Login

संकेत भाग बारा

कथा मालिका.



संकेत भाग बारा.


६. शाल्मली हळू हळू रिकव्हर होत होती. रात्रीची वेळ होती. तिच्या रूमच्या गॅलरीत निवांत बसली होती. जरा आधार मिळाला की चालू शकत होती. अधून मधून जरा पाय मोकळे करत असे ती. आज ती पाय मोकळे करत होती. जपून चालत होती, पण अचानक तिचा तोल गेला आणि ती पडणार या भीतीने तिने डोळे मिटुन घेतले. पण कोणीतरी अलगद तिच्या कमरेत हात घालून पकडले होते. तिने डोळे उघडून पाहिले तर तो सदानंद होता. ती आवाक झाली. पुन्हा मनात कृष्णाचा धावा सुरू झाला. आता सदानंद मुलीच्या वेशात नव्हता तर आहे तसाच आला होता. सदानंदने तिच्याकडे पाहून तिचा हात पकडून तिला उभे केले आणि हळूच पुन्हा हातांवर उचलून बेडवर बसवले. आता तो वाकत तिच्या तोंडासमोर आला, काय गरज होती चालायची ?? ते ही एकटीने. मी वेळेत आलो नसतो तर पुन्हा पायाला दुखापत करून घेतली असती ना शालू ?? त्याचे श्वास तिला स्पष्ट जाणवत होते. तिच्याही हृदयाची धडधड न कळत खूप वाढली होती. सदानंदल ती जाणवली. त्याने तिचा हात पकडला आणि तिचाच हात तिच्याच छातीवर ठेवत तो म्हणाला काय होतंय भीती वाटते का माझी ?? 


शाल्मली हिम्मत करून म्हणाली, तू इथे कसा ?? आलास कुठून ?? तुला इथे कोणी पाहिले तर घरातले लोक दोघांचाही जीव घेतील. ते ऐकून सदानंद हसायला लागला तसे शाल्मलीने पटकन तिचा हात त्याच्या तोंडावर धरला. काय करतोस ?? वेड लागलंय का तुला ?? तुझ्या आवाजाने कोणी आले तर ?? तुला भीती वाटतच नाही का कसली ?? स्वतःच्या जीवाचा तरी विचार कर. सदानंद तिच्या डोळ्यातील भीती, तिचा त्याच्या ओठांवरील हातांचा स्पर्श सगळेच अनुभवत होता. बोल ना आता काय झालं तुला ?? शाल्मली ने प्रश्न केला तसे तुझा हात माझ्या तोंडावर आहे असे डोळ्यांनी त्याने खुणावले तसे पटकन शाल्मलीने हात बाजूला घेतला. तो तिच्याच जवळ बसला आणि म्हणाला मला माझ्या जीवाची कधीच भीती नव्हती आणि इथून पुढेही वाटणार नाही. पण तुझ्या जीवाची खूप काळजी आहे म्हणूनच तुझ्या केसांना ही धक्का लागू देणार नाही. इथे येताना वॉचमन वामकुक्षी घेत होता. कसलाही आवाज न करता, कोणालाही समजणार नाही अशा रीतीने आलो आहे. तेवढं कळतं मला. आता पटकन बरी हो आणि कॉलेजमध्ये ये मला तुझ्या शिवाय चैन पडत नाही आणि हेच सांगायला इतके कष्ट केले आहेत मी. समजल तुला ?? असे म्हणून तो निघून गेला. शाल्मली कृष्णाचे नाव घेतच होती. 


७. आता शाल्मली चांगलीच बरी झाली होती. आज पुन्हा ती कॉलेज जॉईन करणार होती म्हणून खुश होती. घरातील सगळेच आनंदी होते. ती कॉलेजला आली आणि पुन्हा तिच्या मैत्रिणींमधे छान मस्ती करू लागली. दुरून हे सगळंच सदानंद पहात होता. आज शाल्मली खूप खुश आणि प्रसन्न वाटत होती. आज पहिल्यांदाच इतके हसताना सदानंद तिला पहात होता. सुनंदाचे सदानंदकडे लक्ष गेले सदानंद शाल्मलीकडेच पहात आहे हे तिने पाहिले आणि तिने शाल्मलीला सांगितले. शाल्मलीने ते ऐकून न ऐकल्यासारखे केले. त्याचा सदानंदला राग आला होता. त्याने पाहिले होते, सुनंदाने शाल्मलीला त्याच्या बद्दल सांगितले होते ते. कॉलेज संपले आणि मैत्रिणींच्या घोळक्यातून शाल्मली बाजूला झाली. आज तिला काही स्टेशनरी घ्यायची होती म्हणून ती एका रस्त्याने आणि बाकी सगळे दुसऱ्या रस्त्याने गेले. खरेदी करून ती निघाली होती, रस्ता जरा अडवलनाचा होता. अचानक तिच्या समोर सदानंद येऊन उभा राहिला. आज तुला पुन्हा कॉलेजमध्ये पाहून मला खूपच आनंद झाला शालू. तुझा पाय एकदम बरा आहे ना ?? आज तू खूपच खुश दिसत होतीस आणि तुला बघुन मी खुश झालो होतो. पण तू माझ्याकडे दुर्लक्ष का केलेस ?? शाल्मली त्याला काहीच उत्तर न देता जायला निघाली तसे त्याने तिचा हात पकडुन तिला अडवले. शाल्मली ने सणसणीत सदानंदच्या थोबाडीत दिली. ती चपराक इतकी जोरात होती की सदानंद खाली कोलमडला. शाल्मलीने त्याच्या अंगावर बसून त्याची कॉलर पकडली आणि म्हणाली, ये सद्या आपल्या लायाकित राहायचं. आजवर तुझा प्रत्येक गुन्हा मी दुर्लक्षित केला आहे. मी या गावाच्या सूर्यकांत साबळेची मुलगी आहे. माझ्या बापाने मला आजवर कोणाची अरेरावी सहन करायला शिकवले नाही, उलट माज करायला शिकवले आहे. माझ्या घरात येऊन तू खूप मोठी चूक केली, त्याहून मोठी चूक माझ्या अंगाला हात लावून केलीस. ते सगळं तू माझ्या घरात केलं म्हणून मी शांत राहिले. कारण चूक कोणाचीही असली तरी दोष फक्त मुलीलाच दिला जातो आणि शिवाय माझ्या घरातल्या लोकांनी तुझे इतके तुकडे केले असते की ते मोजण्यात तुझ्या घरच्यांची जिंदगी गेली असती. त्यामुळे मी शांत राहिले पण आता माझ्या वाट्याला चुकूनही जायचं नाही. शेवटचं सांगते तुला नाहीतर तुझ शिक्षण आणि करिअर बर्बाद होईल. 


ती खूप त्वेषाने तिथून उठली आणि घरी आली. सदानंद बराच वेळ तिथेच बसून होता.


८. सकाळी सकाळी शाल्मली तिच्या बेडवर टेकुन डोळे मिटून बसली होती. काल ती सदानंद सोबत ज्या पद्धतीने वागली होती त्याचे तिलाच आश्चर्य वाटत होते. असे पहिल्यांदा कोणालातरी तिने मारले होते. तिच्यात इतका राग कुठून आला हे तिचे तिलाच समजत नव्हते. घरात असे दहशतीचे वातावरण तिला कधीच आवडले नव्हते. सतत ती बाबांच्या आणि शरदच्या नजरेच्या धाकात वावरलेली होती. त्यांच्या रागीट आणि विचित्र स्वभावामुळे कोणीही गावात त्यांच्या नादी लागत नसतं. इतकेच काय घरातपण कोणी एकमेकांशी मोकळे पणाने बोलत नसे. शाल्मलीची आई पण दडपण खाली वावरत होती. कदाचित बाबांचेच गुण कुठेतरी तिच्यात आल्यासारखे आज ती वागली होती आणि त्याचा तिलाच राग आला होता. हे वागणे सदानंदच्या काळजी पोटी तर आले नाही ना हाच विचार ती करत होती. कारण असेच चालू राहिले असते तर आज ना उद्या त्याच मरण निश्चित होते. सदानंद दूर राहिला तर चालेल पण जीवंत असावा असेच कदाचित तिला वाटत होते. 


आज ती कॉलेजला आली पण सदानंद तिला कुठेच दिसला नाही. हेच तर तिला हवे होते पण तरीही दिवसभर कॉलेजमध्ये तिचे कशातच लक्ष लागले नाही.


शाल्मली घरी यायला निघाली होती. समोरून एक जीप भरधाव वेगाने येत होती. त्यात काही मुले बसलेली होती. जीपमध्ये मोठमोठ्याने गाणी लावली होती आणि त्यासोबत मुलेही गाणी म्हणत, रस्ता स्वतःच्या मालकीचा असल्या प्रमाणे गाडी चालवत होते. हसत होते, ओरडत होते. लांबुनच शाल्मलीने हा सगळा प्रकार पाहिला होता. त्यामुळे या रस्त्याने न जाता दुसऱ्या रत्याने ती निघाली होती. त्याच रस्त्यावर एक मुलगी खेळत होती, आणि तिच्याच दिशेने जीप जात होती, ती जीप त्या मुलीला धडकणार इतक्यात शाल्मली ने त्या मुलीला ओढून घेतले होते आणि एक गावठी शिवी दिली होती त्या जीप मधील मुलांना. ती शिवी ऐकून जीप चालवणाऱ्या मुलाने जीप थांबवली.


क्रमशः



🎭 Series Post

View all