दृष्टी आणि दृष्टिकोन - भाग 32

Drushti, ani, drushtikon, Viraj, Rujuta, Vidhi, Rajat, blindness, andh, love, prem, marathi, katha, kathamalika

मागील भागात ...

https://www.irablogging.com/blog/drushti-ani-drushtikon---bhag-31_7896

"बरं चल बाय, निघायचंय मला. आणि थँक्स हं", ऋजुता हसून म्हणाली आणि फोन ठेवला. तेवढ्यात रेखाताईंनी बोलावलं , "अग ऋजू, चहा थंड होतोय, चल लवकर". ऋजुताला रिऍक्ट व्हायलाही वेळ मिळाला नाही.

इकडे विराज मनात म्हणाला, "देवा, काय लिहिलं आहेस माझ्या नशिबात? आता मला कळलं , ती का असे विचित्र प्रश्न विचारत होती ते. तिला आतापर्यंत हेच वाटत होतं विधी आणि माझ्याबद्दल. याचा अर्थ तिने अजूनही माझा त्या दृष्टीने विचारच केला नाहीये. आणि इकडे मी.... विधी , तू गेलीस आता".

........

आता पुढे ...

ऋजुता आत जाऊन चहा वगैरे घेऊ लागली. घेता घेता तिने रजतला मेसेज केला.
"सॉरी, माझा गैरसमज झाला होता. विराज तिचा भाऊ आहे. बाकी आपण नंतर बोलू , मी ड्राईव्ह करणार आहे आता", ऋजुता.

"Thank god तो क्लिअर झाला.
Ok. तू फ्री असशील तेव्हा फोन कर मला . एक गोष्ट सांगायची आहे तुला", रजत.

मग विराजलाही एक मेसेज केला ," जमदग्नी, जास्त रागावू नकोस हं विधीला :-)".

विराज सकाळपासून 'दृष्टी'मध्ये आलेला होता. आतापर्यंत त्याचं काही ना काही कामच सुरू होतं. कालच्या विक्रीचा , सामानाचा आढावा घेणे, हिशेब करणे, आणखी काय सामान हवं आहे ते बघणे, पुढे काय करता येईल ते बघणे इत्यादी इत्यादी. ऋजुताचा फोन आला तेव्हाही तो अशाच काहीतरी कामात होता. आता सगळे आटपले होते. तो निघणार तोच त्याला तिचा हा मेसेज आला. त्यातलं जमदग्नी वाचून त्याच्या गालावर हसू पसरलं. "एवढं होऊनही हिला विधीचीच काळजी आहे. किती विचार करावा एखाद्याने दुसऱ्यांचा. आता हिच्यासाठी मला शांत राहावं लागेल. पण विधीला तिची चूक कळणंही गरजेचं आहे ", त्याला वाटून गेलं.

विराज घरी आला. समोर कोणी नव्हतं. तो सरळ माडीवर विधीच्या खोलीत गेला. विधी टेबल खुर्चीवर बसून अभ्यास करत बसली होती. "विधी , आता तुझ्या अगाऊपणाची हद्द झाली हं" , म्हणत त्याने विधीचा कान पिरगळला.

"आ ss , दादा, काय झालं? मी काय केलं? तू का चिडला आहेस एवढा?"

"काय झालं? काय व्हायचं राहिलं आहे ते विचार. ती ऋजुता समजते आहे की आपण दोघे  एकमेकांशी कमिटेड आहोत आणि आपलं लग्न होणार आहे", विराज तिला सांगत होता.

"काय? असं कसं वाटू शकतं तिला? वेडीच आहे ", विधी.

"खबरदार तिला काही म्हणालीस तर. तू जर स्वतः तिला असे सांगितले की त्याचे माझ्यावर खूप प्रेम आहे, तर तीच काय , कोणीही हेच समजणार न? त्यामुळे चूक तिची नाही तुझी आहे", विराज रागावत म्हणाला.

"मी कधी असं म्हणाले?", विधी गोंधळून म्हणाली.

"हेही मीच सांगू का आता? त्या दिवशी मंदिरात आपण सगळे अचानक भेटलो होतो तेव्हा म्हणालीस न तू तिला. तेच तिने धरून ठेवले ", विराज.

"ओह, अशी आहे तर सगळी भानगड ! दादा, तू शांत हो प्लीज. हं मला अंदाज आला होता की असं काहीतरी झालंय. मी बोलेन तिच्याशी ", विधी.

"विधी, मला वाटलं होतं की तिला आता माझ्या बद्दल फिलिंग्स होत आहेत तर मी आता सांगू शकेन तिला माझ्या मनातलं. पण नाही. तरीच ती मला असे प्रश्न विचारत होती. तिला तर हे वाटत होतं ना, त्यामुळे तिने माझा विचारच केलेला नाही अजून. किती वाट बघतोय मी त्या क्षणाची. सगळ्या गोष्टीवर पाणी फिरवलस तू. तिच्या डोळ्यांत माझ्याबद्दल फिलिंग्स बघायला तरसलोय ग मी", म्हणत विराज मटकन बेडवर बसला. त्याच्या डोळ्यात पाणी तरळलं होतं. गालावर अश्रू ओघळला.

विधी उठून त्याच्या समोर खाली येऊन बसली . तिने त्याचे डोळे पुसले.

आपले कान धरून ती म्हणाली , "सॉरी ना, दादा. पुन्हा नाही करणार मी असं काही. उठाबश्या काढू का आता ? मला वाटलही नव्हतं रे की असं काही होईल. मी तिलाही सॉरी म्हणेन ना ती परत आल्यावर, मग तर झालं? तू तर नेहमी सगळ्यांना रडवतोस ना, इतका स्ट्रॉंग माझा दादा, असे डोळ्यात पाणी नाही छान दिसत. तिला परत येऊ दे , मी सॉर्ट आऊट करेन सगळं. हस बघू आता." , अस म्हणत ती विराजच्या केसातून हात फिरवत त्याला शांत करू लागली.

काही वेळाने तो शांत झाला.
"आई बाबा कुठे आहेत ग? सहा वाजले अंधार होत आला तरी लाईट नव्हता लावलेला खाली. आई पण नव्हती किचनमध्ये."

"अरे  आई तर घरीच आहे, बाबा गेले बाहेर दुपारी. त्यांच्या मित्रांसोबत कुठेतरी जायचं होतं त्यांना. पण आईचं तर रोज स्वयंपाक वगैरे होऊन जातं आतापर्यंत. आज काय झालं असेल? दुपारी म्हणत होती , जरा थकल्यासारखे वाटतेय. झोपते म्हणून. चल जाऊन बघू "

दोघे खाली आईच्या खोलीत गेले. वीणाताई पांघरूण घेऊन झोपलेल्या होत्या. विधी त्यांना आवाज देणार तोच विराजने तिला थांबवले. त्याने विणाताईंच्या कपाळावर हात ठेवून पाहिले तर त्यांना चांगलाच ताप आलेला होता.

"ताप आलाय तिला. झोपू दे. तू जेवणाचं बघ . मी कोणी डॉक्टर आहेत का बघतो. आज तर रविवार आहे. असतील  तर उठवतो . ", विराज.

थोडया वेळाने वीणाताईना जाग आली. विराज खुर्चीवर बसलेला होता.

"अगबाई, आलास का तू? किती वाजलेत?", वीणाताई.

"साडेसहा" .

"बाप रे, आज इतकी कशी झोपले मी? स्वयंपाक राहिला माझा", वीणाताई उठण्याचा प्रयत्न करत म्हणाल्या. पण उठवत नव्हतं त्यांना.

त्याने विचारले, "आई , शांत रहा तू. विधीने बनवले असेल काहीतरी . काळजी करू नकोस. काय होतंय तुला? ताप आहे ग. जाऊ या का डॉक्टर कडे?"

"नाही रे नको डॉक्टरकडे जायला आता . रविवारी संध्याकाळी कोण सापडणार? तसंही जास्त काही नाही. ताप आणि घसा दुखतोय थोडा. काल थंडीमध्ये बसलो होतो ना बराच वेळ आपण. शाल वगैरे विसरले होते न्यायला. त्यामुळे थंडी बाधली असेल. आज मी गोळी घेऊन बघते . बरं वाटेल. नाहीतर मग जाता येईल उद्या", वीणाताई.

"बरं, सकाळी बघू .तू आता जेवण करून ही गोळी घे आणि आराम कर.
.....

इकडे ऋजुता आणि सगळे आत्याकडे पोचलेले होते. आत्याच्या बंगल्याला लायटिंग लावलेली दिसत होती. काही पाहुणेही आलेले होते. थोडेफार खाणेपिणे, गप्पा झाल्यावर सीमाआत्या रेखाताईना म्हणाली, "बरं झालं बाई वहिनी तू आलीस जरा लवकर. मला तर काय काय करू असं झालं होतं एकटीला".

"ऋजू, आता स्नेहाला लग्नाचे वेगवेगळे विधी, कार्यक्रम वगैरे साठी तयार करण्याची जबाबदारी तुझी हं. पार्लरवाली  मुलगी येणार आहेच तशी. पण बाकी सगळे साड्या, दागिने वगैरे तुम्ही ठरवा, बघा कधी काय घालायचे ते". आत्या.

"हो ग आत्या , काही काळजी नको करू. मी बघेन ते सगळं आणि सोबतच खूप गप्पाही मारेन स्नेहाशी. लग्नानंतर कधी भेट होईल ते काय माहिती. त्यामुळे मी आत्ता चान्स थोडीच सोडणार आहे तिला चिडवण्याचा , बघ ना किती ग्लो आलाय तिच्या चेहऱ्यावर. ही सगळी किमया आमच्या सुमितजीजूंची ", ऋजुता हसून म्हणाली.

आत्याही हसली , आणि स्नेहा लाजली.

"आणि हं ऋजू, मी विसरून जाईन सांगायला पुन्हा, उद्या सकाळी ना तो राजू झेंडूची फुलं घेऊन येईल. तर त्याच्या माळा करून घे  आणि घरात तुला आवडेल तशा लावून सजावट करून घे. त्याला आणि अजून कोणाला घे मदतीला" . आत्या म्हणाली.

"Ok बॉस , डन हं", खळखळून हसत ऋजुता म्हणाली आणि स्नेहासहित सगळे हसले.

आत्याने ऋजुताच्या खांद्यावर हलकेच चापटी मारत , हसून म्हटले, "मला बॉस म्हणते काय ग, बदमाश. थांब , शेखरला सांगते तुझंही लवकर लग्न लावून द्यायला" .

"अग  आत्या, नको ना. राहू दे न मला शांततेने आईकडे. तू त्यांच्या डोक्यात आता ही चिंगारी नको ना लावू", ऋजू .

"बरं वहिनी, चल आत मी दाखवते तुला सगळं , आणि काय काय करायचंय तेही दाखवते", सीमाताई म्हणाल्या आणि त्या दोघी गेल्या.

दुसऱ्या दिवशी सकाळी सीमा आत्या कडे ..

सकाळी सगळे आटपून ऋजू आणि स्नेहा साड्या वगैरे काही ठरवत बसल्या होत्या. बाकी सर्वांचीही काही न काही लगबग चालली होती.

इतक्यात एक पांढरा शुभ्र कुर्ता पायजमा आणि डोक्याला लाल पिवळी पगडी अशा वेशात असलेला विराज  मोठ्ठ्या टोपलीभर केशरी , पिवळी झेंडूची फुले घेऊन येताना ऋजुताला दिसला. ऋजुता त्याच्याकडे एकटक पाहतच राहिली. समोर मंडप टाकण्याची गडबड सुरु होती. ते काम करणाऱ्या माणसांच्या मागे तो काही सेकंद दिसेनासा झाला. ऋजुता भिरभिरत्या नजरेने त्याला शोधत होती. इतक्यात तो सरळ ऋजुताच्या समोर येऊन उभा राहिला.
टोपली खाली ठेवली, आणि म्हणाला,

"ताई , ही फुलं आणलीय , कुठं कशी लावायची सांगा".

त्याने ताई म्हणताच ऋजुता गडबडली . डोळे उघडमीट करून बघू लागली.

स्नेहाने तिला धक्का दिला , "अग तो राजू आहे, काम करतो इथे. अशी काय बघतेस" , तशी ऋजुता "अरे हो, सॉरी आत्याने सांगितलं होतं तोच का?"  म्हणाली.
" हा तर विराज नाही आहे. पण मग मला तर दिसला होता तो" , ती स्वतःशीच विचार करत होती.

"काय ग, ए ऋजू, कोणाला शोधत होतीस तू?", स्नेहाही तिला कोपरखळी मारून विचारत होती.

"अग कोणी नाही ग", ऋजू.

"हं, चल . माळा कशा लावायच्या ते सांगते तुला" , ऋजूने असं म्हणून तिथून  काढता पाय घेतला.

काही वेळातच तिने समोरचे गेट, वरच्या मजल्यावर जाणाऱ्या पायऱ्यांना असलेल्या ग्रिल ला, तर कुठे भिंतीवर कोपऱ्यामध्ये , ओसरीवरच्या फुलझाडांच्या कुंड्यांच्या भोवती अशी वेगवेगळी ठिकाणं हेरून तिने मस्त सजावट करून घेतली. आत्या एकदम खूष ! डोळ्यात पाणीच आले तिच्या. "किती सुंदर केली आहेस सजावट, ऋजू. लग्नघर वाटतय आता अगदी. बघ तू आल्याशिवाय न अशा गोष्टी होतच नाहीत. ", आत्या आनंदाने म्हणाली.

"अशा जीव लावता तुम्ही मुली अन मग निघून जाता आपापल्या नवऱ्याकडे", आत्याचे डोळे पाण्याने भरले होते.

"आत्या, हे बघ मी आहे ना, तुला खूप त्रास देणार आहे मी अजून. खूप लाड करून घेणार आहे तुझ्याकडून. त्या आधी कुठेच नाही जाणार. " म्हणत तिने आत्याला आणि स्नेहाला एकत्र गृप हग केले.

ते बघून तिकडेच काहीतरी कामात असलेल्या रेखाताई तिथे आल्या आणि म्हणाल्या,

"अरे, आम्हालाही घ्या ना तुमच्यामध्ये".

मग काय हसत, रडत सर्वांनी गृप हग केलं.

सकाळी विराजकडे ...

विराजचा फोन वाजला. "अरे, पुनीत सरांचा फोन ! काय म्हणताहेत सकाळी सकाळी" म्हणून विराजने फोन घेतला.

"हॅलो विराज, जरा लवकर ये आज ऑफिसमध्ये. एक चांगली बातमी आहे तुझ्यासाठी. ऑफिसमध्ये आल्यावर सांगतो", पुनीत.

क्रमशः


© स्वाती अमोल मुधोळकर

कथेचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव. कथा किंवा कथेतील कुठलाही भाग कॉपी करू नये. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा आहे.

आपण देत असलेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल सर्व वाचकांना मनापासून धन्यवाद. हा भाग कसा वाटला ते जरूर कळवा. आपले अभिप्राय हीच लेखनाची ऊर्जा आणि प्रेरणा. स्वस्थ रहा, आनंदी रहा , मुख्य म्हणजे वाचत रहा आणि कळवत रहा :-)

🎭 Series Post

View all