तर छानच आहे हं ! आता पुढच्या वेळी मी पण आधी चेक करणार, नक्की रुसलाय की नाटक करतोय ते", विधी लटक्या रागाने म्हणाली.

"ही ही ही, ओके अलाउड आहे " , रजत हसत म्हणाला. "काय चाललंय ग तुझं एवढं इतक्यात?", त्याने विचारले.

"अरे, इतकं काही ना काही चालू आहे ना की काही विचारू नकोस. दोन तीन टेस्ट्स होत्या, एकीकडे  सबमिशन्सपण चालू आहेत . दुसरीकडे प्लेसमेंटसाठी वेगवेगळ्या प्रॅक्टिस टेस्ट्स देताहेत ते चालू आहे आता. अन तर दादाची तयारीही सुरू होती. त्याचंही शॉपिंग, बॅग भरणं वगैरे काही न काही करायचं असायचं. त्यालाही अर्जंटली जावं लागलं ना त्यामुळे. त्यात तेव्हा आईलाही बरं वाटत नव्हतं. तिचीही नुसती धावपळ. अन मी मदतीला. फारच बिझी चालले आहेत रे गेले काही दिवस."

"ओह, मग तर तुम्ही आमच्यापेक्षाही बिझी झालात मॅडम", रजत हसून म्हणाला.

तेवढ्यात स्वयंपाकघरातून रजतला एका जणाने आवाज देऊन विचारले, "रजत, तेल कुठे आहे? अन मिरची आहे का?"

"वरच्या डावीकडच्या कपाटात बघ, तेलाची बाटली आहे तिथे. मिरच्या ओट्यावरच ताटलीत धुवून ठेवल्या आहेत. त्यातली घे", रजतने खोलीतूनच सांगितले.

"हो, सापडले", तिकडून आवाज आला.

"कोणी आलेलं असेल तर आपण नंतर कधी बोलू या. काय रे? कोणी आलंय का घरी? ", विधीने विचारले.

"अग बोल तू, पार्टनर आहे माझा. पोहे करतोय तो", रजतने सांगितले.

क्रमशः

© स्वाती अमोल मुधोळकर

कथेचे सर्वाधिकार लेखिकेकडे राखीव. साहित्यचोरी हा गुन्हा आहे.

हा भाग कसा वाटला जरूर कळवा. आपल्या अभिप्रायांकरिता धन्यवाद.

🎭 Series Post

View all