दृष्टी आणि दृष्टिकोन - भाग 44

Viraj and Rujuta

मागील भागात ...

https://www.irablogging.com/blog/drushti-ani-drushtikon-bhag---42_9445

https://www.irablogging.com/blog/drushti-ani-drushtikon-bhag---43_9674


पुनीत सरांनी सांगितल्यामुळे ऋजुता त्या मीटिंगची तयारी करत होती. तिला काही fields सापडत नव्हते.

"अरे हे काय, ही file तर protected आहे. याला पासवर्ड लागेल. नक्कीच हे महत्वाचे डिटेल्स असल्यामुळे यातच असतील . आता काय करू? कोणाला माहीत असेल याचा पासवर्ड?", ऋजुता मनाशी.

आधी तिने विराजने जाण्याआधी पाठवलेले मेल्स पुन्हा चेक केले. पण त्यातही नव्हतं. मग तिने निकिताला विचारले.
"निकिता, विराजने ---- ही फाईल दिलीय का ग तुला ? किंवा त्याचा पासवर्ड दिलाय का?", ऋजुता.

पण तिलाही माहीत नव्हते.

"नाही ग", निकिता.

"आता काय करावे? थोडाच वेळ राहिलाय मीटिंग सुरू होण्यासाठी", ऋजुता चिंतेत पडली.

आता पुढे...

"अग आता दुसरा काही उपाय दिसत नाही. तू विराज सरांनाच विचार ना एकदा. त्यांनाच माहीत असेल .", निकिता तिच्या डेस्कवरून फोनवर ऋजुताशी बोलत होती.

"हं, आता तेच करावे लागेल", असं म्हणून ऋजुताने फोन ठेवला.

हो - नाही विचार करता करता शेवटी तिने विराजला फोन केला.

लंडनला सकाळचे साडेपाच वाजले होते. विराज साखरझोपेत होता. त्याचा फोन वाजला. किलकिल्या डोळ्यांनीच त्याने बघितले , इतक्या सकाळी कोणाचा फोन आलाय. ऋजुताचे नाव वाचून टुणकन बेडवरच उठून बसला आणि कॉल रिसिव्ह केला.

"काय ग, तुला इतकी आठवण येतेय का माझी की आजपण सकाळी सकाळी फोन केलास", विराज मिश्किलपणे तिला चिडवत हसून म्हणाला.

पण ऋजुता तर आपल्याच टेन्शनमध्ये होती. तिचं त्या चिडवण्याकडे लक्षच कुठे होतं ! कॉल रिसिव्ह केल्याकेल्याच ती म्हणाली,
"हं, विराज, विराज. थँक गॉड तू कॉल घेतलास. मला वाटलं घेतोस की नाही, तू घेतला नसता तर काही खरं नव्हतं माझं" .

"अग काय झालं, काही प्रॉब्लेम आहे का?", विराज मिश्किल मूड मधून एकदम बाहेर येऊन काळजीच्या स्वरात विचारता झाला.

"अरे, तुला --- या फाईलचा पासवर्ड माहिती आहे का? असेल तर सांग ना.  "

"हो , *********** हा टाक", विराज.

"हं, टाकतेय. ", ऋजुता तिकडे एकीकडे लॅपटॉपवर टाइप करत होती.

"येस्स, उघडली , उघडली फाईल....", ऋजुता उत्साहाने म्हणाली. "थांब आता बघू दे यात हे फिल्डस आहेत का"

"ये ss आहेत आहेत. झाले, सगळे फिल्डस मिळाले. यू नो विराज, यू आर अ saviour", ऋजुता ती लिस्ट आणि फाईलमध्ये बघत आनंदाने म्हणाली.

विराज हसला. म्हणाला, "का ग, एवढया अर्जंटली हवे होते का? "

"अरे हो ना, आता थोडया वेळात ती सर्व सिनिअर मॅनेजमेंटबरोबर मीटिंग घ्यायची आहे.", ऋजुता.

"पण ती तर पुनीत सर घेतील ना?", विराज.

"नाही. पुनीत सर नाहीयेत आज. त्यांनी मलाच सांगितलंय, तेही अगदी वेळेवर. अन त्यात हे काही फिल्डस सापडत नव्हते. सॉरी तुला डिस्टर्ब करावं लागलं मला. मी आधी सगळीकडे शोधला, पण नव्हता दिलेला तू याचा पासवर्ड मला."

"ओह! हो ग, मी विसरलो होतो द्यायला तुला. सॉरी हं", विराज एका हाताने कान पकडत म्हणाला.

"ए , खूप विचारतात का रे हे सिनिअर लोक त्या मीटिंग मध्ये?", ऋजुताला काळजी वाटत होती.

"हो ना, खूप प्रश्न विचारतात. हे असे का? इतके रिसोर्सेस का? इतके एफर्ट्स का? चेंजेस करायला लावतात. आणि मग आपल्याला पुन्हा शेड्युल बनवावे लागते", विराज तिला घाबरवत आपले हसू दाबत म्हणाला.

"काय? पुन्हा इतकं मोठं शेड्युल बनवायचं? अरे यार, बाकी किती कामं आहेत अजून ! हे पुन्हा पुन्हा करावं लागणार का आता?", ऋजुताचा चेहरा पडला अन ती नाराजीनेच म्हणाली.

"हो ना, करावं लागतं", विराज तिच्याकडे बघत होता.

"हं, ठीक आहे, बघेन काय म्हणतात ते", ऋजुता खाली बघत कसनुसा चेहरा करत म्हणाली.

आता मात्र विराजला राहवले नाही . तो लगेच म्हणाला, "ए वेडू, लगेच किती डाऊन होतेस? मी गंमत करत होतो. इतकं टेन्शन घेऊ नकोस. ते विचारतात , पण आपण असं का केलंय , आपले काय पॉईंट ऑफ व्ह्यूज आहेत तेही सांगायचे, ऐकून घेतात ते. मग बरोबर असेल तर विशेष काही बदल करावा लागत नाही. सगळं नीट आहे आपलं. तू काळजी करू नकोस. फक्त नीट प्रेझेन्टेशन दे आणि उत्तरं नीट दे."


"काय विराज, आता गंमत करतोय . तू परत तर ये, तुला न सोडणारच नाही मी", ऋजुता त्याला दम देत म्हणाली.

"ही ही ही ही नकोच सोडू", विराज हसून म्हणाला.

"मी इतकी टेन्शनमध्ये आहे अन तुला गंमत सुचतेय", ऋजुता.

"टेन्शन कमी करण्यासाठीच तर गंमत करत होतो , वेडू, चल हस बघू आता",विराज म्हणाला.

"हं", ऋजुताचा मूड ठीक झाला होता. तिने हलकेच स्माईल केले. "मी करते आता तयारी जरा, थोडया वेळात मीटिंग आहे. बाय ."

फोन ठेवला आणि विराज स्वतःशीच हसला. मग विचार करू लागला, "माझंच चुकलं , पासवर्ड द्यायला विसरलो. कधी कशाची गरज पडेल ते सांगता येत नाही. आता हिला लवकरात लवकर नीट हॅन्ड ओव्हर द्यावा लागेल. नाहीतर बिचारीला असाच त्रास होईल. कधी अन कसा द्यावा तोच प्रॉब्लेम आहे आता. माझं ऑफिस संपेपर्यंत तर तिकडे झोपायची वेळ होते. सकाळी मला लवकर जायचं असतं. मग कसं करावं? इकडे तर मीटिंग रूम नेहमी ओक्युपाईड असते. डेस्कवरून इतकं सगळं बोललो तर इतरांना डिस्टर्ब होणार. मग आता सकाळीच  तिच्या मीटिंग्स सुरू होण्यापूर्वी इथूनच बघावं लागेल. आज संध्याकाळी बोलून ठरवून घेऊ या."

इकडे ऋजुता फोन ठेवून परत आपल्या कामाला लागली. सगळं नीट मांडणी (ऑर्गनाईझ) करून पटापट सविस्तर काय सांगायचे ते नीट ठरवले. काय प्रश्न विचारू शकतील त्याचा अंदाज घेऊन उत्तरं तयार केली. अशी सगळी तयारी केल्यानंतर आता तिच्या चेहऱ्यावर एकदम आत्मविश्वास झळकू लागला.

मीटिंग एकदम व्यवस्थित पार पडली. अत्यंत आत्मविश्वासाने तिने प्रेझेन्टेशन दिले होते . ते देतानाच तिने सर्व गोष्टी नीट मांडल्यामुळे इतरांना फारसे प्रश्न विचारण्याची गरज पडली नव्हती. जेवढे विचारले त्या सर्व प्रश्नांची नीट उत्तरंही तिने दिली होती. त्यामुळे तिला आता काहीही बदल करण्याची गरज पडणार नव्हती. तिने केलेले काम जसेच्या तसेच मंजूर (अप्रुव्ह ) करण्यात आले होते.

मीटिंग आटपल्यानंतर शेवटी मीटिंग रूममधून बाहेर पडताना अमोल सरांनी तिला शाबासकी दिली . अमोल सर म्हणजे पुनीत सरांचेही सिनिअर . ऋजुताला आता कुठे जरा दिलासा मिळाल्यासारखे वाटत होते. "थँक गॉड, काही चेंजेस करावे लागणार नाहीत आता. लंचनंतर पुनीत सरांनाही रिपोर्ट देऊन टाकते.", तिने मनाशी ठरवले आणि विराजला एक मेसेज केला.

"मीटिंग छान झाली. नो चेंजेस रिकवायर्ड. थँक्स फॉर युअर टाईमली हेल्प."


थोडया वेळाने विराज ने मेसेज बघितला. तशी त्याच्या चेहऱ्यावर खट्याळ स्माईल आली. तो उत्तर टाईप करू लागला,
"मी काहीच केले नाही. अन वेडू, मला कशाला थँक्स? I am already all yours."

पण मग स्वतःशीच हसत, जीभ चावत, त्याने शब्द मागे घेतले आणि शांतपणे मेसेज पाठवला,

"वेडू, मला थँक्स म्हणणार आहेस का तू आता? सगळं तर तूच केलं आहेस. I knew you would do it. तू उगाच टेन्शन घेत होतीस. :-) "

"उद्या-परवाचं तुझं शेड्युल बघून सांग, सकाळी किती वाजता फ्री आहेस ते. हॅन्डओव्हर सुरू करू या उद्यापासून", विराजने पुढे मेसेज केला.

वेळ ठरली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसहा वाजता विराज फ्रेश होऊन, तयार होऊन बसला होता. लाईट लेमन येलो रंगाचा लिननचा शर्ट त्याला खूप खुलून दिसत होता. आज डार्क ग्रे रंगाचा सूट त्याने घातला होता . चेहरा एकदम फ्रेश , केस व्यवस्थित सेट केले होते. किंचित कपाळावर रुळत होते.

"ब्लेझर आणि जॅकेट वगैरे जाताना घातले की झाले ", मनाशी म्हणत त्याने लॅपटॉप सुरू केला आणि ऋजुताला व्हिडिओ मीटिंगसाठी कॉल केला.

ऋजुताने कॉल घेतला आणि क्षणभर त्याला बघून चकित झाली. "अरे हे काय, तू ऑफिससाठी तयारीही केलीस इतक्यातच?"

"हो ग, साडेसहा वाजलेत ना, साडेसातला निघायचं आहे. त्या आधी खाली जाऊन ब्रेकफास्टही करायचा आहे. नंतर तयार व्हायला वेळ कुठे मिळणार ना? म्हणून आधीच तयार झालो. पण आज काहीही झालं तरी हॅन्डओव्हर सुरू करायलाच हवा ना. तुला उगाच त्रास होतोय. एकतर रोज थोडा थोडा वेळच देता येईल त्यामुळे मग वाटलं की हे ठीक राहील."

"खूप फ्रेश आणि चार्मिंग दिसतो आहेस. डॅशिंग एकदम ! इथल्यासारखेच तिकडचेही ऑफिस गाजवतो आहेस का तू? ", ऋजुता स्माईल करत म्हणाली.

"थँक्स . काहीही काय ग? मी कुठे गाजवायचो? सकाळी सकाळी फ्लर्ट करतेस का ? ", विराज मिश्किलपणे हसत तिला चिडवत म्हणाला.

"छे छे! काहीही काय रे", ऋजुताचे डोळे विस्फारले .

"मी तर फक्त कॉम्प्लिमेंट देत होते" . उजव्या हाताचा अंगठा अन तर्जनी जुळवून त्याच्यापुढे फिरवत ती मिश्किलपणे हसून पुढे म्हणाली,

"स्व च्छ आणि शु द्ध कॉ म्प्लि में ट ! आणि दुपार झाली आहे इथे आता ". ती गालात हसली अन इकडे विराजचीच विकेट उडाली.

"बरं बरं, अग मीही गंमतच करत होतो ना . एवढं काय गंभीरपणे घेतेस!", विराज हसून म्हणाला.

आधी त्याचेच असलेल्या त्या केबिनमध्ये त्याच खुर्चीवर ऋजुताला काम करताना बघून त्याला खूप छान वाटत होते. एक अनोखा आत्मविश्वास तिच्या डोळ्यात दिसून येत होता. तिच्या मिश्किल स्वभावाला जपतच ती पुढील जबाबदाऱ्या उचलण्यासाठी तयार असलेली त्याला जाणवत होतं. बोलण्यातही आजकाल एक अनोखी धार आणि वजन जाणवत होतं. पण असे असले तरी ती तितकीच विनम्र होती. तिच्या वागण्यात कुठेही अहंकार डोकावला नव्हता. आपली आवडती व्यक्ती यशाच्या पायऱ्या चढत असेल तर कोणाला आनंद नाही होणार ? ती पुढे जातेय याचाही आनंद आणि त्याचे त्या जागेशी असलेले नाते त्याच्या मनात एक अनामिक खुषीची लहर निर्माण करत होते. विराज काही क्षण तिच्याकडे बघत स्वतःच्याच विचारात हरवला होता.

"ए , कुठे हरवलास?" , ऋजुता त्याच्यासमोर एक चुटकी वाजवत म्हणाली. "चल सुरवात करू या पटकन आता. उशीर नको व्हायला तुला", ऋजुता टेबलवरचा लॅपटॉप ऍडजस्ट करत म्हणाली. तशी विराजने सुरवात केली . ऋजुताचे सगळे लक्ष लॅपटॉप मध्ये आणि विराज काय माहिती देतोय त्याकडेच होते. विराज मात्र एकाच कामात दोन्ही कामे करून घेत होता. कोण जाणे, हे दोन चार दिवस गेल्यानंतर पुन्हा अशी वेळ कधी येईल? येईल की नाही ? काही वेळाने त्यांनी आजचे काम आटपले.

"आज आपण इथेच थांबू या. तुला या एवढया section मध्ये काही अडचण असेल तर विचार मला ", विराज खुर्चीवरून उठून ब्लेझर चढवत म्हणाला. तसे तिचे त्याच्याकडे लक्ष गेले. क्षणभर तिचीही नजर त्याच्यावर खिळली. बघतच राहिली ती. इतका तो हँडसम दिसत होता. अन त्यामुळे तिला पुढे काय बोलायचं होतं तेच विसरली ती.

"अं, काय म्हणालास?", ऋजुता.

"आजच्या पार्ट मध्ये काही अडचण असेल तर सांग मला, असं म्हणालो", विराज.

"ओके. काही वाटलं तर कळवीन तुला. थँक्स. ब्रेकफास्ट वगैरे करून जा हं. Have a good day", ऋजुता आता खुर्चीला मागे टेकत शांतपणे बसत , स्माईल करत म्हणाली.

"हो. मी निघतो आता. बाय." विराज इकडे हँडग्लव्हस वगैरे सगळं घेत होता. लॅपटॉप बंद करून घेत तो निघाला.

"आज हीसुद्धा म्हणाली ब्रेकफास्ट करून जा" , विराजच्या चेहऱ्यावर स्माईल आले.

ब्रेकफास्ट आटपला आणि त्यानंतर विराज ऑफिसला निघाला.


असेच काही दिवस गेले. सकाळी सकाळी ऋजुताशी बोलल्यानंतर विराजची सकाळ कशी प्रसन्न होऊन जायची. दिवस अगदी छान जायचा. संध्याकाळी तो आसपास फेरफटका मारत वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन मार्केट वगैरे बघून लागेल ते घेऊन यायचा. रोजचा घरी एक कॉल तर ठरलेलाच होता. विधी तर नवनवीन प्रश्न विचारून त्याला पिडण्यासाठी टपलेलीच असायची जणू. मध्यंतरी विराजने स्वतः साठी घर-शोध मोहीमपण सुरू केली होती. मात्र अजून घर मिळालं नव्हतं.


क्रमशः

© स्वाती अमोल मुधोळकर
कथेचे सर्वाधिकार लेखिकेकडे राखीव.  कथेतील कुठलाही भाग कॉपी करू नये.

हा भाग कसा वाटला जरूर कळवा. आपल्या अभिप्रायांकरिता धन्यवाद.

🎭 Series Post

View all