सुट्टी !!

About India vacation

“ तिकीटं बुक झाली”!!! नवरोजी नी असं सांगितल्या सांगितल्या मन लगेच जाऊन पोहोचलं भारतात....

नाही म्हटलं तरी, सुट्टी... आणि त्यातून भारतात जायचं म्हटलं, की दोन महिन्यापासून अंगात उत्साह संचारतो अगदी!!! महिन्याभराची का होईना ... पण ही भारत वारी.. मनाला सुख देऊन जाते...कामानिमित्त परदेशी राहत असलेल्यांची  .. हि सुट्टी कहाणी !

जायला अजून दोन-तीन महिन्यांचा अवकाश जरी असला... तरी हा काळ लगेच निघून जातो हे नक्की माहीत असतं.. म्हणूनच लगेच याद्या बनवायला सुरू करावे लागते... काय काय आणायचं परत येताना यावेळी? भांडी, कपडे, साड्या , हे, ते.. सर्व काही लिहून काढायचा सपाटा... सगळ्यात महत्वाची यादी म्हणजे भारतात गेल्यावर कोणते कोणते पदार्थ खायचे!!! एकही पदार्थ विसरता कामा नये!! सुरुवातीला असंच व्हायचं.. हे खायचं , ते खायचं , हे खाऊ ते खाऊ असं करता करता परत जायची वेळ यायची पण बऱ्याच गोष्टी राहून गेलेल्या असायच्या... म्हणून या यादीचा खटाटोप!!!

कुठेतरी मी वाचलं... की जेव्हा आपण एखाद्या सुट्टीवर बाहेर फिरायला जाणार असतो... तेव्हा सगळ्यात सुंदर काळ जर कोणता असेल तर तो त्या सुट्टीचा वाट बघण्याचा असतो... जेव्हा तुम्ही सर्वात जास्त खुश असता... सगळ्यात वाईट काळ म्हणजे.. परत आल्यानंतर चा... त्यामुळे सध्या आम्ही तर बेस्ट टाइम मध्येच होतो..

दरम्यानच्या काळामध्ये घरी फोनाफोनी करून झालेली असते... अमुक अमुक तारखेला आम्ही येणार हे जाहीर करून झालेलं असतं.... तिकडची मंडळीही कामाला लागतात.. हे बनव, ते बनव... सगळ्यांना अगदी उत्साह संचारतो...

जायला जेव्हा एक-दोन आठवडे उरतात, तेव्हा घरातले सगळे सामान कसं संपवता येईल याची चिंता लागून राहते. काही राहायला नको, कारण महिनाभर ते राहिलं तर खराब होऊन जाईल आणि आल्यानंतर साफसफाईचं वेगळं टेन्शन...

जेव्हा इथून तिकडे जायचं असतं तेव्हा बॅगांमध्ये भरण्यासाखं मुळात काही नसतंच... चार-पाच कपड्यांचा जोड , प्रत्येकाचे भरले, कि झाल्या बॅगा भरून!!! मन तर कधीच विमानात बसून घरी पोहोचलेलं असतं. फक्त आता सदेह जायचं तेवढं बाकी राहिलेलं असतं!

शेवटच्या दिवशी पूर्ण घरात एकवार नजर फिरवून कधी कुलूप सगळे बंद करून टॅक्सी बोलावून एअरपोर्टला पोहचतो आणि तेव्हा तर अगदी हुरळून गेल्यासारखं होतं. विमानाची वाट बघत असताना अगदी हळूच गुदगुल्या झाल्यासारखं वाटत राहतं. शेवटी जेव्हा दोन विमानं बदलून मुंबईत लँड होतो तेव्हा कधी बाहेरच्या , आपल्याला न्यायला आलेल्या सगळ्यांना भेटतो असं होतं . आणि मग तो क्षण येतो जेव्हा सगळे भेटतात ... आनंद अगदी ओसंडून वाहू लागतो सगळ्यांचा इतक्या दिवसांनी एकमेकांना पाहून !

सगळं सामान घेऊन घरी आल्यावर लगेच प्लांनिंग सुरु ... कुठे कुठे फिरायचं , कुणा-कुणा कडे जायचं , एखादं लग्न असेल तर लगेच शॉपिंग , मेहेंदी .... मावस-चुलत भावंडांबरोबर नाईट आऊट .. गावाला जायचं ... सगळे अगदी धमाल प्रवास ....चिक्कार फोटो .. मस्ती ...

माहेरी किती दिवस राहायचं , एकदम फुल्ल ऑन प्लॅनिंग !!! माहेरी आलं आणि सगळी भावंडं जमली कि बस !!! गप्पांची मैफिल अशी काही जमते कि तोडच नाही !

रोज कुठे ना कुठे भटकून, पाणीपुरी , भेळपुरी , वडा पाव , आईस्क्रीम रिचवून दिवस फुर्रकन उडून जातात आणि परतण्याची तारीख जवळ येते .... 

मग काय , पुन्हा शॉपिंग .... बॅगा अगदी ठासून भरून , चार-चारदा वजन करणे , सामान इकडून तिकडे शिफ्ट करणे , वेळप्रसंगी 2-4 किलो एक्सट्रा भरणे ... यात अगदी जायचा दिवस कधी उजाडतो ते कळतही नाही...

मग अगदी जड मनाने आणि पाणावलेल्या डोळयानी निरोप देऊन एअरपोर्ट वर कितीदातरी बाय बोलून आत जायचं ....

लवकरच पुन्हा भेटू असं बोलून ... 

घरी आल्यावर 2 दिवस तरी फार चुकल्यासारखं वाटतं .... पण तेवढंच रिचार्ज झालेलो असतो ..... पुन्हा वर्षभर झोकून काम करण्यासाठी !!

सुट्टी कहाणी ... सुफळ संपूर्ण !!

(© सावली .. स्वतःची )