Aug 12, 2020
विनोदी

पुढचे पाऊल...भाग1

Read Later
पुढचे पाऊल...भाग1

ती जेव्हा दुधाचा ग्लास घेऊन आत आली तेव्हा तो खुर्चीवर डोळे मिटून होता.

तिच्या बांगड्यांच्या आवाजाने तो जागा झाला.

" आज श्रीरंगराव पैसे घेऊन येणार होते."

" हो, पण बाबांना नाही जमले, त्यांचा मघाशीच फोन आलेला."

" जमले नाही म्हणजे? त्यांनी तसं कबूल केलंय." असं बोलून त्याने मोबाईल हातात घेतला.

" अहो, प्लीज बाबांना फोन नका करू." असे बोलेपर्यंत त्याचे बोलणे सुरू झाले. सासऱ्यांच्या वयाचा मान न राखता तो फोनवर रागारागाने बोलत होता.

बोलणे आटोपल्यावर तिने आणलेला दुधाचा ग्लास उडवत तो खोलीबाहेर निघून गेला. ती मात्र शरीराचं मुटकुळं करून तशीच पलंगावर बसून राहिली. खरंतर तिलाच स्वत:ची लाज वाटत होती. एका बापाने मुलीच्या सुखासाठी हुंडा द्यायचे कबूल करायला नको होते.
काही दिवसांनी तिला भेटायला आलेल्या मैत्रिणी लवबाईट्स वरून चिडवत होत्या. ती मात्र देहावरील घाव आणि मनातील भाव लपवत राहिली. लग्नानंतरचा सहवास दूरच केवळ सासरच्या माणसांचा वनवास तेवढा ती भोगत होती. वरकरणी खुश असल्याचे भासवत असलेली ती, तिची खास मैत्रीण नलूच्या नजरेतून मात्र सुटली नव्हती.
मैत्रिणी गेल्यावर तिला खूप एकटं वाटू लागले. कबूल केलेला हुंडा न दिल्यामुळे ती आई वडीलांकडे जाऊ शकत नव्हती की त्यांना एक फोनही करता येत नव्हता. हुंडा दिल्याशिवाय सासू सासऱ्यांना मुलीच्या घरी यायला जावयाने मज्जाव केला होता.
काही दिवसांनी एक घटना घडली, अचानक तिच्या सासऱ्यांना पक्षाघाताचा सौम्य झटका आला. पैसे नसल्यामुळे त्यांच्यावर चांगले उपचार होत नव्हते. त्यात नवऱ्याचा तुटपुंजा पगार. तो परत तिच्या मागे हुंड्याच्या पैशाचा तगादा लावू लागला. सासूरवाडीला निरोप पाठवला. तिला माहीत होते, बाबांनी लहान तोंडी घेतलेला घास त्यांना झेपणारा नाहीये.
सासऱ्यांच्या पायाला तेल लावून ती हॉलमध्ये बसली असताना बाहेरून नलू येताना दिसली. तिला खूप बरे वाटले. भर उन्हात चेहऱ्यावर पाण्याचा शिडकावा बसावा तसे वाटून गेले. नलूला पाणी देत इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. नलू तिच्या माहेरकडची असल्यामुळे नवऱ्याचे कान त्या दोघींच्या बोलण्याकडेच होते. नलूला ते अपेक्षित होते. जाताना तिने माधवीच्या हातात एक चिटोरे कोंबले आणि निघून गेली. ते चिटोरे माधवीच्या मनाला पालवी देण्याला कारणीभूत ठरले. त्यात शेजारच्या घरातील वायफायचा पासवर्ड होता आणि शेजाऱ्यांशी त्याबाबत नलूने बोलणेही केले होते. माधवी आता नलूशी संपर्क साधू शकत होती. दुसऱ्या दिवशी तिने व्हाट्सएप डाऊनलोड केले आणि तब्बल दोन महिन्यांनी ती आपल्या आई वडिलांशी बोलली. व्हिडीओ कॉलने त्यांना पाहू शकली. हे सारं नलूमुळे घडत होते. अडचण संपली नसली तरी माधवी आणि तिचे आई वडील एकमेकांना पाहू शकत होते. आईने माधवीला खूप समजावले, धीर दिला. माधवीच्या डोळ्यातील अश्रू काही थांबत नव्हते. बराच वेळ चाललेले संभाषण दरवाजा ठोठावण्याने थांबले. माधवीने लगेच व्हाट्सएप अनइंस्टॉल केले आणि वायफाय बंद केले. दरवाजात नवरा उभा होता. तो लगेच तिचा मोबाईल शोधू लागला.

" तुझा मोबाईल कुठेय? कोणाशी बोलत होती? " त्याच्या थेट प्रश्नाने ती मनातून घाबरली...

क्रमश:

Circle Image

ऋतुजा अतुल वैरागडकर

Working woman

I m working woman... i have 2 baby.. I m learning... i like reading and writing