Login

संकेत भाग अकरा.

कथा मालिका

संकेत भाग अकरा. 


आदित्य आणि निशा डायरी घेऊन सरळ त्याच्या ऑफिसमध्ये आले. तेवढ्यात आदित्यच्या आईचा फोन आला. 


आदित्य : बोल आई, मी आता तुला फोन करणारच होतो. आताच मी निशाचे घर चेक करून ऑफिसमध्ये आलो आहे. निशा पण माझ्याच सोबत आहे आणि दोघेही सुखरूप आहोत तू आणि मिसेस पत्की काळजी करू नका. 


आई : अरे तेच विचारण्यासाठी फोन केला होता. ठीक आहे. काळजी घ्या दोघेही. बाय.


आदित्य : चल निशा आता कधी एकदा ती डायरी वाचतोय असे झाले आहे. यात सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळायलाच हवीत आपल्याला. आदित्यने डायरी उघडली तर पहिल्याच पानावर राधा कृष्णाचा सुंदर फोटो लावलेला होता. त्याने पुढचे पान उघडले तर मिसेस पत्कीना फोटोत जी मुलगी खरी असल्याचा भास झाला होता त्याच मुलीचा खूप सुंदर फोटो तिथे होता. काय सुंदर मुलगी आहे ना निशा ?? निशाकडे बघत तो म्हणाला. 


निशा ,: खरंच सुंदर आहे पण आता ती अतृप्त आत्मा होऊन भटकत आहे माझ्या रूममध्ये. तुला चालणार असेल तर माझी काहीच हरकत नाही. 


आदित्य : तिचं सौंदर्य पाहून मी सहज म्हणालो त्यात इतके टाकून बोलण्याची काय गरज ?? असे म्हणत त्याने पुढचे पान उलटले. त्यात लिहले होते : 


भूतकाळ : 


मी शाल्मली सूर्यकांत साबळे. वय वर्षे बावीस. आज कॉलेजचा पहिला दिवस मस्तच होता. खूप दंगा घातला आम्ही सगळ्या मैत्िणींबरोबर. पण आज एक मुलगा माझ्याकडे एकटक बघत होता. या आधी कधी तो गावात दिसला नाही त्यावरून तो इथे नवीन असावा. पण त्याची तीक्ष्ण आणि धारदार नजर माझ्या काळजाचा ठाव घेणारी होती. मी या शहरातील अत्यंत श्रीमंत आणि बागायतदार साबाळेंची मुलगी. माझ्याकडे कोणी असे बघणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे आहे पण त्याला ते माहीत नसावे. म्हणून तो बघत असावा पण एकदा का हे समजले की मग तो माझ्याकडे बघणार नाही. 


२. आज कॉलेजमध्ये गेले तर तो मुलगा क्लास बाहेरच उभा होता. जणू काही माझीच वाट पहात होता. त्याने माझ्याकडे पाहून गोड स्मित केले. मी मनात कृष्णाचा धावा करत होते. आता या मुलाचे काय होईल या विचाराने मी खरतर घाबरले होते. आजही त्याची तीक्ष्ण नजर मला स्पष्ट जाणवत होती. फक्त मलाच नाही तर माझ्या मैत्रीणीनापण ती जाणवली. शालू, तो मुलगा सतत तुझ्याच कडे बघत असतो अगदी वेड्यासारखा. तिची मैत्रीण सुनंदा म्हणाली. त्याला सगळे सांगायला हवे कोणीतरी शालू तुझ्याबद्दल आणि तुझ्या फॅमिली बद्दल. हो खरंय, तो नवीन दिसतोय. पण त्याला कल्पना द्यायला हवी. कशी द्यायची हाच विचार करत आहे, शाल्मली म्हणाली. अग तू घाबरु नकोस, माझा मित्र सुनील आज त्याच्याच जवळ बसला होता, मी त्याला सांगते. शाल्मली ने होकार देताच दोघीही घरी गेल्या. 


३. त्या मुलाला कल्पना दिली ते बरं झालं आता तो असा बघणार नाही म्हणून मी निश्चिंत होते. पण घडले मात्र उलटेच. आजही त्याची नजर मलाच शोधत होती आणि मला पाहिल्यावर तो शांत झाला होता. आता मात्र मी घाबरले होते. हा मुलगा मलाही जगू देणार नाही आणि स्वतःही जगणार नाही असेच वाटत होते. घरी येताना त्याने मला गाठले आणि म्हणाला शालू, पहिल्याच भेटीत असे शालू म्हणून हाक मारणे मला आवडले नाही. पण मी काहीच बोलले नाही. तसा पुढे तो म्हणाला, मला तुझ्याशी मैत्री करायला खूप आवडेल. एकाच नजरेत मी हरवून बसलो आहे स्वतःला. काहीच सुचेनासे झाले आहे. मी सदानंद शिकण्यासाठी आलो आहे. मला काल सुनीलने सगळ्या गोष्टींची कल्पना दिली पण अग घरचे असतातच विरोध करायला पण नंतर स्वीकारतात. म्हणजे हे प्रेम आहे की नाही हे आताच मी सांगू शकत नाही. आता फक्त मैत्रीच्या अपेक्षेने आलो आहे. पुढचे पुढे बघू. आता मैत्री तर जगून घेऊ. हात पुढे करत तिच्या नजरेला नजर देत अगदी बिनधास्त सदानंद सगळे बोलत होता. त्याच्या बोलण्यात कमालीचा आत्मविश्वास होता. मी पुन्हा कृष्णाचा धावा करू लागले. पण हाच आत्मविश्वास याचा आणि पर्यायाने माझा घात करणार नाही ना ?? याच विचारात मी तिथे उभी होते. काय शालू कसला विचार करतेस ?? सदानंद तिला भानावर आणत विचारत होता. आता शाल्मली ला तिथे एकही क्षण थांबायचे नव्हते. ती सदानंद सोबत काहीच न बोलता तिथून घरी गेली. ती घरात आली तर हॉलमधे बाबा, दादा ( शरद ), आई सगळीच मंडळी होती. म्हणून ती रूमकडे निघाली तेवढ्यात मागून शरदने तिला आवाज दिला. आपल्या चेहऱ्यावरील बिथरलेले भाव शक्य तितके लपविण्याचा प्रयत्न करत तिने मागे पाहिले. आज यायला पंधरा मिनिट उशीर झाला शाले तुला ?? कुठं होतीस ?? एकदम कराऱ्या आवाजात शरदने विचारले. अरे दादा मी माझ्या मैत्रिणीसोबत होते. कोण मैत्रीण पुन्हा शरदने प्रश्न केला. सुनंदा अरे सुनंदा होती माझ्या सोबत. बरं बरं पण तुझा चेहरा का असा झाला आहे, चोरी करून आल्यासारखा. अरे कुठे काय, दमलिय खूप त्यामुळे वाटत असेल तुला. मी जरा जाऊन पडते असे म्हणत शाल्मली तिथून कशी बशी निघाली.


४. काही दिवस असेच निघून गेले. सदानंद तिच्याकडे बघतच होता. पण शाल्मलीने त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करायचे ठरवले. उगाच नसत्या फंदात तिला अडकायचे नव्हते. पण आज भलतेच काहीतरी घडेल असे स्वप्नात ही वाटले नव्हते. शाल्मली कॉलेज संपवून घरी यायला निघाली होती, रस्त्याने येताना एका गाडीची तिला धडक बसली आणि ती रस्त्यावर पडली. सदानंद नेहमीच तिच्या अवती भोवती असे. त्यामुळे त्याने पटकन शाल्मलीला दोन्ही हातांवर उचलले आणि हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. हे इतके अचानक घडले की शाल्मलीला काहीच समजले नाही. ती त्याला नको म्हणत होती पण त्याने काहीच ऐकले नाही. डॉक्टरांनी पायाला ड्रेसिंग केले त्यावेळी शाल्मलीने डोळे बंद करून सदानंदचे हात घट्ट पकडून ठेवले होते. पायाला लागल्यामुळे आता ती चालू शकत नव्हती. पुन्हा क्षणाचाही विलंब न करता सदानंदने तिला हातांवर उचलून थेट तिच्या घरी नेले. आता मात्र हार्ट अटॅक येऊन मरते की काय ?? असे शाल्मलीला वाटले. 


घरातील सगळी मंडळी चकित झाली होती. सगळ्यांसमोर सदानंदने शाल्मलीला सोफ्यावर बसवले. तिची आई धावत तिच्याजवळ आली. पायातील जखम पाहून काय झाले ?? कसे लागले विचारू लागली. तेंव्हा शाल्मलीने घडला प्रकार सांगितला. शरदने डोळे रोखून सदानंदकडे पाहिले. काय रे तुझ नाव काय ?? शरदने विचारले. माज नाव सदानंद. मी इथे शिकण्यासाठी आलो आहे. मी घरी जात असताना ही रस्त्यात मला पडलेली दिसली. माझ्याच कॉलेजमध्ये मी हिला पाहिले होते. त्यामुळे माणुसकीच्या नात्याने उचलून हॉस्पिटलमध्ये आणि नंतर घरी घेऊन आलो. सदानंद एकदम आत्मविश्वासाने म्हणाला. हो पण तुला घरचा पत्ता कसा समजला ?? सूर्यकांतराव विचारत होते. अहो त्यात काय अवघड आहे काका ?? गावातील सगळ्यात श्रीमंत बापाची मुलगी म्हटल्यावर पत्ता सापडणे कुठे अवघड आहे आणि शाल्मली होतीच की सोबत त्यामुळे घेऊन आलो घरी. सदानंदची नजरेला नजर देऊन न घाबरता बोलण्याची पद्धत शरद आणि सूर्यकांतराव दोघांच्याही लक्षात आली. 


शाल्मली हे स्वप्न तर नाही ना ?? या आविर्भावात सगळे काही पहात होती. आज तिच्या कॉलेजमधून एक मुलगा थेट तिच्या घरापर्यंत पोहचला होता आणि तिच्या घरचे न चिडता त्याच्याशी बोलत होते. ठीक आहे मी निघतो, शाल्मली काळजी घे असे म्हणून तो तिथून बाहेर पडला.


५. पायाला दुखापत झाल्यामुळे मला अजूनही उठून नीट चालता येत नव्हते. घरात त्यातल्या त्यात रूममध्ये बसून बसून ती खूपच कंटाळली होती. तेवढ्यात तिला भेटायला तिच्या मैत्रिणी आल्या. शाल्मलीला खूप बरे वाटले. सगळेजण छान गप्पा मारत होते. पण त्यातील एक मैत्रीण कोण आहे हे काही शाल्मलीच्या लक्षात येत नव्हते. तिने सुनंदाला विचारले, ही आपल्या क्लासमध्ये आहे का ?? बघण्यात नाही ना ?? हा सदानंद आहे, तिने हळूच शाल्मलीच्या कानात सांगीतले. आता मात्र शाल्मली खूप घाबरली. तू का घेऊन आलीस याला इथे ?? घरी समजल तर काय होईल माहीत आहे ना ?? अग मी नकोच म्हणत होते पण याने खूप हट्ट केला आजी मी इथे येऊ दिले नाही तर आहे तसाच तिच्या घरी जाईन म्हणाला. मग मी काय करायचे होते ?? सुनंदा म्हणाली. अरे देवा हा काय असा माझ्या मागे हात धुवून लागला आहे ?? शाल्मली डोक्याला हात मारत म्हणाली. 


शाल्मलीच्या घरच्यांनी नाश्त्याला सगळ्यांना खाली बोलावले, त्यामुळे सगळ्याजनी खाली गेल्या. तसाच सदानंद पण जायला निघाला. त्याने दरवाजा जवळ जाऊन पुन्हा मागे वळून शाल्मलीकडे पाहिले आणि तसाच पुन्हा दार बंद करून शाल्मलीकडे आला. शाल्मलीच्या काळजाचे ठोके वाढले होते, मनातल्या मनात ती कृष्णाचा धावा करत होती. शाल्मली बेडवर उशिला टेकुन बसून होती, सदानंद तिच्या जवळ आला आणि खाली वाकून तिच्या तोंडाजवळ त्याचे तोंड नेले. त्याचे दोन्ही हात तिच्या अंगाभोवती होते. त्याची तीक्ष्ण धारदार नजर पुन्हा शाल्मलीच्या काळजाचा ठोका घेतच होती. तिचा श्वास वरचा वर आणि खालचा खालीच थांबला होता. आजवर कोणताच पुरुष म्हणजेच त्रयस्थ मुलगा तिच्या इतका जवळ आला नव्हता. त्याने तिच्या डोळ्यात पाहिले. तुझा पाय आता बरा आहे ना ?? लवकर बरी हो आणि पटकन कॉलेज जॉईन कर. तुझ्याशिवाय मला कॉलेजमध्ये अजिबात करमत नाही. माझ्या डोळ्यांना तुला पाहण्याची सवय झाली आहे. तू बरी होईपर्यंत मी तुला भेटायला येईन. उद्या पुन्हा भेटू, काळजी घे असे म्हणत त्याने त्याचे गाल तिच्या गालांवर टेकवले. त्याच्या दाढीचा स्पर्श शाल्मलीच्या अंगावर काटे आणत होता. तिच्या मुठी आवळल्या गेल्या होत्या. तो बाजूला झाला आणि तिच्याकडे पाहून हसून निघून गेला.


क्रमशः

🎭 Series Post

View all