वांझोटी ( लघुकथा.. ईरा.. अष्टपैलू लेखक महासंग्राम स्पर्धा)

लघुकथा (अष्टपैलू लेखक महासंग्राम स्पर्धा)
।। वांझोटी ।।

( लघुकथा.. ईरा... अष्टपैलू लेखक महासंग्राम स्पर्धा.)


ती अशा कार्यक्रमांना कधीच हजेरी लावत नसत. आता आता तर अशा लोकांचा ऊबग आला होता तिला. तेच लोकं, तेच प्रश्न आणि तिची ठरलेली ऊत्तरं. नाईलाजाने का होईना पण आज जावंच लागणार होतं. तिच्या नणंदेचं , सीमाचं डोहाळे जेवण होतं. किती आग्रहाने तिने आपल्या लाडक्या वहिनींला आमंत्रण दिलं होतं. असंही तिचं दादा आणि वहिनीशिवाय होतं तरी कोण? आई, अण्णा निवर्तल्यानंतर वहिनींनेच तिचं माहेरपण जपलं होतं आणि केवळ याच कारणामुळे सीमा वहिनींशिवाय या कार्यक्रमात सहभागी होणार नव्हती. प्रसंगी तिने आजेसासूंचाही रोष ओढवून घेतला होता.

"अशा वांझ स्रियांना डोहाळे जेवण सारख्या शुभप्रसंगी आमंत्रण म्हणजे आपण होऊन पायावर धोंडा पाडण्यासारखे आहे. वांझोटी सावली गर्भार स्री वर पडू नये मुली. " आजेसासू आपली नाराजी प्रकट करत होत्या.

" मी कधीच एकही शब्दाने कुणाला काहीच बोलले नाही पण वहिनीशिवाय मी हा कार्यक्रम पार पडणार नाही आणि हा माझा शेवटचा निर्णय आहे. " रडतच सीमा आत निघून गेली.

आई निवर्तल्यानंतर सीमाने ऊगाचच केलेला आकांडतांडव, वहिनींना दिलेला त्रास आणि ईतकं सगळं करूनही जातांना आईच्या सर्व दागिन्यांसहित तिची पाठवणी करतानाच ,

"तुझं माहेर मी आहे तोपर्यंत तरी परकं होणार नाही"

म्हणत जेव्हा वहिनींनी तिच्या डोक्यावर हात फिरवत तिला जवळ घेतलं , तेव्हा सीमाने जोरात हंबरडा फोडला होता. असं करताना ती वहिनीच्या कुशीत विसावली होती. एक एक प्रसंग सीमाच्या डोळ्यांसमोर तरळत होता. आजेसासू वगळता तसं ईतर कोणाच्या कसल्याही विरोधाचं काही कारण नव्हतंच. सीमाचं सासर सुशिक्षित आणि संपन्न परिवार होतं. असं असलं तरी कुठेतरी सीमालाही अजून कुणी काही वहिनीला बोललं तर ते आपल्यालाच सहन होणार नाही या काळजीत ती पडली. अखेर तो दिवस ऊगवलाच.

सीमाच्या घरात पै पाहुण्यांची लगबग सुरू होती. डोहाळे जेवणाचा कार्यक्रम असला तरी झाडून सर्व नातेवाईक ऊपस्थित होते. नखशिखांत सजलेली सीमा गर्भार असूनही अगदी नवीन नवरीसारखी भासत होती. तिचे डोळे वहिनीचीच वाट पाहत होते पण ती अजून आली नव्हती. चार ते पाच काॅल करून झाले होते पण वहिनी फोन ऊचलत नव्हत्या. नाईलाजाने अखेर सीमाने नाराजीनेच कार्यक्रम सुरू करण्यास होकार दिला. ईकडे कार्यक्रम सुरू झाला आणि तिच्या दादा आणि वहिनीचे आगमन झाले.
फिक्या गुलाबी रंगाची साडी, मोत्यांचे दागिने, कमरेपर्यंत रूळणारी वेणी ,डोक्यात माळलेला सुवासिक गजरा . साक्षात लक्ष्मीचं रूप वाटत होत्या वहिनी. कित्येक नजरा त्यांनाच निरखत होत्या. लग्न होऊन दहा वर्षे झाली तरी ही अजून जशीच्या तशी? कसं शक्य आहे? कुजबूज सुरू झाली होती.

"काय जातंय असं रहायला? आहे का मुल ना बाळ? वांझोटी मेली, असल्या कार्यक्रमांमध्ये बोलवतातच का अशांना? " तिचं मोहक रूप पाहून तिरस्काराने कुणीतरी ओकलंच. आनंदाने या कार्यक्रमात सहभागी होणार्‍या वहिनींचा कंठ दाटून आला. डोळ्यांना अश्रू अनावर झाले आणि हुंदका देत त्या बाजूला होणार तोच सीमाच्या आजेसासू पुढे सरसावल्या. आता मात्र सीमाची पाचावर धारण बसली. काहीतरी अघटीत होणार या भितीने सीमाचा चेहरा काळवंडला.

" कोण बोललं या वांझोटी आहे म्हणून? बिशाद असेल तर सामोरं या. " सीमाच्या आजेसासू कडाडल्या.

" ही सीमाची आई आहे आणि होणार्‍या बाळाची आजी.. समजलं का सर्वांना? " सीमा तर आश्चर्यचकीत होत आज्जींना पहातच राहीली. ईकडे वहिनीही आज्जींच्या या बोलण्याने बर्‍याच सावरल्या. कार्यक्रम व्यवस्थित पार पडला. निघताना वहिनी आजीच्या गळयात पडून खूप रडल्या. त्यांचं सांत्वन करताना आजीने बंद मुठ ऊघडली, ऊपस्थित सर्वांचे डोळे चकाकले. चक्क पुजाघरातील बाळकृष्णाची चांदीची छोटीशी मुर्ती आजींनी वहिनींना सोपवली होती. ज्यास त्या प्राणपणाने पुजत आल्या होत्या. सीमाही आता मला क्षमा करा म्हणत आजीच्या गळयात पडून रडू लागली. आजींचा वहिनींना या कार्यक्रमात येण्यासाठी विरोध केवळ याच एका गोष्टीमुळे होता की, अशा कार्यक्रमांमध्ये लोकं मुल नसलेल्या स्री ला कावळयांप्रमाणे टोच्या मारत तुटून पडतात आणि हेच त्यांना नको होतं पण सीमापुढे त्यांचा नाईलाज झाला होता.

" पोरी, माझा बाळकृष्ण तुझ्याकडे सोपावलाय. त्याला नीट जप. लवकरच तुझ्याघरी त्याचं आगमन होईल, जसा माझ्याघरी झाला होता. ही मुर्ती माझ्या सासूबाईंनी मला सोपवली होती. त्यांना ठाम विश्वास होता की आपल्या घरी गोकुळ नक्कीच नांदेल. त्यांचा विश्वास खरा ठरला. माझ्या घराचं गोकुळ झालं. त्याच विश्वासाने हे तुझ्याकडे सोपवतेय. पुढच्या वेळी येतांना दोघं नाही तिघं या. "

वहिनींनी मुर्ती डोक्याला लावली आणि छातीशी कवटाळताना तिला आताच आई झाल्याचा भास झाला. त्याच अत्यानंदात ती परतीच्या प्रवासाला निघाली.

आपलाच समीर खान ©®

( आपला बहुमुल्य अभिप्राय नक्की द्या. लाईक, कमेंटरूपी उपस्थिती नक्की नोंदवा ?

सदर कथेत निःसंतान स्री चं भावविश्व रेखाटलं आहे. यात काही भावनिक बंध अतिशय तरल शब्दांमध्ये रेखाटले आहेत. यात कुठेही दैववाद किंवा अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या कुठल्याही प्रथेचं उदात्तीकरण नाही याची नोंद घ्यावी. जी गोष्ट आपल्याला प्राप्त नसते कधी कधी त्या गोष्टीचा छोटासा अंशही निराश झालेल्या जीवाला नवसंजीवनी प्राप्त करून देतो हा संदेश या कथेतून देण्यात आला आहे.)