लेखिका खुशी शिंदे : संघर्षातून फिनीक्ष भरारी

ईरा : शब्दांचे भावविश्व


लेखिका खुशी शिंदे : संघर्षातून फिनीक्ष भरारी

जीवनात संकटे आवासून उभी असतात.त्या संकटाना धीराने तोंड दिल्यास जीवन अधिक गतीमान होते.पण तितकी आपल्यात क्षमता असावी लागते किंबहुना आपल्यात जास्त कष्ट आणि जिद्द करण्याची तयारी असावी लागते.ही जिद्द जेंव्हा महिलांच्यात पाहायला मिळते तेंव्हा त्यांचा आत्मविश्वास किती बुलंद असतो हे जाणवते.जीवनात एखादा प्रसंग असा येतो की तो बरेच कांही शिकवून जातो.या काळाच्या कसोटीला आपण कसे तोंड देतो यावर आपली कार्यकुशलता दिसून येते.अशाच आपल्या लेखिका आणि प्रेरणेचा स्तोत्र कायम देणा-या आदरणीय खुशी शिंदे यांचे जीवनही संघर्षमय परिस्थितीतून यशदायी बनले आहे.

वयाच्या तेवीसाव्या वर्षापासून पोलीस आॕफिसर होऊन समाजाची सेवा करत रुबाबदार आयुष्य जगण्याची इच्छा होती पण नियतीला वेगळच मान्य होते.अकॕडमीची फी भरायला पैसे नाहीत म्हणून त्यांना अपमानीत करण्यात आले आणि याच मनातील ठीणगीने जीवनाचा विचार प्रवाह बदलला.अशा अनेक प्रसंग व अनाथ म्हणून काढलेल्या हालअपेष्टा त्यांना खूप कांही शिकवून गेल्या.शालेय जीवनात मुळची हुशारी कामी आली.कथा , कविता लिखाणाची आवड.वत्कृत्व नसानसांत भिनलेलं त्यामुळे सर्व गुरुजनांची आवडती विद्यार्थिनी त्या होत्या.शालेय जीवनात अनेक स्पर्धा गाजवल्या.स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.आष्टी येथील वत्कृत्व स्पर्धेचा प्रसंग तर अंगावर शहारा आणणारा होता.तेथील बसस्टॕंडवर काढलेली रात्र आणि कंडेक्टरने दिलेली भाजी आणि भाकरीने त्यांची भूक शममली होती.नंतर तो बक्षीसाचा मिळालेला पाच हजाराचा लिफाफा मन आनंदीत करत होता.खुशीजींच्या अशा प्रसंगातून त्यांचे जीवन किती संघर्षमय होते ते स्पष्ट होते.

पुढे त्यांची भेट मानवी हक्क अभियानाचे अॕड.एकनाथ आव्हाडांची भेट झाली .त्यांच्या प्रोजेक्टवर फिल्ड आॕफीसर म्हणून काम केले व शिक्षणही पूर्ण केले.नंतर त्या स्पर्धा परिक्षेची तयारी करण्यासाठी पुण्यात आल्या तेथे त्यांची भेट अशोकशी झाली.तेथे त्यांचे प्रेमाचे धागे जुळले आणि जीवनाला वेगळी कलाटणी मिळाली,खुशी शिंदेच्या खुशी काबळे झाल्या.दोघात विचारांचा ताळमेळ बसला.एकमेकांची खंबीर साथ लाभली.मनात विशाल कल्पनेने जाग आणली आणि " अग्नीपंख अकॕडमीची " निर्मिती झाली.नवीन अकॕडमी त्यामुळे तितकासा प्रतिसाद मिळाला नाही.पण हार मानली नाही.हळूहळू अग्नीपंखला प्रसिद्धी मिळाली.मुलांचा ओघ वाढू लागला आणि अग्नीपंखला सोनेरी दिवस आले.

आज अग्नीपंख ने भरारी घेतली आहे.खुशीजींची त्यामुळे सर्वत्र प्रसिद्धी झाली आहे,अनाथ व गरीब मुलांना प्रशासकीय अधिकारी बनन्यासाठी " शिवराज बहुउद्देशिय विकास संस्था स्थापन केली आहे.मुलांना राहण्यासाठी सोय व्हावी म्हणून होस्टेलचे बांधकाम चालू आहे.ज्यांना कोणताच आधार नाही अशा अनाथ मुलींना , स्रीयांना " माहेरवाशीण " नावाचे संकूल बांधण्याचा संकल्प खुशीजींचा सुरु आहे.तो लवकरच पुर्णत्वास जाईल आणि अनाथाना " प्रेमळ माय " मिळेल.

निखारा जसा तावूनसुलाखून निघतो तसे त्यांचे जीवन घडले आहे.स्वतः मुलांना प्रशिक्षण देऊन त्यांच्यात जिद्द निर्माण करत आहेत.सक्षम पिढी निर्माण करुन तरुणांना अधिकारी बनण्याचे स्वप्न त्या साकार करत आहेत.आशा महिलांच्या कतृत्वाने आणि विचारांने भारत देश समृद्ध होईल.तिरंगा अभिमानाने फडकेल.महिलांना मायेचा आधार मिळावा म्हणून माहेरवाशीण ही संकल्पना खरोखरच अनुकरणप्रिय आहे.परिस्थितीशी झुंजत यशाला गवसणी घालणाऱ्या खुशीजींचे कार्य हे प्रेरणादायक आहे.यातूनही त्या लेखनासारखा छंद जोपासत आहेत.त्यांच्यासारखे हरहुन्नरी व्यक्तीमत्व ईराला लाभावे हे भाग्य आहे.त्यांंचे हे कार्य असेच चालू रहावे , यासाठी त्यांना आणखी उर्जा मिळावी , नवे अधिकारी निर्माण व्हावेत यासाठी या हिरकणीला खूपसा-या शुभेच्छा ...!!

©®नामदेवपाटील