स्वयंपूर्ण

स्वयंपूर्णता

.

कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन घोषित झाल. प्रथम वाटले काही दिवसांचा प्रश्न आहे होईल सर्व सुरळीत. पण कुठचे काय जनजीवन पूर्वपदावर येण्याची काही चिंन्हे दिसेनात. महिनाभर घरी बसून अनघाला कंटाळा आला. नोकरीमुळे तिचे एक फिक्स रूटीन होते. त्यात भर म्हणून की काय कंपनीकडून कमी करण्यात आलेल्या स्टाफमध्ये तीपण होती. अनघाला रडूच कोसळले. नोकरी ही तिच्या स्वयंपूर्ण असण्याची ओळख होती.

डिप्रेशन येऊ लागले. ते घालवण्यासाठी ती कुकिंगचे निरनिराळे पदार्थ करून पहायची. मस्त चव होती तिच्या हाताला तिच्या आईसारखी.

एक दिवशी दुपारी ती बाकरवडीचा मसाला करत होती, खमंग वास सुटला होता.

तेंव्हा दाराची बेल वाजली. तिने उठून दरवाजा उघडला तो शेजारच्या मंदाकाकु होत्या. त्या म्हणाल्या" अनघा काय खमंग वास येतोय ग आज काय विशेष ?".…

अनघा बोलली "घरात बसून काही काम नाही म्हटले रेसिपी ट्राय करू ".  "अग पण तू ऑनलाईन काम करत होतीस ना ऑफिसचे ?"  

अनघा.."हो काकू पण माझा जॉब आता नाही राहिला" आणि तिच्या डोळ्यात पाणी आले. मंदाकाकू तिला म्हणाल्या "अग असा धीर सोडू नकोस. मी तुला एक सुचवू का? राग मानू नकोस आणि कमीपणा पण वाटून घेवू नकोस."


अनघा .. "सांगा काकू मी काय करू?"

"अनघा तुझ्या हाताला चव आहे तू केटरिंग सर्व्हिस का चालू करत नाहीस. लॉकडाऊनमुळे हॉटेल्स मेस बंद झाल्यामुळे परगावचे विद्यार्थी नोकरदार यांची      जेवणाची पंचाईत झाली आहे. घरगुती कार्यक्रमाला ऑर्डर पुरव. कुकींग हा तुझा प्लस पॉइंट आहे तर तू त्यावर लक्ष केंद्रित कर."  अनघा चकीत झाली "काकू मला कसे हे सुचले नाही thanks पण मला आता यासाठी प्रयत्न करायला हवेत." तेंव्हा काकू म्हणाल्या "खरे तर मी याच कामासाठी आले होते. परवा माझ्या भाचीचे डोहाळजेवण आहे. थोड्या माणसांचा घरगुती कार्यक्रम आहे. तेंव्हा तू डोहल्याचे सर्व पदार्थ व त्या दिवशीच्या जेवणाची ऑर्डर घेशील का?"

अनघाला खूप आनंद झाला. तिने आनंदाने ती ऑर्डर स्वीकारली. सर्व व्यवस्थित प्लॅनिंग केले. तिने थोडी बचत केली होती ते पैसे आज तिच्या कामी आले. दोहाल्याचे पदार्थ जेवणाचा मेनू सर्व उत्तम झाले. तिथेच तिला नवीन ऑर्डर्स मिळाल्या. हळूहळू जम बसला. तिला जशा ऑर्डर्स येत गेल्या तसा तिचा जम बसत गेला. एक नवीन आत्मविश्वासाने भरलेली अनघा सर्वांना दिसू लागली. तिने मग छोटीशी जागा घेतली. लोकांनी केलेल्या कौतुकाने तिची आपोआप जाहिरात झाली. खप वाढला विद्यार्थी नोकरदार यांचे जेवण, समारंभाच्या ऑर्डर्स याने तिची दैनंदिनी भरून गेली. कष्ट करण्याची तिची तयारी होती. तिची प्रगती होत गेली. आज छोटा का होईना तिचा स्वतःचा व्यवसाय होता आणि त्याचा बळावर ती सुखी समाधानी आणि मुख्य आनंदाची गोष्ट म्हणजे अनघा स्वयंपूर्ण होती.