दृष्टी आणि दृष्टिकोन - भाग 38

Drushti, ani, Drushtikon, Viraj, Rujuta, Rajat, Vidhi, Marathi, katha, kathamalika, love, prem, blindness, andh

मागील भागात ...
https://www.irablogging.com/blog/drushti-ani-drushtikon---bhag-37_8758

"अग ए , लवकर ये हं छकुली", रेखाताई आवाज देत म्हणाल्या.

"आई खूप दिवसांनी भेटतोय ना ग, जरा तर गप्पा मारू दे. तू पण ना", म्हणत ऋजुताने पोबारा केला .

"ही मुलगी ना, सदा न कदा घोड्यावरच स्वार असते. सदा घाई ! उत्साहाचा झरा . कुठून आणते एवढा उत्साह कळत नाही मला. एवढी सवय झालीय ना मला तिच्या अशा चुलबुलेपणाची. माझ्या घरातलं चैतन्यच जणू ही", रेखाताई हसत मनात म्हणाल्या आणि स्वयंपाकाला लागल्या.


आता पुढे ...

काहीवेळाने रेखाताईंचा स्वयंपाक आटपला. तेवढ्यात राजशेखर परत आले आणि हातातल्या पिशव्या खाली ठेवत म्हणाले,

"ही घे भाजी अन बाकी सामान".

रेखाताईंनी त्यांना पाणी दिलं पाणी पिऊन ते म्हणाले,

"अग स्वयंपाक झालाय का? झाला असेल तर आपण जेवून घेऊ या. मग मला बाहेरची दोन-तीन काम आहेत , ती करून येईन म्हणतो, माझी सुट्टी आहे तर. उद्या पुन्हा बंद राहतील ना रविवार मुळे. आताच जाऊन करून घेणार होतो खरं तर. पण म्हटलं राणीसरकार वाट पाहतील जेवणासाठी ", राजशेखर.

"हो झालाय स्वयंपाक. घेते जेवायला. मग? सुट्टीच्या दिवशी तरी सोबत जेवायला नको का हो ? रोज तर मी एकटीच असते दुपारी जेवायला. तुम्ही ऑफिसमध्ये आणि ऋजूही ऑफिसमध्ये", रेखाताई म्हणाल्या.

"हं, खरंय. बरं , वाढ तू , मी आलोच फ्रेश होऊन", राजशेखर .

जेवण आटपून राजशेखर परत बाहेर निघून गेले . आता रेखाताईंनी लाडू वळायला घेतले. त्यांचे घड्याळाकडे सारखे लक्ष होतेच. लाडू वळून त्यांनी प्लास्टिकच्या चपट्या चौकोनी डब्यामध्ये रांगेने ठेवून पॅक केले. रजतमुळे त्यांना पॅकिंगचीही बऱ्यापैकी सवय होती . डब्याचे झाकण लावत "हा डबा विराजचा", त्या मनात म्हणाल्या. "दोन-चार लाडू घरीही द्यायला हवेत ना टेस्टसाठी". मग दुसऱ्या एका छोट्या डब्यात त्यांनी दोन-चार लाडू पॅक केले .

"ही ऋजू अजून आली नाही", त्या स्वतःशी म्हणाल्या. त्यांनी तिला एकदोनदा फोन करून बघितला पण ती फोनही  उचलत नव्हती.

"काय बाई ही मुलगी!  फोन तरी उचलावा ना . तरी सांगितलं होतं, लवकर ये. हेही नाहीयेत घरी. मलाच जावे लागेल की काय आता ? पण मी गेले तर घर बंद राहील आणि या दोघांकडेही घराची चावीही नाहीये . हे दमून आल्यानंतर बाहेर थांबावं लागलं आणि चिडले तर? नको नको ".

पाच दहा मिनिटं अशीच गेली.

"काय करावे? वेळ पुढे पुढे जातोय. दोन वाजून गेलेत. पोहोचेपर्यंत ही थोडा वेळ जाईल. मीच तयार होते जाऊदे.   त्यांनी हॉलमध्ये समोरच टेबलवर  ग्लासमध्ये  पाणी भरून ठेवले अन् त्या तयार होण्यासाठी गेल्या.

पाच मिनिटं होत आली असतील तेवढ्यात बेल वाजली. "आली वाटतं " , म्हणत रेखाताईनी दार उघडले. समोर ऋजूला पाहून दारातच पाणी तिच्या हातात देत त्या म्हणाल्या , "अगं किती उशीर! हे घे पाणी पी".

"अगं मम्मा , आत तर येऊ देशील की नाही मला आधी?", म्हणत ऋजू सँडल काढायला लागली.

"नाही , थांब, चप्पल काढू नकोस", रेखाताई.

"मम्मा, खूप ट्रॅफिक होती ग. तुला तर माहिती आहे, ही पुण्यातली ट्रॅफिक म्हणजे! मी निघाले होते केव्हाच. एकतर सायलीला यायलाही उशिर झाला ना ट्रॅफिकमुळे आणि तिच्याच तर लग्नाची पार्टी देणार होतो. आमच्यासाठी वेळ काढून आली ग ती. त्यामुळे तिला भेटल्याशिवाय कसे येणार ग? ", ऋजुता.

"बरं ,बरं, ठीक आहे, ठीक आहे.  दोन वीस झालेत घड्याळात. उशीर झालाय. वीस मिनिटं तरी लागतील जायला. तीन वाजण्यापूर्वी पोचायला हवं तुला. हे घे . हे वीणाताईंकडे घेऊन जायचं आहे . हा मोठा डबा विराजला दे. शक्यतो त्याच्या हातातच दे , म्हणजे गडबडीत इकडे तिकडे ठेवला आणि राहून गेला इथेच , असं नको व्हायला. आणि हं, हा वीणाताईंना दे. घरी तुम्हाला टेस्टसाठी दिले आहेत म्हणावं".

त्यांनी तिच्या केसांवरून हात फिरवत ते नीट केले . आणि "जा लवकर पळ. पण नीट जा हं", म्हणून तिला पाठवले.


इकडे विराजकडे ...

दुपारी विराज , विनीत आल्यानंतर सर्वजण मिळून एकत्र जेवणे आटपली होती. विराज आपल्या खोलीत होता.

" आई मी आता लॉक वगैरे लावून फायनल पॅक करतोय ग बॅग्स . काय द्यायचं राहिलं असेल ते पाठव विधीबरोबर वर", विराजने वरून खोलीतून आवाज देत आईला सांगितले.

"विधी हे घे, हे प्रेसवाल्या कडून कपडे प्रेस करून आले आहेत . त्यातले काही हवेत का बघ म्हणावं. नेऊन दे त्याला. अन हे घे , ही औषधं पण दे ", वीणाताई.

विधीने ते वर नेऊन दिले.

"काय आहे यात ? व्हिक्स, रोल ऑन, मूव्ह, बँड एड ? अग इतकं सगळं कशाला? " विराज त्याकडे बघत म्हणाला.

"ते मला नाही माहित. आईने दिले आहे. ठेव ते", विधी.

"असू दे रे. काही लागलं तर कुठे जाशील वेळेवर घ्यायला? छोटे-छोटे पॅक तर दिले आहेत", वीणाताई.

"हं, घे. आता तर नेशील ना? मी म्हटलं तर माझं ऐकत नाही तू", विधी हसत त्याला चिडवत म्हणाली.

"बघ, बघ, माझ्या आईला माझी किती काळजी आहे ", विराजही हसत तिला चिडवत म्हणाला.

"हो का ? तुझीच आई आहे का फक्त?" विधी नाक मुरडत म्हणाली. "माझी जास्त आहे ती. मी लहान आहे ना".

"ओ हो , बाळच, नाही का ते छोटंसं? ", म्हणत विराज हसत होता.

"अगं विधी , हे नेलं नाहीस का? हे चिवड्याचे पॅकेट इथेच राहिले आहे", वीणाताईंनी खालून आवाज दिला.

विधी खाली येऊन ते घेऊन परत गेली . "हे घे ", चिवड्याचे पॅकेट त्याला देत म्हणाली. विराजने बॅगमध्ये जागा करत ते ठेवले.

"अग अन मसाले भरले होते न मगाशी? ते इथेच ठेवशील का? काय बाई वेंधळी मुलगी आहे. कुठे लक्ष आहे कोणास ठाऊक ", वीणाताई डोक्याला हात लावत आवाज देत म्हणाल्या.

अन तिकडे विधीने स्वतःशी "राहिलंच" म्हणून जीभ चावली.
खरच होतं ना. तिचं लक्ष सारखं आपलं घड्याळाकडे अन ...

"आले ग", म्हणून परत खाली गेली आणि घेऊन आली.  ते विराजच्या हाती दिले. त्याने ते बॅगमध्ये ऍडजस्ट करत ठेवले. अन विधी पुन्हा खाली गेली.

तेवढ्यात ऋजुता तिथे पोचली. दरवाज्याची बेलही वाजवण्याची गरज पडली नाही तिला. लोखंडी जाळीच्या दरवाज्यातून विधीला लगेच दिसली ती . विधीच्या जीवात जीव अन चेहऱ्यावर खूप आनंद आणि उत्साह आला. तिने ये ये म्हणत स्माईल करत ऋजुताला आत घेतले.

"ये, ये, अगदी बरोबर वेळेत पाठवले ग बाई रेखाताईंनी लाडू करून तुझ्याबरोबर", वीणाताई

ऋजुताने छोटा डबा विणाताईंच्या हातात देत "हे घरी खाण्यासाठी दिलेत आईने आणि हे विराजला द्यायचे" , म्हणत आईचा निरोप सांगितला.

वीणाताईंनी डबा उघडून बघितला. उघडल्या बरोबर वेलची-जायफळ घातलेल्या लाडूंचा सुगंध नाकात शिरला. अतिशय सुबक आकाराचे आणि खरपूस भाजून केलेले अन नीट मांडून ठेवलेले लाडू बघितले आणि वीणाताई खूपच आनंदित झाल्या. लाडूवर बेदाणे लावलेले होते. मध्येच काजूचे तुकडेही डोकावत होते.

"सुगरण आहेत हो रेखाताई अगदी. किती सुंदर दिसताहेत लाडू. म्हणूनच आवडले होते विराजला. विधी , बघ ना. धन्यवाद सांग बरं का ऋजुता माझ्याकडून आईला. नाहीतर राहू दे, मीच करेन फोन  ", वीणाताईंनी विधीलाही दाखवत म्हटले.


"ये ना, हे दादाला देऊ, चल तो पॅकिंगच करतोय" , म्हणत विधी तिचा हात पकडत तिला वर विराजच्या खोलीत घेऊन गेली.

विराज पाठमोरा कोणाशीतरी फोनवर काही कामाचे बोलत बॅग मधलं सामान ऍडजस्ट करत होता. त्यामुळे त्याला खाली काय चाललंय काही कळलं नव्हतं. दोघी आल्या तरी त्याचे यांच्याकडे लक्षच नव्हते.

ऋजुताने बघितलं तर खाली समोरच मोठ्ठीशी बॅग भरून उघडीच होती . त्यात कपडे, ब्लॅझर, टाय इत्यादी सगळं दिसत होतं. बाजूला आणखी एक बॅग, लॅपटॉप वगैरे इतर गोष्टी होत्या. बेडवर एकदोन वस्तू ठेवल्या होत्या, बहुदा तो बॅगमध्ये त्या ऍडजस्ट करणार असावा. विधीने ऋजुताला तोंडावर बोट ठेवून गप्प रहा आणि तो डबा त्याला दे असा इशारा केला आणि ती त्यांच्यासाठी चहा कॉफी करायला खाली निघून गेली.

ऋजुताला कळेना इतकी सगळी तयारी कसली चाललीय. ती तिथेच विराजचे बोलणे संपण्याची वाट बघत उभी राहिली. विराजचा फोन संपला आणि मग ऋजुताने लाडूचा डबा खाली पाठमोरे बसलेल्या विराजसमोर धरला. "हे घे, ठेव , आईने दिलेत".

"अजून काय असेल ते एकदाच दे बरं. असं एकेक देऊन कितीदा मला सामान ऍडजस्ट करायला लावशील? निघायची वेळ होत आहे ना", विराज आता जरा मोठयानेच म्हणाला होता. त्याला वाटलं होतं की विधीनेच पुन्हा काहीतरी विसरलेले आणून दिलंय आणि त्याला सतावते आहे.

ऋजुताला काही कळेना. एकतर याच्यासाठी एवढं धावत पळत आणलंय अन हा थँक यू म्हणणं तर दूरच राहिलं, ओरडतो आहे माझ्यावर. खडूसपणा गेला नाही का अजून चिडकूमहाराजांचा?

"पण मी तर हे एकच आणलंय. अजून काही हवं होतं का?", ऋजुता शांतपणे म्हणाली.

मग कुठे विराजने वळून पाहिले. अन मग मात्र तो डोळे विस्फारून बघतच राहिला. ही आत्ता इथे? लाइट ब्लू रंगाची जीन्स, त्यावर मरून रंगाची कुर्ती, गळ्याभोवती स्कार्फ , अर्धे केस क्लचमध्ये बांधून अर्धे मोकळे ठेवलेले. छोटेसेच पण सुंदर इअरिंगस...

"ऋजुता? इथे? नाही नाही . छे, काहीतरीच. ती कशी येईल इथे आता? भास होतोय मला" . विराजचे मनात विचार सुरू होते. त्याने डोळे घट्ट मिटून दोन तीन वेळ आपली मान डावी उजवीकडे फिरवत झटकली. तरीही ऋजुता समोरच दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर प्रश्नार्थक भाव होते.

"काय रे , असं काय करतोय? अन तू लग्नाला येतो म्हणाला होतास ना? आलाच नाहीस. आता जातोय का दुसऱ्या कोणत्या लग्नाला ? ही एवढी सगळी तयारी ? पण हे सगळे तर फॉर्मल कपडे दिसताहेत. यात एकही कुर्ता वगैरे नाही घेतलंस का?", ऋजुताचे इतके सारे एकामागे एक प्रश्न ऐकून आता मात्र विराजला खात्री पटली की हा भास नाही . त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला आणि तिच्या प्रश्नमंजुषेमुळे तो गालातल्या गालात हसू लागला.

"अरे हसतोस काय असा? सांग ना", ऋजुता.

"अग मी कधी म्हणालो मी लग्नाला येतोय? काहीही हं तुझं", विराज.

"अरे तूच नाही का त्या दिवशी फोनवर म्हणाला होतास मी लग्नाला जातोय म्हणून", ऋजुता.

"लग्नाला?" , आता विराजने डोक्याला हात लावला. "म्हणजे तू तुझे मेल वगैरे बघितलेच नाहीस का अजून?".

"नाही. अरे काल रात्री उशिरा आलो आणि आज सकाळपासून काही न काही चाललंच आहे. उद्या सुटीच आहे ना , बघेन मग", ऋजुता.

"घ्या, म्हणजे लॅपटॉप सोबत नेला नव्हतास तू?", विराज.

"नाही रे, तिकडे कुठे नेणार? एवढया गोंधळात कुणाचा पाय बिय पडला म्हणजे? आणि लहान मुले कमी असतात का ? कुणाच्याने तुटला फुटला तर? मग काय करणार ऑफिसचा लॅपटॉप आहे ना", ऋजुता.

"Ok, ok, म्हणजे एकंदरीत तुला काहीच माहिती नाहीये तर!", विराज.

"अरे, आता काय माहिती नाही ते सांगणार आहेस का लवकर?", ऋजुता.

"अग, लंडनला जायला निघतोय मी आता थोड्या वेळात", विराज.

"काय? काय म्हणालास? लंडनला जातोय तू ? अन तेही आताच ? हे कधी झालं? आणि मला आत्ता सांगतोय तू?", ऋजुताचे डोळे आश्चर्याने विस्फारले होते. आवाजात उत्साह होता अन तिला सांगितलं नाही त्यामुळे एक नाराजीची छटाही डोकावत होती. धक्काच होता तिच्यासाठी.

"अग त्यादिवशी फोनवर मी तुला हेच तर सांगितलं होतं. लंडनला जातोय असं. तू चुकून लग्नाला ऐकलंस वाटतं. म्हणूनच तुझी अशी कोल्ड रिऍक्शन होती तर ! ", विराज हसला.

"ओह, त्या बँडच्या आवाजात ना काही नीट कळत नव्हतं. त्यामुळे असं झालं असेल. सॉरी. पण हे कधी झालं?", ऋजुता.

"अग GRACE म्हणून एक प्रोजेक्ट सुरू होतोय. ती नाही का एकदा खूप वेळ अगदी दुपारी उशिरापर्यंत मीटिंग चालली होती बघ आमची कॉन्फरन्स रूममध्ये. काही फॉरेन डेलिगेट्ससुद्धा आले होते त्यासाठी. ती मीटिंग या प्रोजेक्टसाठीच होती. मी बरेच दिवसांपासून या प्रोजेक्ट वर काम करतोय".

"ओह अच्छा , त्यादिवशीची मीटिंग. म्हणूनच म्हणाला होतास का मला , ऑफिसमध्ये बरच काही सुरू असतं म्हणून !" , ऋजुता हसली.

"मी खूप खूष आहे तुझ्यासाठी. इट्स सो एक्सयटिंग !
लंडनला राहणं, काम करणं, नवीन अनुभव ... आता कळलं, म्हणूनच आमच्या मातोश्रींनी अक्षरशः पळवलेच मला इकडे , तुला वेळेवर लाडू देण्यासाठी. तरीच तिची लाडू बनवण्याची इतकी घाई सुरू होती ", ऋजुताला आता उलगडले होते.

विराज हसला. त्याने डबा उघडून बघितले . " ए हा तसाच लाडू दिसतोय , मला आवडला होता तसा. तू माझ्याकडून थँक्स सांग हं काकूंना. अन आता मला राहवत नाही आहे हं. मी एक आताच खातोय" , म्हणत त्याने एक लाडू घेतला.

"हं, बघ ना, माझ्या आईला आपल्या लेकीची सुद्धा आठवण राहिली नाही  लाडू झाल्यावर खिलवण्यासाठी. नाहीतर टेस्ट करायला पहिला नंबर माझा असतो. दादाच्याही आधी मला देते ती. यू नो, लहान असल्याचा फायदा. पण आज तर अगदी बाहेरच्या बाहेरच पिटाळले मला. आता मी भांडणारच आहे तिच्याशी.  पण तिला तरी कसं अन कधी माहीत झालं कोणास ठाऊक . मला तर काही बोलली नाही. पण वेळही मिळाला नाही तिला बोलायला. मी घरी नव्हतेच ना आज", ऋजुता मजेने म्हणाली.

हे ऐकता ऐकता विराजने तिच्यापुढे एक लाडू धरलाच होता.

"हे घे, अग खा. नाहीतर माझ्या पोटात दुखेल लाडू खाल्ल्यावर", विराज हसत म्हणाला.

"हो रे, बघू दे जरा नीट झालाय की नाही ते. त्याचं काय आहे मीच भाजलंय ना बेसन त्यासाठी", ऋजुता आता मात्र गंभीरपणे म्हणत होती.

"काय? बाप रे. रिस्कच आहे मग तर. वाटच लागेल माझी परदेशात ", विराज.

ऋजुताचा चेहरा एवढासा झाला.

"अग चिल. गंमत करतोय मी वेडू. खरं सांगायचं तर दुप्पट आनंदाने खाईन मी ", विराज.

"का रे? दुप्पट कसा?", ऋजुता.

"अं .... अग ... ते ..." , विराज गोधळला, काय सांगावे, "हं , काकूंनी इतक्या प्रेमाने पाठवलेत ना.म्हणून"

"हं, बरं ठेव ते आता लवकर. अन कधी येणार आहेस परत? आणि PACE चं काय होणार रे मग, तू तिकडे जातोय तर?", ऋजुता.

"मी तीन महिन्यांसाठी जातोय. आणि PACE चा कारभार एका सुयोग्य व्यक्तीकडे सोपवला आहे . त्यामुळे तो वेळेवर पूर्णत्वास जाईल. काळजी नसावी ", विराज.

"अच्छा ! ", ऋजुता काहीशी शांत, उदास, नाराज वाटत होती . आता विराजसोबत काम करायला मिळणार नाही का असं तिला वाटत होतं , अन ती आपल्याच तंद्रीत विचार करत होती.

"अग विचार तरी , की कोण सांभाळणार आहे आता", विराज.

"हं , सांग ना , कोण?", ऋजुता.

"मिस ऋजुता कुलकर्णी" , विराज तिच्याकडे हसून बघत हाताची घडी करत म्हणाला.

"हं, कधी जॉईन होणार आहेत त्या?" , ऋजुता आपल्याच नादात होती.

"त्यांनी ऑलरेडी जॉईन केलेलंच आहे", विराज.

"एक मिनिट, कोण म्हणालास? ऋजुता? म्हणजे मी? " , ऋजुता विचारात पडली होती.

"हो. तू नाहीतर अजून कोण सुयोग्य असणार? नाउ यू विल डिरेक्टली रिपोर्ट टू पुनीत सर.  पण ही नेहमीची ऋजुता वाटत नाहीये. कोणतीही नवीन गोष्ट असो अगदी उत्साहाने सामोरी जाणारी ऋजुता आज अशी चिंतेत का दिसतेय? माझ्या निर्णयावर विश्वास आहे ना तुझा? अग तुझ्या क्षमता आणि  तुझी योग्यता तुझ्यापेक्षा जास्त मला माहिती आहेत. वेडू, माझ्याकडे बघ, काय झालं? पाणी का आलंय डोळ्यात? तुला आनंद नाही झाला का? अग तू प्रोजेक्ट मॅनेजर होते आहेस. आहेस कुठे?", विराज तिच्या खांद्यावर थोपटत तिला आश्वस्त करत म्हणाला.

"नाही रे, काही नाही. आनंद तर होतोच आहे, पण टेन्शनही येतंय. सगळंच खूप शॉकिंग आहे ना. एकदम धक्क्यावर धक्के. मी सुरवातीपासून तुझ्यासोबतच काम केले आहे ना, तर असं अचानक चेंज होईल असं आलंच नाही कधी मनात. म्हणजे आतापर्यंत तू जसा सांभाळून घ्यायचास ... तू एकतर असा अचानक तिकडे जातोय ,  इकडे ही नवीन जबाबदारी ... तू इथे असतास, कधी अडलं तर सांगायला , तर मग काही प्रॉब्लेम नसता. Anyways ... बरं झालं तू जाण्या आधी आपली एकदा भेट होऊन हे माहिती झालं मला", ऋजुता.

"मला माहिती आहे , मी खूप अचानकपणे सगळं तुझ्यावर सोपवून जातोय, तुला अडचणीत टाकतोय. पण अग काळजी करू नकोस . तू नक्की अगदी समर्थपणे हॅन्डल करशील. मला विश्वास आहे. मी तिकडे असलो तरी तुला फोनवर नीट हॅन्ड ओव्हर देईन. ती जबाबदारीच आहे ना माझी. इन फॅक्ट काही मेल्स सुद्धा करून ठेवले आहेत तुला. डिटेल्स, फाईल्सही पाठवले आहेत. काही अडचण आली तर कधीही मला फोन कर, मेल कर. मी आहेच ना. सगळं मॅनेज होईल नीट. एकदा हे स्थिरस्थावर झालं की दृष्टीकडेही थोडंफार बघशील ना? म्हणजे बाबा आणि पराग आहेतच ग , पण ते लेडीज डिपार्टमेंट  ... तिथे तुझी मदत लागेल मुख्यतः. बरं, सोड ते सगळं आता अन चल हस बघू. असं बाय करणार आहेस का मला? ", विराज तिला समजावत म्हणाला.

ऋजुताचा मूड थोडा निवळला. "हं, करेन मी सगळं नीट हॅन्डल, डोन्ट वरी " , तिने स्माईल केले.

"नाउ दॅट्स लाईक युजुअल कॉन्फिडन्ट ऋजुता!  ऋजू, माझी वाट पाहशील ना ग?", विराज म्हणाला. आता मात्र त्याचा चेहरा गंभीर , उत्तरासाठी आतुर दिसत होता. डोळ्यात जणू काही प्राण आणून तो तिच्या बोलण्याची वाट बघत होता. तिच्या नजरेत काहीतरी शोधत होता. त्याची ती निर्मळ पण आतुर नजर ऋजुताला नकळतपणे अस्वस्थ करत होती. तिच्या मनात कालवाकालव होत होती. काहीतरी तिचं स्वतःचं दूर जातंय असं तिला वाटत होतं. जीवाला खूप हुरहूर लागली होती. मात्र हे का हे कळत नव्हतं. किंबहुना का असा विचारच आला नाही तिच्या मनात. दोघांचीही नजर एकमेकांच्या नजरेत कैद झाली होती. ते तसेच स्तब्ध राहिले होते. दोघेही कदाचित मौनात शब्द अन नजरेत अर्थ शोधत होते.


क्रमशः

© स्वाती अमोल मुधोळकर
कथेचे सर्वाधिकार  लेखिकेकडे राखीव. कथेतील कुठलाही भाग कॉपी करू नये. साहित्यचोरी हा गुन्हा आहे.

कथेला देत असलेल्या प्रतिसादाबद्दल सर्वांना धन्यवाद.
हा भाग कसा वाटला नक्की कळवा. जसे वाचक प्रेमळ हक्काने मोठा भाग टाका अस सांगतात, तसेच आम्हीही प्रेमळ हक्काने वाचकांना म्हणत असतो की कंमेंट्स सुद्धा मोठ्या आणि जास्त हव्यात बरं का, तेव्हा कंजूषी करू नका, स्पेशली ज्यांनी अजून एकदाही कंमेंट केलेली नाही.  सर्वांनी नक्की कळवा. कारण आमची लिहिण्याची प्रेरणा तीच असते ना !

🎭 Series Post

View all