दृष्टी आणि दृष्टिकोन - भाग 30

Drushti, ani, drushtikon, marathi, kathamalika, katha, Viraj, Rujuta, Rajat, Vidhi, blindness, andh, love, prem

मागील भागात ...

https://www.irablogging.com/blog/drushti-ani-drushtikon---bhag-29_7625

"हाय विधी, फ्री असशील तर बोलता येईल आता. थोडया वेळाने बाहेर जायचं आहे मला मित्रासोबत", रजत.

"ओके, चालेल मला आता", विधी.

रजतने नेहमी घरी करायचा त्या सवयीप्रमाणे व्हिडिओ कॉल केला . एकमेकांना बघताच दोघेही काही सेकंद ब्लॅंकच झाले. विधीच्या चेहऱ्यावर ती हुरहूर, उत्सुकता, आतुरता दिसत होती . टपोरे पाणीदार डोळे सलज्ज झाले होते. रजत मात्र सगळे विसरून पुन्हा हरवला होता त्यांमध्ये. सकाळी सकाळी फ्रेश चेहरा, ट्रिम केलेली बिअर्ड, नुकतेच सेट केलेले ओले केस असलेला आणि व्हाईट कॅज्युअल टीशर्ट, ब्लू जीन्स घातलेला रजत खूपच देखणा दिसत होता. विधीचीही नजर त्याच्यावरून हटत नव्हती.
.........

आता पुढे ...

विधी खुर्चीवर बसली होती आणि फोन तिने टेबलवर रेस्ट करून ठेवला होता. एक हात टेबलावर पालथा आणि दुसरा हात गालावर ठेवून ती बसलेली होती.

"मला माहीत आहे ... की मी खूप हॅण्डसम दिसतो... पण म्हणून काय नेहमी ... असे बघत राहायचे का माझ्याकडे?" , रजत गालातल्या गालात हसत शब्दांवर जोर देत हळुवार आवाजात हळूहळू शब्द बोलत होता.

"अँ ? ", विधी तंद्रीतच, अन गोंधळलीही होती. एक दोन क्षण तो काय म्हणाला ते कळलेच नाही तिला . भानावर येताच त्याने काय म्हटले हे जाणवून तिने जीभ चावली आणि स्वतःलाच टपली मारली.

"कोण मी? क्काहीपण ... अगदी क्काहीपण हं", विधीचे आधीच टपोरे असलेले डोळे विस्फारून आणखी मोठे झाले होते. "वा रे वा, चोराच्या उलट्या बोंबा", विधी काहीशी लाजत गालात हसत म्हणाली.

"छे, इथे कोण चोर आहे? बाय प्रोफेशन मी इंजिनीअर आहे बुवा. सॉफ्टवेअर आर्किटेक्ट", रजत खांदे उडवत, हसत म्हणाला.

"मिस्टर आर्किटेक्ट, काल कोण बघत होतं असं भान हरपल्या सारखं? आणि झालंच तर आतासुद्धा ?", विधीनेही जाब विचारलाच.

"अरे ते जरा चुकून ... पण त्यातही माझा दोष नव्हता हं. मग कोणीतरी राजकुमारी इतकं सुंदर तयार होऊन , नाजूक हसत अचानक समोर आली तर गरीब बिचारे 'आम्ही' काय करू शकणार होतो?" , स्वतःला आम्ही असे संबोधताना राजतने टी शर्टची कॉलर अजूनच नीट केली उगाच.

"ओहो , म्हणजे तीही चूक आमचीच ! वा रे वा! बहोत खूब"

"पण बाय द वे तुला कसं कळलं की मी बघतोय ते?", रजतने हसत प्रश्न केला.

"अरे बाप रे , हा पुन्हा माझ्यावर आणून गुंडाळणार का आता? विधी कुछ कर, कुछ कर", विधी क्षणभर मनात विचार करत होती.

"अरे अशाने महत्त्वाचे बोलायचे ते राहून जाईल ना, ते बोलूया ना आधी", विधी विषय बदलत अन घाई करत म्हणाली.

"हं बोल ना, काय झालं?", रजत उत्सुकतेने म्हणाला.

"ऋजुता काल मला विचारत होती की लग्न कधी करताय? म्हणजे डायरेक्ट हाच प्रश्न विचारला तिने", विधी.

"ठीक आहे ना, मग जे असेल ते सांगायचं तिला, त्यात काय?", रजत.

"म्हणजे काय सांगू? अजून तर आपलं काही बोलणंही नाही", विधी.

"म्हणजे? मला नाही समजलं. तू ऑलरेडी कमिटेड आहेस ना, मग तुम्ही काही न काही ठरवलं असेलच न, त्यात मी काय करणार?", रजत न समजून म्हणाला.

"क्काय ? मी कमिटेड? कोणाशी? काहीपण काय बोलताय? कोणी सांगितलं हे तुम्हाला? ", विधीचे डोळे  आश्चर्याने विस्फारले होते.

"काहीपण म्हणजे? तुमचं ठरलेलं नाहीये का? ", रजत.

"अरे, ठरायला आधी कोणीतरी असावं लागतं ना? तसंच कसं ठरेल? सांगा ना, कोणी सांगितलं तुम्हाला?", विधी आता उदास वाटत होती.

"अग ऋजुनेच सांगितलं होतं . की विधी आधीच कमिटेड आहे , तू तिच्यापासून दूर रहा म्हणजे तिलाही त्रास नको आणि तुलाही. म्हणून तर कितीही आठवण आली तरी कितीतरी दिवसात मेसेजही नव्हता केला मी तुला. ती म्हणाली होती की मी त्यालाही ओळखते" , रजत.

"अरे देवा, आणि कोण आहे तो? मलाही कळू द्या आता", विधी.

"अग मी नाही ते विचारले", रजत.

"वा, तुम्ही पण ना. मी तर कामाशिवाय कोणाशी बोलतही नाही.  खरच सांगा, मी जर कमिटेड असते, तर तुमच्याशी तरी एवढे बोलले असते का? हा सुद्धा विचार नाही केलात तुम्ही . मला विचारायचं ना मग. स्वतः च ठरवलं आणि मी आपली वाट बघत राहिले तुमची ", विधीचा चेहरा पडला होता.

"अग पण, एवढं सांगितल्यावर असं तुमच्यामध्ये कशाला यायचं म्हणून मी ...", रजत.

"पण ती असं का म्हणाली होती? तुम्ही काय सांगितलंत तिला ?", विधी.

"कशाबद्दल?", रजत.

"अहो कशाबद्दल म्हणजे काय? आपल्याबद्दल. म्हणजे हा विषय निघाला म्हणजे तुम्हीही काहीतरी बोलला असाल म्हणून निघाला ना?", विधी.

"अं, हो... ते ... हेच की ... आपलं ते ...", रजत आता पुरता फसला होता.

"झालं? रजत , सांगा ना आता. प्रॉमिस, मी रागावणार नाही", विधी.

"म्हणजे मी सांगितलं नव्हतं, पण आधी तिलाच कळलं, म्हणून शेवटी सांगावं लागलं".

आता विधी हाताची घडी घालून प्रश्नार्थक नजरेने तो पुढे बोलण्याची वाट बघत होती.

"खरं ... खरंच सांगू?", रजत.

"एकतर तुम्ही दोघे बहीणभाऊ मिळून माझं मत न विचारताच लग्न ठरवताय , कोणाशी तेही माहीत नाही, आणि आता तुम्ही बोलतही नाही आहात" , विधी आता रडकुंडीला आली होती. हे काय होत आहे तिला कळत नव्हतं. तिच्या डोळ्यात पाणी जमायला लागलं होतं.

"विधी... विधी, नाही हं ,  इतक्या सुंदर डोळ्यात अजिबात पाणी नाही येऊ द्यायचं. इकडे बघ , माझ्याकडे... आणि रागावू नकोस हं. मी सांगतो तुला. मी तिला सांगितलं होतं की ... की मला विधी आवडते आणि माझं प्रेम आहे तिच्यावर", रजतने धीर करून सांगितले.

"काय ? खरंच? तुम्हालापण मी आवडते?", आता विधीच्या चेहऱ्यावरचे हावभाव क्षणार्धात बदलले होते. आश्चर्य, आनंद, समाधान, लज्जा, हसू, निश्चिन्तता काय काय दिसत होतं तिच्या डोळ्यात . पाहतच राहिला रजत.
" खरंच किती निरागस आहे ही", त्याला वाटले.

"हो . अगदी पहिल्यांदा चुकून बघितले होते ना, तेव्हापासूनच", रजत.

आता मात्र विधीचे गाल खूपच आरक्त झाले होते. दोघेही काही वेळ स्तब्ध होते. हा क्षण पुरेपूर जगल्यावर , तीही थोडी सावरल्यावर तिचे बोलणे त्याच्या लक्षात आले तसे त्याने भुवया उडवत विचारले , "एक मिनिट, तुम्हाला पण .... ? हा 'पण' म्हणजे काय? आणखी कोणाला?"

"म्हणजे .... म्हणजे काही नाही", विधी पापण्या खाली झुकवत, लाजत, हसत म्हणाली.

"ए सांग ना, प्लीज, प्लीज", रजत हसत विनवणी करत होता. कळले तर होते त्याला, पण उगाच. तिच्याकडून ऐकायचे होते ना.

"वाट बघा, वाट. कळ काढा थोडीशी , मिस्टर आर्किटेक्ट", विधी हसून म्हणाली.

"धिस इज नॉट फेअर, माझ्याकडून सगळे ऐकून घेतले आणि तू काहीच सांगत नाहीस. जाऊ दे, मी नाही बोलणार आता, ठीक आहे. बाय ", रजत चेहरा उतरल्यासारखा दाखवत म्हणाला.

बाय तर म्हटलं पण कॉल काही कट केला नाही हं त्याने. वाट बघत होता ती बोलण्याची.

शेवटी विधी हसत लाजत म्हणाली, " मी पण सेम टू सेम".

आता रजतच्याही आनंदाला पारावर नव्हता. तो तर खुर्चीवरून उठून नाचायलाच लागला होता. हात वर करून जॅकेट बोटात अडकवून गोल गोल फिरवत होता.

ढिन चिक ...  ढिन चिक ... ढिन चिक ...

आणि विधी त्याच्याकडे हसून बघत होती . "वेडू! एवढा प्रेम करतो पण तरी स्वतःला थांबवलं होतं त्याने, माझ्या आनंदासाठी ", ती त्याच्याकडे बघत मनात म्हणाली आणि एक अश्रू टिपला. काही वेळात तो परत जागेवर येऊन बसला आणि म्हणाला, " विधी, आय अम सो हॅपी टुडे. खरं सांगू, आधी मला वाटलं होतं की तुलाही मी आवडतो. पण मग ... ते सगळं झालं . मी खूप मिस करायचो तुला. असं वाटायचं , असं का झालं माझ्यासोबत? मी आतापर्यंत अभ्यास, करिअर यातच फोकस्ड होतो. पहिल्यांदा असं कोणामध्ये अडकलो मी आणि तीही माझी नाही होऊ शकत. खूप वाईट वाटलं होतं ग. कसं बसा प्रयत्न करत होतो मी सावरण्याचा", रजत सांगत होता.

"ओह, म्हणून तुम्ही काल असे वाटत होतात, काहीसे डिस्टर्ब झालेले", विधी.

"पण आता , जाऊ दे , जाऊ दे ते सगळं. आज मै उपर , आसमा नीचे ... तू जर हो म्हणशील तर मग मी आलो की आईबाबांना सांगून रीतसर मागणी घालेन तुला . तोपर्यंत तुझंही इंजिनिअरिंग पूर्ण होईलच. पण तोपर्यंत मात्र फक्त अभ्यास करायचा, त्याच्यावर कुठलाही परिणाम झालेला मला चालणार नाही. काय?", रजत .

"झालं, आता तू पण आणखी अभ्यास अभ्यास? एक दादा होता तो काय कमी होता?", विधी हसून म्हणाली.

"हा हा हा", रजत हसत होता.

"अरे, पण या ऋजुताचे काय? तिचा नक्की काय गैरसमज झालाय? कोणाला ओळखते ती? मी तर कोणाहीसोबत कधी गेली नाही कुठे. फार फार तर दादा किंवा मैत्रिणीच असतात सोबत माझ्या. ऋजुताला मी जेव्हाही भेटली तर दादाच होता माझ्यासोबत. मग हिला नक्की काय वाटले?  दादाला पण आज ती लग्नाबद्दलच विचारत होती. आणि काय म्हणाली होती ? ", विधी आठवू लागली. "हं , तुझं कधीपासून विधीवर प्रेम आहे? अरे हे काय विचित्र? कधीपासून म्हणजे काय? भाऊ आहे तो माझा. लहानपणापासूनच प्रेम करणार ना माझ्यावर. तिला काही कन्फ्यूजन तर नाही झालंय ना?"

"अं, सांगता येत नाही , असू शकतं. नाव काय ग दादाचं तुझ्या?", रजत.

"विराज", विधी.

"ओके , मी बघतो नंतर. ते आज गावाला निघालेत. पोचले नसतील अजून", रजत.

"ओके, आणि मग सांगा मला पण. नाहीतर तुमच्या बहिणाबाई ऍक्सेप्ट करायच्या नाहीत आम्हाला", विधी हसून म्हणाली . "आणि हं, यापुढे कितीही काहीही असलं, तरी आधी माझ्याशी बोलायचं आणि मग ठरवायचं, कळलं ना? ", विधी.

"हो ग, राजकुमारी. ", रजत हसून म्हणाला.

आणि जे लाजली ना विधी , की काय विचारता.

"बाय", विधी.
"बाय", रजत.

फोन ठेवला आणि आता इकडे विधीने समोर पडलेली एक ओढणी उचलली आणि दोन्ही हातात वर धरून ती नाचू लागली.  तिकडे रजतही खुशीत नाचतच होता. जणू दोघांच्याही मनातल्या भावना या सारख्याच होत्या ...

हृदयात वाजे समथिंग ...
सारे जग वाटे  हॅपनिंग ...
असतो सदा मी आता ड्रीमिंग ...

असतो उगाच smiling
बघता तुला मन jumping
वाटे हवे हे गोड feeling

धुंद धुंद क्षण सारे
हलके हलके फुलणारे
फिरुनी ओठांवर येई तुझेच गाणे

खिडकीतुनी डोकावुनी
दिसतेस का ... पाहतो तुला क्षणोक्षणी
कळता तुला ... मी संपतो
रोखू कशी तगमग आता हि रोजची
नजरेतूनीच माझ्या सांगतो मी तुला सारे
समजेल का तुला काही
पाहतो जिथे-जिथे मी चेहरा तुझाच आहे
विसरतो का मलाच मी

हृदयात वाजे something…

वाटेवरी मी रोजच्या असतो उभा दिसशील का कधी तरी
दिसलीस कि झंकारते उठते मनी किणकिण ही गोड गोडशी

रोखुनी मला तू बघशी
गोड तू जराशी हसशी
येशी अन तशीच तू जशी
शब्द ना सुचे मग काही
बोलणे हि जमतच नाही
गोंधळून वेडे मन जाई

हृदयात वाजे something…

क्रमशः

© स्वाती अमोल मुधोळकर

कथेचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव. कथा किंवा कथेतील कुठलाही भाग कॉपी करू नये. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा आहे.

सर्व वाचकांनी दिलेल्या प्रतिसादासाठी धन्यवाद. लाइक्स कंमेंट्स कमी असल्या तर मग आमचा लिहिण्याचा उत्साह बारगळलाच म्हणून समजा :-) . तर कसा वाटला आजचा भाग, तुमच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया नक्की कळवा. संपूर्ण कथेतील कोणते पात्र जास्त आवडते आहे?

रजत आणि विधीसाठी आजचे गाणे एका वाचक मैत्रिणीने सुचविले आहे. त्यासाठी त्यांनाही मनःपूर्वक धन्यवाद. गाणे छान आहे . जरूर ऐका.

🎭 Series Post

View all