दृष्टी आणि दृष्टिकोन - भाग 34

Drushti, ani, Drushtikon, blindness, andh, Viraj, Rujuta, Rajat, Vidhi, love, Marathi, katha, kathamalika

मागील भागात आपण पाहिले,

पुनीतने विराजला  प्रोजेक्ट साठी लंडनला जाण्याबद्दल बातमी दिली. विराजने ते घरी कळवले. PACE चे उर्वरित management ऋजुताला देण्याबाबत विराजने पुनीतला सुचविले. रजतने ऋजुताला फोनवर सांगितले की त्याने विधीला सर्व सांगितले आणि तिनेही होकार दिला. स्नेहाच्या लग्नाच्या धामधुमीत असतानाच ऋजुताला विराजचा फोन आल्यामुळे तिचा जरा गडबड घोटाळा झालाय. काय घोटाळा झाला ते मात्र मागील भागातच वाचायला हवे. ????
https://www.irablogging.com/blog/drushti-ani-drushtikon---bhag-33_8202

आता पुढे ...

एवढ्यात मंगलाष्टके सुरू झाली आणि सगळे पुन्हा तिकडे व्यस्त झाले. स्नेहाचं लग्न धूम धडाक्यात पार पडलं. सर्व विधी व्यवस्थित पार पडले. पाहुण्यांची सरबराई झाली . पाठवणीच्या वेळी आत्या, रेखाताई, ऋजुता, स्नेहा सर्वांच्या डोळ्यात पाणी होते.  पाठवणीही झाली . नवरी गेल्यानंतर काहीसं सुनंसुनं वाटतं ना घर, तसंच सर्वांना वाटत होतं. पण सगळं छान झाल्याचं एक समाधानही सर्वांच्या चेहऱ्यावर विलसत होतं.

विराजकडे ...

वीणाताई, विनीत, विराज सकाळी चहा नाश्ता करत डायनिंग टेबलाशी बसले होते.

"विराज, तुला उद्या निघायचं आहे ना? 'दृष्टी'चं कसं काय मॅनेज करणार आहेस मग?", वीणाताई.

"आई, पराग आहे ना , त्याला काही गोष्टी बघायला सांगितल्या आहेत. तो मला देईल सगळे रिपोर्ट्स रोज. अन माझे मित्र मैत्रिणी जे एक एक गोष्ट शिकवायला येतात ते असेच येतील नंतरही", विराज सांगत होता.

"अन तू जे शिकवतोस ते? त्याचं कसं?", वीणाताईंचा पुढचा प्रश्न.

"मी स्वतः जे सेशन्स घेतो त्यातले काही मी रेकॉर्ड करून ठेवले होते तेव्हाच. बाकी जे प्रत्यक्ष घेण्याची गरज आहे ते बाबा घेतील. त्यांनीही काल परवा येऊन सगळं बघितलं आहे  , हो ना हो बाबा? आणि काही मी तिकडून ऑनलाईन सुद्धा घेऊ शकतो लागेल तसे".

"हं, ठीक आहे", वीणाताई.

"अन तू पूर्ण बरी झाली की थोडा वेळ तूही जाशील ना दुपारी वगैरे, बायकांचे कामं बघायला, देखरेख करायला? मी ऋजुतालाही विचारेन ती आली की. ती मुलींना शिकवेल , बघेल त्यांचं ", विराज.

"हो ना, हा खोकला काही सुचू देईना अजून, बघ ना. बरी झाली की जाईनच मी", वीणाताई.

"होऊन जाईल सगळं, काही काळजी करू नका तुम्ही. मी पण जाऊन बघून आलोय सगळं. ", विनीत.

"अहो हो ना, एवढा मोठा घाट घालून ठेवलाय आणि हा नसेल तर कसे व्हायचे? काळजी वाटतेय म्हणून विचारले", वीणाताई.

"अग आई, तुझी तब्येत बरी नाही ना , म्हणून तुला नेलं नाही मी 'दृष्टी'मध्ये. तसं काही ना काही करून मॅनेज कसं करायचं ते ठरलंय बऱ्यापैकी.  आमच्या फिल्डमध्ये असं कधीही जावं लागू शकतं. मला सुरवातीपासूनच कल्पना होती ही. म्हणूनच परागला सगळं बघायला दिलंय सुरवातीपासून".

"हो ना, ते एक चांगलं केलंस", वीणाताई.

"बरं, मी आता निघतो ऑफिसला. संध्याकाळी लवकर जमलं तर जाईन 'दृष्टी' मध्ये.

ऑफिसमध्ये ...

विराज आपले काम करत होता. त्याने PACE चे सर्व डिटेल्स, वेगवेगळे डॉक्युमेंट्स, कम्युनिकेशन्स वगैरे एका ठिकाणी केले. काही ऋजुताला ई-मेल केले. काही पेन ड्राईव्ह मध्ये तिला देण्यासाठी सेव्ह करून ठेवले. रोहितलाही सांगून दिले की यापुढचे ऋजुता बघणार आहे.

निकिताच्या डेस्क वर फोन करून त्याने तिला केबिनमध्ये बोलावले.

"मे आय कम इन?", निकिता.

"हो , ये ना", विराजचे लक्ष लॅपटॉप मध्ये होते.

"काही काम होतं का विराज सर?", निकिताने विचारले.

"हो बस ना" विराज म्हणाला.

निकिता समोरच्या खुर्चीवर बसली.

विराज तिच्याकडे बघत म्हणाला, "हे बघ निकिता , मी दुसऱ्या एका प्रोजेक्टच्या निमित्ताने लंडनला जातोय".

"वाह ! कधी सर? आय एम सो एक्साईटेड ! ", निकिता म्हणाली.

"परवा म्हणजे उद्याच लेट नाईट फ्लाईटने जातोय मी. तीन महिने तिकडेच राहणार आहे . तर इथलं सगळं PACE प्रोजेक्ट वगैरे यापुढे ऋजुता बघेल, प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून. त्यामुळे तिच्या टीम लीडींग च्या रिस्पॉन्सिबिलिटी तुला घ्याव्या लागतील. ती सांगेल तसं. अँड डू को ऑपरेट विथ हर एज यू डिड विथ मी ", विराज.

"शुअर सर. नो प्रॉब्लेम . तिला माहित आहे ना तुम्ही जाताय ते ?", निकिता.

"हो . मी सांगितलं आहे तिला, पण मॅडम खूप गडबडीत होत्या. फक्त ओके, ये म्हणाल्या", विराज हसत म्हणाला .

निकिताही हसली.

"म्हणजे तुमची आणि तिची भेट होणार नाही तर जाण्याआधी", निकिता म्हणाली.

"हो ना, शक्य वाटत नाहीये . बरं निकिता, आणखी एक करशील का माझ्यासाठी प्लीज?", विराज.

"हं, बोला ना सर", निकिता.

"तशी तर तुझी मैत्रीणच आहे ऋजुता . त्यामुळे तुम्ही सोबतच असता. पण तू ऋजुता कडे थोडे लक्ष ठेवशील", विराज.

"म्हणजे?", निकिता न कळून म्हणाली.

"म्हणजे ती कधी अस्वस्थ वाटली किंवा चिंतित वाटली, कधी अनयूजुअली त्रस्त वाटली तर तिच्याशी बोलशील आणि तसंच काही वाटलं , गरज वाटली तर मलाही सांगशील", विराज म्हणाला.

"ठीक आहे. पण तुम्ही हे का सांगताय सर?", निकिताला कळत नव्हते.

"म्हणजे.... आता मी इथे नाहीये ना ... म्हणून ", विराज .

"हं, मला जे वाटतंय ते ... खरे आहे का सर... की तुम्ही... ?", निकिता .

"हो, खरं आहे ते . माझं प्रेम आहे तिच्यावर", विराज थोडा ब्लश करत होता.


"काय ? खरंच?", निकिता तर आता खूप एक्साईट झाली होती. तिला ऐकून खूप आनंद झाला होता." तिला माहिती आहे ना हे?", निकिता आनंदाने म्हणाली.

"नाही ग, तो एक वेगळाच गोंधळ आहे. सांगीन नंतर कधीतरी. अजून कोणालाच माहिती नाहीये आणि तिला काय वाटतं हेही मला माहिती नाही. पण प्लीज हेल्प करशील ना एवढी माझी?" विराज तिला म्हणाला.

"हो नक्की, तुमचं जुळलं तर खूप आनंद होईल मला. म्हणजे काय आहे ना, की एकदम परफेक्ट आहात तुम्ही एकमेकांसाठी... दोघांनाही समाजासाठी काहीतरी करण्याची आवड आहे . तुम्ही ज्वालामुखी, तर ती शांत संथ वाहणारी नदी ... ती चैतन्याचा प्रवाह तर ...", निकिता आपल्याच विचारात गढत म्हणाली.

"काय मी ज्वालामुखी?", विराज डोळे विस्फारत , राग दाखवत म्हणाला.

तशी निकिता गडबडली, खाली मान घालत म्हणाली, "हो ... म्हणजे ... नाही नाही,  म्हणजे सॉरी, तसं नाही".

"ही ही ही, अग घाबरतेस काय? गंमत करत होतो", विराज.

"बाप रे, घाबरवलंत तुम्ही मला, मला वाटलं पुन्हा आधीसारखे चिडलात की काय? एकतर ऋजुताही नाही आहे तुमचा राग हॅन्डल करायला. ते तिलाच जमतं बाबा", हुश्श करत निकिता म्हणाली.

"बरं टीमला बोलाव मीटिंग रूम मध्ये. सर्वांना सांगायचंय", विराज.

"काय, ऋजुवर प्रेम करता हे सर्वांना सांगणार तुम्ही असं , ती नसताना?"

"अग वेडी आहेस का, काहीही काय? मी लंडनला जातोय आणि ऋजुता इथे बघणार आहे हे सांगायचंय ना", विराज हसत म्हणाला.

निकिताने जीभ चावत स्वतःलाच टपली मारली आणि "अरे हो" म्हणत जायला निघाली.

"आणि हं, ते सीक्रेट ठेव हं, कोणालाही अगदी ऋजुतालाही सांगायचं नाहीस . वेळ आली की मी सांगेन", विराज.

"हो" म्हणून निकिता गेली.

विराजने टीमला सांगितले. सर्वांनी त्याला शुभेच्छा दिल्या.

क्रमशः

© स्वाती अमोल मुधोळकर

कथेचे सर्वाधिकार लेखिकेकडे राखीव.

🎭 Series Post

View all