दृष्टी आणि दृष्टिकोन - भाग 36

Drushti, ani, drushtikon, Viraj, Duniya, Vidhi, Rajat, love, prem, marathi, katha, kathamalika, blindness, andh

मागील भागात ...

https://www.irablogging.com/blog/drushti-ani-drushtikon---bhag-35_8474

विनीत जायला वळले. दाराशी होते तेवढ्यात विराजने आवाज दिला , "बाबा". विनीत थबकले. विराज त्यांना मिठी मारत म्हणाला, "थँक्स बाबा. तुम्ही मला खूप समजून घेता", त्याच्या डोळ्यात पाणी आले होते. ते पाणी पुसत विनीत म्हणाले,

" वेड्या, तुला जरी मी कडक स्वभावी वाटत असलो ना, तरी लहानपणापासून तळहाताच्या फोडा प्रमाणे जपलं आहे तुला आणि विधीला. आईचं काय आणि माझं काय, तुमचं सगळं चांगलं व्हावं , तुम्ही सुखी रहावं यासाठीच असतं रे सगळं, मग ते रागावणं असो की दटावणे. पण तुम्हा मुलांना नाही कळत ते", विनीतही भावुक झाले होते.

"कळतं हो बाबा, म्हणून तर दुखवायचं नसतं ना तुम्हालाही. म्हणून तर घाबरलो होतो मी सांगायला . अन त्यात हे जाण्याचंही मधेच आलंय, त्यानेही काही कळेना झालंय", विराज.

"अरे ते? त्याची काळजी नको करू. आणि कंपनीचे आभारच मान की तुला अगदी योग्य वेळी पाठवताहेत ते ", विनीत.

"ते कसं काय?", विराज न कळून म्हणाला.

आता पुढे...


विनीत परत येऊन बेडवर बसत म्हणाले, " तुला एक गंमत सांगतो. सीक्रेट आहे हं. माझं आणि वीणाचं लग्न झालं तेव्हा आम्ही वयाने तसे काही फार मोठे नव्हतो. आमचे लग्न होऊन सहा एक महिने झाले असतील. मी जिथे काम करायचो ती कंपनी बंद पडली आणि माझी ती नोकरी सुटली. माझी काही चूक नसताना माझी नोकरी गेल्यामुळे मी चिडचिड करायचो. दुसरे कोण हक्काचे असणार , वीणावरच सगळा राग निघायचा. मी छोट्या छोट्या गोष्टींसाठी तिला ओरडायला लागलो होतो, माझ्याही नकळत. बायकोवर हात वगैरे उचलणे असे अयोग्य प्रकार आपल्या घराण्यात  कधीच नव्हते आणि नाहीत. मीही कधीच हात उगारला नाही , पण चिडचिड फार करायला लागलो होतो. वीणा काही बोलायची नाही . रुसायची, किंवा अबोला धरायची फक्त. पण माझी आणि आईबाबांची काळजी मात्र तरीही ती अगदी नीट घेत असे.

तुझे आजोबा, म्हणजे माझे बाबा, फार धोरणी होते. त्यांनी कायम स्त्रियांना मानानेच वागवले. माझ्या आईलाही कधी ते ओरडून बोलल्याचं आठवत नाही. त्यांचा शब्द म्हणजे प्रमाण. त्यांना माझे असे वीणावर विनाकारण रागावणे अजिबात आवडत नव्हते. परंतु आमच्यामध्ये ते स्वतःहून फारसे काही बोलायचे नाही. काही दिवस त्यांनी फक्त बघितले. एक दिवस मी जरा जोरातच ओरडलो होतो. वीणाच्या डोळ्यात टचकन पाणी आले होते. बाबा तेवढ्यात बाहेरून आले आणि त्यांना तिच्या डोळ्यात पाणी दिसले. ते बघून मात्र त्यांना राहवले नसावे. "सूनबाई, जरा चहा करतेस का" , म्हणून त्यांनी तिला आत पाठवले.

मला म्हणाले , "विनीत, माधवकाकांनी विनीत सध्या रिकामा आहे तर त्याला काही दिवस माझ्याकडे मदतीला पाठव, असा निरोप पाठवला आहे. तर तू उद्या सकाळी जा तिकडे गावाला, दोनेक महिन्यासाठी. आणि हं, सूनबाई आईच्या मदतीला इकडेच राहील".

आईने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला,"अहो..." . पण त्यांनी फक्त हात वर करून आता हेच फायनल असल्याचं सांगितलं. दुसऱ्या दिवशी मी निघूनही गेलो. वीणा बिचारी, डोळ्यात पाणी आले होते तिच्या. पण नाही म्हणायची सोय नव्हती. त्या वेळी फोन वगैरे नव्हते फारसे आतासारखे. त्यामुळे प्रत्यक्ष भेट होईपर्यंत वाट पाहावी लागायची. ते दोन महिने मी तिकडे आणि ती इकडे होतो. दोघांनाही एकमेकांची इतकी आठवण यायची की सगळे भांडण तंटे, रुसवे फुगवे विरहाच्या अग्नीत नष्ट झाले. मी परत आल्या आल्या तिचे हात हातात घेऊन तिची माफी मागितली.

"वीणा, खूप ओरडलो ग मी तुझ्यावर. तुझी काही चूक नसताना. पण खरं सांगू, इतके दिवस कसे काढले मलाच माहीत. एक दिवसही तुझी आठवण आल्याशिवाय जात नव्हता. कंपनीतून थकून भागून आल्यावर पाण्यापासून ते जेवणापर्यंत सगळे वेळच्यावेळी  हातात आणून द्यायची तू. पण त्यामागची मला शांत ठेवण्यासाठी, माझी काळजी घेण्यासाठी तुझी धडपड लक्षातच आली नव्हती ग माझ्या. तिथे जेव्हा स्वतः सगळे करावे लागायचे तेव्हा कळले की मी रागावलो तरीही तू स्वतःहून किती प्रेम, काळजीने सगळं करतेस. माफ कर ग मला", मी म्हणालो.

"अहो, जाऊ द्या ना ते सगळे. खरं म्हणजे मीही चुकले, मी उगाच रुसले, फुगले , अबोला धरला तुमच्याशी. तुम्हाला समजून घ्यायला हवे होते. नोकरी गेल्यामुळे तुम्ही टेन्शनमध्ये होतात. मला माफ करा", वीणा म्हणाली. आमचे भांडण मिटले आणि आम्हाला जाणीव झाली की आम्ही एकमेकांशिवाय अपूर्ण आहोत. तेव्हापासून आम्ही एकमेकांत जे विरघळलो ते आजतागायत. दोघांनाही एकमेकांचे आयुष्यातले स्थान, महत्त्व कळून चुकले होते. पुन्हा आमचे भांडण झाले नाही. कित्येक लहानमोठ्या अडीअडचणी आल्या. किरकोळ मतभेद झाले पण दोघांनीही समजुतीने निभावले. तर तात्पर्य लक्षात आले ना तुझ्या? ", विनीत विराजला म्हणाले.

"हो", विराज.

"फरक हा आहे की माझे लग्न झालेले होते. पण प्रेम आणि भावना या तर सारख्याच असतात ना. त्या तर कालातीत असतात. तेव्हा काय आणि आता काय . माणूस समोर असला की कधीकधी त्याचे महत्त्व कळत नाही. पण जेव्हा तो नजरेआड होतो ना, तेव्हा मनाला त्याच्या नसण्याची, दुराव्याची जाणीव होते . ऋजुतालाही त्या निमित्ताने कळेल तिच्या मनात काय आहे ते. तू फक्त एवढे करायचे,...", असे म्हणून विनीतने त्याला काहीतरी कानात सांगितले.

"हं, असे होईल ? वाटतं का तुम्हाला?", विराज.

"तुला तुझे उत्तर तर मिळेल . जे असेल ते सही. एक लक्षात घे. आपलं नसेल तर काहीही केलं तरी आपल्याला मिळणार नाही पण जे आपलं असेल ना, तर ते काहीही झालं तरी ते आपल्याकडे आल्याशिवाय राहणार नाही ", विनीत त्याच्या पाठीवर थोपटत म्हणाले.

"हं, बरोबर", विराज.

"आणि या सगळ्यामध्ये स्वतःला खंबीर ठेवणं, स्वतःचा संयम आणि समतोल कायम ठेवणं हे महत्त्वाचे आहे हं. काहीही लागले तर मी आहेच. बरं, आता काळजी करू नकोस. बरं मी काय म्हणतोय, उद्या कधी निघशील? मुंबईहून जायचे म्हणजे तुला दुपारीच निघावे लागेल ना इथून. ", विनीत म्हणाले.

"हो चार वाजता निघाले तरी चालेल ना?", विराज.

"नको रे , तू तीन वाजताच निघ. म्हणजे काही कुठे अडचण आली तर आपल्या हातात वेळ शिल्लक असावा", विनीत.

"हो , बरोबर. कट टू कट नको जायला. मग तीन वाजता निघेन मी."

" हं आणि आटपून झोप आता लवकर. मीही जातो झोपायला", विनीत त्याच्या डोक्यावर मायेने हात फिरवत म्हणाले आणि खाली झोपायला निघून गेले.

विराजने कसेबसे थोडेफार आवरले. त्यानंतर त्याला सुचेनासे झाले. ऋजुताची खूप आठवण येत होती त्याला. शेवटी त्याने सगळ बाजूला ठेवलं. तसेही बराच उशीर झाला होता. त्याने कपाटातून बासरी काढली आणि खिडकीशी बसून तो वाजवू लागला. आज त्याच्या स्वरात खूप आर्तता होती. बासरी वाजवता वाजवता त्याचे बंद डोळे झरू लागले .

"ऋजू कुठे आहेस ग तू? ये ना प्लीज लवकर. खूप आठवण येतेय ना ग", विराज मनात म्हणत होता.

तिकडे बाजूच्या खोलीत सबमिशनसाठी जर्नल पूर्ण करत बसलेल्या विधीला विराजच्या बासरीचे स्वर ऐकू आले . त्यातली आर्तता तिलाही जाणवली. ती उठून हळूच त्याच्या खोलीच्या दारात येऊन बघू लागली . तर तिला दिसले की विराज एक पाय पसरून  दुसरा पाय गुडघ्यात वाकवून उभा ठेवत खिडकीला टेकून बसला होता. डोळे मिटून बासरी वाजवताना त्याच्या डोळ्यातले अश्रु गालावर ओघळत होते.

त्याला तसे बघून विधीचेही डोळे पाणावले. "खरंच असं असतं का प्रेम? किती वेदना आहेत त्यात! म्हणूनच दादा मला सारखं बजावत असतो. किती मिस करतोय दादा तिला. खरंच आता गेला की तीन महिने भेटतासुद्धा नाही येणार त्याला ", विधी मनात विचार करत होती.

थोडया वेळाने विराज बासरी वाजवून थांबला अन तसाच भिंतीला टेकून, डोळे मिटून बसला होता .

कितीदा नव्याने तुला आठवावे?
डोळ्यातले पाणी नव्याने वहावे

कितीदा झुरावे तुझ्याचसाठी?
कितीदा म्हणावे तुझे गीत ओठी?
कितीदा सुकूनी पुन्हा फुलावे?
कितीदा नव्याने तुला आठवावे?
डोळ्यातले पाणी नव्याने वहावे

किती हाक द्यावी तुझ्या मनाला?
किती थांबवावे मी माझ्या दिलाला?
कितीदा रडुनी जीवाने हसावे?
कितीदा नव्याने तुला आठवावे?
डोळ्यातले पाणी नव्याने वहावे

विधी धावत त्याच्याकडे गेली. त्याचे डोळे पुसत खांद्यावर हात टाकत म्हणाली, "दादा , मिस करतोय ना तिला खूप? नको ना रे काळजी करू, सगळं ठीक होईल ".

"हो ग, खूप आठवण येतेय. बघ ना कधीची जाऊन बसलीय गावाला. माझा जायचा दिवस आला तरी अजून आली नाही . तीन महिने जाण्याआधी भेटीची शिदोरी नको का ग एकदा तरी? कशी का असेना भेट, ऑफिसमध्ये दुरून जरी दिसली तरी एक समाधान असतं ग. दुरुनही तिचं हसणं ऐकू आलं, दिसलं तरी मन खूष होतं माझं. दिवसभरासाठी एक ऊर्जा मिळते. सगळे प्रॉब्लेम्स सोडवायला, काम करायला बळ मिळतं. " , विराज.

"दादा, हे बघ, असं खचून चालेल का? आणि तुला जावं लागतंय ना, यातूनही काहीतरी चांगलं होईल रे, विश्वास आहे माझा".

ती त्याचा हात धरून उठवत त्याला बेडवर आणून बसवत म्हणाली, "ये बरं, मी तेल लावून देते तुला डोक्याला. जरा मसाज करून देते. मग तिकडे गेल्यावर कोण करून देणार ना तुला ? तू झोप. किती थकला आहेस सगळीकडे धावपळ करून. बारा वाजलेत बघ. राहिलेलं आपण उद्या करू फ्रेश मनाने. मी मदत करेन तुला. चल आता झोप इथे".

विराज बेडवर डोळे मिटून झोपला. विधी त्याच्या डोक्याला तेल लावत मसाज करून देऊ लागली. विराजला बरे वाटत होते.

"विधी, काय जादू आहे ग तुझ्या हातात. खूप बरं वाटतय.", विराज.

"हो ना? चलो फीस निकालो हमारी", विधीने त्याचा मूड हलका करण्यासाठी मिश्किलपणे म्हटले.

"और क्या है आप की फीस?", विराज म्हणाला.

तशी विधी त्याच्या नाकावर तेलाचा बोट लावत म्हणाली, "आप की ये स्माईल, और क्या?"

आणि विराजला आपोआपच हसू आले. "माझी वेडूली" तिचे नाक चिमटीत पकडत तो म्हणाला. विधीही हसली.

विषय बदलावा म्हणून विधी त्याला म्हणाली, "दादा, तुला भीती नाही का रे वाटत? असे एकदम परदेशात जायचं, तिथल्या ऑफिसमध्ये, तिथल्या लोकांशी इंटरएक्ट करायचं. कसे असतील ना तिथले लोक?"

"अग लोक कसे काय? आपल्यासारखेच, माणसंच ना ती पण? ", विराज हसून म्हणाला.

"अरे तसं नाही, म्हणजे त्या लोकांना काम कस परफेक्ट लागत असणार ना? म्हणजे कुठे चुकायला नको काही असं?", विधी म्हणाली.  अजून ती शिकत असल्याने कंपनीतल्या कामाचा अनुभव नव्हता ना तिला. म्हणून ती असं सगळं बारीकसारीक विचारत बसली होती.

"म्हणजे हे बघ, मी खूप एक्साईटेड आहे पण भीती नाही वाटत मला. कारण आम्ही रोजच असे काम करतो ना ऑफिसमध्ये. रोजच्या डेडलाईन्स असतात, कामाचं प्रेशर असतं, स्ट्रेस असतो. पण या सगळ्याची सवय होते हळूहळू. आणि कसं आहे, अशी काहीतरी डेडलाईन असल्याशिवाय कामं लवकर संपतील कसे? आपल्याला स्वयंस्फूर्तीसुद्धा मिळत असते अशाच गोष्टींमुळे. तू काम करायला लागलीस ना अशी ऑफिसमध्ये, की कळेल तुलाही. रोजचे नवनवीन आव्हानं असतात कामाचे. थ्रिल असतं, सगळं वेळेच्या आत संपवणे, चुका होऊ न देता करणे, क्लाएंटसना आपल्या कामाने खूष करणे अशा सगळ्या गोष्टींमध्ये", विराज सांगत होता. विधीलाही आता कॅम्पस इंटर्व्हयू द्यायचे होतेच ना .

"मज्जा येत असेल ना रे", विधी उत्साहित होत म्हणाली.

"हं, कामं नीट वेळेत संपली तर मजा, नाहीतर सजा. कसं आहे न, की आपण आपल्याला दिलेलं काम आपलं समजून, मनापासून केलं ना की ते करताना त्यात मजाच यायला लागते. उगाच  काम संपवायचे म्हणून कसं तरी करून टाकायचं असा दृष्टिकोन ठेवला की मग गोष्टी बिघडतात आणि मजा ऐवजी सजा होते", विराज हसून म्हणाला.

"अरे यार दादा, तूच माझी कॅम्पस इंटरव्ह्यूची तयारी करून घेतली असतीस ना रे, आता तर जातोय तू", विधी काहीशा नाराजीने म्हणाली.

"अरे तुमने कहा है तो हम करवा देंगे. अग तिथे असलो तरी सांगेन ना मी तुला कशी तयारी करायची ते. डोन्ट वरी सिस्टर", विराज तिला आश्वस्त करत म्हणाला आणि विधीच्या चेहऱ्यावर स्माईल आले.

"किती छान सांगतोस तू दादा. पण एवढं सगळं तू कधी शिकलास रे? आणि कोणी शिकवलं तुला सगळं?", विधी.

"ओह नो ! केली ना गडबड , माझ्या गुरूचं नाव विचारून! ", विराज नाटकीपणे आपल्या डोक्याला हात लावत म्हणाला.

"का रे , काय झालं त्यात, विचारलं तर", विधी न कळून म्हणाली.

"अग , माझं इम्प्रेशन कमी नाही का होणार", विराज चेहरा अगदी बिचारा करत म्हणाला. तशी विधी खूप हसली.

"ए सांग न , सांग न प्लीज, आता तर मला ऐकायचंच आहे", विधी उत्साहित होत सरसावून बसत म्हणाली.

"एनी गेसेस?", विराज.

"डोन्ट टेल मी दॅट इट्स ऋजुता", विधी अविश्वासाने डोळे विस्फारत म्हणाली.

"ऍबसोलुटली करेक्ट", विराज.

"पण कसं काय? ती तर लहान आहे, ज्युनिअर आहे ना तुला?", विधी.

"हो, पण तीही आता प्रोजेक्ट मॅनेजर होते आहे. कधीकधी आपल्या पेक्षा लहान व्यक्तीदेखील आपल्याला काहीतरी शिकवून जातात. तिला कधीही कोणतेही काम दिले ना, तरी इतका जीव लावून आणि मेहनतीने करते ना की जणू काही हे कंपनीचे काम नसून तिचे स्वतःचेच काम आहे. बुडून जाते त्यात. आणि इकडे मी माझे पुढचे काम करायला निश्चिन्त होतो की हिला काहीही प्रॉब्लेम जरी आला तरी ती तो सोडवून काम नक्की पूर्ण करणार आहे. प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मकतेने बघण्याचा हा जो दृष्टिकोन आहे ना तो खूप महत्त्वाचा आहे जीवनात आणि तिच्याकडूनच हे शिकलोय मी ", विराज.

"हं, खरंय", विधी.

"घ्या, झाली ना तुमची कॅम्पसची अर्धी तयारी इथेच", विराज हसून म्हणाला. विधीही हसली.

थोडया वेळाने "बरं झोप तू आता शांतपणे", म्हणत विधीने मनात काहीतरी ठरवले. तो झोपल्यावर तीही झोपायला आपल्या खोलीत निघून गेली.

क्रमशः


© स्वाती अमोल मुधोळकर

कथेचे सर्वाधिकार लेखिकेकडे राखीव.

कथेला देत असलेल्या प्रतिसादाबद्दल सर्वांना धन्यवाद.
हा भाग कसा वाटला नक्की कळवा.  मोठ्या भागाला कंमेंट्स सुद्धा मोठ्या हव्यात बरं का, तेव्हा कंजूषी करू नका, सर्वांनी नक्की कळवा. विराजचा मूड लक्षात येण्यासाठी गाणे जरूर ऐका.

गणेशोत्सव आणि पर्युषण पर्वानिमित्त सर्वांना शुभेच्छा.

🎭 Series Post

View all