दृष्टी आणि दृष्टिकोन - भाग 35

Drushti, ani, Drushtikon, Viraj, Rujuta, Rajat, Vidhi, andh, love, blindness, prem, marathi, katha, kathamalika

मागील भागात ...

https://www.irablogging.com/blog/drushti-ani-drushtikon---bhag-34_8333

"अग वेडी आहेस का, काहीही काय? मी लंडनला जातोय आणि ऋजुता इथे बघणार आहे हे सांगायचंय ना", विराज हसत म्हणाला.

निकिताने जीभ चावत स्वतःलाच टपली मारली आणि "अरे हो" म्हणत जायला निघाली.

"आणि हं, ते सीक्रेट ठेव हं, कोणालाही अगदी ऋजुतालाही सांगायचं नाहीस . वेळ आली की मी सांगेन", विराज.

"हो" म्हणून निकिता गेली.

विराजने टीमला सांगितले. सर्वांनी त्याला शुभेच्छा दिल्या.

आता पुढे ...

मीटिंग रूम मध्येच सर्वांच्या विराजच्या नकळत खाणाखुणा सुरू होत्या. मीटिंग झाली आणि सर्वजण बाहेर पडले. विराज पुन्हा केबिनकडे वळला . प्रसाद आणि निकिताने नंदनच्या कानात हळूच  काहीतरी सांगून त्याला कुठेतरी जायला सांगितलं.

"लवकर ये हं", असे नंदनला बजावलेही.

"हो, यूं गया और यूं आया, तुम्ही तोपर्यंत इकडे सांभाळा", असे म्हणून नंदन लगेचच निघाला.

थोड्याच वेळात तो काहीतरी घेऊन परत आला. तसे सर्वजण कॅन्टीनमध्ये जमले. प्राची आणि प्रसादने नंदनने आणलेल्या गोष्टींची टेबलवर नीट मांडणी केली.

इकडे विराजने केबिनमधून सहज टीमच्या जागेकडे नजर टाकली , "अरेच्चा, सगळे कुठे गायब झाले? मी जातोय म्हटल्यावर लगेच सगळे टेन्शन फ्री आणि रिलॅक्स झालेत का? ", विराजला असे वाटून हसू आले.

तेवढ्यात कॅन्टीनमध्ये आणलेले सगळे मांडून झाल्यावर निकिता विराजला बोलवायला त्याच्या केबिनमध्ये गेली.

"विराज सर, थोडावेळ कॅन्टीनमध्ये चला ना, सगळेजण बोलावताहेत तुम्हाला", निकिता.

"कशाला ग? बरं चल" , म्हणत तो उठला आणि ते कॅन्टीनमध्ये आले.

समोर बघताच तो चकित झाला. "अरे हे सगळे काय आहे?"

"सर आमच्याकडून एक छोटीशी सरप्राईज पार्टी , तुमच्यासाठी", प्रसाद.

"मी तुम्हाला सोडून जातोय , आता ओरडायला असणार नाही म्हणून एवढे खूष झालात तुम्ही?", विराज हसत टेबलावरच्या डिशेस कडे बघत मजेने टीमला चिडवत म्हणाला.

"नाही हं, तुम्हाला लंडनला जायला मिळतंय , म्हणून तुमच्या आनंदात आम्ही सहभागी आहोत म्हणून आहे हे  आणि आनंद हा साजरा करायलाच हवा असं आपल्या ऋजुता मॅडम नेहमीच म्हणतात ना", निकिता.

"सर , हे घ्या, केक कट करा", विराजकडे सुरी देत नंदन म्हणाला.

विराजने केक कट केला. सर्वांनी केक खाऊन झाल्यावर डिश मधल्या समोसे, बर्गर, चिप्स इत्यादींवर ताव मारत विराजशी गप्पाही मारल्या. विराजने आनंदाने सर्वांसोबत सेलिब्रेशनचे फोटो घेतले आणि त्यांनाही पाठवले.

ते सगळं झाल्यावर विराजने ऑफिस चे काम संपवले आणि केबिनमधल्या त्याच्या वस्तू नीट आवरून घेतल्या. घरी जायला निघण्याआधी विराजने ऑफिसबॉयला ऑफिस सुटल्यावर तो घरी जाण्याआधी एक छोटेसे काम करायला सांगितले आणि आठवणीने करशील असेही बजावले. विराजला आज थोडं लवकर निघायचं होतं. त्याची सगळी तयारी अजून राहिली होती. ऑफिस आणि 'दृष्टी' दोन्हीकडची व्यवस्थित सोय लावता लावता त्याला त्याच्या स्वतःच्या कामांना फुरसतच मिळत नव्हती. निघता निघता विधीचा फोन आलाच .

"दादा, अरे आज तरी लवकर यायचं ना.  मी केव्हाची वाट बघतेय. पटकन घेऊन येऊ सगळं राहिलेलं. मी काही गोष्टी आणल्या आहेत तुझ्या लिस्ट मधल्या. पण कपड्यांचं तरी पहावच लागेल ना तुला. मला कसे कळणार  तुझे फॉर्मल कपडे , साईज वगैरे?"

"अग हो हो, माझी लाडुली, तू आहेस म्हणून तर सगळी तयारी होतेय ना माझी? नाहीतर कसं झालं असतं बाबा? ", विराज हसून म्हणाला.

"हं, लावा मस्का आता", विधी हसून म्हणाली.

" मी निघालोच. बसलोय कार मध्ये जस्ट. पोहचतो थोडया वेळात. आणि होईल ती पण शॉपिंग. तू काळजी नको करू", विराज.

"हं, ड्राईव्ह मात्र शांतपणे कर. तिथे नको घाई करू ", विधी.

"हो हो, चल बाय", विराज.

विराज आणि विधीने जाऊन खरेदी आटपली .

"छान मिळाले तुझे कपडे. हो ना? दादा, चल ना, आइसक्रीम खाऊ या", विधी हातात कपड्यांच्या बॅग्स नीट करत म्हणाली.

"काय? अग थंडी आहे ना, आईस्क्रीम खायचंय?" , विराज.

"ए, काही नाही होत. आणि थंडीत तर मजा येते अजून . पण आईला सांगू नकोस हं , रागवेल ती मला नाहीतर", विधी.

"हो, रागावणार नाही तर काय? बघितलं नाहीस का तिला किती त्रास होतोय सर्दी खोकल्याचा. आणि त्यात मला जायचंय. म्हणावा तसा आराम पण होत नाहीये तिचा. जरा बर वाटलं की काहीतरी करत राहते", विराज.

"हं, पण आता संध्याकाळच होतेय न , अजून थंडी पडली नाही. चल ना प्लिज. आज तू जाण्या आधीचं शेवटचं आईस्क्रीम. बघ ना, उद्या तर तू निघूनही जाशील या वेळेपर्यंत ", विधी विनवणी करत होती. खरं म्हणजे तिला त्याच्यासोबत थोडा वेळ घालवायचा होता.

बोलता बोलता ते आईस्क्रीम शॉप जवळ आले.  दोघेही आत गेले आणि विराजने दोघांसाठी आईस्क्रीम घेतले. तिथे बसून आईस्क्रीम खाता खाता दोघे गप्पा मारत होते.

"हं, आता बोल विधी. काय झालं ? का आईस्क्रीमच्या मागे लागलीस आज एवढं ? ", विराज.

"खरं सांगू का दादा, तू उद्यापासून इथे नसशील न मला चिडवायला, रागवायला, असं वाटूनच मला करमत नाही आहे. तुझ्यासोबत थोडा वेळ शांतपणे बसावं , गप्पा माराव्या असं वाटत होतं", विधीच्या डोळ्यात एक दोन अश्रू डोकावत होते.

"वेडू, मी तिकडे गेलो तरी न तुला चिडवणे सोडणार आहे न रागावणे सोडणार. तो तर माझा जन्मसिद्ध अधिकार आहे न?", विराज हसत तिच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाला.

विराजचे बोलणे ऐकून विधीलाही हसू फुटले.
"अं, हं. जन्मसिद्ध अधिकार तर फक्त माझा असतो. तोही तुला खूप सतावण्याचा, तुझ्याकडे हट्ट करण्याचा, तुझ्याकडून आवडत्या गोष्टी मागून घेण्याचा", विधी हसत म्हणाली.

दोघेही हसले.

"दादा, हे इकडचे गरम कपडे तिकडच्या थंडीसाठी पुरेसे होतील न रे , मला तर शंकाच वाटते आहे. आता खूप थंडी असते ना तिकडे. कधी कधी एखाद्या वेळी तर minus मध्ये तापमान असतं. कधीकधी बर्फही पडतो ना.", विधी विचार करत म्हणाली.

"हो का? मला तर माहीतच नव्हतं. आणि हे सगळं कोणी सांगितलं ? काय ग?", विराज हसून चिडवत म्हणाला.

कोणी सांगितलं म्हटल्यावर विधी चपापली. "अरे, भूगोलात नाही का शिकलो आपण?" विधी सारवासारव करत म्हणाली. "असंच लंडन आवडतं मला म्हणून माहिती वाचते कधी कधी त्याच्याबद्दल".

"ओ हो, असं आहे का? मग आपण शोधू तुझ्यासाठी एखादा लंडनमधलाच. मी काय म्हणतो, मी आता जातोच आहे तर लगे हाथ तेही काम उरकून घेऊ का ?", विराज हसत तिला चिडवत म्हणाला.

ते ऐकताच विधीला आईस्क्रीम खाता खाताही ठसका लागला.

"नाही नाही, नको नको. तू नको शोधू काही", विधी गडबडून म्हणाली.

"काय ग , काही गडबड आहे का?", विराज .

"मॅडम लक्षात ठेवा, आपल्याला इंजिनिअरिंग टॉपमध्ये येऊन पूर्ण करायचं आहे. आपल्या पायावर उभे राहायचे आहे . खबरदार तोपर्यंत इकडे तिकडे बघितलं तर, खूप रागवीन हं , आधीच सांगतोय", विराज डोळे मोठे करत , दम देत म्हणाला. ते बघून विधीचे डोळे विस्फारले. चेहरा कसनुसा झाला अन एक आवंढा गिळत बिचारीने हो म्हटले. त्याला रजतबद्दल सांगण्याचा विचार तिने पार तळाशी दाबून टाकला.

तेवढ्यात वीणाताईचा विराजला फोन आला आणि बिचाऱ्या विधीची सुटका झाली.

थोड्याच वेळात ते घरी आले. विधीला घरी सोडून विराज 'दृष्टी' मध्ये गेला. तिथली काही कामे केली. इकडे वीणाताईंची काही न काही तयारी चालली होती. विधीही जाऊन मदत करू लागली.

रात्री सगळे आटपल्यावर विराज त्याच्या खोलीत आवरसावर करत होता. वीणाताई खालचे सगळे आवरून झोपायला गेल्या होत्या. त्यांचीही दमछाक झाली होती. विधी तिच्या खोलीत तिचा अभ्यास करत  बसली होती.  विनीत विराजच्या खोलीत आले .

'"काय चाललंय बरखुरदार? झाली का तयारी?"

"चाललंय बाबा तेच . आधी सगळे तिकडे नेण्याचे डॉक्युमेंट्स एका फाईल मध्ये नीट ठेवत होतो", विराज.

"हो. काही विसरायला नको हं डॉक्युमेंट्स. नीट बघून घे सगळं. पासपोर्ट, तिकीट, कंपनीचे लेटर वगैरे असेल तर ते इत्यादी", विनीत.

"हो ठेवलं ते सगळं", विराज.

"बरं, मी काय म्हणतो, ते... तुझा ऋजुताचा विचार कितपत पक्का आहे?", विनीत.


"बाबा , मी एकदम सगळं तिच्यावर सोडून चाललोय ना, तर तिला सध्या वेळ मिळणार नाही 'दृष्टी'मध्ये यायला, महिनाभर तरी निदान . तिला ऑफिसमध्येच भरपूर काम पुरणार आहे. त्यानंतर विचारेन तिला 'दृष्टी' मध्ये येशील का थोडा वेळ म्हणून", विराज म्हणाला. एकीकडे त्याचे  हातातले कामही सुरू होते.

"हं अच्छा, पण मी ते नाही दुसरं काहीतरी विचारतोय", विनीत.

"दुसरं काय? ", विराजने त्यांच्याकडे बघत विचारलं.

"तुला आवडते ना ऋजुता?", विनीत.

विराज चमकलाच एकदम. त्याचे डोळे विस्फारले. "हो , खूप".

"मग कितपत पक्का आहे तुझा विचार?", विनीत .

"100%, पण तुम्हाला कसं माहिती?", विराजने गोंधळून विचारले.

"बाप आहे ना मी तुझा. कळतं मला तेवढं. आतापर्यंत सगळ्या गोष्टी सांगायचा ना तू मला? मग ही का लपवलीस ? मी वाट बघत होतो तू बोलण्याची", विनीत त्याला बेडवर बसवत स्वतःही त्याच्या बाजूला बसत म्हणाले.

"बाबा खरं सांगायचं तर मी घाबरलो होतो की तुम्हाला आवडलं नाही तर? मला तुम्हाला दुखवायचं नव्हतं बाबा . मला माहिती आहे. तुम्ही दोघांनी खूप कष्ट केलेत आमच्यासाठी. आईचे पण काही स्वप्न असतील. माझ्या लग्नाबद्दल, सुनेबद्दल आणि आता तर तिचंही वेगळंच चालू आहे . कोण तिच्या मावसबहिणीची नातलग. पण बाबा, प्लीज ना, नका ना तिकडे बोलू. ", विराज काकुळतीला येऊन म्हणत होता.

"खरं सांगायचं तर ऋजुताच्या जागी दुसरं कोणी असतं तर मीही विचारच केला असता . पण मी बघितलंय, नाव ठेवायलाही जागा नाहीये पोरीमध्ये. गुणी आहे, समजूतदार आहे, हुशार आहे, इतरांचा विचार करते, परिवार आपल्या ओळखीतला, माहितीतला आहे, लोक चांगले आहेत, अजून काय हवं ना? तुझी आवड आणि निवड खूप छान आहे बेटा ", विनीत त्याचा हात आपल्या हातात घेत म्हणाले .

काही वेळाने ते म्हणाले, "आणि तिच्या म्हणजे ऋजुताच्या मनात काय आहे? ".

"तेच तर माहिती नाही ना मला", विराज.

"का रे, आतापर्यंत बोलला नाहीस का? आता जातोय ना तिकडे, मग कसं होईल?"

"खरं तर आपल्या 'दृष्टी'च्या प्रोग्रॅम नंतर सांगणार होतो, पण त्याचं असं झालं की ...", विराजने मग ऋजुताचे विराजला घाबरणे, विधीची खोडी आणि त्यामुळे झालेला गोंधळ असं सगळं बाबांना सांगितलं. "आणि आता ती गावाला गेलीय आणि मीही चाललोय. कसं होणार मलाही कळत नाही आहे", विराज.

"ओह अच्छा, असं आहे तर. ", विनीत.

"मी तिच्या मनातलं जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय . पण बाबा, माझं तिच्यावर खूप प्रेम असलं तरी मला तिला या नात्याची कुठलीही जबरदस्ती करायची नाही आहे. माझं प्रेम मी तिच्यावर थोपवणार नाही. अंतिम निर्णय तिचा राहील बाबा. मला थोडा वेळ हवाय, तिच्या मनातलं जाणून घ्यायला. तिला जर माझ्याबद्दल फीलिंग्स आहेत असं वाटलं तर मी सांगेन तिला", विराज.

"बाबा, तिच्या मनात काही नसताना मी काही बोललो आणि तिने नकार दिला तर? खूप भीती वाटते मला. मला तिला गमवायचे नाहीये. ती आयुष्याची जोडीदार म्हणून हवी आहे मला. म्हणून मी योग्य वेळेची वाट बघतोय. मी ठीक करतोय ना बाबा?", विराज.

"ठीक आहे . मग बरोबर आहे तुझं. पण खूप उशीर करू नकोस आणि योग्य वेळ आल्यावर मात्र घाबरू नकोस, लाखात एक आहे माझा बेटा. का नकार देईल ती?", विनीत.

"तसं नाही बाबा, पण लग्न म्हणजे आयुष्यभराचा निर्णय आहे न? ऋजुता स्वतंत्र विचारांची आहे , महत्त्वाकांक्षी आहे, हुशार आहे. तिचेही काही स्वप्न असतील . आवड असेल ना. आपणही समजून घ्यायला हवं न?", विराज म्हणाला.

"खरं आहे बेटा, I am proud of you. की तू असा विचार करतोय.  प्रेम म्हणजे प्रेम असावं , त्यात दुसऱ्याला समजून घेण्याची वृत्ती असावी. त्याच्या मतांचा आदर असावा. त्याला त्याचा विचार करण्याचा, स्वतःचे निर्णय घेण्याचा अधिकार आहे हे लक्षात ठेवावे. प्रेम प्रेमाने आणि योग्य मार्गाने मिळवावे, जबरदस्तीने नव्हे. त्यासाठी अट्टाहास करून कोणतेही चुकीचे पाऊल उचलू नये. त्याने सर्वच गोष्टी बिघडतात. आणि मग ते प्रेम कसले , ती तर विकृती झाली , नाही का? आपलं घर सुसंस्कृत माणसाचं घर आहे त्यामुळे विचार करूनच वागायचं", विनीत म्हणाले.

"हो, मलाही तेच वाटतं, म्हणूनच मी ...", विराज.

"हं, बरं ठीक आहे. चल आता , तुझी तयारी कर आधी. हे नंतर बघू. सांग मला , काय करायचं आहे ? बॅग भरायची आहे का तुझी? मी मदत करतो तुला", विनीत.

"मी करतो बाबा, तुम्ही आता झोपा . थकले आहात तुम्ही आता", विराज.

विनीत जायला वळले. दाराशी होते तेवढ्यात विराजने आवाज दिला , "बाबा". विनीत थबकले. विराज त्यांना मिठी मारत म्हणाला, "थँक्स बाबा. तुम्ही मला खूप समजून घेता", त्याच्या डोळ्यात पाणी आले होते. ते पाणी पुसत विनीत म्हणाले,

" वेड्या, तुला जरी मी कडक स्वभावी वाटत असलो ना, तरी लहानपणापासून तळहाताच्या फोडा प्रमाणे जपलं आहे तुला आणि विधीला. आईचं काय आणि माझं काय, तुमचं सगळं चांगलं व्हावं , तुम्ही सुखी रहावं यासाठीच असतं रे सगळं, मग ते रागावणं असो की दटावणे. पण तुम्हा मुलांना नाही कळत ते", विनीतही भावुक झाले होते.

"कळतं हो बाबा, म्हणून तर दुखवायचं नसतं ना तुम्हालाही. म्हणून तर घाबरलो होतो मी सांगायला . अन त्यात हे जाण्याचंही मधेच आलंय, त्यानेही काही कळेना झालंय", विराज.

"अरे ते? त्याची काळजी नको करू. आणि कंपनीचे आभारच मान की तुला अगदी योग्य वेळी पाठवताहेत ते ", विनीत.

"ते कसं काय?", विराज न कळून म्हणाला.

विनीत परत येऊन बेडवर बसत म्हणाले, " ये बस, तुला एक गंमत सांगतो".

विनीत सांगू लागले.

क्रमशः


© स्वाती अमोल मुधोळकर
कथेचे सर्वाधिकार लेखिकेकडे राखीव. कथेतील कुठलाही भाग कॉपी करू नये. साहित्यचोरी हा गुन्हा आहे.

वाचकांच्या आग्रहास्तव मोठा भाग पोस्ट करत आहे. हा भाग कसा वाटला ते नक्की कळवा. प्रतिक्रियांबद्दल सर्व वाचकांना धन्यवाद.
माझ्या लेखणीतून आणखी कोणत्या प्रकारचे लेखन वाचायला आवडेल तेही कळवा.

🎭 Series Post

View all