मागील भाग येथे वाचा...
https://www.irablogging.com/blog/drushti-ani-drushtikon---bhag-38_8866
आता पुढे ...
"नाउ दॅट्स लाईक युजुअल कॉन्फिडन्ट ऋजुता! ऋजू, माझी वाट पाहशील ना ग?", विराज म्हणाला. आता मात्र त्याचा चेहरा गंभीर , उत्तरासाठी आतुर दिसत होता. डोळ्यात जणू काही प्राण आणून तो तिच्या बोलण्याची वाट बघत होता. त्याची ती निर्मळ पण आतुर नजर ऋजुताला नकळतपणे अस्वस्थ करत होती. तिच्या मनात कालवाकालव होत होती. काहीतरी तिचं स्वतःचं दूर जातंय असं तिला वाटत होतं. जीवाला खूप हुरहूर लागली होती. मात्र हे का हे कळत नव्हतं. किंबहुना, का असा विचारच आला नाही तिच्या मनात. दोघांचीही नजर एकमेकांच्या नजरेत कैद झाली होती. ते तसेच स्तब्ध राहिले होते. दोघेही कदाचित मौनात शब्द अन नजरेत अर्थ शोधत होते. तो तिच्या नजरेत काहीतरी शोधत होता. अन तिला त्याच्या नजरेत काहीतरी दिसत होतं, गवसत होतं , ते डोळ्यातून खोलवर हृदयात झिरपत होतं, आपलंसं वाटत होतं आणि ही भावना काही वेगळीच होती. अभावितपणे ती म्हणाली, "लवकर येशील ना?". त्याने होकारार्थी मान हलवली.
"वाटतंय तुला मी लवकर यावं असं?" विराजने हळुवार आवाजात विचारले.
"हो", ऋजुता हळूच म्हणाली.
"का?", विराज.
"माहीत नाही", ऋजुता.
"शोध मग. वाट बघशील माझी?", विराज तिच्या डोळ्यात बघत एकदम हळुवारपणे विचारत होता.
विधी हातात चहाचा ट्रे घेऊन आली तर तिला दिसले, मोठी उघडीच असलेली सुटकेस , त्याच्या एका बाजूला ऋजुता, अन दुसऱ्या बाजूला विराज. अन ती नजरकैद!
विधीने चहाचा ट्रे टेबलावर ठेवला आणि बाजूला एक हात कमरेवर ठेवून वाट बघत उभी राहिली. दोन मिनिटं झाली तरी यांचं लक्षच नाही . ते काही हलायचं लक्षण दिसेना.
शेवटी विधीच म्हणाली, "अरे, वाट तर बघणारच ना ती? तू एवढं सगळं तिच्यावर टाकून जातोय तर कधी एकदा येतोस अन हे परत सांभाळतोस असं वाटेलच न तिला? हो की नाही ऋजुता? वाट बघशीलच ना तू त्याची". विधीने हुशारीने एकाच उत्तरात ऋजुतालाही वाट बघायला सांगितलं होतं अन विराजलाही आश्वस्त केलं होतं.
विधी बोलली तसे विराज गडबडला आणि भानावर आला आणि किंचित ब्लश करायला लागला आणि ऋजुताही भानावर आली. तिला कळेच ना की तिने अनुभवलेली ही कोणती ट्रान्स स्टेट होती? कोणती वेगळीच फीलिंग, वेगळीच जाणीव होती? कधीही न अनुभवलेली.
"मला सांगायचं तरी असतं, की चहाऐवजी सरबत आण. आता या गरमागरम चहाचं थंड सरबत व्हायच्या आधी घ्या बरं लवकर", विधी.
विधी त्यांच्या जवळ येऊन म्हणाली, "सॉरी दादा अन वहि (नी)" , विधीच्या तोंडून 'नी' बाहेर पडायच्या आतच तिचा मिश्किलपणा विराजच्या लक्षात आल्याने विराजने तिच्या पायावर पायाने मारून तिला थांबवलं .
"अरे , दादा वही घेतलीस का एखादी? असं विचारत होते ना मी? का मारलंस मला?", अचानक लागल्यामुळे विधी पाय हातात घेत कळवळून म्हणाली.
"हो का? हो घेतलं मी एक छोटं नोटपॅड. अजून काही?"
विराजने सांभाळून घेतल्याने ऋजुताला विधीचे वहिनी म्हणणे काही लक्षात आले नव्हते. ती वेळ सांभाळत दोन चहाचे कप हातात उचलून विधी विराजला देत म्हणाली , "बरं आता हे घ्या . नंतर भांडा".
नंतर खुर्चीवर बसून चहा घेत डोळे मिचकावत विधीला म्हणाली, "विधी चहा पसंत आहे हं. आता तुझ्या हातचे पोहे कधी खिलवणार आहेस?" .
विधीला इशारा कळून ती लाजत गालात हसली. विराजला मात्र तो कळलं नव्हता. तो विधीला चिडवत म्हणाला ," छे छे, तिने नुसता पोह्यांना हात जरी लावला तरी ते चांगले बनत नाहीत. मग तिने ते पूर्ण बनवले तर आपण खाऊ शकू की नाही शंकाच आहे हं !".
"दादा, जा बरं तू ! काहीपण म्हणतोस. येतात मला पोहे करता", विधी चहा घेता घेता लटक्या रागाने म्हणाली.
"अग जरा दहा मिनिटं दम धर, जातोच आहे मी", विराज.
ऋजुताला हसू येत होते यांचे भांडण बघून. "किती भांडता रे तुम्ही? मला पण आता माझ्या दादाची आठवण येतेय तुम्हाला बघून".
"तुम्ही पण असेच भांडता ?", विधी.
"अगदी. भांडतोही असेच आणि जीवसुद्धा असेच लावतो एकमेकांना", ऋजुता.
"मला तुला एक सांगायचंय. ऋजुता, सॉरी हं , माझ्यामुळे तुझा तेव्हा गैरसमज झाला होता दादा आणि माझ्याबद्दल. अग मी तर त्यादिवशी तेवढ्यापुरतं सहज गमतीने म्हणाले होते आणि नंतर विसरूनही गेले. राहूनच गेलं ते तसंच. सॉरी. दादा मी कान पकडलेत हं, बघ". विधी कान पकडत म्हणाली.
"ठीक आहे ग, इट्स ओके. विराज का मारलंस रे तिला मगाशी?", ऋजुता तिच्या पायाकडे बघत म्हणाली.
"अग, जेव्हा बघावं तेव्हा नुसती खोड्या करत असते माझ्या", विराज.
"अरे लहान आहे ती. हक्कच आहे ना तिचा. तू करत जा ग ह्याच्या खोड्या. माझा फुल सपोर्ट आहे तुला" , ऋजुता विधीला टाळी देत म्हणाली.
"अग काय हे, तू माझी मैत्रीण आहेस की हिची?", विराज डोक्याला हात लावत म्हणाला.
"ते कळेलच तुला", दोघीही हसत एकदमच म्हणाल्या.
"ए चला आवरून घेऊया लवकर अन खाली जाऊ या. बाबा घाई करताहेत बरं का. कॅब येईल आता. दादा, घेतलंस ना सगळं? पासपोर्ट, तिकीट, बासरी? डायरी? चार्जर वगैरे?", विधी.
"हो ग. झालं सगळं ". विराज बॅगला लॉक लावत म्हणाला.
एकदा वजनही चेक करून घेतले आणि मग सगळे बॅग वगैरे घेऊन खाली आले . वीणाताईनी रेखाताईंसाठी थोडा चिवडा आणि मठरी ऋजूजवळ दिलं.
"अहो, चहा घेतलात ना ? गाडी आली की तुम्ही सामान ठेवा. मी आलेच तयार होऊन", वीणाताई विनीत यांना म्हणाल्या.
"अग आई, तू कुठे निघालीस आता?", विराज.
"अरे कुठे काय? तुझ्याबरोबर येतोय आम्ही", वीणाताई.
"आई ,राहू दे ना , तुझी खूप दमणूक झालीय ग एवढ्यात आणि आजही. रात्री उशीर होईल परत पोचायला. त्यापेक्षा तू घरी आराम कर आता . बाबा येत आहेत ना . पुरे आहे न मग".
"अरे तिची इच्छा असेल तर येऊ दे ना तिला बरोबर. तिचंही बाळ पहिल्यांदाच परदेशी जातंय ना. तेवढ्याच गाडीमध्ये गप्पा होतील", विनीत हसून म्हणाले.
"हो ना बाळ, आम्ही पण येणार", विधी खळखळून हसत म्हणाली.
ऋजुताही ते ऐकून विधी - विराजकडे बघत हसली.
"बरं विराज, लाडूंचा डबा व्यवस्थित मावला ना बॅगमध्ये? ", वीणाताई.
"हो , एकदम परफेक्ट डबा दिला काकूंनी. कपड्यांच्या चळतीवरच ठेवता आला. नीट मावलाय", विराज.
"अग आई, तो मावत नसता तर त्याने दोन तीन कपडे कमी केले असते पण तो डबा मात्र नक्की बसवला असता बॅग मध्ये", विधी हसत विराजकडे बघत त्याला चिडवत म्हणाली.
विराजने तिला एक लुक दिला . तशी विधी गडबडून सावरत म्हणाली, "म्हणजे एक तर लाडू आवडतात ना त्याला आणि त्यात काकूंनी एवढे करून पाठवल्यावर तर मग नेणारच न तो".
"हो हो ठीक आहे ना ", विनीत हसून म्हणाले.
विराज देवाच्या आणि आईवडिलांच्या पाया पडून गाडीत खिडकीशी बसला. विधी, वीणाताई, विनीतही गाडीत बसले. ऋजुताने
"ऑल द बेस्ट, हॅपी जर्नी अँड टेक केअर. पोचलास की कळव" , ऋजुताने गाडीच्या खिडकीतून विराजला हस्तांदोलन करत शुभेच्छा दिल्या.
तिचा हात क्षणभरच हातात आला असेल पण विराज तेवढ्यानेच थोडा भावुक झाला. निरोपाचा क्षण हा नेहमी इतका कठीण का असावा बरं? "असाच हा हात कायमचा माझ्या हाती देशील का ग? " , तो मनातच म्हणाला.
विनीतना लक्षात आलं की विराज भावुक होतोय. ते तो क्षण सांभाळत म्हणाले , "येतो बेटा ऋजुता आम्ही. नीट जाशील घरी".
"हो काका", ऋजुता.
"हळू चालव ग गाडी. गडबड करू नकोस आता. येताना धावपळ झाली तुझी", वीणाताई.
"हो काकू, नीट जाईन", ऋजुता.
"थँक्स ऋजुता. मेसेज करेन पोचल्यावर", विराज.
सगळेच निघाले. विराजने खिडकीतून वळून एकदा ऋजुताकडे बघितले. काहीतरी निसटत आहे, सुटत आहे असं ऋजुतालाही वाटत होतं. तरीही तिने स्मित केले. तो गेल्यावर खूपशी हुरहूर मनात घेऊन तीही आपल्या मार्गाला लागली.
दूरदेशी निघून जाता
क्षणभर वळलास मागे
बस तेवढे पुरे रे
जुळण्यास सर्व धागे
डोळ्यांत गूढ दिसता
ती तगमग मनाची
नवीच ही कशी रे
मग आर्तता जिवाची ?
"आज असं का वाटतंय, की विराजचे डोळे काहीतरी बोलत होते. काहीतरी सांगू पाहत होते. आर्त, आतुर वाटत होते. जणू शोधतोय काहीतरी. काय असावे? ", ऋजुता मनात विचार करत होती.
"मघाशी सायलीने विचारले , आता तुम्ही सगळ्या कधी न्यूज देणार लग्न ठरल्याची? काय ऋजू, कोणी मिळालं की नाही मनासारखा? तिला तर "नाही ग, मी विचार नाही केला अजून" असं म्हणाले मी, पण तेव्हा पटकन विराजचा चेहरा डोळ्यासमोर का तरळला असेल माझ्या? ... काल घरी आलो तेव्हा खोलीत टेबलावर त्याने त्यादिवशी दिलेली मोगऱ्याची फुलं सुकलेली दिसली अन आठवण आली त्याची. भेटावसंही वाटत होतं. सोमवारी ऑफिसमध्ये भेट होईलच म्हणून समजावलं मी स्वतः ला. अन आज तर तो तिकडे गेला. न कळवता , न भेटता गेला असता तर? बाप रे, विचारही करवत नाहीये. तो गेला आणि मन सैरभैर झाल्यासारखं होतंय. काहीतरी निसटून गेल्यासारखं वाटतंय. एकटं एकटं वाटतंय. असं का वाटतय मला?". असे बरेच प्रश्न मनात घेऊन ऋजुता घरी पोचली.
"आली का छकुली? थँक यू हं", रेखाताई तिला घरात घेत म्हणाल्या. रेखाताईना दिसलं, ऋजुता शांत आणि काहीशी उदास वाटतेय. चेहरा एवढासा झालाय.
"कशाला ग?", ऋजुता.
"अग धावपळ करून लाडू पोचवून दिलेस ना, म्हणून. अजून कशाला?", रेखाताई.
"हं", ऋजुता शांतच होती.
"काय झालं? विराज भेटला?" , रेखाताई.
"हो भेटला. त्याच्याचजवळ दिले. अग तो लंडनला निघालाय. तुला माहीत होतं? म्हणून एवढ्या घाईत लाडू बनवून दिले न तू?", ऋजुता.
"हो ग. विणाताईंची तब्येत बरी नव्हती इतक्यात. त्यामुळे त्यांचं करणं झालं नव्हतं. वाईट वाटत होतं त्यांना. अन त्याला आवडला म्हणून तू सांगितलं होतं ना तेव्हा मला. मग म्हटलं देऊ या. तेवढीच विणाताईंना मदत होईल", रेखाताई.
"हो ग , काकूंना फार आवडले लाडू . बघितले त्यांनी. खूप खूष झाल्या होत्या. मम्मा, तू मला का नाही सांगितलंस ग, विराज तिकडे जातोय ते?", ऋजुता
"अग , सकाळी विधीचा फोन आला होता म्हणून तेव्हा कळलं मलाही. मला वाटलं की झालंच असेल तुमचं बोलणं अन ऑफिसमुळे माहीतच असेल तुला", रेखाताई.
"हं, नव्हतं माहिती ग. तिथे गेल्यावर कळलं. अन मुख्य म्हणजे इथलं सगळं माझ्यावर सोपवलं ग त्याने अचानक असं", ऋजुता.
"होईल ग सगळं नीट. काळजी कशाला करतेस एवढी? बरं तुला कॉफी आणू का? दमलेली दिसते आहेस", रेखाताई.
"नको ग, विधीने चहा केला होता तिकडे तर घेतलाय", ऋजुता.
"बरं, मग जा, आराम कर थोडा वेळ", रेखाताई.
ऋजुता खोलीत गेली . सकाळपासून दमल्यामुळे लगेच तिचा डोळा लागला.
क्रमशः
© स्वाती अमोल मुधोळकर
कथेचे सर्वाधिकार लेखिकेकडे राखीव. कथा किंवा कथेतील कुठलाही भाग कॉपी करू नये. साहित्यचोरी हा गुन्हा आहे.
कसे सामोरे जातील विराज ऋजुता या करिअर मधल्या नवीन आव्हानांना? ही छोटीशी भेट विराजसाठी संजीवनी बनून आलीय. काय होईल त्यांचं पुढे? बघूया पुढील भागांमध्ये.
अभिप्राय कळवल्याबद्दल सर्व वाचकांना मनापासून धन्यवाद.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा