वेळ - लघुकथा

वेळ - लघुकथा


"पाच वर्ष झाली रे.. आईबाबांना भेटला नाहीयेस तू.. मान्य आहे की, तिथे सगळं छान आहे.. पण कधीतरी तिथल्या व्यापातून वेळ काढ आणि येऊन भेट त्यांना.

विडिओ कॉल वर चेहरे दिसतात फक्त.
आता या वाक्यावर घरपण दिसतं विडिओ कॉल वर हा पांचट जोक मारू नको.. 

ते दाखवत नसतील पण आतून तेही तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसलेत..  तुलाही आठवण येतच असेल ना त्यांची.. भावना जिवंत असेपर्यंत त्या जपायच्या असतात.. वेळ निघून गेली की, कशाला काही अर्थ नसतो..

" शब्दात कितीही माया असली, तरी त्याने स्पर्शातल्या मायेची उणीव नाही भरून निघत.. "   :  मैत्रेयी


मैत्रेयीचा मेसेज विवान च्या व्हाट्स अँप नोटिफिकेशन मध्ये पॉप अप झाला.


इतक्या रात्री कुणाचा मेसेज असेल ???  नक्कीच ती येडपट मैंत्रेयी असेल.. तिला नाहीतरी रात्री 12 नंतर झटकेच येतात... बघूया आज कुठला झटका आलाय मॅडम ला..

असं म्हणत विवानने मैंत्रेयीचा मेसेज ओपन केला. मेसेज वाचताच क्षणी त्याच्याही नकळत त्याच्या डोळ्यात पाणी तरळलं.. त्याने स्वतःला सावरलं आणि घाईने मेसेज type करायला घेतला.


तू बोलतेस ते बरोबर आहे.. पण इथला व्यापही वाढलाय.. अर्धवट सोडून नाही ना येता येत.. जीव माझाही तुटतो.. पण काहीच पर्याय नाहीये..  या एक दोन वर्षात येण्याचा नक्की प्रयत्न करेन.. आणि खूप खूप Thank you तुझ्या या मेसेज साठी..   :  विवानचा रिप्लाय


त्याने मेसेज type केला खरा.. पण शब्द इकडे तिकडे झाले होते.. मैंत्रेयीला पक्कं माहित होतं की, जेव्हा विवान इमोशन्स बाजूला ठेवत वरवर strong असल्याचं दाखवतो, तेव्हा त्याचं टायपिंग असंच असतं इकडम तिकडम..


तिने तो मेसेज नीट वाचला आणि त्याला परत नॉर्मल करायला म्हणाली..


Thank you काय नुसतं.. पाया पड..  :  मैंत्रेयी


दोघेही ऑफलाईन गेले.

इकडे विवानला आईबाबांच्या आठवणीने डोळ्यातलं पाणी थोपवता येत नव्हतं तर तिकडे मैंत्रेयी आपण आपल्या मनात जे आलं, ते बोलून मोकळं झालो.. या विचारात समाधानाने झोपी गेली.


 भावना वेळीच जपल्या तर त्या पुढेही जीवंत राहतात.. वेळ निघून गेल्यावर कल्पनेचं आभासी मृगजळ वास्तवातलं सुख नाही देऊ शकत.. त्यासाठी वेळीच आपल्या माणसांसाठी वेळ काढावा लागतो..