सौंदर्य..

असावा असा कुणीतरी.. जो माझ्यातल्या मला ओळखेल..

           खरंच आहे, जेव्हा सौंदर्य बाह्य रुपात न शोधता विचारात शोधलं जातं ना, तोच व्यक्ती मला सुंदर भासतो.. कारण बाह्य रुपावर भाळणारे असतील बरेच..

          पण मला शोध आहे त्याचा जो माझ्या बाह्य रुपावर आकर्षण न बाळगता स्वतंत्र माझ्यातल्या मला ओळखून घेईल. माझ्या विचारांवर प्रेम करेल, माझ्या बालिशपणावर भाळणारा हवाय मला.. इतरांच्या नजरेत मी असेना वेडी - खुळी पण त्याच्यासाठी ही वेडी - खुळीच  त्याची सर्वस्व असणारी.. असा कुणीतरी मिळाला ना तेव्हा माझा शोध संपेल. 

          कारण आयुष्याच्या वाटेत बरेच जण आलेत, भेटलेत पण सगळ्यांचा मोह तो बाह्य रुपालाच महत्त्व देणारा, आणि म्हणून अशा लोकांच्या मीच चार हात लांब राहते. कारण या बाह्य सौंदर्याला बऱ्याच कमेंट्स, कॉम्प्लिमेंट्स मिळत असल्या तरी त्या कॉम्प्लिमेंट्स चिरतरुण राहतील याची शाश्वती माझी मलाच नाही, म्हणून अशा कॉम्प्लिमेंट्स वर लगेच प्रभावित होत नाही मी.. 

            कारण माझी ओळख माझा चेहरा नसून माझी लेखणी, माझं साहित्य आहे असं मला वाटतं. आणि म्हणून माझ्याशी संपर्क साधायचा असेल तर त्यांनी आधी माझ्या विचारांशी जुळवून घ्यावं,जाणून घ्यावं! 

          जर माझं साहित्य पटलं, त्यातले विचार आवडले तरंच माझ्याबद्दल कयास बांधावे.. उगाच हरभऱ्याच्या झाडावर तुम्ही चढवू पाहलं तरी मी चढणाऱ्यातली नाही.. मला माझ्यातली  उणीव जशी कळते, तसंच माझ्यातली माझी खुबी सुध्दा.. म्हणून कोणत्या कमेंट्स, कॉम्प्लिमेंट्स माझं व्यक्तिमत्त्व रेखाटणाऱ्या आहेत ते लगेच कळतं मला.. 

              म्हणून खोट्या खोट्या तारफीच्या पुलावर पाय ठेवत नाही मी.. कारण पुल कधीही ढासळतात एव्हाना.. म्हणून तेवढीच आधीच पूर्वतयारी केलेली बरी.. 

          म्हणून लिपीने जो आज विषय दिलाय ना, तो हुबेहूब पटला. जेव्हा सौंदर्य हृदयात दिसते, तेव्हा शोध संपतो.. आणि एक सुंदर प्रवास सुरू होतो जीवनाचा.. त्या प्रवासात सहवास असतो, त्याचा जो मनाने आपल्यातला स्विकारतो.. 

           हाच प्रवास जगायचा आहे मला.. माझ्यातल्या मला ओळखणाऱ्या त्याच्यासोबत.. जो फक्त माझाच असेल. कित्येक सौंदर्यवतींना मागे लोटत जो माझ्या विचारांवर भाळणार, ज्याला भुरळ पडेल माझ्या प्रत्येक अंशाची, जे मला स्पेशल बनवतं.. मग तो माझा आवाज असो वा लेखणी.. त्याला प्रेम असावं माझ्या आवाजावर आणि माझ्या प्रेम कवितांवर..  

           त्याने जीव ओवाळून टाकावा माझ्या वेडेपणावर, ज्याने गर्दीतूनंही माझा शोध घेऊन माझा हात घट्ट पकडून तो कधीच सुटू न द्यावा.. तो लाखो मुलींच्या गळ्याचं ताईत असला तरी त्याचा श्वास मी असावी.. 

           त्याने माया करावी माझ्या स्वभावावर.. त्याने त्याच्या पध्दतीने हाताळावा माझा राग आणि रुसवा, कधी समजवून, कधी लहान बाळासारखं पॅंपर करून तर कधी रागावून आणि कधी कधी माघार घेऊन.. 

         त्याला हवंहवंसं वाटावं माझं लाजणं, माझ्या गालावर खळी न पाडणाऱ्या स्माईलसाठीही त्याने धडपड करावी.. त्याने माझ्या निखळ हास्यात सामील व्हावं, माझ्या दुःखात माझे अश्रू पुसणारा रुमाल व्हावं.. माझ्या प्रत्येक वाटचालीत माझी सावली त्याने व्हावं.. 

          त्याच्या हृदयावर त्याने फक्त मलाच राज्य करू द्यावं.. माझ्या मनाचं सौंदर्य त्याला एवढं पसंत असावं की, आमचं नातं टिकण्यासाठी मला माझ्या बाह्य सौंदर्याचा आधार घ्यावा लागणार नाही.. 

                जसं माझ्यावर फक्त त्याचाच हक्क असणार तसंच त्याच्यावर फक्त आणि फक्त माझाच अधिकार असणार.. इतरांसाठी नसली मी परफेक्ट तरी त्याच्यासाठी मी हुबेहूब परफेक्ट असणार.. 

          असावा असाच कुणीतरी.. ज्याच्या सहवासात येताच क्षणार्धात वाटावं हाच तो माझा सोलमेट❤.. ज्याने फक्त माझ्यासाठीच जन्म घेतलाय..❤ आणि इतरांना वाटावं जणू आम्ही एकमेकांसाठीच बनलोय..

     थोडक्यात" Made for each other" असावा असा कुणीतरी.. आणि मला मिळेल तो नक्कीच, मला माहीत आहे.. कारण # internal feeling झालीय.. 


........... 

             बाकी काही नाही एवढंच बोलायचं होतं की, बाहेरचं सौंदर्य काय आज आहे, उद्या वाढत्या वयात नसणार.. पण तेच तुम्ही तुमचा जीव एखाद्याच्या स्वभावावर, विचारांवर भाळला तर नक्कीच तो स्वभाव, ते विचार चिरतरुण राहतील.. आणि तुमचं प्रेमंही.. 

             बाकी काही नाही.. काळजी घ्या.. तुमचीच सेजल अर्थात श्रावणी..