दृष्टी आणि दृष्टिकोन - भाग 45

Drushti ani Drushtikon : An interesting story of Viraj , Rujuta and their vision and perspective.

मागील भागात ...

"आज आपण इथेच थांबू या. तुला या एवढया section मध्ये काही अडचण असेल तर विचार मला ", विराज खुर्चीवरून उठून ब्लेझर चढवत म्हणाला. तसे तिचे त्याच्याकडे लक्ष गेले. क्षणभर तिचीही नजर त्याच्यावर खिळली. बघतच राहिली ती. इतका तो हँडसम दिसत होता. अन त्यामुळे तिला पुढे काय बोलायचं होतं तेच विसरली ती.

"अं, काय म्हणालास?", ऋजुता.

"आजच्या पार्ट मध्ये काही अडचण असेल तर सांग मला, असं म्हणालो", विराज.

"ओके. काही वाटलं तर कळवीन तुला. थँक्स. ब्रेकफास्ट वगैरे करून जा हं. Have a good day", ऋजुता आता खुर्चीला मागे टेकत शांतपणे बसत , स्माईल करत म्हणाली.

"हो. मी निघतो आता. बाय." विराज इकडे हँडग्लव्हस वगैरे सगळं घेत होता. लॅपटॉप बंद करून घेत तो निघाला.

"आज हीसुद्धा म्हणाली ब्रेकफास्ट करून जा" , विराजच्या चेहऱ्यावर स्माईल आले.

ब्रेकफास्ट आटपला आणि त्यानंतर विराज ऑफिसला निघाला.

https://www.irablogging.com/blog/drushti-ani-drushtikon---bhag-44_9737

आता पुढे ...

असेच काही दिवस गेले. सकाळी सकाळी ऋजुताशी बोलल्यानंतर विराजची सकाळ कशी प्रसन्न होऊन जायची. तसं तर ते कामासाठीच बोलणं असायचं पण तरीही त्यामुळे एक खुषीची लहर दिवसभर मनात रेंगाळत रहायची अन दिवस अगदी छान जायचा. संध्याकाळी तो आसपास फेरफटका मारत वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन मार्केट वगैरे बघून लागेल ते घेऊन यायचा. रोजचा घरी एक कॉल तर ठरलेलाच होता. विधी तर नवनवीन प्रश्न विचारून त्याला पिडण्यासाठी टपलेलीच असायची जणू. मध्यंतरी विराजने स्वतः साठी घर-शोध मोहीमपण सुरू केली होती. मात्र अजून घर मिळालं नव्हतं.


वीणाताई रेखाताई आताशा दुपारी 'दृष्टी'मध्ये जायला लागल्या होत्या. तिथल्या बायकांशी बोलून कोण काय कामं  करतात हे समजून घेत होत्या. देखरेखीखाली साहित्य मागवणे, काय संपले आहे, मागवायचे आहे त्याची यादी बनवणे, विविध गोष्टी बनविण्यासाठी मोजून मापून साहित्य काढून देणे, बनवताना देखरेख ठेवणे इत्यादी गोष्टी त्या करत . सोबतच त्यांच्याशी आणि एकमेकींशी गप्पाही चालत असत. एकंदरीत त्यांचाही वेळ आता या कामांमध्ये छान जात होता.

त्यादिवशी त्या दोघी 'दृष्टी'मध्ये देखरेख करत बसलेल्या होत्या.

"वीणाताई, मला काय वाटतं, आता या सर्वांना काही नाश्त्याचे पदार्थ करायला शिकवा ना. म्हणजे या खास प्रशिक्षिका मॅडम आहेतच सोबत, तर शिकवता येतील तुम्हाला त्यांच्याबरोबर. नाही का? रोज एक एक शिकवला तर तोच इथे संध्याकाळी नाश्त्यालाही होईल सर्वांना.", रेखाताईंनी सुचविले.

"हो, चांगली कल्पना आहे ही खरं तर", काहीसा विचार करत त्या म्हणाल्या. "पण मला वाटते , माझ्यापेक्षा तुम्हीच छान शिकवू शकाल. आम्ही आहोतच मदतीला. नाही म्हणजे तुम्ही सुगरण आहात हो. म्हणून म्हणतेय. त्यादिवशी लाडू खाल्ला ना तुमच्या हातचा. अहो , काय अप्रतिम झाला होता ! सुरेख वळलेले होते लाडू. अगदी बघितल्याबरोबर कोणालाही खाण्याचा मोह व्हावा अस्से ! अन चवही तितकीच अप्रतिम ! अगदी भाजण्यापासून ते गोडी , आणि वेलची-जायफळ मसाल्यापर्यंत सगळं अगदी तंतोतंत परफेक्ट प्रमाणशीर! कुठे म्हणून नाव ठेवायला जागा नाही.", वीणाताई कौतुक करत म्हणाल्या.

रेखाताई हसून म्हणाल्या, "अहो, खरं तर ऋजूकडून भाजून घेतलं होतं मी. तेवढंच एकदा तिच्याही हाताखालून जाईल आणि मलाही मदत होईल म्हणून. पडले होते ना, त्यानंतर अशी भाजण्याची कामे करताना हाताला जास्त ताण झेपवत नाही अजून मला. दुखायला लागतो.", रेखाताई.

"अरे हो, तेही खरंच. म्हणजे ऋजुताला छानच जमलंय म्हणायचं लाडूंसाठी भाजायला. छानच की हो! ", वीणाताई.

"हो ना. या शिक्षण, नोकरी करणाऱ्या मुलींना कसं शिकवावं इतकं सगळं? रोजच्या व्यापातच एवढया व्यस्त असतात, त्यातच दमून जातात बिचाऱ्या. मग आता असंच एखादा रोजच्या पेक्षा वेगळा पदार्थ करायचा झाला की थोडीशी मदत घेते सुट्टीच्या दिवशी. त्यामुळे सवय झालीय तिला आता. शेवटी आपल्याला हेही मनात वाटत असतं ना, की कधी लग्न ठरलं तर जड जायला नको यांना. वेळेवर सगळंच कसं शिकवणार ना. ", रेखाताई.

"सवय झालीय वाटतं तिला आता बऱ्यापैकी. तुम्ही पडल्या होत्या तेव्हा एकहाती छानच सांभाळत होती की घर! मी बघितलंय ना", वीणाताई कौतुकाने म्हणाल्या. रेखाताईंनी किंचित हसत समाधानाने मान डोलावली.

" विधीलासुद्धा असाच एखादा एखादा पदार्थ करायला लावते मी. तिच्या बाबांचं अन विराजचं चाललं असतं, आता तिला अभ्यास करू दे , वगैरे. पण शेवटी, जसं ते त्यांचं अभ्यास अन ऑफिसातलं काम या गोष्टी आपल्याला नाही कळत, तसंच या स्वयंपाकघरातल्या गोष्टींचा पुरुषांना अंदाज नाही ना येत. ते आपल्यालाच बघावं लागणार", वीणाताई.

"हो बरोबर. भाजी, वरण भात, पुलाव, पोहे, उपमा, इडली, डोसे वगैरे असे पदार्थ रजतलाही थोडंफार हाताखालून घातलेत मी तर. आता परदेशात राहणं काय सोपं आहे का? सगळी कामं स्वतःच करावी लागतात. अन बाहेरचं किती दिवस खाणार? रोजच्या खाण्यापिण्यापुरतं त्यांना स्वतःचं स्वतःला करता आलं की मग आपल्यालाही जरा निश्चिन्त राहता येतं त्यांच्याबाबतीत . आता तर स्वतः सुट्टीच्या दिवशी वेगवेगळे प्रयोग करत असतो", रेखाताई.

"अगबाई, खरंच का? फारच छान हं !", वीणाताई आश्चर्य आणि आनंदाने उद्गारल्या.

एकीकडे हातातले काम करता करता वीणाताई, रेखाताईंच्या  अशा गप्पाही रंगल्या होत्या.


वीणाताईंनी प्रशिक्षिकेच्या मदतीने 'दृष्टी'मधल्या बायकामुलींना जमतील अशा काही पदार्थांची यादी केली आणि त्यासाठी लागणाऱ्या सामानाची यादी करून ती परागकडे दिली. 

इकडे या दोघींचं हे चाललं होतं, तर तिकडे विनीतसुद्धा संध्याकाळी ऑफिसमधून आल्यानंतर 'दृष्टी' मध्ये येऊन तरूण मुलांसाठी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल या दृष्टीने सेशन्स घेत होते. विराजने त्यांना सगळे नीट समजावून दिले होते. तेसुद्धा या कामात खूष होते. विनीत दिवसभराचा आढावाही परागकडून घेत असत आणि रात्री मग विराजशी त्यावरही बोलणे होत असे.

"विराज , अरे बाळा ते टेक्निकल टॉपिक काही जमणार नाहीत रे मला शिकवायला. त्यांचं कसं करायचं?"

"हो, बाबा. मी बघतो पुढच्या आठवड्यात कसं जमतं ते. मलाही सध्या नाही जमणार ते घ्यायला. वेळ जुळणार नाही सध्या. तोपर्यंत तुम्ही पुढचे दुसरे टॉपिक घ्या", विराज.

विधी कॉलेजच्या सबमिशन्स , टेस्ट्सवगैरे मध्ये व्यस्त होती. अशाप्रकारे सगळेच जण आपापल्या कामांमध्ये व्यस्त झालेले होते. असेच काही दिवस गेले.

आज विराजच्या हॅन्डओव्हरचा शेवटचा दिवस होता. विराज आज विशेष तयारी करत होता. सकाळी आरशात बघत  शीळ घालत केस सेट करत होता. आज त्याने नेव्ही ब्लु रंगाचा शर्ट आणि त्यावर आकाशी रंगाचा सूट घातला होता . परफ्युम लावताना जरा जास्तच लावले.

"एवढे परफ्यूम ? विराज तू तर असा वागतोय जसं काही तिला त्याचा सुगंधच जाणार आहे लंडनहून पुण्याला !", स्वतःलाच टपली मारत विराज स्वतःशी हसला.

"देवा , हा नाही तरी माझ्या प्रेमाचा सुगंध मात्र नक्की तिच्यापर्यंत पोचव.", विराज काहीसा गंभीर झाला होता. "आजच्यानंतरही आम्ही बोलायचे की नाही याबद्दल तू काय ठरवले आहेस? ती कायमस्वरूपी माझ्या आयुष्यात यावी यासाठी तिच्यापासून दूर राहण्याचे मला बळ दे . दूर राहूनही मनाने मी तिच्या किती जवळ आहे याची तिला जाणीव होऊ दे . आजचा हा अर्धा तास माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे." देवाला नमस्कार करून त्याने लॅपटॉप लावला आणि ऋजुताला व्हिडिओ मीटिंग साठी कॉल केला.

"सुप्रभात विराज!", ऋजुता.

"सुप्रभात ! नाही नाही, शुभ दुपार!", विराज कपाळाला हात लावत गडबडून म्हणाला.

ते बघून पलीकडे  खळखळत्या गुलाबी हास्यात मौक्तिके उधळली आणि विराज त्यात हरवला. आज ऋजुताही तितकीच सुंदर दिसत होती. बेबी पिंक रंगाचा नाजूक एम्ब्रॉयडरी असलेला कुर्ता , त्यावर मॅचिंग ओढणी, कानात नाजूकसे झुमके, खांद्यावर रुळणाऱ्या केसांच्या बटा. बारीकशी मॅचिंग टिकली. अगदी हलका मेकअप. चेहरा आत्मविश्वासाने फुललेला. त्यावर सुमधुर हास्याची लकेर.  जणू साधेपणात सौंदर्याची परिभाषाच !  इतके सगळे असताना विराजचे भान हरवले तर त्यात नक्की दोष कोणाचा म्हणावा?

"You look gorgeous!", विराज नकळतपणे उद्गारला.

"थँक्स, फ्लर्ट करतोय?", ऋजुता हसून म्हणाली.

"हो", विराज.

"अं?", ऋजुता.

तिच्या विस्फारलेल्या डोळ्यांकडे लक्ष जाताच तो गडबडला. "हो, म्हणजे नाही. नाही ग. खरंच म्हणतोय ना. खूप सुंदर दिसतेस. सिम्पल अँड स्वीट ! एकदम शुद्ध कॉम्प्लिमेंट हं".

तशी ऋजुता पुन्हा खळखळून हसत म्हणाली, "मेराही तीर मुझ ही पे?"

"बरं, उधार दे तुझा 'तीर' आजचा दिवस.", त्या दिवशी ऋजुताही अशीच 'शुद्ध कॉम्प्लिमेंट' म्हणाल्याचे आठवून विराज हसून म्हणाला.

"बरं, दिला. चला मिस्टर, सेशन सुरू करायचे आहे की नाही?", ऋजुता हसून म्हणाली.

"राहू देत ना आज. गप्पाच करू या. उद्या करू या हॅन्ड ओव्हर पूर्ण", विराज.

"काय? गप्पा मारण्यासाठी एवढ्या लवकर उठलास तू?", ऋजुता.

"नाही ग, पण आत्ता विचार बदलतोय", विराज मिश्किलपणे म्हणाला.

"ए , आता भाव नको खाऊस हं. पूर्ण करू या आजच.", ऋजुताही मिश्किलपणे म्हणाली. "तुला नाही, पण मला तर रिपोर्ट करावं लागतं ना पुनीत सरांना. कालच विचारत होते , हॅन्ड ओव्हर झालं का ते. मी म्हटलं की उद्या पूर्ण होईल.".

"आता हे, माझ्या प्रेमाचे दुष्मन!", विराज पुटपुटला.

"काय म्हणालास?", ऋजुता न समजून म्हणाली.

"काही नाही . सुरू करू या म्हणालो", विराज.

विराजने सेशन सुरू केले. माहिती देणे, प्रश्न, उत्तरे, अडचणी सोडवणे इत्यादी सगळे झाले . सेशन संपले. विराज शांत झाला. ऋजुता कडे बघत काहीसं विचारात हरवला. "आता यानंतर कधी बोलणे होईल कुणास ठाऊक", तो विचार करत होता.

"ए , काय झालं? कुठे हरवलास?", ऋजुता.

"काही नाही ग. काही सांगायचं राहिले का, हा विचार करत होतो", विराज.

"हं, आठवलं तर सांग नंतर. तुला उशीर होईल ना आता", ऋजुता म्हणाली. पण का कोणास ठाऊक, आज त्यालाही निघावेसे वाटत नव्हते आणि ऋजुताचीही कॉल संपवण्याची इच्छा होत नव्हती . असे वाटत होते, हे सेशन अजून काही वेळ चालावे. शेवटचे सेशन आणि उद्यापासून विराज असा बोलणार नाही की दिसणारही नाही याची तिला हुरहुर वाटत होती. त्या दिवशी विराज पुण्याहून लंडनला जाताना जसं तिचं स्वतःचं काहीतरी हातातून निसटून जातंय असं वाटत होतं ना, तसंच आज पुन्हा एकदा वाटत होतं. एखाद्या अथांग डोहासारखे त्याचे डोळे आज आणखी काहीतरी बोलताहेत असं तिला वाटत होतं. काहीतरी आहे त्याच्या डोळ्यांमध्ये, खोलवर.  आज मध्ये मध्ये तो स्वतःच्या विचारातच हरवतोय हेही तिला जाणवलं होतं. या काही दिवसात त्यांच्यामधले बंध आणखी घट्ट झाले होते का?

क्रमशः

© स्वाती अमोल मुधोळकर

कथा किंवा कथेतील कुठलाही भाग कॉपी करू नये. साहित्यचोरी हा गुन्हा आहे.


हा भाग कसा वाटला नक्की कळवा. आपल्या अभिप्रायांकरिता मनापासून धन्यवाद.

🎭 Series Post

View all