हे नाते जन्मांतरीचे.(भाग19)

संघर्ष प्रेमासाठीचा. हे ह्या कथेच्या भागात दर्शवला आहे.


#प्रेमकथा (भाग 19)
नदीकाठी श्वेतरंगाची साडी घातलेली एक स्त्री  दिसत होती. त्याचे डोळे आनंदाने चमकले. त्याची उदासीनता दूर होऊन तो त्या खडकावरून लगबगिने उठला. आणि वेगाने जाऊन त्या नदीचे दुसरे टोक गाठले. नदीच्या वरच्या अंगाला श्वेत साडीवाली स्त्री कपडे धुण्यात व्यस्त होती. तिला कुणाची तरी येण्याची चाहूल लागली. तसं तिने वर पाहिले समोर प्रीतम उभा होता. तीने लगेच गडबडीने  साडीचा पदर ठीक केला. ती संकोचित रित्या खाली पाहू लागली. क्षण दोन क्षण ते एकमेकांकडे बघू लागले. कसे बोलावे आणि काय बोलावे हे दोघांनाही सुचत नव्हते.
तेवढ्यात प्रीतमनेच तिला विचारलं. घरात एवढी नोकर चाकर असतांना तुम्ही का धुणे धुवायला आलात आणि तेही एकटेचं ...?
ती त्यावर काहीच बोलली नाही.
नंतर त्याने विचारले, काय धुणे धुता आहेत का..?
" नाही जेवण करते आहे..!तुम्ही करणार का.?"
असे स्पष्ट उत्तर त्याला द्यावे असे तिला वाटले पण तिने स्वतःला सावरले. चेहऱ्यावर थोडे स्मित हास्य करत.
" हो"म्हणाली
" रोज दुपारी इकडेच धुणे घेऊन येतात का तुम्ही..? "
" हो रोज इकडेच येत असते...!"
" कुणाला सोबत आणायचं ना मग एवढे दूर एकट्या का येतात. "
" आणखी कोण येणार सोबतीला, हे सांगतांना  तिला कसंतरी झालं, तिचा चेहरा थोडा दुःखी झाला,
त्याला वाईट वाटलं उगाच तिला असं विचारलं म्हणून.
तो थोड्या वेळ शांत राहिला. तो शांत राहिलेला पाहून तिने त्याला विचारलं.
" तुम्ही आज नदीकडे कसे काय...? " नाही म्हणजे तुमची शाळा असते ना...? तिने आपणहून प्रश्न विचारल्यामुळे त्याला जरा बरे वाटले.
" असंच फिरत फिरत आलो.. ह्या नदीकाठी मला फिरायला फार आवडते. तसेच त्या खडकावर बसून नदीचा किनारा निहारायला फार छान वाटते.
त्या खडकावर बसून नदीचे सौंदर्य पाहण्यात एक वेगळाच अनुभव आहे. शहरी भागातील गजबज पाहिलेली आहे मी.
पण इथल्या शांत आणि निरव वातावरणाने मी भारावून गेलो. त्याचे ते प्रामाणिक उत्तर एकूण तिलाही समाधान वाटलं.
त्याचा तो सभ्यपणा आणि शांत स्वभाव तिला पहिल्याच भेटीत मनाला भावला होता. त्याच्या चेहऱ्यावर तिला आपलेपणा जाणवला. तो अनोळखी होता पण चेहरा मात्र खूप खूप ओळखीचा वाटत होता.  त्याचा तो चेहरा कुणाची तरी आठवण करून देत होता. लग्नाच्या सहाव्या महिन्यानंतर मृत्यू पावलेल्या पतीची, म्हणजेच आर्यनची.
तिला त्या आठवणीने एक दुःखाचा उमाळा आला. डोळ्यातून  अलगत एक थेंब अश्रू केव्हा गळून गेला. हे तिलाच समजले नाही. आता मात्र तिला तिचे रडू अनावर झाले. त्याच्या नजरेपासून लपवून तिने ते  साडीच्या पदराने पुसले त्याच्या चेहऱ्याला पाहून तिला आपल्या पतीची आठवण झाली ,त्याच्यात तिचा काहीच स्वार्थ नव्हता.  
पण पहिल्याच भेटीत तो काहीतरी वेगळा भासत होता. त्यामुळे तो पहिल्या दिवशी आला तेव्हा तो शाळेत गेल्यावर ती त्याच्या खोलीत जाऊन  निवांत त्याच्या वस्तुंना निहारू लागली.
रात्री ती त्याला पाणी द्यायला गेले असता, तेव्हापासून तिची डोक्यातविचार मालिका सुरु झाली. बराच वेळ असाच लोटला. दोघेही काहीच बोलले नाही. फक्त अधून मधून  एकमेकांनकडे बघने मात्र दोन तीनदा झाले.
आजूबाजूला घनघोर शांतता होती. अचानक काहीतरी नदीच्या पाण्यात पडल्याचा आवाज आला.
डुबुक sss बहुदा  एक झाडाची फांदी तुटून पाण्यात पडली असावी त्याचा हा आवाजा असावा.
ती जरा दचकलीच, त्यामुळे तिची विचार मालिका जरा तुटली, ती बेसावध होती. त्याच गडबडीत तिचा तोल ठासडून तिचा देह नदीच्या पाण्याकडे झुकला. दोन-तीन गीरक्या खात ती नदीच्या पाण्यात पडणारचं तेवढ्यात  प्रीतमने तिचा  वर झालेला उजवा हात गपकन पकडला. जोरात खेचून तिला अलीकडे ओढलं. तिचा तोल जाऊन ती त्याच्या अंगावर कोसळली. क्षण दोन क्षण काय झाले हेच दोघांना समजले नाही. दोघेही थोडे सावरले तिचा श्वास अजून फुललेला होता. भीतीने चेहरा बहरून गेला होता आणि ती तशीच अजून त्याच्या बाहू पाशात होती.
दोन्ही हाताने छातीवर घट्ट धरून ठेवलेले. तिचा उर शांत झाला,भीती कमी झाली. तिने लाजून त्याला मारलेली मोठी सोडली आणि थोडी दूर जाऊन थांबली.
"माफ करा..!"असं तिच्या तोंडून नकळत शब्द निघून गेले.
" काही हरकत नाही, तुम्हाला लागलं तर नाही ना..!
या इकडे या थोडा वेळ खडकावर बसा. म्हणजे तुम्हाला बरे वाटेल..!"
असं म्हणत तो खडकाकडे  निघाला आणि तीही त्याच्या मागे मूकपणे निघाली. खडकाच्या दोन टोकांवर दोघी बसले.
" मधुमिता तुम्ही ठीक तर आहात ना..? "
" हो...!!मी ठीक आहे तुम्ही होतात म्हणून आज वाचली मी, ती कृतज्ञतेने त्याच्याकडे पाहू लागली.
"एक गोष्ट सांगतो तुम्हाला, मी असतांना तुम्हाला काहीच होऊ देणार नाही, तुमचे रक्षण करणे हेच माझे कर्तव्य आहे. हे बोलताना तो तिच्या नजरेला नजर टाकून बोलत होता. तसा तो जागेवरून उठला आणि तिच्याजवळ गेला.
" मी जेव्हा तुम्हाला पहिल्यांदा पाहिले तेव्हाच तुमच्याविषयी एक आपलेपणा माझ्या मनात निर्माण झाला होता, नक्कीच आपली काहीतरी जुनी ओळख असावी, नाहीतर त्याशिवाय अश्या आपल्या भावना जुडणे कदापि शक्य नाही. आई विषयी जी ममतेची ओढ असते अगदी त्याचप्रमाणे तुमच्या विषयी माझ्या मनात प्रेमाची ओढ वाढली. तुम्ही मला मनापासून आवडला होतात. पण हे तुम्हाला सांगणार तरी कसे..?
" सर्व आयुष्य तुमच्या सोबत जगावे हीच एक इच्छा आहे मनात."
त्याच्या डोळ्यातून अश्रू गळू लागले त्याने अलगत तिचा हात हातात घेतला.
" माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे, जसे आज तुमचे रक्षण केले अगदी त्याचप्रमाणे तुमचे आयुष्यभर रक्षण करायला मी तयार आहे...!"
प्रितम मनातलं सारं काही एकाच शब्दात बोलून गेला, काय बोलला हे देखील त्याला त्याचे समजले नाही. पण भावनेच्या भरात तो भरपूर काही बोलून गेला होता.
तिला त्याच्या स्पर्शाने भरून आले. गेल्या दोन वर्षाच्या विधवा काळात  तिला असा प्रेमळ स्पर्श कोणीच केला नव्हता. जीवनात सारेच दुःख, वेदना, अपमान हेच काही तिच्या वाटेला आलेले होते. तिने अलगद त्याचा हात आपल्या हातात घेतला, एक वर नजर त्याच्या डोळ्यात खोलवर टाकत. चेहऱ्यावर स्मित हास्य केले. आणि बाजूला शून्यात नजर लावून बसली. तिच्या चेहऱ्यावरल्या भावना नेमक्यापणे  त्याला टिपता आल्या नाही. तिच्या दुःखावर आज कुणीतरी सुखाची फुंकर घातली होती.



(कथेच्या पुढील भागात काय होते ते बघण्यासाठी वाचत रहा ही कथा.)

कथा क्रमशा :
लेखिका :- सौं रुपाली बोरसे.
कथेचे नाव :- हे नाते जन्मांतरीचे.
टीम :- ईरा नाशिक.
स्पर्धा :- राज्यस्तरीय करंडक स्पर्धा

🎭 Series Post

View all