दृष्टी आणि दृष्टिकोन - भाग 37

Drushti, ani, drushtikon, Viraj, Rujuta, Vidhi, Rajat, marathi, katha, kathamalika, love, prem, blindness, andh, Vinit

मागील भागाचा सारांश:

विनीत आणि विराज यांचे बोलणे झाले. त्यांनी विराजला आपल्या वेळेचा एक प्रसंग सांगून समजावले, हिंमत दिली.  ते निघून गेल्यावर विराजने सामान आवरायला घेतले . थोडेफार केल्यावर त्याचे मन लागत नव्हते . त्याला ऋजुताची खूप आठवण येत होती. काही वेळाने विधी तिथे आली . आणि विराजचा मूड चांगला होऊन झोप लागावी म्हणून त्याला केसांना तेल लावत त्याच्याशी गप्पा मारू लागली.
https://www.irablogging.com/blog/drushti-ani-drushtikon---bhag-36_8555

आता पुढे ...

दुसऱ्या दिवशी सकाळी

विराजकडे...

सकाळी लवकर उठून वीणाताई आपले आवरून कामाला लागल्या होत्या. स्वयंपाकघरात इकडे तिकडे त्यांची लगबग सुरू होती. आज विराजला आवडतात म्हणून नाश्त्याला डोसे, चटणी आणि सांबार करायला घेतलं होतं त्यांनी. जेवणही त्याच्या आवडीचेच सगळे ठरवले होते आज.

विधी आपला अभ्यास करून घेत होती. विराज खोलीतून खाली आला. येताच म्हणाला ,"आई काय मस्त सुगंध येतोय ग फोडणीचा, काय बनवते आहेस? ".

"डोसा आणि सांबर केलंय तुझ्या आवडीचं. आज खाऊन घे पोटभर. मग तीन महिने काही माझ्या हातचं मिळणार नाही खायला", वीणाताई.

"हो ना ग. किती आठवण येईल मला तुझी", विराज.

"अरे पण तिथे गेल्यावर काय करशील? मिळणार आहे का जेवण तयार? म्हणजे हॉटेल आहे की काय?", वीणाताई.

"गेल्यावर सुरवातीचे पाच सहा दिवस हॉटेलमध्ये आहे. नंतर मग अपार्टमेंट शोधून स्वतःच करायचं आहे सगळं".

"अग बाई, मग हे तू आत्ता सांगतोय का रे?", वीणाताई काळजीने म्हणाल्या.

"का काय झालं?", विराज.

"अरे, मग जरा काही दोन चार पदार्थ बनवायला शिकून घेतलं नसतं का तू?", वीणाताई.

"हो ना, तरी मी म्हणत असतो, प्रत्येकाला रोजच्या जगण्यापुरतं जेवणखाण बनवता आलंच पाहिजे, मग ती मुलगी असो वा मुलगा . म्हणजे कोणावर अवलंबून राहावं लागत नाही आणि चांगलं खायलाही मिळतं. आता येईल ना पंचाईत!", विनीत पेपर वाचता वाचता बाजूला करून म्हणाले.

"हो ना, कधी म्हटलं तर इंटरेस्टच दाखवला नाही त्याने. मग मीही सोडून दिलं मदत कर म्हणणं ", वीणाताई.

"अग आई, खरं आहे. पण जाऊ दे ना, एक तर वेळच कुठे मिळाला ग, आणि दुसरं तुला बरंही नव्हतं ना. हीच तर किती धावपळ होतेय तुझी" , विराज म्हणाला.

"बघ दादा, म्हणून म्हणते न मी, की मला मदत करत जा तू, मी जेव्हा आईला मदत करत असते तेव्हा. म्हणजे शिकला असता की नाही आतापर्यंत. उपाशी राहायची वेळ येईल न आता", विधी पायऱ्या उतरत मिश्किलपणे म्हणाली.

"हो ग, शहाणे. तू आईला मदत कर अन मी तुला मदत करू काय? कान टवकारलेलेच असतात काय ग तुझे? दादाला कोणी रागावताना दिसलं की स्वारी लगेच वाहत्या गंगेत हात धुवून घ्यायला हजर ! ", विराज हसून तिचा कान पकडत म्हणाला.

विधी, वीणाताईही हसू लागल्या. विनीतही हसले.

"तुला विचारून करेन ग आई मी. तू काळजी नको करू. थोडंफार लक्ष होतं माझं. आणि यू ट्यूब पण आहे ना मदतीला आमच्या सारख्यांसाठी. विधी शोधून देईल मला सोप्या रेसिपी. देशील ना ग नकटू?", विराज विधीचे नाक चिमटीत पकडत म्हणाला.

"हो हो, आहेच ना लहान बहीण सेवेशी सादर !", विधी मिश्किलपणे म्हणाली.

"आई, बघ ना ही कशी बोलते", विराज.

"आई , आधी हा नकटू म्हणाला मला. माझं नाक काय नकटं आहे का? चांगलं चाफेकळी नाक आहे माझं", विधी ऐटीत नाक मुरडत म्हणाली.

"हो हो, नाक तर चाफेकळी आहे ... पण ...", विराज खुर्चीवरून उठत पळायची तयारी करत म्हणाला.

"पण ? आता पण काय अजून?", विधी.

"नाक चाफेकळी आहे .... अन त्याच्यावर रागही तेवढाच आहे म्हणून लाल लाल चाफेकळी आहे ती", असे म्हणून विराज हसत पटकन उठून बाजूला झालाच तिथून .

विधी पण उठून त्याच्या मागे त्याला मारायला धावली. विराज तिला चुकवत पुढे पळत होता. दोघेही डायनिंग एरिया मधून हॉल मध्ये हॉलमधून डायनिंग एरिया मध्ये पळत होते. वीणाताई, विनीतना हसू येत होते. थोडया वेळात विराज दमून सोफ्यावर बसला आणि विधीने त्याला पाठीत एक गुद्दा घातला.

"ए बस बस आता, बघ तू मारशील ना तर काही आणणारच नाही मी लंडनहून तुझ्यासाठी. बघ मग " , विराज भुवया उडवत म्हणाला.

विधी लगेच थांबत त्याच्या बाजूलाच सोफ्यावर बसत लाडिकपणे म्हणाली, "किती छान आहे न माझा दादा! असं नाही करू. खूप खूप गिफ्ट आणू आपल्या लहान बहिणीसाठी. लाडकी आहे न मी तुझी?".

"हो न? आता आठवलं का ते?", विराज हसून म्हणाला.

"बरं विधी, चल ये बरं इकडे जरा. जरा दोन तीन डोसे लाव. आणि एकीकडे थोडे थोडे मसाले भरून दे त्याला छोट्या छोट्या झिपलॉक बॅग्स मध्ये. गेल्या गेल्या कामा येतील. मग नंतर आणेल तो तिथे सवडीने ".

"दादा , ये तू पण इकडे , मी शिकवते तुला डोसा कसा लावायचा ते. एखादा कर म्हणजे एकदा हाताखालून जाईल तर सोपं पडेल तुला", विधी.

"वजन वगैरे केलंस ना रे बॅग चं? आहे का जागा? ", वीणाताई.

"आहे ग . भरपूर शिल्लक आहे , वजन आणि जागाही", विराज.

त्याची काही आवश्यक वस्तू राहायला नको म्हणून ,  वीणाताई आठवून आठवून त्याला हे घेतले का ते घेतले का विचारत होत्या, देत होत्या.


ऋजुताकडे ...

इकडेही रेखाताईचं शुचिर्भूत होऊन चहा नाश्ता वगैरे बनवणे सुरू होते. तेवढ्यात ऋजुताही आपले आटपून आली.

"आई गुड मॉर्निंग. काय करत आहेस ? गरमागरम नाश्ता करावासा वाटतोय तुझ्या हातचा. मिस करतेय मी तो" , ऋजुता स्वयंपाकघरात असलेल्या रेखाताईंच्या गळ्यात पडत म्हणाली.

"हो ग छकुली, तेच करतेय. पण तू आजही लवकर उठलीस
आजच्या दिवस आराम करायचा ना. खूप धावपळ झालीये लग्नामध्ये तुझीही".

"जाग आली ग रोजच्याप्रमाणेच. बरं, मी न, घर झाडून वगैरे घेतलंय अन कपड्यांचं बघत होते. काही कपडे लावले आहेत आपले मशीनला धुवायला. माझे दोन तीन ड्रेसेस मी ड्रायक्लीनिंगला देत आहे. तुझ्या काही साड्या वगैरेही द्यायच्या असतील तर सांग मला. थोडया वेळाने जाऊन देऊन येईन  मी.

"हो देते. चल आधी शांततेने नाश्ता करू या सगळे. बाबांना बोलव", रेखाताई.

नाश्ता वगैरे आटपल्यावर काही वेळाने राजशेखर म्हणाले, "अग काही  भाजी, सामान वगैरे लागेल ना? मी घेऊन येतो.  ऋजु, चल सोबतच जाऊ. तुझंही काम करून घेऊ".

"हो ठीक आहे. मम्मा येतो ग आम्ही जाऊन", ऋजुता म्हणाली आणि ते त्या कामासाठी बाहेर गेले.


काही वेळाने विराजकडे

"विराज, जरा चल माझ्या बरोबर  ", विनीत.

"अहो, आता घाईत घाई कुठे निघालात तुम्ही दोघे?", वीणाताई.

"अग लगेच येतो अर्ध्या तासात. एक काम आहे, पुन्हा तो गेला की राहून जाईल. विराज दुपारी तीन वाजता निघणार आहे. होईल सगळं तोपर्यंत व्यवस्थित. काळजी नको करू" विनीत म्हणाले आणि ते दोघे निघाले.

ते गेल्यावर वीणाताई जरा खुर्चीवर टेकल्या आणि नाश्ता करू लागल्या. विधी म्हणाली, "अग आई , तू रेखाकाकूंना सांगितलंच नाही ना ग , दादा जातोय ते".

"नाही ग, आठवणही नव्हती अन त्या गावाला गेल्या ना. सांगेन नंतर", वीणाताई जरा दम घेत म्हणाल्या.

" त्यांना वाईट वाटेल ना आई, सांगितलंही नाही म्हणून. थांब फोन करते, आले असतील तर बोल दोन मिनिटं. नसतील आले तर राहिलं", विधी म्हणाली अन तिने लगेच घरच्या नंबरवर फोन लावलाही. ( ही विधी पण ना ???? ????)

रेखाताई आताच आवरून जरा पेपर वाचत होत्या. ऋजू बाबांबरोबर गेलेली होती. तेवढ्यात फोन वाजला.

"हॅलो", रेखाताई.

"हॅलो काकू, विधी बोलतेय. आलात का तुम्ही सगळे गावाहून परत?

"हो ग, काल रात्रच झाली बघ पोचायला. काय म्हणतेस, कशी आहेस? "

"मी एकदम मजेत. दादा लंडनला जातोय ना तर त्याचीच गडबड चाललीय सध्या घरी", विधी.

"अगबाई, हो का? कधी जाणार आहे? ", रेखाताई.

"आजच दुपारी तीन वाजता निघतोय. रात्रीची फ्लाईट आहे", विधी. "ऋजुता आहे का? "

"अगबाई आजच का ! बरं .
अग नाही , ऋजू बाहेर गेलीय जरा. वीणाताई कामात आहेत का? नाहीतर दे ना त्यांना फोन", रेखाताई.

"आहे आई , देते हं" , विधीने आईकडे फोन दिला.

"हॅलो, आलात का रेखाताई लग्नाहून परत? कसं झालं लग्न?", वीणाताई.

"लग्न एकदम छान झालं. सगळं अगदी व्यवस्थित झालं. अहो विराज लंडनला चाललाय म्हणे आज? आता विधी सांगत होती", रेखाताई.

"हो ना, फार गडबडीत ठरलंय त्याचं. अगदी आठवड्यापूर्वीच अन त्यात मी जरा ताप सर्दी खोकल्याने आजारी होते . सगळी गडबडच सुरू आहे.", वीणाताई. आता बोलतानाही त्यांना थोडा खोकला येतच होता.

"अगबाई, हो ना, एकदमच धावपळ झाली असेल सगळं असं एकत्रच म्हटल्यावर. थोडेफार फराळाचे वगैरेही केले असेल ना त्याच्याबरोबर देण्यासाठी?", रेखाताई.

"हो ना, थोडं थोडं चिवडा, मठरी आणि थोडी शेव केलीय. पण गोड काही नाही झालं हो करणं, काहीतरी करेन म्हटलं होतं. पण नाही झालं. आणि बाकी वस्तू देणे , कपडे हे ते असच चाललय सगळं", वीणाताई.

"हं, मी एक सुचवू का ? तुम्ही बाकी तयारी आटपून घ्या. मी पाठवते थोडेसे लाडू करून . मी पडल्यावर बरी झाले ना त्यानंतर ऋजुच्या टीममधल्या या मुलांसाठी ऑफिसला पाठवले होते मी एकदा . तेव्हा विराजला आवडला होता लाडू . तसाच करून पाठवते दुपारपर्यंत", रेखाताई.

"अहो, तुम्ही कशाला त्रास घेताय? आताच आला आहात तर थकवा असेल ना. आराम करा आज", वीणाताई.

"तेवढं झालं की मग करेन ना आराम . मी तुमची काळजी समजू शकते हो. आईचं मन असतं ते . माझं सुद्धा होतं असं रजत जातो तर. आपल्या मुलांसाठी काळजी वाटणारच ना. करू या आपण . काळजी नका करू तुम्ही. ", रेखाताई.

"मनापासून धन्यवाद बरं का . एकदम रिलॅक्स झाल्यासारखे वाटतेय. नाहीतर अशी हुरहूर लागून राहिली होती की हे नाही जमत आहे करायला", वीणाताई.

"आणखी एक, तुम्ही ठीक झाल्यावर दृष्टी मध्ये जाल ना तेव्हा सांगा मलाही. मीही येईन बरोबर", रेखाताई.

"हो हो नक्की", वीणाताई.

"बरं मग ठेवते फोन", रेखाताई.

रेखाताई उठल्या अन लगेच कढई घेऊन त्यात तूप घालून गॅसवर ठेवले आणि लाडूसाठी बेसन भाजायला घेतले. तितक्यात ऋजुता परत आली.

"आई हे काय? अग आज लगेच तू लाडू बनवते आहेस? खूप गोड खाल्लय ना आता लग्नात. "

"हो , बरं झालं तू आलीस. ये बरं जरा हलवत रहा हे भाजून होईपर्यंत. मी जरा वेलची कुटून घेते अन बेदाणे वगैरे काढते", रेखाताई.

"अग आई, मी तेच सांगायला आले तुला की काव्याचा फोन आला होता. आमच्या सगळ्या मैत्रिणी लंचला भेटताहेत आता मॉलमध्ये. तर मीही जाते ना. जाऊ दे ना प्लीज", ऋजू त्यांच्या हातातून कढईतला झारा घेत म्हणाली.

"ओ हो, तर यासाठी सकाळपासून लाडी गोडी चालली आहे तर", रेखाताई हसून म्हणाल्या.

ऋजुताने हसून जीभ चावली.

"बरं जा, पण एवढं भाजून झाल्यावर . अन लवकर परत ये बरं का. काम आहे."

"हो. सकाळी म्हणत होती आराम कर अन आता म्हणतेय काम आहे ", म्हणत हसतच तेवढं भाजून ऋजुता पटकन तयार व्हायला गेली.

"अग बाबा कुठे गेलेत ? आले नाही तुझ्याबरोबर परत?" , रेखाताईनी हाक दिली.

"अग बघ ना, गडबडीत मी विसरलेच तुला निरोप सांगायला. त्या ड्रायक्लीन वाल्याला कपडे देत होते तर त्यांना कोणा मित्राचा फोन आला भेटण्यासाठी. तर ते जवळच कॅफे मध्ये गेलेत. येतो म्हणाले अर्ध्या एक तासात", ऋजुता खोलीतून म्हणाली.

रेखाताईनी पीठ परातीत काढून थंड व्हायला ठेवले तोपर्यंत
ऋजुता तयार होऊन लगेच निघालीसुद्धा.

"अग ए , लवकर ये हं छकुली", रेखाताई आवाज देत म्हणाल्या.

"आई खूप दिवसांनी भेटतोय ना ग, जरा तर गप्पा मारू दे. तू पण ना", म्हणत ऋजुताने पोबारा केला .

"ही मुलगी ना, सदा न कदा घोड्यावरच स्वार असते. सदा घाई ! उत्साहाचा झरा . कुठून आणते एवढा उत्साह कळत नाही मला. एवढी सवय झालीय ना मला तिच्या अशा चुलबुलेपणाची. माझ्या घरातलं चैतन्यच जणू ही", रेखाताई हसत मनात म्हणाल्या आणि स्वयंपाकाला लागल्या.


क्रमशः

© स्वाती अमोल मुधोळकर
संपूर्ण कथेचे सर्वाधिकार लेखिकेकडे राखीव.

भाग कसा वाटला ते नक्की कळवा.

🎭 Series Post

View all