दृष्टी आणि दृष्टिकोन - भाग 33

Drushti, ani, drushtikon, Rajat, vidhi, viraj, Rujuta, London, Prem, Marathi, katha, kathamalika, love, story, andh, blindness

https://www.irablogging.com/blog/drushti-ani-drushtikon---bhag-32_8062

विराजचा फोन वाजला. "अरे, पुनीत सरांचा फोन ! काय म्हणताहेत सकाळी सकाळी" म्हणून विराजने फोन घेतला.

"हॅलो विराज, जरा लवकर ये आज ऑफिसमध्ये. एक चांगली बातमी आहे तुझ्यासाठी. ऑफिसमध्ये आल्यावर सांगतो", पुनीत.


"Ok येईन लवकर", विराज.

"तू जा विराज, मी बघतो आईला"


विराज ऑफिसमध्ये आल्या आल्या पुनीतच्या केबिनमध्ये आला ...

"गुड मॉर्निंग पुनीत सर", विराज.

"गुड मॉर्निंग , गुड मॉर्निंग , ये ये. अरे देअर इज अ ग्रेट न्यूज. ते TechnoSystems मधून मेल आलाय. तू ज्या प्रोजेक्ट प्रपोजल वर गेल्या कित्येक दिवसांपासून मेहनत घेत होतास ते ऍक्सेप्ट केलंय त्यांनी आणि तुला पुढच्या प्रोसेससाठी लंडनला बोलावलंय शक्य तितक्या लवकर. येत्या सोमवारी तिकडे मीटिंग करायचं म्हणताहेत . तुझे डॉक्युमेंट्स वगैरे लगेच देऊन टाक प्रोसेसिंगला आणि शुक्रवारी रात्रीचे किंवा जास्तीत जास्त शनिवारी रात्रीचे फ्लाईट बुक करायला सांगून दे ", पुनीतच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.

"Wow, ऍक्सेप्ट झालं प्रपोजल! दट्स रिअली अ ग्रेट न्यूज !", विराज आनंदाने म्हणाला. पण लगेच त्याचा चेहरा विचारमग्न झाला. "अरे यार हे लंडनला जाण्याचं पण इतक्या लगेच व्हायला पाहिजे होतं का? ही ऋजुता पण नाही आहे इकडे . आता कुठे जरा सगळं लाईनवर येईल असं वाटत होतं तर लगेच हे. काय होणार आहे कोणास ठाऊक" ,विराज विचार करत होता.

"काय रे, कसला एवढा विचार करतोय ?", पुनीत.

"अं , काही नाही , ते इथलं PACE चं पुढे काय करायचं तो विचार करत होतो", विराज.

"हं, ते ना? ते कोणाला हॅन्ड ओव्हर द्यावं लागेल तुला. कोणाला देशील? राकेशला की ऋजुताला?", पुनीत.

"खरं तर सध्या राकेश खूप बिझी आहे. त्याच्या प्रोजेक्टची डेडलाईन आहे एवढ्यात.  मला थोडीशी आयडिया होती की हे TechnoSystems चं येऊ शकतं. म्हणून मी ऋजुताला तसं सुरवातीपासून PACE च्या सगळ्या घडामोडींमध्ये सामील करून घेतले आहे. तिला सगळं माहितीही आहे आणि खूप चांगल्या प्रकारे ती हॅन्डल करत आहे. तर आपण तिला प्रोजेक्ट मॅनेजमेंटचाही चान्स द्यावा. म्हणजे सध्या रोल दिला तरी चालेल. मला खात्री आहे की ती तेही व्यवस्थित करेल", विराज.

"हं , आता तिचा तेवढा अनुभवही झालाय. ओके देन, प्रश्नच मिटला मग तर", पुनीत.

"हो , फक्त ती सध्या सुट्टीवर आहे तर ती आल्यावर तिला थोडाबहुत हॅन्ड ओवर देईन मी ", विराज.

"Ok, ते तुम्ही मॅनेज करा काय ते आणि चला नवीन कामाला जाण्यासाठी तयारीला लागा आता", पुनीत.

"हो", विराज.

विराज आपल्या केबिनमध्ये गेला. त्याने आईबाबांना फोन करून कळवले. त्यांनाही आनंद झाला.

"बाबा, जाऊ ना मी? तीन चार महिन्याचा प्रश्न आहे" , विराज.

"हो हो , नक्कीच. जाऊन ये, वेगळा अनुभव असतो. अनुभवसमृद्ध व्हावे माणसाने. आलेल्या संधीचा उपयोग करावा. इकडे होईल सगळं मॅनेज", विनीत म्हणाले.


इकडे ऋजुता आणि सगळे तयारीतच व्यस्त होते. एक एक गोष्टी हातावेगळ्या होत होत्या. रजतने ऋजुताला  मेसेज केला. "कॉल कर  मला तुला थोडा वेळ मिळाला की".

ऋजुताने वेळ मिळाला तसे त्याला विडिओ कॉल केला.

"बोल , काय म्हणतोस दादा? ", ऋजुता.

"अग एक खुशखबर द्यायची होती तुला म्हणून तर केव्हाचा म्हणतोय कॉल कर.", रजत.

"अरे काही ना काही गडबड सुरूच होती. लग्न म्हटलं की असंच असतं न. बरं तू सांग न खुशखबर लवकर", ऋजुताला आता रहावत नव्हते.

"मी विधीला सगळं सांगितलंय आणि ती मला हो सुद्धा म्हणाली आहे", रजतच्या आवाजात आणि चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.

"काय? खरच? मी खूप खुश आहे तुझ्यासाठी ", ऋजुताला आश्चर्य आणि आनंद दोन्हीही वाटत होते आणि ते तिच्याही आवाजातून आणि चेहऱ्यावर झळकत होते.

"अरे, हे सगळं कधी आणि कसं झालं? कधी बोललास तिच्याशी?", ऋजुता.

मग रजतने सगळे सांगितले.

"मग आता दोघांच्याही घरी कधी सांगणार आहात तुम्ही?" , ऋजुता.

"हं तोच एक प्रॉब्लेम आहे आता फक्त. मी तर लगेच सांगितलं असतं ग, पण तिला फायनल एक्साम होईपर्यंत वेळ हवाय", रजत.

"हं, बरोबर आहे तिचंही", ऋजुता .

"आणि मला यायलाही तेवढा वेळ लागेलच. त्यामुळे आणखी काही दिवसांनंतर बोलू. फक्त तुला सांगतोय मी आता. तुला पसंत आहे ना वहिनी?", रजत विचारताना हसत होता.

"ऑफकोर्स येस, इतकी क्युट आहे न ती. ती वहिनी झाली तर खूपच आवडेल मला तर", ऋजुता एकदम आनंदात होती.

"तुला काय वाटतं, आई बाबा रागावतील का ग? की आवडेल त्यांना ती सून म्हणून?"

"अं, माहीत नाही बॉ. चिडतील कदाचित. पण आता ते तर तुलाच बघावं लागेल" , ऋजुता हसत, खांदे उडवत म्हणाली.

"असं का बेटा, माझी मदत नाही करणार का तू? एवढे लाड करतो मी तुझे आणि तुला काहीच नाही , जा कट्टी मी", रजत लटक्या रागाने म्हणाला.

"ही ही ही, चिडू नकोस ना. गंमत केली रे, मी आहेच ना तुझ्यासाठी, कोई शक?", ऋजुता हसत म्हणाली.

"ही ही ही, मी पण गंमतच केली होती. तुझ्याशी कट्टी घेऊन कसं चालेल? माझ्या लग्नाची तयारी तूच तर करणार ना . ही ही ही", रजत हसत हसत म्हणाला.

"हो, पण भरपूर गिफ्ट्स वगैरे लागतील मला त्यासाठी. असं फ्री मध्ये नसतात होत ते कामं", ऋजुता आता हाताची घडी घालून, मान ताठ करून , भाव खात, हसत म्हणाली.

"हो, कबूल. तुला जे हवं ते. पाहिजे तर कार्डच देतो तुला, मग घे तुला हवं ते", रजत.

"ए पण तू सुद्धा शांतच रहा हं सध्या" , रजत.

"ओके बाबा , डोन्ट  वरी", ऋजुता.

"आणखी काय? झाली का स्नेहाच्या लग्नाची तयारी? ", रजत.

"चालली आहे. इतका सुंदर दिसतोय न आत्याचा बंगला. काकांनी दोन्ही टेरेस ला लायटिंग लावून घेतली आहे. समोर मंडप उभारला आहे. घरात फुलांनी, लायटिंग लावून सजावट केली आहे. खूप झोकात होत आहे सगळं. आणि स्नेहा पण खूप खुश आहे", ऋजुता.

"Wow! बोलेन मी आत्याशी अन स्नेहाशीही", रजत.

"बरं चल , बोलू मग नंतर , मी जाते आता जरा", ऋजुता.

कसं असतं ना बहीण भावाचं प्रेमळ नातं? एकमेकांशी भांडतील, रुसतील, हट्ट करतील , पण वेळ आली तर एकमेकांसाठी उभेही राहतील, साथ देतील.

असेच तीन चार दिवस धांदल गडबडीत निघून गेले. लग्नाच्या एकेक विधींना सुरवात झालेलीच होती. आणखी पाहुणे मंडळीही आली होती. ऋजुताने स्नेहाला तयार केले आणि स्वतःही तयार होऊ लागली. तेवढ्यात आत्या आली, आनंदाने म्हणाली, " अगबाई, किती गोड दिसते आहे स्नेहा.  छान तयारी झालीय हं ऋजू. बरं स्नेहा, बाबांच्या मावशी वगैरे आल्या आहेत , चल तुला भेटवून देते , झालंय ना तुझं?"

"हो , झालंय माझं, ऋजू तू ये तुझं झालं की, अजून वेळ आहे विधी सुरू व्हायला ", स्नेहा म्हणाली.

"हो, बस केस सेट करून आलेच", ऋजुता.

आत्या स्नेहाला घेऊन गेली. ऋजुताने आरशासमोर बसून केस सेट केले. रजत आणि विधीच्या विचारात असताना तिच्या नकळतच तिने समोरच्या बटांना कर्ल केले. आणि केसांचा फ्रेंच रोल केला. वर सुंदर मोत्याची फुले असलेली सोनेरी पिन एका बाजूला लावली आणि निघण्यापूर्वी आरशात शेवटची एक नजर टाकत होती . तोच तिच्या मागे खोलीच्या दाराशी असलेला विराज हाताने सुंदर असे सांगताना तिला आरशातून दिसला.  ती लाजली आणि नकळतपणे तिची नजर खाली झुकली. क्षणभराने मागे वळून पाहते तर काय , विराज गायब !

"अरे, विराजही आलाय का लग्नाला? पण तो कसा येईल? जाऊ दे, बोलावले असेल त्यांनाही , काही ओळख असेल काकांची वगैरे. पण मग असा न बोलता गायब कुठे झाला? ", अशा विचारातच ऋजुता खोलीबाहेर पडली .

काही वेळ असाच गेला.  लग्न लागण्याची वेळ आली . नवरदेव घोड्यावरून वाजतगाजत मंडपात येत होता. शालू वगैरे नेसून सजलेली स्नेहा स्टेजवर बसलेली होती. बँडबाजा वाजत होता. फटाके फुटत होते.

इतक्यात ऋजुताला जाणवलं की आपला फोन वाजतोय, व्हायब्रेट होतोय. तिने बघितलं तर विराजचा कॉल होता.

"हॅलो", ऋजुता ( धम धडाम, धूम- फटाके )
"हॅलो, ऋजुता, अग मला लं ( धडाम धूम , पी पी पी पी ,धूम धडाम - फटाके आणि बँड वाजत होता) डनला जायचंय.

"काय? लग्नाला ( पी पी पी धुडुम फट फट) जायचंय?", सध्या ऋजुताच्या डोक्यात स्नेहाचं लग्न इतकं गाजत होतं की ऋजुताने लंडनेवजी लग्न ऐकले होते.

"हो", विराज. आता त्याला काय माहीत , की तिने लग्न ऐकले होते . फटाक्याच्या आवाजाबरोबर त्यालाही ऋजुचा आवाज फारसा नीट ऐकू आला नव्हताच.

"हं ये ना मग. ( फट फट फटाक)", ऋजुता.
"हो", विराज.
"बरं मग , इथे खूप गडबड आहे. बाय", ऋजुता.

"बाय", विराज.

"अशी काय ही, हिला एवढे सांगितलं तरी काहीच वाटलं नाही हिला. फारच कोल्ड रिऍक्शन दिली हिने तर! जाऊ दे, मी माझं सांगण्याचं काम केलं, बघू पुढे", विराज विचार करत होता.

इकडे मंडपात रेखाताई वगैरे काही जणी बोलत होत्या. ती रेखाताईंच्या जवळ आली आणि विचारले , "विराज आलाय का ग"?

रेखाताई फक्त हसल्या आणि म्हणाल्या "मला नाही दिसला, तुला दिसला का?".

"अग हो ना, एक दोनदा दुरून दिसल्यासारखं वाटलं, आणि नंतर गायब", ऋजुता.

"बरं, आला असेल तर भेटेलच ना", आपले हसू लपवत रेखाताई म्हणाल्या.

"हं, बरोबर", ऋजुता.


क्रमशः

© स्वाती अमोल मुधोळकर

सर्व गोष्टी जुळून येत आहेत असं वाटत असतानाच विराजला लंडनला जावं लागतंय. करिअर मधील नवीन अनुभव आहे . पण विराज ऋजुताची जाण्याआधी भेट होईल की नाही ? काय वाटतं? कळवा.

हा भाग कसा वाटला नक्की कळवा.
सध्या जरा व्यस्तता असल्याने पुढील भाग अंदाजे 30 तारखेनंतर पोस्ट होईल. वाचक आपुलकीने विचारपूस करतात, वाट बघतात, समजून घेतात . खरच खूप खूप धन्यवाद. हा भागसुद्धा मी वेळात वेळ काढून पोस्ट करते आहे. पुढील एका भागासाठी थोडी वाट पहावी लागेल त्यासाठी सर्व वाचकांना क्षमस्व.  

🎭 Series Post

View all