Login

हे नाते जन्मांतरीचे.(भाग 15)

प्रस्तुत कथेमध्ये मधुला विधवा असल्यावर होणारा त्रास आणि त्या नंतर प्रेमच्यासाठी संघर्ष करावा लगतो आहे हे दर्शवले आहे.


#प्रेमकथा (भाग 15)
प्रस्तुत कथेच्या मागील भागात आपण बघितले की प्रितम आता सज्जनगडाकडे निघाला आहे आणि त्याला रस्त्यात एकही वहान मिळत नाही, कसे बसे एक वहान मिळाले आहे (टांगा ).त्यातून त्याचा प्रवास चालू आहे. आता पुढे काय होते ते वाचत रहा.
*******
बोलता बोलता त्याचा प्रवास सुरू झाला. प्रवासामुळे अंग जरा सैल पडले होते. एक तास उलटून गेला. वाटेत एक नदी लागली तिही संतपणे वाहत होती. नदीवरला पूल ओलांडला की गावाची वेस लागणार होती आणि थोड्याच वेळात सज्जनगड. एकंदरीत गाव छोटासा होता पण काही घरी चांगलीच मोठी दिसत होती. जुने वाडे ही दिसत होते. त्यापैकी एक भव्यदिव्य वाडा म्हणजे आप्पासाहेब इनामदारांचा होता. टांगेवाल्याने टांगा अंबाजोगाईच्या मंदिराजवळ आणून सोडला. तेवढ्यात तो टांगेवाला प्रितमला म्हणाला.
" मास्तर आता रात्र झाली आहे, तुमची राहायची सोय कुठे आहे का..? नसेल तर ह्या अंबाजोगाईच्या मंदिरात होऊ शकते!"
" प्रितमने आपली बॅग घेतली , मंदिराच्या पायऱ्याजवळ येऊन उभा राहिला. तेवढ्यात मंदिरातील पुजारी प्रितमची विचारपूस करू लागला.
" मास्तर आता रात्र खूप झाली आहे आणि एवढ्या रातच्याला तुम्ही थांबणार तरी कुठे..? त्यापेक्षा एक काम करा आमच्या घरी थांबा आजची ही रात्र. अशी पण तुमची शाळा आता बंद असेल, वाटलंच तर सकाळी तुम्ही निवांतत उठून शाळेत जावा...!!"
" उगाच तुम्हाला कशाला त्रास नको नको काका..!!"
" मुख्याध्यापक असतील शाळेचे त्यांच्या घरी थांबतो आज. उद्या गावात एखादी रूम पाहतो!!"
" अहो मास्तर, पण आता मुख्याध्यापक पण झोपले असतील की हो, चला तुम्ही आमच्याकडेचं, संकोच नका हो करू..!"
असं म्हणत त्या पुजाऱ्याने प्रितमला हाताला धरून आपल्या घरी नेले. रात्रभर प्रितम त्या पूजऱ्याच्या घरीचं राहिला. रात्री त्या पुजाऱ्याने  प्रितमला सांगितलं की, गावातील इनामदार देशमुख म्हणजेचं गावचे  पाटील. त्यांचा वाडा तो बघा समोरचं आहे, आप्पासाहेबांचा वाडा तुम्हाला राहण्यासाठी थोडे दिवस  योग्य आहे. असाही त्यांचा वाडा गावात सर्वात मोठा आहे. तिकडे तुमची सोय चांगल्या रीतीने होईल, असे वाटते.
अर्धा एकर परिसरामध्ये विस्तीर्ण पसरला तो चिरेबंदी वाडा पाहून प्रितमचे भान हरवून गेले.
त्या दिवशीची रात्र अशीच उलटून गेली. दुसरा दिवस उजाडला प्रितम आवरून सावरून शाळेची  विचारपूस करावी म्हणून आप्पासाहेबांच्या वाड्याकडे  निघाला.कारण ते गावचे पाटील होते.
आप्पासाहेब नुकतेच शेताकडे निघणार तेवढ्यात त्यांना प्रितम वाड्याकडे येतांना दिसला. त्याला पाहताच  ते जरा थांबले. जरा विचारपूस केल्यावर समजले की हे झेडपीच्या शाळेतले नवीन शिक्षक आहेत. त्यांनी प्रितमला घरात बोलावलं. प्रितम घरात आला. असा भव्यदिव्य वाडा त्याने फक्त  चित्रपटांमधेचं पाहिला होता. भल्या मोठ्या बैठकीच्या खोलीत ते दोघी आले. बोलता बोलता आप्पासाहेबांनी प्रितमला राहण्याबद्द्लच्या सोय विषयी विचारलं.
"मास्तर, तुमची राहण्याची सोय होत नाही तोवर तुम्ही आपल्या वाड्यात रहा की खुशाल..!"
असे पण प्रितमला अजून त्या गावात फारसा कोणी ओळखत  नव्हतं. म्हणून थोडे दिवस राहण्याची सोय झाली म्हणून त्याने आप्पासाहेबांना सांगितलं  की,
मी कालच रात्री इकडे पोहोचलो मला अजून तरी गावात कुणी फारसे ओळखत नाही, दहा एक दिवसांनी मी माझ्या रहसण्यासाठी गावात एखादी खोली भाडयाने घेईल म्हणून तोवर आश्रय मिळाला त्यामुळे तुमचे उपकार मी कधीचं विसरणार नाही.
"मास्तर तुम्ही ना एक काम करा तुमचे सामानच घेऊन  या इकडे..!!"
प्रितमने आपला सामान आणला आणि तो बाजूच्या खोलीत ठेवला. तेवढ्यात एक नोकर आला आणि त्याचा सामान घेऊन वरच्या बैठकीच्या खोलीत घेऊन गेला.
"साहेब तुम्ही आता वरच्या बैठकीच्या खोलीत जरा वेळ अराम करा!!"
असं म्हणतं त्याने त्याचा सामान वरच्या खोलीत पोहोचवला. प्रितम त्याच्या मागे मागे वरच्या खोलीत गेला ती खोली तर त्याला जाम आवडली. खिळकीजवळ जाऊन त्याने खिळकी उघडली. त्या खिलकीतून बाहेरचा परिसर खुपच छान दिसत होता. एक थंडगार हवेची मंद झुडूक त्याला येऊन स्पर्शून गेली. अंगाला जणू कुणी गुळगुल्या केल्या असाव्यात असे त्याला क्षणभर  वाटले.
खिळकीतून अंगणाच्या सभोवताली, सावरी, नीलगिरी, रामफळ, सिताफळ, कडुनिंब, डाळिंब, पेरूची झाडे लावलेली दिसत होती. पुढे दहा एकराचे शेत विस्तीर्ण पसरलेले होते. घराच्या छपरीतूनच सारे हिरवेगार शेत दृष्टीपथात येत होत. शेतात या वर्षी संकरीत ज्वारी,  बाजरी पेरली होती. कणसे निसवून दाणे भरायला सुरुवात झाली होती.
तेवढ्यात  चिमणीच्या आकारचा एक पक्षी शेताच्या आणि अंगणाच्या सीमेवर असलेल्या डाळिंबाच्या झाडाच्या फांदीवर येऊन बसला. डोक्यावर आणि पोटाखाली पिवळागर्द रंग ल्यालेला सुगरण पक्षी होता तो. त्याच्या बळकट चोचीमध्ये कोणत्यातरी वनस्पतीचा सोललेला धागा होता. नक्कीच तो ( घरटे)  खोपा बांधीत असावा... पण कोठे?
काही क्षणातच तेथून तो उडाला आणि छपरीजवळ तीस फूटांवर असलेल्या नीलगिरीच्या झाडाच्या खालच्या डहाळीवर येवून बसला.
निलगिरी झाडाच्या फांद्यावर सुगरण पक्षाचे तीन खोपे त्याला दिसले. खोपे विणण्याला नुकतीच सुरुवात झाली होती. तो त्यांना पाहण्यात एवढा मग्न झाला होता की त्याला आता आठवण पडली होता की आपल्याला कुणी खाली बोलवण्यासाठी आले आहे.
दुपारी जेवण झाल्यावर तो छपरीला येवून बसला आज पाऊस थांबला होता. पिंजलेल्या कापसासारखे काही ढग सूर्यासोबत लपाछपीचा खेळ खेळत होते. काल पाऊस पडून गेल्यामुळे धूलीकणांमुळे मुक्त झालेले आकाश, स्वच्छ निळेशार दिसत होते. भरपूर सूर्यप्रकाशामुळे विहिरीजवळील तीनही खोपे त्याला स्पष्ट दिसत होते, अशीच सायंकाळी निघून गेली.
हात पाय धुवून त्याने कपडे बदलवले, खुप छान वाटतं होत त्याला  त्या वाड्यात. रात्रीचे   खाली जेवण करायला  बोलवण्यात आले.
प्रितम खाली उतरून जेवणानाच्या भल्या मोठ्या खोलीत गेला. समोर चौरंग पाट टाकले होते. केळीच्या पानात जेवण वाढले होते. आप्पासाहेब, वसुंधराबाई, राम घरातले इतर असे सर्व जेवण करायला बसले होते. ताट आधीच वाढून झाले होते. वसुंधरा आप्पाच्या शेजारी जेवणाला बसली होती. ती प्रितमला वर खालून न्याहाळू लागली. त्याला थोडे शरमल्यासारखे वाटले तसा तो थोडा अवघडून गेला पण नंतर अप्पासाहेबांनी इकडच्या तिकडच्या गप्पा सुरु केल्या, तेव्हा त्याला बरे वाटले. गप्पा चांगल्या रंगात आल्या होत्या. मग तो थोडा निवांत झाला. बोलण्यावरून त्याला लक्षात आले की वसुंधरा जरा स्वभावाने शानीच आहे. अप्पासाहेब जरा कडक स्वभावाचे होते. त्याच्या डोक्यात काही चालू असतांना समोर कुणी तरी हळू हळू चालत पुढे येत होते. हातात पाण्याचा ग्लास होता.
 

(कथेच्या पुढील भागात काय होते ते बघण्यासाठी वाचत रहा ही कथा.कोण असेल पाण्याचा ग्लास घेऊन येणारे?? आणि प्रीतमला त्या वाड्याची ओड लागेल का??हे बघण्यासाठी वाचत रहा. )

कथा क्रमशा :
लेखिका :- सौं रुपाली बोरसे.
कथेचे नाव :- हे नाते जन्मांतरीचे.
टीम :- ईरा नाशिक.
स्पर्धा :- राज्यस्तरीय करंडक स्पर्धा

0

🎭 Series Post

View all