Aug 06, 2020
स्पर्धा

टर्निंग पॉईंट

Read Later
टर्निंग पॉईंट

टर्निंग पॉईंट

 

Breaking News..! Breaking News..! Breaking News..!

फक्त पंधरा वयाच्या मुलाने केला आत्महत्येचा प्रयत्न...

चार माळ्याच्या बिल्डिंग वरून घेतली झेप..

नुकत्याच आलेल्या मालवाहू ट्रक मुळे वाचला जीव...

दोष कोणाचा..?

 

आज दिवसभरात बातम्यांवर सतत ही बातमी दाखवत होते. प्रणिता ने न राहवून टीव्ही च बंद केला आणि किचन मध्ये गेली. चार दिवसांपूर्वी शुभम म्हणजेच तिच्या मुलाने बिल्डिंग च्या गच्चीवरून उडी मारली होती. त्यांच दैव बलवत्तर म्हणून तिथे मालवाहू ट्रक आला होता. आणि त्यात शुभम पडला. तिचं नक्की काय चुकलं ह्या बद्दल ती विचार करत बसली. जेवणाचा डबा भरण्याची ती तयारी करू लागली. प्रणय ने तिला खाली येण्यास सांगून निघून गेला. तीही लगेच दाराला कुलूप लावून खाली आली. प्रणय ने रिक्षा थांबवली होती. लगेच ती त्यात बसली. आणि निघाले हॉस्पिटल च्या दिशेने. तिथे पोहचताच ते जनरल वॉर्ड मध्ये गेले जिथे शुभम ला आज शिफ्ट केले होते. शुभम ला नुकतच इंजेक्शन दिल्यामुळे तो झोपला होता. नर्स ने येऊन त्यांना डॉक्टरांनी बोलवल्याचा निरोप देऊन गेल्या.

 

टकSss.. टकSss..

 

"हो या आत या."

 

"डॉक्टर, तुम्ही बोलावलत. शुभम ठीक तर आहे ना. आम्ही घरी कधीपर्यंत..."

 

"सध्या त्याला डिस्चार्ज नाही देऊ शकत. जखमा खोल आहेत. शरीरावर च्या आणि मनावर च्या सुध्दा. शारीरिक दृष्टीने तसा तो होईल रिकव्हर पण मानसिक दृष्टीच काय..? त्यामुळे खरी गरज त्याला मानसिक दृष्ट्या सक्षम बनवण्याची आहे. आणि त्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांची गरज लागेल."

 

"म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय की शुभम..?"

 

"ह्यात च चुकतो आपण. मानसोपचार म्हटलं की व्यक्ती वेडा झाला, असं होत नाही मिस्टर. देशमुख. डॉक्टर कडे जाऊन जसे शारीरिक उपचार करतो तसे मानसिक उपचार होणे देखील अत्यंत गरजेचे आहे. हे कार्ड घ्या. गरज लागेल तुम्हाला. बघा विचार करा. मी फक्त इतकेच करू शकतो. आफ्टर ऑल इट्स युअर डिसिजन."

 

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

 

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार शुभम ला डिस्चार्ज मिळाल्या नंतर च्या एका आठवड्याने मानसोपचार तज्ज्ञांकडे घेऊन जाण्यात आलं. त्याला विचारलेल्या प्रश्नांनी कळलं, की तो एक गेम खेळत होता. ज्याचं नाव होत "ब्लू व्हेल". त्याला त्या गेम ची लिंक कोणत्या प्रायव्हेट अकाउंट द्वारे मिळाली होती. शाळेत नेहमी अव्वल येणारा, कोणाशीही जास्त संपर्कात न राहणारा, अभ्यासा व्यतिरिक्त अन्य कोणत्याही विषयावर न बोलणारा असा होता शुभम. एकलकोंडा स्वभाव असल्याने कोणी मैत्री देखील करत नसे. वर्गात ही एकटाच पुस्तकात डोकं घालून बसत. अभ्यासात हुशार असल्याने सगळे त्याचा तात्पुरता फायदा घेऊन निघून जात. महागडे गेम्स, आणि लेटेस्ट फिचर्स च्या सगळ्या गोष्टी घरी होत्या. पण खेळून खेळून किती खेळणार. तसेच आई बाबा कामाला जात आणि उशिरा येत. त्यामुळे शाळेतून घरी आल्यावर घर त्याला खायला उठे. अश्यातच त्याला त्या नवीन गेम बद्दल कळलं.

 

सतत च्या एकाकी पणामुळे तो कंटाळला होता. म्हणून काहीतरी नवीन करण्यासाठी त्याने हा गेम खेळण्याचे ठरवले. याची जाणीव ना प्रणिता ला होती ना प्रणय ला. त्या गेम नुसार पन्नास चॅलेंज त्याला देण्यात आले होते. आणि ते आतापर्यंत पार देखील त्याने केले. आणि हेच शेवटचे चॅलेंज होते, जे करण्याचे धाडस आज शुभम ने केले. त्याने मध्येच क्विट करण्याचे देखील ठरवले होते पण एकदा का तो गेम आपल्या मोबाईल मध्ये आला, तर पूर्ण मोबाईल आपला हॅक होऊन जातो. त्यामुळे त्याला तिथून धमक्या येऊ लागल्या. आणि ते टास्क पूर्ण करण्याशिवाय त्याला गत्यंतर नव्हतं.

 

कामात स्वतःला पूर्णपणे झोकून घेतलेल्या प्रणिता आणि प्रणय ला हे सगळं अनपेक्षित होतं. त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. उशीर झाला होता पण वेळ निघून गेली नव्हती. त्यांनी लगेचच घरी जाऊन आधी तो कॉम्प्युटर फोडून टाकला. त्यांना अजुन कोणतीही रिस्क घ्यायची नव्हती. शर्टच्या बाह्यात लपलेलं,ब्लेड ने हातावर काढलेलं व्हेल च चित्र आज त्यांना दिसलं. त्याला फक्त औषध गोळ्या न देता, शुभम ला घेऊन दर विकेंड ला ते बाहेर घेऊन जाऊ लागले. त्याला आवडणाऱ्या गोष्टी करू लागले. त्याच्याशी कमी होत असलेला संवाद आता ते रोज गप्पा गोष्टी करून, त्याचे फक्त आई वडील न राहता आता मित्र बनू लागले. शिक्षकांशी संपर्क साधून त्यांना देखील ह्या गोष्टी बद्दल सांगून, सतर्क केले. त्यांना साथ देण्याचे ठरवून शिक्षकांनी आठवड्यात एक चर्चासत्र चा तास ठेवू लागले. त्यामुळे शुभम सोबतच काही अबोल असणारी मुले हिम्मत करून बोलू लागली. त्यांचे बुजरे स्वभाव खुलू लागले. मनात कोंडलेले विषय बाहेर आल्याने शुभम सोबत इतर ही मुलांचा स्वभाव स्वछंदी झाला.

 

आज शुभम लॉ कॉलेजमध्ये शिकत आहे. आजही त्याला त्याच्या आई वडिलांची दिलेली साथ आठवते. फक्त गोळ्या औषधांच्या भरवश्यावर न राहता त्यांनी आधी स्वतःमध्ये बदल घडवून त्याला मानसिक दृष्ट्या बर आणि सक्षम केलं, आणि हाच त्याच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट म्हणून त्याला आठवतो. याच गोष्टीचा धडा घेत, आता बेकायदेशीर गोष्टी करणाऱ्या वाईट लोकांना धडा शिकवत, निरागस लोकांची ह्यातून सुटका करण्यासाठी, त्यांना सतर्क ठेवण्यासाठी त्याला वकील बनायचे आहे.

 

- अक्षता कुरडे.

( ब्लू व्हेल गेम सारख्या भयानक सत्यावरून वरील काल्पनिक गोष्ट लिहिली आहे. )