हो, माझं लग्न ठरलंय! हो, माझं स्वातंत्र्य आता जवळपास संपल्यात जमा आहे! आहेच मी सिंह(रास म्हणायचीय मला, नाहीतर घरी बोलवून अंगावर कुत्रं सोडून द्याल.) पण आता माझ्यावर दुर्गा देवी येऊन बसलीय! अजून कोणाला काही ऐकायचं आहे का?
आता तुम्हीं म्हणाल की केळं हिसकावून घेतल्यानंतर उर बडवून घेणाऱ्या गोरिला सारखं एवढं चिडायला काय झालं? सांगतो ना, सगळ्यांना विस्कटून सांगतो. हे ईरा वरचे तुमचे सगळे लेखक आणि लेखिका आहेत ना ते जाम खोडकर आहेत बरं. या सगळ्यांनी मिळून मला आजकल सेलिब्रिटी करून ठेवलं आहे. सेलीब्रिटी म्हटलं की आनंद व्यक्त करावा असं म्हणताय?? अहो ते जुन्या काळात 'M टीव्ही बकरा' म्हणून काही होतं तसा माझा त्यांनी 'शब्द मैफिल बकरा' करून ठेवला आहे. अगदी कपड्यापासून ते खाण्याचा विषय सुरू झाला की त्याची गाडी माझ्या लग्नाच्या मंडळात इतक्या झपकन वळते की बस रे बस! अजूनही विश्वास बसत नाही? सांगतो, सगळं सांगतो आणि हो हे सिक्रेट अगदी फ्री आहे बरं का! प्रो सिक्रेट नाहीच!
आता तुमच्या लाडक्या मंडळींनी माझ्यासोबत काय केलं असेल सांगू? माझं लग्न ठरलं, साखरपुडा झाला. शास्त्रानुसार मी व्हाट्सएपच्या स्टेट्सला फोटो ठेवले. ( आता या गोष्टीचा आनंद व्यक्त करू नयेत हे मला नंतर साऱ्या लेखकांनी एकसुरात सांगितलं ते वेगळं. काही झालं तरी शेवटी मित्रच ओ ते, स्वतःचे भोग आठवून सावध करण्याचा प्रयत्न करत होतेच पण शेवटी नशीबाने उलटं फिरायचं ठरलं की ते तर फिरतंच असं म्हणतात.)
तर त्याचं काय आहे ना, त्या तिकडे आमच्या एक धातू भगिनी ( आम्ही तांबे अन त्या लोखंडे म्हणून.) आहेत, श्रावणी मॅडम (त्याच त्या , हो.. त्याच त्या.. "आण वाल; टाक सुकट" संघटनेच्या अध्यक्षा, "लेकाला दे झापडी; नवऱ्यासाठी वाल-पापडी " संस्थेच्या संस्थापिका); खूप मागे लागल्या की एकदा तरी बायकोचं दर्शन दाखवा. आता दर्शनाच दर्शन दुर्मिळच म्हणावं तरी कोणी ऐके ना. शेवटी वाचव रे बाबा म्हणून ईश्वराला मनातल्या मनात साकडं घातलं तर माझ्याकडे पोहचण्याइतपत तुझं बजेट नाही म्हणून देवानं पळवून लावलं की राव. त्यात कहर म्हणजे; एरव्ही 'लोक बोंबलो, मी झोपलोय' वरदान लाभलेले ग्रुपवरील ईश्वर सर पचकलेच. त्यांच्या समर्थनार्थ 'लिही रेसिपी; पण नको देऊ समोसे' वाल्या शगुफ्ता मॅडम उतरताच आंदोलनाला चांगलीच धार आली होती.
शेवटी माझ्या वर आलेले दडपण पाहून आमचे मित्र सारंग सर मदतीला धावून आले आणि ते बाहेर बागेत, काहीश्या मोकळ्या हवेत घेऊन गेले. मी आपला केविलवाणा चेहरा करून इकडे तिकडे हिरवळ (झाडांची) पाहण्यात रमलोच होतो की सारंग सर खो खो हसू लागले.
'अहो, झाडांवर प्रेम करा, झाडाखाली नको'- ते आपलं नेहमीच्या शैलीत बोलून गेले. ते तसं बोलताच मागच्या झाडाने सळसळ हलत माझी टेर उडवण्याचा पुरेपूर प्रयत्न केल्यासारखा मला भास झाला.
अरे होय खरं, आता 'शेतकरी हक्क संघटना, शब्द मैफिल शाखा' यांच्या अखत्यारीत म्हटल्यावर हे असंच काही तरी म्हणणार हे मी विसरलोच होतो.
'मग मी काय करावं असं आपणांस वाटतं?'- मी आपलं शरणागती पत्करून त्यांना विचारलं.
'आपण वृक्षारोपण करूयात, आणि त्यात तुम्हीं त्यांना आणा.'- ते संयमी उत्तरले.
त्यांनी तसं म्हणताच पायावर धोंडा नव्हें सॉरी; अक्खा पर्वत पाडून घेणं याचा याचीदेही अनुभव आला. शेवटी काही न काही करून टाळाटाळ करावी तर हे पडले पक्के कोल्हापूरकर. जबरदस्ती आमच्या तिला फोन करायला लावलाच.
'हॅलो, दर्शना..'- चाचरत मी म्हटलं. ( दशहत नाही ओ, येणाऱ्या संकटाची तिलाही चाहूल लागावी यासाठीचा तोकडा प्रयत्न.')
'हा बोला.. बोला ना..आज चक्क तुमचा फोन?'- पलीकडून ती लाडात. आश्चर्य अन इन्सल्ट एकाच वाक्यात! (स्रियांकडे असलेलं उपजत वरदान).
'आपल्याला भेटायचं आहे.'- माझे शब्द हळुहळु मध्यमवर्गीय स्वप्नासारखे कमी कमी होऊ लागले होते.
'काय? खरंच? कधी?'- पलीकडून उत्सुकता.
'वृक्षारोपण कार्यक्रमात'- मी राजधानीच्या स्पीडने बोलून तात्काळ रामरक्षा म्हणायला घेतली.
'काय????'- पलीकडचे तापलेले वातावरण माझ्यापर्यंत पोहचले असले तरी मी एका स्थितप्रज्ञ साधुप्रमाणे शक्य तेवढे निर्विकार भाव चेहऱ्यावर आणले. ( नाहीतर माझ्या घाबरण्यावरून ग्रुपवर अजून कोलाहल झाला असता ते वेगळं).
शेवटी बऱ्याच विनंतीवरून आमच्या त्या; आमच्या पहिल्या भेटीसाठी तयार झाल्या. निमित्त काय? म्हणे वृक्षारोपण!कपाळावर हात मारावा की हातावर कपाळ मारावं इथवर गोंधळ वाढला होता.
दोन दिवसानंतरचा दिवस ठरताच माझ्या मनात धडकी भरली होती. कारण भले तोफगोळा कोसो दूर असला तरी दशहत तेवढी कायमच असते म्हणा.( या दोन दिवसांत सगळी संभाषण मी नुसते हम्म, हं , ठिक आहे, ओके या असल्या उत्तरांवर काढलीत ती गोष्ट वेगळी).
शेवटी एकदाचा दिवस उजडला, आता त्यासोबत माझं बरंच काही उजडणार होतं ते मला आतून तेव्हाच कळलं की जेव्हा 'आय हेट पिंक' म्हणणाऱ्या नवऱ्यासाठी अक्ख मार्केट पालथं घालून त्याच्या आवडीच्या रंगाची साडी शोधणारी माझी बायको अंगावर जिकडे जमेल तितका गुलाबी रंग पांघरून आली.
ओळख परेड झाल्यावर 'लेखणीत दिवे अन शेतीत पिके' मंडळाचे उपाध्यक्ष असलेले सारंग सर बोलते झाले. मोजक्या शब्दांत सूचना देत कार्यक्रम सुरू झाला.
प्रत्येकाने आपापल्या सोयीनुसार अवजारे उचलली. माझं लक्ष दर्शनाकडे. आता ती जे काही उचलणार त्यावरून नेमकं डॉक्टर वृंदा की डॉक्टर सुप्रिया यांपैकी कोणाची अपॉईंटमेंट घ्यावी ते ठरणार होतं. ऋतुजा मॅडम कडून पेनकिलर घेणं तर जवळपास निश्चितच होतं.
शेवटी तिने पाण्याचा झारा उचलला तेव्हा कुठे जिवात जीव आला आणि तो झारा प्लास्टिकचा आहे कळल्यावर तर काहीसं हायस वाटलं. (कधी बेसावध असताना डोक्यात हाणला तरी फारसं लागलं नसतं त्याने. तशी ती गरीब गाय आहे पण गाईला शिंगपण असतात या वास्तवाकडे दुर्लक्ष करणे धोक्याचे ठरले असते.)
'चला झाडं लावूया. हे असं प्लॅन करून दिवे तर लावलेच आहात तर आता ज्यासाठी आलोय ते तर करूच.'- तिने थंडपणे म्हटलं तसं मला गारठायला झालं.
' गुलाबी ड्रेसमध्ये तू अगदी गुलाब वाटतेस बघ.'- मी आपलं वातावरण हलकं करण्याचा प्रयत्न केला.
प्रतिउत्तर म्हणून तिने बाजूलाच पडलेली कुदळ उचलली तसा माझा रक्तदाब हळूच नेत्यांच्या आश्वासनासारखा मध्येच वाढला.
'हे? हे कशाला?'- मी चाचरत विचारलं.
'ढेप'..
'नाही पूजा आदेप.. अनुभव आणि किस्से वाल्या..'- मी गोंधळून म्हटलं.
'अहो, जमिनीतल्या ढेप बाजूला करायला आणि खड्डे खोदायला घेतलीय. घ्या.'- तिने तोंड वाकडं करत कुदळ माझ्या हातात
जवळपास फेकलीच.
'थांबा तुम्हीं आधी का?'- सगळ्यांच्या आधीच मी पुढे सरसावलो तसं तिने अडवलं.
'नाही बा.. त्या तर राधिका. राधिका कुलकर्णी मॅडम, बटाट्याच्या चाळीच्या कॅप्टन. त्यांची विघ्नहर्ता वाचूनच तर मला लिहावंसं वाटलं.'- माझ्या कानांनी पुनः घोळ घातला होता.
'अहो, आधी बाकी काय करतात ते पाहूया, तुम्ही कुठे पुढे पुढे धावताय?'- तिने काहीसं चिडून म्हटलं.
'आता कळलं लग्न झाल्यावर धावपट्टू कायम मागे का राहतात. बायकांचं ऐकतात बिच्चारे!'- सवयीने मी कुऱ्हाडीवर पाय आपटला होता.
तिने एकवार आकाशाकडे पाहून एक हुसासा भरला, कदाचित टाईम मशीन असती तर तिने मला होकार दिलेला क्षण नक्कीच बदलून घेतला असता.
'वाघिण आली वाघीण आली..'- कोणीतरी मध्येच ओरडल तसं ती काहीशी घाबरली.
'अग, ते प्रियंका पाटिल मॅडम बद्दल बोलत आहेत, जयसिंगपूरची वाघीण असं संबोधून निधी मॅडमनी त्यांना शेंडी लावलीये. वाघिण कधी शाकाहारी असते का??'- मी पुन्हा पांचट विनोद फेकला तसं तिने पुन्हा तोंड वाकडं केलं.
'चला, लोक कामाला लागली. इकडे या..'- आदेश आला.
'किमया.. किमया मुळावकर त्या. ज्वारीच्या पिठाला ज्ञानपीठ म्हणणाऱ्या'- तिने पुढे बोलायच्या(सूनवायच्या असं हवं का इकडे?) आधीच मी शांततेचं नोबेल स्वतःहून स्वीकारलं आणि तिच्या मागे चालू लागलो.
'व्वा, केवढी छान नक्षी!'- समोरच एकमेकांत गुंफलेल्या वेलींकडे पाहत ती बोलली.
'हा.. मिनाक्षी ताई पण छान लिहितात. जेष्ठ अन श्रेष्ठ असल्या तरी छान बोलतात.' - मी आपला पटकन बोलून गेलो.
'पुरे झालं ते ईरा पुराण. चला झाडं लावूया.'- आता कडकडीत शब्दांत आज्ञा आली.
'पुढे सुट्टी कधी? संडे?'- निरागस प्रश्न.
'देशपांडे मॅडम, अपूर्वा देशपांडे सांभाळतात बाल ईरा, त्यांना विचारा'- मी सोबतच्या एका लेखिका मॅडमना म्हटलं.
'धध्म'- पाण्याचा झारा आपसूक हातातून खाली सटकला की तो आपटला गेला याचा शोध लावण्यापेक्षा 'सगळ्यात आधी बायकोचं म्हणणं ऐकावं' हे लगेच कळून चुकलं होतं.
मी आपला केविलवाणा चेहऱ्याने तिच्याकडे पाहू लागलो तर ती डोळे मिटून शांतपणे दिर्घ श्वास घेत होती. बहुधा चारचौघांत होणाऱ्या नवऱ्याला धुता ( हो. तेच तुमच्या मनातलं- हाणायला) न येण्याची विवशता ती कंट्रोल करत असावी. लेकीला छान संयम शिकवल्याबद्दल सासू-सासऱ्यांचं मनातून आभार मानत परत असा पोरकटपणा न करण्याचं मी मनात ठरवून टाकलं.
'मोर आहे.. मोर.. हे..'- ती मध्येच डोळे उघडून बोलली..
'नाही. निशा थोरे हे वह.. शब्द मैफिलच्या अलका कुबल. 'सापाचे चंदनाला वेटोळे' तत्वज्ञानाच्या कट्टर समर्थक आहेत त्या.
पुन्हा एकदा विवेक बुद्धीने माती खाल्ली होती. दर्शना मॅडम मला अगदी खाऊ की गिळू नजरेने पाहत होत्या तर मी आपला अंग चोरून, खाली मान घालून उभा होतो. तिला समोर आलेला मोर दाखवायचा होता.
'सॉरी हा..'- मी ओशाळलयासारखं म्हटलं.
'मुर्गा व्हा.. मुर्गा.'
'कोण? दुर्गा? पुढचा पार्ट आला नाही अजून. मेघा मॅडम तिच्या लग्नाच्या शॉपिंगला गेल्या आहेत. लिहितील सवडीने..'- मी पायाने माती उरकत म्हटलं.
'सगळंच मातीमोल..'- कपाळावर हात मारल्याचा आवाज आला.
'नाही, मेघा अमोल..'- मी ठार बधीर बनलो होतो.
'अजून कोणी लेखक किंवा लेखिका बाकी आहेत की त्यांची पण नाव घेणार आहात??'- त्रासिकपणे तिने विचारलं.
'तसे तर तिथे एका पेक्षा एक आहेत, सगळेच छान लिहितात. प्रत्येकाचा एक स्वतःचा वाचक वर्ग आहे. आता माझा ही स्वतःचा एक हक्काचा वाचक असेल. हो नं? '- मी डोळे मिचकावत विचारलं.
'तुम्हीं पण ना..'- मॅडम काहीश्या लाजल्या तसा माझा जीव भांड्यात पडला ( नाहीतर माझं खड्डयात पडणं जवळपास निश्चितच होतं.)
'मला खरंच आवडलं इथे येऊन, सर्वांना भेटून. '- तिने सभोवताली सर्व लेखक आणि लेखिकांकडे नजर फिरवत म्हटलं.
काही वेळ अशीच शांततेत गेल्यावर अश्विनी मॅडमनी जवळ येत कानात म्हटलं- ' घाबरलात का ओ सर? एवढ्यातच?'
'हो, अगदी कुणाल सरांसारखं वाटतंय.'- मी काहीसा सावरलो होतो त्यामुळे मी परत टोला दिला होता.
'हे घ्या, वाचून दाखवा त्यांना'- दर्शनाच्या नकळत त्यांनी एक कागद माझ्या हाती सरकवला.
कागद उलगडताच नामदेव सरांच्या अक्षरातल पत्र दिसलं. मनात म्हटलं की चला एकतरी चांगलं होतंय. सरांनी लिहिलेल्या काही रोमँटिक ओळी मी सगळ्यांसमोर तिला वाचून दाखवल्या तशी तिची कळी चांगलीच खुलली.
' अरे व्वा! गुलाब चांगलंच लाल झालं म्हणायचं तर!'- मी चिडवण्याचा चान्स थोडीच सोडणार होतो.
तिला लाजलेले पाहून सगळेच हसू लागले तशी ती पटकन माझ्यामागे लपली. पुन्हा एकदा चांगलाच हशा पिकला होता.
'मग मयुरेश, पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटायचं का वृक्षारोपण कार्यक्रमाला??'- ईश्वराला पुन्हा जाग आली होती.
'कुदळ कुठे गेली ती?'- मी तावातावाने बोलताच अजून एक हास्य विस्फोट झाला आणि यावेळेस आमचे डॉन पण त्यात शामिल झाले होते.
समाप्त.
ईरा व्यासपीठावर लिहायला सुरुवात केलेल्याला आता जवळपास वर्ष होत आलं. विनोदी कथेने सुरुवात केल्याने वर्षपूर्तीही विनोदी कथानकातून साजरी करण्याची इच्छा या निमित्ताने पुर्ण झाली. सदर कथा हि विनोदी असून; ईरा परिवारातील लेखक आणि लेखकांची नावे त्यांना न विचारता घेतली आणि नुसती घेतली नाहीतर त्यावरून थट्टा मस्करीही लिहिली त्याबद्दल सर्वांची क्षमा मागतो. कोणी दुखावलं गेल्यास, मोठया मनाने माफ करावं हि नम्र विनंती!
बाकी विनोदी लिखाण हा काही माझा प्रांत नाहीच तरीही प्रयत्न केलाय. वाचक मायबापानीं आपले अभिप्राय नक्कीच कळवावेत.
तसेच येत्या २४ डिसेंबर रोजी मी कु. दर्शना हिच्यासोबत विवाहबद्ध (बंधनात) होतोय तर आपले सर्वांचे शुभाशीर्वाद आमच्या सोबत असावेत हि नम्र विनंती!
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा