शिवकाव्य कौस्तुभ भाग -१०

Shivkavya Kaustubh Part 10
पुणे नगरीचा कायापालट झाला. धर्म, संस्कृती सण साजरे करून, जपले जाऊ लागले.
जिजाऊची धैर्याशील वृत्ती, स्वतंत्र राज्य निर्मितीसाठीची असणारी जिद्द, आणि चिकाटी या गुणवैशिष्ट्यामुळे, पुण्याची दशा बदलली.
अन् या सर्व कार्याचे, खंबीर नेतृत्व करण्यासाठी शिवबांना, ती माऊली घडवत होती. आकार देत होती.

लाल महालात, जिजाऊ च्या अखत्यारीत शिवबांवर सुसंस्कारांची जपणुक करून, योग्य मुल्यांची रूजवण सुरू होती.
मावळच्या दर्या खोऱ्यात, दादाजींच्या हाताखाली, शिवबाचे शिक्षण सुरू होते. काही समशेर बहाद्दरांच्या हाताखाली राजे उत्तम समशेर चालवण्यात तरबेज होत होते. राजे खेळत खेळत शिकत होते. शिकत शिकत मोठे होत होते.
तालमीतल्या तांबड्या मातीत, माळावर, मैदानावर, आणि खलबतखाण्यातील बैठकीतही ते सारखेच रंगून जात होते. हळूहळू सगळ्यात ते तरबेज होत होत पारंगतही होत होते.
राजे सर्वांशी प्रेमाने वागत होते. गोड बोलत होते. त्यांच्या वागण्यातील खेळकरपणा, भारदस्तपणा, या गुणामुळे सहवासात येणारे लोक प्रभावित होत होती. म्हणून बालराजेही मग सगळ्यांनाच हवे हवेसे वाटत होते. सुलतानी यवनशाहीला कंटाळलेले, विटलेली जनता, या माय लेकरांच्या कामामुळे यांच्याकडे ओढ घेऊ लागली.
शिकत असताना, मावळात फिरत असताना सह्याद्रीच्या दर्या कपाऱ्यात फिरताना, शिवबाचा या सगळ्यावर जीव जडला. जनतेशी त्यांचा सहवास आल्याने, त्यांच्या विषयी जिव्हाळा, आपुलकी निर्माण झाली. आणि सुलतानी जुलुमात, अन्यायात आणि अत्याचारात, ती कशी होरपळली जात आहे.हे आपण थांबवलेच पाहिजे!आणि या प्रजेला या कचाट्यातुन सोडवलेच पाहिजे!हे त्यांनी हेरले. आणि याच सर्व वैचारिक मंथनातून 'हिंदवी स्वराज्याचे' नवनीत जन्माला आले.
पाहुया या पुढील काव्यात..

" हिंदवी स्वराज्य"..

पाहुनी भोवतीची जुलूमशाही
पाणावले डोळे शिवबाचे,
सळसळत्या रक्तात भिनले
रूप 'हिंदवी स्वराज्याचे'।।धृ।।

धरून मावळे संगतीला,
जिंकूया गड किल्ल्याला,
संपवू या गुलामगिरीला,
सुलतानी सुलतानशाहीला.
करून सुरुवात, बीज रोऊ या मराठेशाहीचे।।
सळसळत्या रक्तात भिनले
रूप 'हिंदवी स्वराज्याचे'।।१।।

मांसाहेबांच्या तपश्चर्येला,
पिताश्रींच्या सुप्त इच्छेला,
सह्याद्रीस ठेवून साक्षीला,
मूर्त रूप यावे या स्वप्नाला.
बांधून खूनगाठ मनी,कार्य हे सुराज्यनिर्मितीचे।।
सळसळत्या रक्तात भिनले
रूप 'हिंदवी स्वराज्याचे'।।२।।

मावळातील प्रजा व्हावी सुखी,
सुखाचे घास पडावे मुखी,
लेकी सुना सुखात नांदो मुलखी,
निर्भय मीरावी देवाची पालखी.
धरून हाती ढाल तलवार, निर्मावे राज्य जनतेचे।।
सळसळत्या रक्तात भिनले
रूप 'हिंदवी स्वराज्याचे'।।३।।

रामाचा आदर्श पुढे ठेवून,
दृष्टांचा संहार करून,
कृष्णा सम डाव रचुन,
मारावे कंसास ठेचून.
शौर्यात गनीमाने, जिंकावे राज्य आदिलशाही मुलखाचे ।।
सळसळत्या रक्तात भिनले
रूप 'हिंदवी स्वराज्याचे'।।४।।

शुभांगी सुहास जुजगर.

🎭 Series Post

View all