Aug 13, 2020
कथामालिका

आयुष्याला द्यावे उत्तर... भाग २ 'रेड लाईट ते लाईम लाईट... '

Read Later
आयुष्याला द्यावे उत्तर... भाग २ 'रेड लाईट ते लाईम लाईट... '

चला वळूया आपल्या पुढच्या कथेकडे. 

ही कथा आहे श्वेता कट्टी ची. आता तुम्ही म्हणाल.. कोण ही? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्यात तुमची चूक नाहीच मुळी. कसं माहित असणार तुम्हाला?  अहो,  आपल्याकडे नको त्या व्यक्तींचं मार्केटिंग जास्त होतं. तुम्ही गुगल वर श्वेता टाईप केलं ना... की सगळ्यात आधी तुम्हाला एखाद्या एक्टरेस चे डिटेल्स मिळतील. त्या लिस्ट मध्ये ही श्वेता कुठेतरी शेवटच्या बाकावर मिळेल.

असो... आज आपण हिच्याबद्दलच बोलणार आहोत. रेड लाईट मधून लाईम लाईटमध्ये आली खरी,  पण हा प्रवास खरंच तितका सुककर होता?  की खाचखळगे.. काट्याकुट्यानी भरलेला होता? 

मुंबईतील सर्वात मोठा 'रेड लाईट एरीया' अशी ओळख असलेल्या कामाठीपुऱ्यातील एक तरुणी अमेरिकेत शिक्षण घेणार ही बातमी वाचताना किती छान वाटतं नाही !! पण हे सगळं खरंच इतकं छान होतं?? इतकं सोप्प होतं?? 

काय काय  नाही पाहिलं लहान वयात... कामाठीपुरातल्या  बदनाम वस्तीमध्ये असलेली  टीचभर खोली... इमारतीत चालणारा वेश्या व्यवसाय..  दिवस रात्र येणारे जाणारे 'ग्राहक'... डोक्यापासून पायापर्यंत कपड्यांच्या आत असणाऱ्या शरीराच्या विविध अंगांना...कपड्यांवरून स्कॅन करणाऱ्या  त्यांच्या वासनांध  नजरा.... कधीही न पाहिलेला.. नावही  माहित नसलेला सख्खा बाप.... सावत्र बापानं केलेला शारीरिक अत्याचार...त्वचेच्या रंगामुळे पडलेलं 'काळी' नाव..  दिवसरात्र नजेरेसमोर चालणारा शरीराचा व्यापार... सजलेल्या चेहऱ्यांमागे असलेलं दुःख.....यातना.... घरची बेताची आर्थिक परिस्थिती... आजूबाजूची भयानक परिस्थिती...  सगळ्याच बाजूनं मनाचं  खच्चीकरण करणारी... तिच्या कोवळ्या मनावर या  सगळ्यांचा परिणाम होत होता.. पण हळूहळू तिला हे सगळं सरावाचं झालं...तिनं ते करुन घेतलं... परिस्थितीशी जुळवून घेतलं.. कारण नजर आणि मन दोन्हीही मेलं होतं.... आणि त्यातूनच तिनं  स्वतःचा शोध घायला सुरवात केली.. संकटांच्या छातीवर पाय रोवून यशाची शिखरं पार करत गेली.. 

आजूबाजूला देहाचा उघड उघड बाजार मांडलेला असताना तिची आई या दलदलीत न रुतता छोटी- मोठी कामं करत संसाराचा गाडा हाकत होती. आपल्यासारखी  आपल्या मुलींची अवस्था होऊ नये म्हणून तिची आई तिला आणि तिच्या बहिणींना शिकवत होती. त्याच बदनाम वस्तीतल्या पालिकेच्या मराठी शाळेत तिने आठवीपर्यंत शिक्षण घेतले. पुढे एसएनडीटीतून  मधून बारावी पूर्ण केली. आपल्या आईच्या लढाऊ  स्वभावामुळं ती सुद्धा परिस्थिती वर मात करायला शिकली. अडाणीपणामुळे आईचा परिस्थितीशी असलेला झगडा तोकडा पडत होता, हे वास्तव तिला जाणवले. परिस्थिती बदलण्यासाठी शिक्षण हाच एकमेव उपाय असल्याचे तिच्या लक्षात आले. म्हणूनच तिनं आपलं शिक्षण जिद्दीनं पूर्ण करायचं ठरवलं. सगळं काही विपरीत असतानाही तिची जिद्द  ठाम होती. आणि याच इच्छाशक्ती च्या जोरावर तिने न्यूयॉर्कमधील बार्ड महाविद्यालयात मानसशास्त्राच्या अभ्यासासाठी प्रवेश मिळवला. 

 या दरम्यान, कामाठीपुरात वेश्याव्यवसाय करणा-या महिलांसाठी काम करणा-या सामाजिक संस्थांशी तिची ओळख झाली.  आणि तिच्या आयुष्याला खऱ्या अर्थानं कलाटणी मिळाली. नवी भरारी घ्यायला  ती सज्ज झाली. मराठी माध्यमातून झालेलं शिक्षण... तिच्या सावळ्या रंगामुळं होणारी हेटाळणी... त्यातुन कॉलेज मध्ये आलेला न्यूनगंड घालवण्यासाठी तिनं इंग्रजी भाषा शिकायला सुरु केलं. हट्टाला पेटल्यासारखं.. नी अवघ्या दोन वर्षामध्ये तिने इंग्रजीवर प्रभुत्व मिळवत,   आपल्या उच्च शिक्षणात येणारा एक अडसर दुर केला. 

आपल्या प्रगतीच्या... शिक्षणाच्या आड येणाऱ्या प्रत्येक अडथळ्यावर मात करत... बंद दारावर लाथ मारत...  आपल्या मेहनतीच्या... जिद्दीच्या जोरावर... शिक्षण पूर्ण करुन... स्कॉलरशिप मिळवून ही चिमणी भुर्रकन उडाली... अमेरिकेला... आयुष्यात आलेल्या वेदनेच्या... अपमानाच्या... गरिबीच्या.. अवहेलनेच्या.. सगळ्या सगळ्या काळ्याकुट्ट ढगांना मागे सारत...  आयुष्यात यशाचे इंद्रधनुष्य उमटवायला.. क्षणभंगुर नसलेलं... अख्या जगाला दिसेल आणि अक्ख जग नावाजेल असं... आपली मुलगी काय शिकतेय.. कुठल्या युनिव्हर्सिटी मध्ये शिकतेय,  हे तिच्या आईला नाही सांगता येत... पण तिचं यश आई डोळ्यांत साठवू पाहतेय.. 

©®रत्ना 
 

​​​​​​